मुझिरिस हे दक्षिण भारतातील एकेकाळचं वैभवशाली बंदर. मिरीच्या व्यापारासाठी प्रसिद्ध असलेलं मुझिरिस १४ व्या शतकात गूढरित्या नामशेष झालं. या बंदराचे व तिथल्या व्यापारी संस्कृती आणि समाजजीवनाचे अनेक उल्लेख तमिळ संगम साहित्यात, तसेच युरोपीयन ऐतिहासिक दस्तावेजांमध्ये आढळतात. मुझिरिसचा हा इतिहास मल्याळम् लेखक ए. सेतूमाधवन यांनाही खुणावत होता. त्या इतिहासाविषयीच्या कुतूहलातूनच ही कादंबरी लिहिली गेली.. त्यातून मुझिरिसचा इतिहासातून वर्तमानापर्यंतचा प्रवास उलगडत जातो..

मल्याळम् साहित्यातील ख्यातनाम कादंबरीकार सेथू (ए. सेथुमाधवन) यांच्या ‘मरुपिरवी’ (पुनर्जन्म) या कादंबरीचा प्रेमा जयकुमार यांनी केलेला ‘द सागा ऑफ मुझिरिस’ हा इंग्रजी अनुवाद नुकताच प्रकाशित झाला आहे. १४ व्या शतकात पृथ्वीतलावरून गूढरीत्या नामशेष झालेल्या एके काळच्या वैभवशाली बंदराची ही वेधक कहाणी आहे. केरळमधील सागरी वाहतूक व आनुषंगिक व्यापार-उदिमाचं एक महत्त्वाचं केंद्र म्हणून एर्नाकुलम जिल्ह्य़ातील मुझिरिस बंदराची ख्याती होती. सन १३४१ मध्ये चूर्णी (पेरियार) नदीला महाभयंकर पूर आला आणि या प्रलयंकारी पाण्याखाली मुझिरिस बंदर व परिसर दीर्घकाळ राहिल्याने पूर्णत: नाहीसे झालं. पुराच्या रुद्रावतारानं सारं काही नेलं- माती, मालमत्ता आणि माणसंही! त्यानंतर या नदीनं आपला मार्गही बदलला. काळाच्या वेगाचं भान हरवलेल्या, आपल्या संपन्नतेच्या तोऱ्यात मश्गूल असलेल्या क्रांगनूर किंवा महोदयपुरम या शहराचाही अस्त झाला.

भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील मुझिरीपटिनम् हे मूळ नाव असलेल्या दोन हजार वर्षांपूर्वीच्या या बंदराचं ग्रीक, रोमन व अरबांनी ‘मुझिरिस’ हे नाव रूढ केलं होतं. या बंदरातून मुख्यत्वेकरून मिरी व त्यापासून बनवलेल्या कशायम या अर्काचा व्यापार व निर्यात मोठय़ा प्रमाणात होत असे. जगाच्या अनेक भागांतून व्यापाराच्या निमित्ताने इथं येणाऱ्या परकियांना ‘यवन’ संबोधले जायचे. युरोपीय देशांतील थंडीच्या काळात मांस टिकवण्यासाठी, औषधी गुणासाठी मिरीचं महत्त्व वाढलं होतं. त्यामुळे मध्य-पूर्व देशांतील व्यापाऱ्यांना पाश्चिमात्त्यांच्या मिरीवेडाचा फायदा उठवायचा होता. इजिप्शियन व फिनिशियन आधीच इथं येऊन धडकले होते. छोटय़ा बोटींतून अ‍ॅडेन व नंतर तांबडा समुद्र व भूमध्य समुद्रामार्गे ही मिरी व मसाल्याचे इतर पदार्थ रोम, ग्रीस व अन्य युरोपीय देशांत पोहोचेपर्यंत त्याची किंमत २०० पटीने वाढलेली असायची. हिपॉलिस या ग्रीक खलाशाने शोधून काढलेल्या मार्गाने- मौसमी वाऱ्याबरोबर या बोटी तांबडा समुद्र, मग अरबी समुद्रातून मुझिरिसच्या किनाऱ्यावर येत व मौसमी वाऱ्याच्या परतीच्या प्रवासाबरोबरच त्या बोटी परतत.

या लुप्त झालेल्या शहराविषयी इतिहास संशोधक, पुरातत्त्व अभ्यासक, विद्यार्थी यांच्यात वर्षांनुवर्षे कुतूहल, जिज्ञासा निर्माण झाली आहे. लेखकालाही अनेक वर्षांपासून हा विषय खुणावत असल्याने व अलीकडील पट्टणम येथील उत्खननाच्या निमित्ताने या प्रदीर्घ, बहुपदरी कादंबरीचा जन्म झाला, तोही एका शहराला पुनर्जन्म देत!

ज्या गावात व परिसरात आपलं बालपण गेलं, त्याविषयी विलक्षण ओढ असणारे अरविंदन, पेरुमल, रामभद्रन चेंदमंगलम इथं एकत्र येतात. अरविंदन हा दर्यावर्दी जीवनाचं आकर्षण असल्यानं शिपिंग कंपनीत नोकरी करून मुंबईत स्थिरस्थावर झालेला, पण आपल्या मातीशी नाळ जोडून असलेला- या कादंबरीचा संवादक. पेरूमल हा त्याचा शाळकरी मित्र आज इतिहास संशोधक झालेला. रामभद्रन हा गावीच असलेला मित्र. अप्पुकुट्टन या दुसऱ्या मित्राने अरविंदनची राहण्या-जेवणाची व्यवस्था करण्यासाठी अच्चुम्मनला तैनात केले आहे. तिघे मित्र भेटतात, आपल्या गावच्या वैभवशाली इतिहासाचे धागेदोरे शोधत राहतात. तो जुना काळ, शाळा, शिक्षक इ. अनेक विषयांचं स्मरणरंजनही अटळपणे येतं. त्यापलीकडे जाऊन पेरुमल डॉ. चेरियन यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या पट्टणम येथील संशोधनाबद्दल सांगतो. केरळमधील इतिहास संशोधन परिषद, पुरातत्त्व विभाग, तंजाऊर येथील तमिळ विद्यापीठ, तसेच इंग्लंड, अमेरिका व इटली येथील विद्यापीठांच्या सहयोगाने सुरू झालेल्या संशोधनातून दिसलेले वीट, फरशी, नाणी, मोती, काचेचे तुकडे, दागिने यावरून इथल्या लोकांची ऊर्जस्वल संस्कृती व आनुषंगिक निष्कर्ष काढले जात आहेत. ‘संगम साहित्या’तही याचे संदर्भ आधी आलेले आहेत. ‘चमच्याने माती काढली पाहिजे. मातीच्या प्रत्येक कणाला काही तरी सांगायचे असते,’ असं प्रा. सेल्व्हाकुमार म्हणतात. आजचं पट्टणम हे मुझिरिस असावं का, याचा मागोवा घेताना मुझिरिस हे मोठं बंदर शहर असावं, पट्टणम हे त्याचं उपनगर असावं, असा कयास करण्यात येत आहे. मात्र मुझिरिस हे बंदर, सागरी वाहतूक, नद्यांतून छोटय़ा बोटींद्वारे मालाची ने-आण, अनेक देशांतील व्यापाऱ्यांची इथे ये-जा अशी एके काळची जिवंत, रसरशीत संस्कृती आज नामशेष झाली आहे, यावर सर्वाचं एकमत आहे.

रोमन संस्कृतीचा अस्त हे इथला व्यापार थंडावण्याचं कारण असावं. पुढे पेरियार नदीनं आपलं पात्र बदलल्यानं बंदर नाहीसं झालं, तरीही हे शहर फार काळ मातीखाली राहू शकणार नाही, असं पेरुमल सूचित करतो.

काही हजार वर्षांच्या कालौघाचा धांडोळा घेताना राजकीय उलथापालथी, सामाजिक संघर्ष-लढे यांचा एक रोचक इतिहास उलगडत जातो. या प्रदीर्घ कालपटात सारं काही आहे- इतिहास, दंतकथा, मिथकं, कल्पित कथा, मानवी नाती अन् जादूई वास्तवही!

मुझिरिसमध्ये लोहार, सुतार, कुंभार, विणकर, तांबट जहाज बनविणारे असे बंदराला पूरक व्यवसाय करणारे सारे असल्यानं इथलं समाजजीवन सुरळीत असावं. इथं काही दुभाषी असले तरी परदेशी लोकांनी इथली जुजबी भाषा आत्मसात केली होती. लुटारूंचा धोका असल्याने धष्टपुष्ट यवन हे व्यापाऱ्यांचे अंगरक्षक असायचे. इथली घरं ही मिरीनं भरलेली गोदामं होती. ‘सोनं घेऊन या व मिरी घेऊन जा’ असंही संगम साहित्यात नमूद असल्याचं पेरुमल सांगतो.

चेंदमंगलम हे गाव सामाजिक एकात्मतेचं जणू प्रतीकच आहे. इथल्या कोहाईल कोविलकम टेकडीवर विष्णुमंदिर, ज्यू प्रार्थना घर, मशीद व चर्चही एकाच ठिकाणी नांदत आहेत. अरविंदन ज्यू लोकांचं आपल्या गावच्या परिसराशी जुनं नातं असल्याचं सांगतो. इथं अनेक ज्यू कुटुंबं राहत, त्यामुळे त्याचे शाळेत अनेक ज्यू मित्र होते. ज्यूंना मुझिरिस हे बरकतीचं बंदर वाटायचं, शिवाय इथल्या विलिव्रतम राजाने त्यांना घरे बांधण्यासाठी जागाही दिल्या. गावातील आझाद हा निराधार मुलगा पुढे इजिप्तला २०-२५ र्वष पर्यटन क्षेत्रात काम करीत होता. तोही गावी येऊन आपले अनुभव सांगतो. अरविंदनलाही अनेक आठवणी दाटून येत होत्या. स्थलांतरितांच्या भावना, अन्यत्र जाऊन ‘तिथलं होणं’, हृदयाच्या कोपऱ्यातील आपली मुळं- त्याविषयीची ओढ, तिथं प्रत्यक्ष गेलं की येणारी व्याकूळता याविषयी दोघं भरभरून बोलतात. इ.स.च्या पहिल्या शतकात त्यांचे प्रार्थनाघर पाडल्यानंतर ज्यू जगभर पसरले. त्यातले व्यापारासाठी मुझिरिसकडे मोठय़ा प्रमाणात आले व इथल्या समाजाचा एक भाग बनले. व्हिएन्ना येथील एका संग्रहालयात अलेक्झांड्रिया आणि मुझिरिस येथील व्यापाऱ्यांचा एक करार ‘मुझिरिस पॅपिरस’ या नावानं असल्याचं पाहून थक्क झाल्याचं आझाद सांगतो. इथल्या मातीत वाढलेला बेझसेल हा मात्र आपल्याला विसरू शकत नाही. इस्रायलमध्ये सर्वात मोठा फ्लोरिकल्चरिस्ट म्हणून त्याला ओळखतात. इथं का घर बांधावं वाटतं, हे सांगताना तो म्हणतो, ‘माणसं परत आपल्या मातीकडे वळतात. तिथं त्यांचं कुणीही नसलं तरीही जुन्या काळाचा ‘फील’ येण्यासाठी एखादं घरटं बांधावं वाटतं.’

आझादने इजिप्तमधील रशिदी नावाच्या एका अवलियाची गोष्ट सांगितली. अतिश्रीमंत असणाऱ्या व एरवी कुणाशीही ओळख, जवळीक टाळणाऱ्या आझादचं नाक इजिप्तियन वाटलं म्हणून हळूहळू दोस्ती झाली. जगातल्या प्रत्येक देशाचे समुद्रकिनारे, ग्रंथालयं पाहण्याच्या वेडानं झपाटून गेलेला रशिदी आयुष्यभर काचेच्या जारमध्ये साठवलेल्या वस्तू व ग्रीकमधील दुर्मीळ हस्तलिखितं या आझादकडे सोपवतो, त्याचा मृत्यू कसा होतो, हे सारं वाचण्यासारखं आहे. जाता जाता आझाद तो काचेचा जार त्यालाही पुढे कोणी वंश नसल्याने अरविंदनला त्याची नात- गायत्रीकडे म्हणजे पुढच्या पिढीकडे देण्यासाठी देतो.

अरविंदन या साऱ्यांशी होणारा संवाद, चर्चा, संशोधन, जुनी कागदपत्रे यातून मिळणारं सारं संचित शब्दबद्ध करायची जबाबदारी स्वीकारतो. टिपणं काढत राहतो. मुंबईला आल्यावरही गावच्या वातावरणाचं गारूड कमी झालेलं नसतं. पत्नी वासंती, मुलगा रघू हे काय खूळ आणलंय म्हणून अरविंदनला हेटाळत राहतात. सुरुवातीलाच अरविंदनचं बालपण, शिक्षण, खलाशी होण्याचं स्वप्न, त्याची करारी आई, जनु अम्मा यांच्याविषयीचे तपशीलही वाचकांना भावणारे आहेत.

मुझिरिस हे इतकं संपन्न होत गेलं, की स्थानिकांना दलाल विचारायचे- ‘मिरी आहे का तुमच्याकडे, त्याच्या बदल्यात सोन्याची नाणी मिळतील.’ त्यामुळे काही तरुण हे काळे सोने जंगलात जाऊन आणण्यापेक्षा त्याची लागवड डोंगरकपारीला करू लागले. या संदर्भातील मनिक्कन या कृषक संस्कृतीचा आदिबंध असणाऱ्या भूमिपुत्राची कथा लेखकाने इथे सांगितली आहे. कमी श्रमात अधिक पैसा, यामुळे मिरीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना तो म्हणतो की, ‘मी मिरीची लागवड करणार नाही. मला यवनांचं सोनं नको आहे. मला धान्य पिकवायचं आहे, ज्यामुळे इथल्या लोकांचं पोट भरेल. आपण कसणं बंद केलं की पाऊस थांबेल, नद्यांची पात्रे अरुंद होतील, किनारे फुगतील, निसर्गाचे स्वत:चे असे ठोकताळे असतात. अनादिकाळापासूनच्या शेतीवर माझी श्रद्धा आहे. जमिनीतून वर येणाऱ्या प्रत्येक कोंभाला जपलं पाहिजे.’

मान्सूनचे वेध लागले, की दलाल, व्यापारी, सावकार इथं येऊन धडकलेले असायचे. त्यांचं स्वागत स्थानिकांकडून व्हायचं. त्यात आता काही स्त्रियाही परकीयांच्या करमणुकीसाठी तयार होऊ लागल्या. त्यात वडक्कोथसारख्या उच्चभ्रू कुटुंबातील थंका, पोन्नू यांनी पैशाच्या मोहानं अ‍ॅड्रियन या परकीय व्यापाऱ्याच्या शयनगृहात प्रवेश केला. या अनैतिक मार्गाने थंकाने अमाप पैसा, सोने मिळवले. स्थानिकांच्या, स्त्रियांच्या शोषणावर लेखकाने नेमके बोट ठेवले आहे. मात्र याच घराण्यातील कुंकम्मा नावाची मुलगी मात्र अ‍ॅड्रियनचा मुलगा ओरियनसाठी तयार करण्याच्या थंकाच्या इराद्याला छेद देते. त्यामुळे संपत्तीच्या जोरावर आपला कलंकित भूतकाळ झाकता येईल, असं मानणाऱ्या थंकाच्या इभ्रतीला धक्का पोहोचतो. कुंकम्माच्या या निर्णायक भूमिकेतून लेखकाला नव्या बंदराच्या उदयाचं सूचन तर करायचे नाही?

अरविंदनने सेलिना, सारा, जोसा यांसारख्या ज्यूंबद्दलही लिहिले आहे. सारासारख्या बंडखोर, तडफदार महिलेच्या संरक्षणासाठी युरुथु गावाने दिलेला लढा महत्त्वाचा आहे. इथल्या संगीत नाटकात भूमिका मिळविण्याच्या स्वप्नापायी शिक्षणाला तिलांजली देणारा व शेवटी आपल्या वडिलांप्रमाणे रंगारी कामात जाणारा जोसा- हे सारे या संस्कृतीचा भाग बनले आहेत.

या पुस्तकात इतिहासाबरोबर मानवी संस्कृती, मानवाचं मातीशी असलेलं आदिम नातं अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. घाटदार व्यक्तिचित्रणशैलीमुळं या इतिहासवजा पुस्तकाला कादंबरीचं स्वरूप आलं आहे. वास्को द गामाला प्रत्यक्ष पाहिलेले गावातील पैलप्पन मास्तर, स्त्रियांचं विशिष्ट पद्धतीनं माप घेऊन त्यांना शोभेल असे दागिने बनविणारा थंकुमूपन हा सोनार, सर्व रोगांवर इलाज करणारा थमी वैद्यन, अचुंबब विणकर, रंगारी वेंकली पप्पू, जोसा आदी व्यक्तिरेखा बेमालूम रेखाटल्या आहेत. या पुस्तकात इतिहास, लोककथा, चमत्कृती, अद्भुतता हे सारं इतस्तत: पसरलेलं वाटलं, तरी या साऱ्या तुकडय़ांतून एक सुंदर कोलाज लेखकानं बनवल्याचं लक्षात येतं. मुझिरिस बंदर नव्याने उदयास येत आहे, याचं सूचन प्रत्येक तुकडय़ाच्या शेवटी होत राहतं. अरबी समुद्रात नवं बंदर निर्माण होत आहे. अनुषंगाने पर्यटन केंद्र विकसित केलं जात आहे. अप्पुकुट्टन गोत्री पुलामुळं वाहतूक वाढणार म्हणून आनंदी आहे. समुद्र भूमी गिळू पाहतो आणि नदी आपलं पात्र बदलू पाहते, तेव्हा आपल्या किनाऱ्याची शुद्धता राखायला पाहिजे, असं कुंकम्माला वाटतं. तिला आपल्या वडोक्कोथ घराण्याला लागलेला डाग पुसून काढून नव्याने सुरुवात करायची आहे. कन्टेनर यार्ड, मोठाली गोदामं, यंत्रं यांना नियंत्रित करणारी उत्तम संगणकीय प्रणाली तिला हवी आहे. ग्राहकही उच्च दर्जाचे येतील, आपण कशातच दुय्यम असण्याचे कारण नाही. तिच्या आजीचा एक गुण- खंबीरपणा तिच्यातही होता. नवी गोदामं मत्तनचेरी इथं सुरू झाली. नवीन बंदर- कोची जन्माला आलं. प्रवास चालूच राहतो. शतकं, सहस्रकं सरतात, ज्यात काही बाबी नष्ट होतात, तर काही नव्या निर्माण होतात. अरविंदनचा हा इतिहासाकडून वर्तमानापर्यंतचा प्रवास समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवे.

 

‘द सागा ऑफ मुझिरिस’

मूळ लेखक : ए. सेथुमाधवन (सेथू)

इंग्रजी अनुवाद : प्रेमा जयकुमार

प्रकाशक : नियोगी बुक्स

पृष्ठे : ४३०, किंमत : ४९५ रुपये

 

डॉ. अजित मगदूम

ajitbalwant@gmail.com