दिल्लीतील बहुजन समाज पक्षाचे सर्वात श्रीमंत उमेदवार असलेले दीपक भारद्वाज यांची भरदिवसा हत्या होणे, याचे अनेक अर्थ निघतात. सकाळी नऊ वाजता भारद्वाज यांना त्यांच्याच फार्महाऊसवर काही फुटांवरून गोळय़ा घातल्या जातात, याचा अर्थ तेथे असलेली खासगी सुरक्षा व्यवस्था कुचकामी होती असा होतो. अशी हत्या करणे सहज शक्य होऊ शकते, याचे कारण हत्येची सुपारी घेणारे सराईत मारेकरी मोकाटपणे िहडत असतात. श्रीमंतांमधल्या भांडणात एकमेकांचा काटा काढण्यासाठी अशा हत्येकऱ्यांच्या टोळय़ा राजरोसपणे कार्यरत आहेत, असाही या घटनेचा अर्थ होतो. अगदी पंधरा-वीस वर्षांपूर्वी मुंबईत आणि महाराष्ट्रात खंडणीबहाद्दरांच्या टोळय़ा सुखेनैव आपला व्यवसाय तेजीत करीत असत. या खंडणीस्वारांना सत्ताधीशांचेच आशीर्वाद असल्याचे त्याही वेळी स्पष्ट झाले होते. कुणा नेत्याच्या विमानात कोणता टोळीबहाद्दर शेजारी बसला होता, याच्या कहाण्या तेव्हाही रंगवून छापल्या जात असत. आता अशाच टोळय़ांनी आपले बस्तान खुद्द राजधानीतच बसवायला सुरुवात केली आहे, असे भारद्वाज यांच्या हत्येवरून स्पष्ट होते. सुतारकाम करणाऱ्या वडिलांच्या उत्पन्नात चालणाऱ्या घरात भारद्वाज लहानाचे मोठे झाले. तीसहजारी न्यायालयात नोंदणी कारकून म्हणून मिळालेली नोकरी त्यांच्यासाठी फारच मोठे बक्षीस होती. त्या तुटपुंज्या पगारातही त्यांनी जमिनीच्या खरेदी-विक्रीचा ‘साइड बिझनेस’ सुरू केला. दिल्ली आणि परिसरातील अनेक जमिनी त्यांनी विकतही घेतल्या. कालांतराने याच मातीमोलाने घेतलेल्या जमिनींना भाव येऊ लागला आणि हे भारद्वाज एकदम श्रीमंत होऊ लागले. मग शिक्षण आणि हॉटेलिंग हे सध्या तेजीत चालणारे उद्योग त्यांनी निवडले आणि त्याच्या जोडीला ‘रियल इस्टेट’ या कोणत्याही प्रकारचे ज्ञान आवश्यक नसलेला मूळचा व्यवसाय सुरूच ठेवला. एवढे पैसे खिशात असले, की त्याच्या संरक्षणासाठी राजकारणात येणे आवश्यकच ठरते. त्यामुळे भारद्वाज यांनी बहुजन समाज पक्षाकडे २००९च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मागितली. ती त्यांना मिळण्यात अडचण असण्याचे कारणच नव्हते. तेव्हा निवडणुकीचा अर्ज भरताना आपली संपत्ती ६०९ कोटी रुपये असल्याचे त्यांनी जाहीर केले, तेव्हा सगळय़ांच्याच भुवया उंचावल्या. निवडणूक जिंकली नाही, तरी पक्षाचे नेते म्हणून त्यांना आपोआपच मान्यता मिळाली. बांधकाम क्षेत्रात प्रवेश करीत असलेल्या भारद्वाज यांनी एक मोठा गृहप्रकल्प हाती घेतला होता आणि त्या संदर्भात काही ताणतणाव निर्माण झाले होते. हत्येमागे हे कारण असू शकते, असा पोलिसांचा अंदाज आहे. हे सारे एखाद्या चित्रपटाची कथा म्हणून खपून जाऊ शकेल, इतके सुलभ निश्चितच नसणार. प्रश्न आहे, तो खुनाच्या सुपाऱ्या घेणाऱ्या टोळय़ांच्या बंदोबस्ताचा. तो होत नाही आणि अशा घटना पुन:पुन्हा घडतात. भारद्वाज हे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ चारित्र्याचे होते, असे मानण्याचे काहीच कारण नाही. परंतु समाजात वावरणाऱ्या कुणाचीही, कोणत्याही कारणाने अशी निर्घृण हत्या होणे, हे कायदा-सुव्यवस्था काबूत नसल्याचेच लक्षण आहे. राजधानीतच जर असे घडत असेल, तर देशभरातील परिस्थितीचा अंदाज करण्याची गरजच नाही.
संग्रहित लेख, दिनांक 28th Mar 2013 रोजी प्रकाशित
राजधानीतील रक्तरंजित होळी
दिल्लीतील बहुजन समाज पक्षाचे सर्वात श्रीमंत उमेदवार असलेले दीपक भारद्वाज यांची भरदिवसा हत्या होणे, याचे अनेक अर्थ निघतात. सकाळी नऊ वाजता भारद्वाज यांना त्यांच्याच फार्महाऊसवर काही फुटांवरून गोळय़ा घातल्या जातात, याचा अर्थ तेथे असलेली खासगी सुरक्षा व्यवस्था कुचकामी होती असा होतो.

First published on: 28-03-2013 at 12:16 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bloody holi in politics