‘बुकबातमी’मध्ये एरवी नव्या, आगामी किंवा गाजणाऱ्या एखाद्या पुस्तकाबद्दल वाचायला मिळतं, तसं इथं काही नाही.. खरं तर ही बातमी जितकी पुस्तकाबद्दलची आहे, तितकीच सव्वाचार लाख लोकवस्तीच्या एका छोटय़ाशा शहराबद्दलची आहे. हे शहर रोमानियातलं. त्याचं नाव क्लूज- नापोका. रहिवाशांना वाचनाची गोडी लागावी, यासाठी या शहरानं एक योजना आखली- ‘पुस्तक वाचत असलात, तर बसने मोफत प्रवास!’
हे शहर म्हणे, बुखारेस्ट या राजधानीच्या शहरानंतरचं रुमानियातलं दुसरं मोठं शहर. शिवाय नगर म्हणून त्याचा इतिहास अगदी तेराव्या शतकापासूनचा. तरीही हे शहर इतकं आडबाजूचं ठरलं आहे की, तिथं ४ ते ७ जून या चारच दिवस पार पडलेल्या या उपक्रमाची माहिती इंग्रजी प्रसारमाध्यमांना ऑगस्टमध्ये मिळाली (आणि तिथूनच ती आज इथं आली).
‘त्या चारही दिवसागणीक बसमध्ये कोणत्याही वेळी, एक तरी प्रवासी वाचनात गढून गेलेला दिसे’ इतकं यश या योजनेला मिळाल्यामुळे आता ‘वाचकांना मोफत प्रवास’ पुढेही वारंवार घडवण्यासाठी आता आखणी केली जात आहे.
मोफत प्रवासाची ही कल्पना व्हिक्टर मिराँ या वाचनवेडय़ाची. तो हौशी लेखकही आहे, पण सध्या ब्लॉगवरच लिहितो. त्यानं या शहराचे महापौर एमिल ब्लॉक यांच्याकडे वर्षभरापूर्वीच ही कल्पना मांडली होती. पण तेव्हा ती अंधूक होती. ‘बसगाडय़ांचा वापर वाचनप्रेम वाढवण्यासाठी करता येईल..’ इतकीच.. पण म्हणजे काय? पहिला पर्याय आला प्रत्येक बसगाडीत चार-पाच पुस्तकं ठेवायची.. ती प्रवाशांनी तिथंच पाहावीत, वाटल्यास वाचावीत वगैरे.. पण यासाठी बसचालकाच्या निगराणीखाली राहील अशा बेतानं (तिथे वाहक- कंडक्टर नसतो) पुस्तकांसाठी कप्पा करावा लागणार, म्हणून बेत रहित झाला. त्यापेक्षा पुस्तकातला निवडक भाग सर्वाना वाचता येईल अशा बेतानं बसमध्ये लावावा, असंही सुचलं.. पण ते अगदीच नेहमीचं. जाहिराती तरी लोक पूर्ण कुठे वाचतात? म्हणून हा तिसरा पर्याय आला! तो मात्र अपेक्षेबाहेर यशस्वी झाला.
महाराष्ट्रात कधी काळी ‘वाचाल तर वाचाल’ अशी घोषणा देऊन राज्यभर ‘ग्रंथाली’नं ग्रंथमोहोळ उठवलं होतं. त्यानंतर रोमानियातल्या या शहरानं केलेला ‘वाचा म्हणजे (तिकिटाचा खर्च) वाचवाल’ हा उपक्रम इथंही आला, तर?
संग्रहित लेख, दिनांक 22nd Aug 2015 रोजी प्रकाशित
‘बुकबातमी’ वाचाल तर वाचाल.. आणि ‘वाचवाल’सुद्धा!
‘बुकबातमी’मध्ये एरवी नव्या, आगामी किंवा गाजणाऱ्या एखाद्या पुस्तकाबद्दल वाचायला मिळतं, तसं इथं काही नाही.

First published on: 22-08-2015 at 12:29 IST
मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book news