प्रदीप आपटे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आसेतुहिमाचलातील मध्यान्हरेखा व भूभाग त्रिकोणजालाने वेढून भारताचा नकाशा पूर्णत्वास नेण्याचे काम जॉर्ज एवरेस्टने केले; त्यासाठी दिवेही वापरले, ते कसे?

मद्रास इलाख्याच्या कंपनी सरकारने तिथून जाणाऱ्या रेखांशाची धार धरून त्रिकोणांचे जाळे विणत नकाशा बनवायचा उद्योग सुरू केला. विल्यम लॅम्बटनच्या ध्यासाने त्याचा फैलाव मध्यभारतापर्यंत पोहोचला होता. मराठा साम्राज्याच्या पराभवानंतर मुंबई इलाखाही त्यात सामावणार होताच.

थिओडोलाइट वापरून भूभाग रेखायचे तर त्यासाठी उंचीवरची पर्वत टेकाडांची शिखरे किंवा कमीअधिक उंचीच्या इमारती अधिक अनुकूल आणि सोयीच्या असतात. दक्षिणेतली गोपुरे, देवळांचे चिन्हस्तंभ, तमिळ/आंध्र प्रांतात आढळणारे थोराड उंचपुरे पाषाण वापरले गेले. पायाभूत रेघा आणि अंतर मद्रासच्या समुद्रसपाटीला होते. दक्षिण भागात गोदावरी आणि कृष्णा नद्यांचे खोरे त्रिकोणात गुंफताना असलेला भूस्तर, तिथला खडकाळपणा, झाडझाडोऱ्यांची ठेवण जशी होती तशी सर्वत्र नसणारच होती. थिओडोलाइटच्या ‘नजरे’तून वेध घेण्याच्या जागा आधी हेराव्या लागत. ती जागा काही मैलांवर असे. तिथे उंचीच्या खुणा असणाऱ्या खांबाचे निशाण फडकावीत निशाणानेच हाळी द्यायला हेलकरी पुढे जात.

ते तिथे कधी पोहोचतात याचा काही नेमका सुमार नसे. दोन, तीन, चार आठवडे लोटले तरी त्यांच्याकडून खुणेचे चिन्ह येत नसे. वाटेत पूर, श्वापदे, लुटारूंचा ससेमिरा असे. दूरवरचे साफ दिसायला पाहिजे तर वातावरण साफ हवे. धुके, वादळ, अतिउष्म्याचा धुरळलेपणा टाळावा लागे. म्हणून पावसाळा ओसरल्यानंतरचे आकाश आणि वातावरण अनुकूल ठरायचे. पण कृष्णा/ गोदावरी नद्यांच्या खोऱ्यात बोकाळलेल्या पुरांमुळे वाटा प्रवासाला खीळ घालायच्या. पावसाळ्यासह अनेक साथरोग डोके वर काढत. हिवतापाचे थैमान सुरू होई. लागण झाली की अवघा चमू आजाराने निपचित होत असे. लॅम्बटनचा उत्तराधिकारी ठरलेला खंदा सहकारी जॉर्ज एवररेस्ट या तापाने खंगून गेला होता. शरीर विकल झाले. इतका की त्याला कंपनीने पाच वर्षांच्या रजेवर इंग्लंडला धाडले.

रजेवर असला तरी नकाशांसाठी त्रिकोणांची धाबळ अधिक बिनचूक कशी बेतायची? भूगोलाचा वक्राकार अधिक अचूक कसा अजमावयाचा यामध्येच एवररेस्टचा जीव गुंतला होता. पृथ्वीचे वाटोळेपण नेमके कसे आणि कुठे फुगते वा आकसते या समस्येबद्दल अठराव्या शतकाच्या अस्तकाळातले ‘सृष्टी तत्त्ववेत्ते’ झपाटले होते. तोवर भौतिकशास्त्र, गणित असे वेगळे सुभे झाले नव्हते. सगळ्याला सृष्टी तत्त्वज्ञान म्हणजे नॅचरल फिलॉसॉफी असेच संबोधले जायचे. (न्यूटनच्या ‘प्रिंकिपिया’ ग्रंथाच्या उपशीर्षकात ‘नॅचरल फिलॉसॉफी’ असेच शब्द आहेत.) पृथ्वीच्या वाटोळेपणातला संभाव्य उणे अधिकपणा लक्षात घेऊन पृथ्वीसाठी ‘पपनस’ (ग्रेप फ्रूट) असा सांकेतिक बोली शब्द जाणकारांमध्ये रूढ झाला होता. म्हणूनच पृथ्वीचा ‘बृहद्-वक्र’ मोजण्याची चढाओढ होती.

एवरेस्टने या पद्धतीतल्या नव्या प्रयोगांचा, तंत्रांचा, साधनांचा पिच्छा सोडला नाही. दूरवर एखादा गडी खांब धरून उभा राहणार आणि त्याचा दुर्बिणीतून वेध घ्यायचा यामध्ये थोडी उणीव यायची. बिनचूकपणा घरंगळायचा. यावर काय उपाय करता येईल. मोजमापातल्या धातूंच्या साखळ्या पट्टय़ांचे थंडीने किंचित आकसणे किंवा उष्म्यामुळे पसरणे किती होते? त्याचा छडा कसा घ्यायचा? कर्नल कोलबीने आर्यलडमध्ये केलेल्या सर्वेक्षणात या आकुंचन-प्रसरणाच्या मोजमापासाठी पितळ आणि लोखंडाच्या वेगवेगळ्या जोडपट्टय़ा मधोमध जोडून एक संयुगपट्टी बनविली होती. त्याला ‘कॉम्पेनसेशन बार’ म्हणतात. एकच लांबी, पण दोन्ही धातूंची प्रसारशीलता निराळी. त्यामुळे मोजमापात होणारी वधघट निस्तरणे शक्य होई. अशा दहा फूट लांबीच्या जोडपट्टय़ा घेऊन लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर एवरेस्टने प्रयोग करून पाहिले. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आणि उपाय तो आत्मसात करीत राहिला. १८३० साली तो शरदकाळात कलकत्त्याला पोहोचला. भारतात परतताना त्याने आपल्याबरोबर अशा सहा जोडपट्टय़ा आणि नवीन, अधिक सुधारित आणि तगडी थिओडोलाइट यंत्रे आणली.

लॅम्बटन निवर्तला तोपर्यंत नागपूर वऱ्हाड प्रांतापर्यंत नकाशांची दिंडी पोहोचली होती. मुंबईकडून खानदेश आणि नर्मदा विंध्य प्रदेशाला खेटून देणारी आडवी साखळीही जोडली जाणार होती. लॅम्बटन स्वभावानेच जिद्दी आणि सोशीक होता. त्याची धुरा ज्याला मिळाली तो एवरेस्टसुद्धा जिद्दी; पण शीघ्रकोपी आणि तोंडाळ होता. एखाद्या सहकाऱ्याला कधी संतापी लाखोली तर कधी स्तुतीच्या पुराला सामोरे जावे लागे. त्याच्या हाताखाली नको काम करायला म्हणून काहींनी नोकरीतून मोकळीक मागितली होती! तरी आपले भवितव्य आणि लौकिक त्रिकोणमिती सर्वेक्षण तडीला नेण्यात आहे याचे एवरेस्टला सदैव भान होते. तो परतून कामावर रुजू झाला ते सर्वेक्षण प्रमुख आणि त्रिकोणमिती सर्वेक्षणाचा पर्यवेक्षक अशी दोन्ही पदे एकत्र करूनच. त्याने अगोदर कल्याणपूर ते कोलकात्यातील ‘फोर्ट विल्यम’पर्यंत अदमासलेल्या रेखांश मार्गाचे काम जुलै १८३२ पर्यंत संपविले आणि पुनश्च, आधीच्या बृहद् वक्री रेखाटनाकडे मोहोरा वळविला.

जसजसे उत्तरेकडे जावे तसतशी भूभागाची ठेवण पालटत जाते. फार मोठा प्रदेश मैलोन्मैल सपाट भासते. एवरेस्टने यासाठी अभिनव युक्ती अवलंबली. मुख्य नोंदगोंद करण्याआधी रंगीत तालीम केल्यागत अदमास घेणारा, जागा निश्चित करणारा दौरा केला जाई. ती ठिकाणे ठरली की त्या-त्या जागी एक बांबूची ७० फूट उंचीची स्तंभासारखी उतरंड आणि त्याच्या शिरावर एक फळीमचाण बांधले जाई. त्या मचाणांकडे दुर्बिणीतून रोखून बघणारे एक निराळे ३० फूट उंचीचे मचाण तयार असे. त्यावर ४० इंच व्यासाचा पायपाट ऊर्फ ‘टेबल’ ठेवले जाई. ते कोन मोजून नोंदणे त्याची पायारेखेशी सांगड घालणाऱ्या सरळ रेखा काढण्यासाठी असे. या पायपाटावर १२ इंची व्यासाचा थिओडोलाइट ठेवला जाई. हे दुर्बिणीतून वेध घेणाऱ्याचे मचाण. त्याला चढउतार करायला त्याभोवती बांबूंचा तक्त्यासारखा पिरचा असे. बांधलेल्या मचाणी मनोऱ्यांवर निळसर ज्योतींचे ‘आर्गाँ दिवे’ दहा-दहा मिनिटांच्या अंतराने पेटवून फडकावले जायचे. या आर्गाँ दिव्यांच्या प्रकाशाचे परावर्तन घडवून, परावलयी दुर्बिणीतून दिसणाऱ्या त्यांच्या शलाकांचा मार्गवेध घेतला जायचा. त्यामुळे या रीतीला ‘किरणमाग’ (रे ट्रेसिंग) पद्धत म्हटले जाऊ लागले. गोगादेवाचे उंच निशाण घेऊन जाणाऱ्या जथ्यासारखी ही सर्कस मुक्काम बदलत पुढे जायची. त्याचबरोबरीने ५० फूट उंचीचे पायाशी पाच फुटी रुंद भिंतीचे असे १७ कायमस्वरूपी बांधकाम केलेले मनोरे बांधले गेले. त्यांच्या शिखराशी गोलाकार घुमट, गोल चकतीगत व्यासपीठ आणि निरीक्षकाची फिरण्या- बसण्याची जागा. अवजड थिओडोलाइट यारीने उचलून त्यावर बसविला जाई. त्यातल्या काहींचे अवशेष एवरेस्ट सेनेच्या वीरगळांगत राहिले आहेत.

ऑक्टोबर १८३४ ते जून १८३५ एवढय़ा कालावधीत चंबळचे खोरे ते शिवालिक पर्वतरांगांच्या पायथा ते डेहरा-दून दरी परिसरापर्यंतचा भाग त्रिकोणांकित बनला. हा अवघा परिसरच समुद्रसपाटीपासून दोन हजार फूट उंचीवर होता. डेहरा-दून जवळच्या हाथीपाँवपाशी एवरेस्टची कचेरी होती. तिथूनच शिवालिक पर्वतांवरची अमसोत आणि बानोग ही दोन शिखरे दिसत. कालांतराने त्रिकोणाचे जाळे विणत विणत या दोन टोकांचे अंतरदेखील पुढच्या सर्वेक्षणाचे ‘पायाभूत अंतर’ बनले.

हा झपाटा उरकण्यासाठी एवरेस्टने आणखी एक उद्योजक खटाटोप केला होता. यासाठी तीन फुटांचे दोन थिओडोलाइट वापरले होते. एक ट्रफ्टन कंपनीचा, तर दुसरा बॅरो नावाच्या कंपनीचा. एवरेस्टने या बॅरोला कोलकात्यामध्ये आणून वसविले होते! लॅम्बटनने आणलेल्या जुने यंत्राची दुरुस्त विस्तारित आवृत्ती आणि स्वत:चे यंत्र पुरवीत बॅरोचा चमू सर्वेक्षणात सहभागी असे!

एकीकडे स्वत:च १८२२ साली आरंभलेले मुंबई मध्यान्हरेखा सर्वेक्षण, दुसऱ्या टोकाला कोलकात्यातून जाणारे सुधारित मध्यान्हरेखा सर्वेक्षण, रेनेलकृत नकाशांचे त्याआधारे केलेले पुनर्सर्वेक्षण आणि केप कोमोरिन ऊर्फ कन्याकुमारी ते उत्तर व्यापणारे हिमालय शिवालिक पर्वत सामावलेले त्रिकोणांकी सर्वेक्षण अशी मध्यान्हरेखी गडगंज नकाशापुंजी संपवत एवरेस्ट १८४३ साली निवृत्त झाला. १८३५ साली त्याची प्रकृती इतकी ढासळली होती की, १८३७ साली कंपनी संचालकांनी त्याची जागा घ्यायला म्हणून मुंबई प्रांतातल्या मेजर जेर्विसची नेमणूक केली होती. जेर्विसची स्वत:ची ओळख आणि अभ्यासू निबंध लिहिणारा अशी रॉयल सोसायटीत ख्याती होती. त्याच्या प्रभावामुळे रॉयल सोसायटीच्या काही सदस्यांनी जेर्विसची पद्धत आणि कल्पनाच अमलात आणाव्यात, अशी शिफारस कंपनी संचालकांना केली. त्यावरून पेटलेल्या सुप्त वादंगाला प्रत्युत्तर म्हणून एवरेस्टने रॉयल सोसायटीचा अध्यक्ष डय़ूक ऑफ ससेक्सला अनेक खोचक उपरोधिक पत्रे लिहिली आहेत. त्यांतले वितुष्टी वावदूकपण नजरेआड करावे इतके अनेक लक्षणीय तांत्रिक तपशील त्यांत आहेत. हे वितुष्ट न उद्भवते तर ते तपशील विरून हरवले असते. एवरेस्ट निवृत्त झाल्यावर त्याला नाइटहूड सन्मान देऊ केला गेला. तो त्याने आधी नाकारला, पण पुढे १८६१ साली स्वीकारला.

आसेतुहिमाचलातील मध्यान्हरेखा आणि भूभाग त्रिकोणजालाने वेढणाऱ्याच्या प्राक्तनात आणखी वेगळाच अलौकिक सन्मान होता. त्याची कहाणी पुढच्या वेळी!

लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सुप्रतिष्ठ प्राध्यापक असून ख्यातनाम अर्थतज्ज्ञ आणि विचक्षण अभ्यासक आहेत.

pradeepapte1687@gmail.com

मराठीतील सर्व भारतविद्या बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on ray back of distant lights abn
First published on: 12-02-2021 at 00:07 IST