थेट ‘सीआयए’चीही मदत भारताच्या एका गोपनीय फौजेची उभारणी करण्यात कशी झाली, याबद्दल एका पुस्तकात माहिती मिळतेच, पण पुढे याच फौजेने बांगलादेश युद्धातही महत्त्वाची कामगिरी केली.. त्या पुस्तकाबद्दल, बांगलादेश मुक्तियुद्धास ४५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने..
भारताने १९५९ मध्ये तिबेटी दलाई लामा यांना भारतात आश्रय दिला आणि यामुळे भारत आणि चीन सीमेवर कायम चकमकी सुरू झाल्या. ३,२२५ किलोमीटर लांबीच्या सीमेचा प्रश्न चिघळला गेला आणि सीमेवरील खुपशा ठिकाणी चीनला आमची लष्करी पोस्ट खुपायला लागली. उभय देशांतील वाटाघाटींचा काहीही उपयोग झाला नाही आणि शेवटी २० ऑक्टोबर १९६२ रोजी चीनने भारतावर आक्रमण केले. स्वातंत्र्यानंतर १५ वर्षांत भारत सरकारची राजनीती आणि रणनीती दोन्ही आपले पावले रोवायच्या प्रयत्नात होती. पूर्वोत्तर आणि उत्तरेत चीनला लागून असलेल्या सीमा प्रदेशातील १४,००० फूट उंचीवरील आपले सैन्य कमकुवत पडायला लागले होते. याचा फायदा चिनी सेनेने घेऊन उत्तरेकडील चुशुल भागातील रेजांग-ला आणि ईशान्य प्रदेशातील तवांगवर कब्जा केला. २० नोव्हेंबर रोजी युद्धविराम झाला. याच वेळी अमेरिका आणि सोव्हियत युनियन या दोघांनाही, क्युबाकडे असलेल्या आण्विक क्षेपणास्त्राची भीती भेडसावीत होती आणि त्यामुळे या दोन्ही महासत्तांनी त्या वेळी भारताला काहीही मदत केली नाही.
भारत सरकारने त्यानंतर अमेरिकी गुप्तहेर संघटना सीआयए आणि तिबेटच्या मदतीने गुप्तपणे एक सैनिकी गट तयार केला. तिबेटची अस्तित्वाची लढाई चीनविरुद्ध चालूच होती. या गुप्त गटातील तिबेटी युवकांना खास प्रशिक्षण देण्यात आले. हे युवक चीनविरुद्ध उंच प्रदेशात लढू शकतील आणि एक प्रकारे भारतीय सेनेकरिता संरक्षक ढालीचे काम करतील, अशी आशा होती.
केनेथ जे कॉनबॉय आणि जेम्स मॉरिसन यांच्या ‘द ‘सीआयए’ज् सीक्रेट वॉर इन तिबेट’ या पुस्तकात या सर्व योजनेचा तपशीलवार खुलासा केलेला आहे. नेपाळमधील खमपा या लढवय्या युवकांना प्रशिक्षित करणे हा या योजनेतील सीआयएचा महत्त्वाचा भाग होता. याआधी १९५७ मध्ये अशाच काही नेपाळी खमपा युवकांना चीनविरुद्ध हेरगिरी आणि लढण्याचे प्रशिक्षण कॅम्प हेल- कोलोरॅडो येथे देण्यात आले होते. त्या वेळी त्या योजनेला ‘एस टी सर्कस’ असे गुप्त सांकेतिक नाव दिले गेले होते. जवळजवळ २५० नेपाळी गरिलांना प्रशिक्षण देऊन, चीनमध्ये चीनच्या सेनेचे नुकसान करण्याचे काम अमेरिका करीत होती. आता अशाच प्रकारे खमपांचा उपयोग करून घेण्यासाठी त्यांना भारतात प्रशिक्षण देण्यात येणार होते. या कामासाठी भारतीय गुप्तहेर खाते, सीआयए आणि तिबेटची चुशी गंगडूक संघटना यांनी एकत्रित येऊन एक विशेष गट तयार करण्याची योजना आखली होती. या विशेष गटाची माहिती अनेक वर्षे गुप्त ठेवली गेली. या कानाचे त्या कानाला सुद्धा कळू न देण्याची खबरदारी घेतली गेली.
१४ नोव्हेंबर १९६२ साली विशेष सीमांत बल म्हणजेच ‘स्पेशल फ्रॉन्टियर फोर्स’ची निर्मिती करण्यात आली. मेजर जनरल सुजान सिंग उबान (निवृत्त) हे या स्पेशल फ्रॉन्टियर फोर्सचे प्रथम इन्स्पेक्टर जनरल नियुक्त केले गेले. दुसऱ्या महायुद्धात उत्तर आफ्रिकेमधील युद्धात मेजर उबान यांना मिलिटरी क्रॉस देऊन सन्मानित केले गेले होते. त्या वेळी ते २२ व्या पर्वतीय रेजिमेंटचे कमांडर होते. त्या मुळेच या खास विशिष्ट आणि गुप्त अशा गटाला एक नवीन सांकेतिक नाव मिळाले – ‘एस्टॅब्लिशमेंट २२’. या फोर्सचे मुख्यालय उत्तराखंडमधील चकराता इथे आहे.
‘चकराता’ हे ठिकाण डेहराडूनपासून जवळजवळ ८७ किलोमीटर दूर आहे. येथेच सुरुवातीला तिबेटी युवकांना (नंतर नेपाळी युवकांनाही यात सामील करण्यात आले) गरिला किंवा ‘गनिमी काव्या’च्या लढाईतील खाचाखोचांचे सहा महिने प्रशिक्षण देण्यात आले होते. सीआयएने १९६० च्या दशकातच एम १ आणि एम ३ मशीन गनचा उपयोग सुरू केला होता, त्याचे प्रशिक्षण या सैनिकांना मिळाले. शिवाय एव्हिएशन संशोधन सेंटरच्या मदतीने या गटाला विमानातून जंगलात उतरण्याची कलासुद्धा शिकवली गेली. १९७० साली या फोर्समध्ये जवळजवळ २०,००० गरिला सैनिक होते. सीआयए आणि भारतीय गुप्तहेर संस्थांनी या गरिला गटाचा उपयोग केला होता.
३ डिसेंबर १९७१ रोजी भारतीय सेनेच्या आक्रमणानंतर पूर्व पाकिस्तानला १६ डिसेंबर १९७१ रोजी स्वातंत्र्य मिळून बांगलादेशचा जन्म झाला, या घटनेला ४५ वर्षे होत आहेत. या लढाईत वर वर्णन केलेल्या ‘स्पेशल फ्रॉन्टियर फोर्स’(एसएफएफ)चे महत्त्वाचे योगदान होते. याच फोर्सने मुक्ती वाहिनीबरोबर पूर्व पाकिस्तानच्या सेनेशी मुकाबला केला होता. १९७१ च्या लढाईत पूर्व पाकिस्तानातील एका अतिशय धोकादायक मोहिमेत भाग घेऊन या फोर्समधील ४९ सैनिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले.
नोव्हेंबर १९७१ मध्ये एसएफएफला मिझोरामच्या चिटगोंग पर्वतीय प्रदेशात पाठवले गेले. तिथून पूर्व पाकिस्तानात घुसण्याचा हुकूम त्यांना मिळाला. इथूनच ‘माउंटन ईगल’ ही मोहीम सुरू झाली. मिझोराम येथील डेमागिरी गावाजवळ रात्रीच्या अंधारात, भारतीय हवाई दलाच्या एएन-१२ विमानातून पॅराशूटच्या साहाय्याने एसएफएफचे ३००० सैनिक उतरवले गेले. सुरुवातीला या फोर्सजवळ अमेरिकी कार्बाईन आणि बेल्जियममधून खास मागवली गेलेली एके-४७ रायफल होती. एक ब्रिगेडिअर (तिबेटी भाषेत दापोन) प्रथमच या फोर्सचे नेतृत्व करीत होता. या वेळेला भारतीय सेनासुद्धा तयारीत होती आणि जनरल सॅम माणेकशॉ यांच्या हुकुमाची पूर्व विभागीय सेना वाट पाहत होती. ऑक्टोबर १९७१ च्या शेवटच्या आठवडय़ात पूर्व पाकिस्तानातून बरेच शरणार्थी मिझोरामच्या चिटगोंग प्रदेशात येऊन पोहोचले होते. एसएफएफने काही काळ या शरणार्थीमध्ये लपून राहून नंतर छोटय़ा छोटय़ा टोळ्या करून पूर्व पाकिस्तानातील कर्णफुली नदी लहान नौकेतून पार केली. आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून शत्रूच्या मोर्चावर गनिमी काव्याने कित्येकदा अकस्मात हल्ला या जवानांनी केला. आपल्या सेनेच्या इतिहासात ‘एस्टॅब्लिशमेंट-२२’ या दलाने अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून सर्जिकल स्ट्राइकचा वापर पहिल्यांदा केला! एसएफएफने अनेक भागांत मुक्ती वाहिनीबरोबर आपल्या दिलेल्या लक्ष्यावर अचूक शरसंधान केले. एसएफएफच्या या लपून वार करण्याच्या युक्तीमुळे अनेक वेळा पाकिस्तानी मोर्चे, पूल, सैनिकी वाहनांच्या ताफ्याचे अतोनात नुकसान झाले. पूर्व पाकिस्तानात असलेल्या पाकिस्तानी सैनिकांना या फोर्सच्या सैनिकांची दहशत बसली होती. एसएफएफचे सैनिक त्यांना वेताळ किंवा भुताप्रमाणे भासत होते, जे अचानक डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच येऊन, हल्ला करून, मारून पसार होत होते.
३ डिसेंबर १९७१ रोजी जेव्हा भारतीय सेनेने पूर्व पाकिस्तानात कूच केले तेव्हा त्यांच्याबरोबर या फोर्सने सुद्धा पूर्व पाकिस्तानात प्रवेश केला. आता त्यांच्याकडे मोर्टार आणि स्वयंचलित रायफल्स, आणि दोन ‘एमआय-फोर’ हेलिकॉप्टरसुद्धा होती. युद्धात १२ डिसेंबरच्या सुमारास जेव्हा पाकिस्तानला समजले की आता मृत्यूला सामोरे जावे लागेल, तेव्हा पळ काढण्यासाठी पूर्वेत असलेले ब्रह्मदेश आठवले. पण या रस्त्यावर ‘फँटम फोर्स’ तर येणार नाही ना याची धाकधूक त्यांना वाटे. एके रात्री एसएफएफला हे समजले होते की पाकिस्तानी पळ काढत आहेत. लगेच छोटय़ा तुकडय़ा रवाना झाल्या. पूर्व पाकिस्तानातून ब्रह्मदेशात पळून जाणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांना या एसएफएफ फोर्सने घेरले. पाकिस्तानची ९७ स्वतंत्र ब्रिगेड आणि दुसऱ्या क्रमांकाची कमांडो बटालियन यांना या फोर्सने घेरले होते. एसएफएफने बांगलादेशी मुजीब वाहिनीच्या तरुणांनाही प्रशिक्षित केले होते. ज्यांनी लहान लहान टोळ्यांत जाऊन पूर्व पाकिस्तानच्या तेल आणि इंधन गोदामे, पूल आणि रेल्वे रुळांना निकामी करण्याचे काम यशस्वीपणे केले. याशिवाय एसएफएफने पूर्व पाकिस्तानातील रंगमाती जिल्ह्यतील कर्णफुली नदीवरील कपताई कालवा उडवण्यात यश मिळवले होते.
बरीच वर्षे एस्टॅब्लिशमेंट-२२च्या अस्तित्वाबद्दल गोपनीयता बाळगून भारत सरकारने या गनिमी फोर्सचा उत्तम उपयोग १९७१ च्या लढाईत केला होता. यांच्या बहादुरीमुळेच चितगांव हिलच्या बाजूने भारतीय सेना (२३ व ५७ डिव्हिजन) पूर्व पाकिस्तानात सहजपणे दाखल होऊ शकली. जेव्हा १६ डिसेंबर रोजी पाकिस्तानी सैन्य ढाकात शरण येत होते, तेव्हा एसएफएफचे सैनिक जवळपास ४० किलोमीटर दूर होते, पण तेथील रस्त्यावर येऊन ते आनंदोत्सव साजरा करू लागले. तेव्हा सर्वानाच आश्चर्य वाटले, की भारतीय सेनेला ही कोणती नवीन फौज येऊन मिळाली आहे. काही काळाने हे सैनिक पुन्हा जंगलात गायब झाले. आजही एसएफएफविषयी माध्यमांना माहिती नाही. तिबेटच्या लोकांनी मात्र आपल्या आठवणीत या फोर्सला नक्कीच स्थान दिले आहे. एस्टॅब्लिशमेंट-२२ चे प्रशिक्षण इतके परिणामकारक होते, की असा एक छोटा गटसुद्धा मोठी कारवाई यशस्वीपणे करू शकला. आमच्या शूर सैनिकांना एक सलाम!
कर्नल सारंग थत्ते ( निवृत्त )