शर्मिला शेंडे
राज्य सेवा २०२० चा अंतिम निकाल लागला आणि एकदाचा काय तो माझा जीव भांड्यात पडला. निवड झाली आणि एका दिव्यातून बाहेर पडल्याची भावना मनात होती. या निमित्ताने घरी बरेच लोक भेटायला येत होते. पण यात विशेष म्हणजे येताना ते आपल्या कन्येला सोबत घेऊन येत होते. आणि त्या आलेल्या मुलीसुद्धा अतिशय उत्साहाने मला अनेक प्रश्न विचारत होत्या. त्यांच्यापैकी कुणाला डॉक्टर बनायचंय, कुणाला आय. आय. टी.ला जायचं आहे, कुणाला छान चित्र काढून त्यात करिअर करायचं आहे तर कुणाला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून प्रशासनात यायचं आहे, अधिकारी व्हायचं आहे. दहावी – बारावीच्या वयातच करिअरचा गंभीरपणे विचार करणाऱ्या या मुलींना पाहून खरं तर मला फार कौतुक वाटलं.
ग्रामीण भागात मुलींच्या शिक्षणाकडे आणि करिअरकडे म्हणावं तसं लक्ष देत नसले तरी ही परिस्थिती हळूहळू बदलत आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्या तीनही क्रमांकावर मुली आहेत आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतसुद्धा उत्तम यश मिळविणाऱ्या मुलींची संख्या वाढत आहे. त्यामुळे असे आदर्श समोर ठेवून ग्रामीण किंवा शहरी भागातील मुली स्पर्धा परीक्षांकडे एक उत्तम करिअर म्हणून पाहत आहेत. भविष्यात अधिकारी होण्याची स्वप्न पाहत आहेत. पण या स्वप्नांच्या अलीकडे काय आहे आणि कोणता रस्ता तुम्हाला चालायचा आहे ते सांगण्याचा हा मनस्वी प्रयत्न.
आता एमपीएससी किंवा यूपीएससीसाठी तयारी करायची म्हटलं तर विशेषतः मुलीच्या बाबतीत प्रश्न उभा राहतो वाढत्या वयाचा आणि लग्नाचा. साधारण एक-दोन वर्षांनंतर अपेक्षित यश मिळत नसेल तर दुसऱ्या क्षेत्रात नोकरी किंवा लग्न झाल्यावर मग अभ्यास कर या विचारांकडे पालकांचा कल असतो. पण तुमचा निर्णय पक्का असेल आणि अभ्यासाची तयारी असेल तर मात्र कसल्याही परिस्थितीत अभ्यास करून यशस्वी व्हायचं आहे. पण हे करताना कौटुंबिक आणि सामाजिक दबावाला कसं सामोरं जायचं ? तर सगळ्यात पहिल्यांदा पालकांशी संवाद वाढवायचा आणि आपली बाजू मांडायची. म्हणजे नक्की काय करायचं? तर या परीक्षेचं स्वरूप त्यांना नीट समजावून सांगा, तुमची अभ्यासातील प्रगती त्यांना दाखवून द्या, या परीक्षेतून मिळणाऱ्या वेगवेगळ्या पदांची त्यांना माहिती द्या, शक्य असल्यास सध्या कार्यरत असणाऱ्या महिला अधिकाऱ्यांशी त्यांची भेट घालून द्या. कॉलेजला असतानाच पदवीच्या अभ्यासासोबत हासुद्धा अभ्यास सुरू केलात तर त्यांचं मन वळविताना अवघड जाणार नाही.
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणाऱ्या विविध संस्था आहेत. सारथी, बार्टी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्युट), महाज्योती, एस. आय. ए. सी. यांसारख्या नावाजलेल्या संस्था विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी मार्गदर्शन तर करतातच, पण विशेषतः मुलींसाठी वेगवेगळ्या योजनादेखील राबवतात. या सगळ्यामुळे प्रशासनात येऊ पाहणाऱ्या मुलींची संख्या वाढताना दिसतेय ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असेल तर गावाकडे राहून, इंटरनेटचा वापर करून चांगला अभ्यास होऊ शकतो. फक्त सतत कोणाचे तरी मार्गदर्शन घेत राहणे आवश्यक असते. त्यामुळे अभ्यासाची गाडी रुळावर राहते. अलीकडे तर लग्नानंतरही कित्येक मुली या क्षेत्राकडे वळताना दिसत आहेत. वयाच्या ३८ व्या वर्षांपर्यंत त्या ही परीक्षा देऊ शकतात. मूलबाळ झाल्यावर अभ्यासाला सुरुवात करून चांगल्या पदावर विराजमान झालेल्या अनेक महिलांची उदाहरणे आहेत. आता हे झालं सुरुवात कशी आणि कुठून करायची याबद्दल. पण खरी मेख आहे सुरुवात केल्यानंतर काय याबद्दल…..
क्लास लावायचा का? कोणता लावायचा? पुस्तकं कोणती वाचायची? किती तास अभ्यास करायचा? गावाकडे करायचा की पुण्यात येऊन करायचा? अभ्यासाला बसल्यावर फार टेन्शन येतं त्याच काय करायचं? तर ऐका!!!
स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्राबद्दल काहीच माहिती नसेल, अभ्यासाचा आवाका लक्षात येत नसेल तर क्लास लावायला हरकत नाही. नाही लावला तरीही काही बिघडत नाही. निवड झालेल्या उमेदवारांकडून वेळोवेळी मार्गदर्शन घ्या. खूप पुस्तकं वाचण्यापेक्षा ठरावीक पुस्तकांमधून अभ्यास करा. अभ्यासातलं सातत्य खूप महत्त्वाचं आहे. रोज किमान आठ ते दहा तास अभ्यास करावा लागेल तरच अभ्यासक्रम पूर्ण होईल. जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवा म्हणजे चुका कमी होतील आणि मार्क वाढतील. आता राहिला प्रश्न अभ्यासाच्या वेळी येणाऱ्या तणावाचा. तर तणाव हा येणारच आहे. कुणीही त्यातून सुटलेलं नाही. पण या टेन्शनचा नकारात्मक परिणाम अभ्यासावर होऊ देऊ नका. अभ्यास झाल्यावर आपल्या आवडीच्या गोष्टी करा. छंद जोपासा. मन रमेल आणि अभ्यासात उत्साह येईल असे काही करा.
ताणतणावाचे नीट व्यवस्थापन न करता आल्यामुळे सगळ्यात मोठी समस्या निर्माण होते आरोग्याची. मुलींच्या बाबतीत तर हे जास्त प्रकर्षाने जाणवते. केस गळणे, चेहऱ्याची त्वचा निस्तेज दिसणे, थकवा येणे, मासिक पाळी अनियमित होणे, हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण होणे, वजन अचानक कमी किंवा जास्त होणे, मूत्रमार्गातील संसर्ग, पी. सी. ओ. डी., पी. सी. ओ. एस. इत्यादी गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागतं. मी स्वतः या अनुभवातून गेले आहे म्हणून हे कळकळीचं सांगणं आहे. आधीच आपल्या देशात ५० टक्के स्त्रिया पंडुरोगग्रस्त (ॲनिमिक) असतात. त्यात आपली भर पडायला नको. स्त्रियांची संप्रेरके आधीच जास्त परिणामकारक (व्हायब्रंट) असतात, त्यामुळे बाह्य परिस्थितीचा त्यांच्या मनावर आणि शरीरावर लगेच परिणाम होतो. त्यासाठी रोज थोडा तरी व्यायाम करणे खूप फायद्याचे ठरते. मी रोज कमीत कमी अर्धा तास व्यायामासाठी राखून ठेवलेला असतो. अगदीच वेळ नाही मिळाला तर १२ सूर्यनमस्कार तरी मी घालतेच. त्यामुळे माझी ढासळलेली तब्येत चांगली होण्यात मदत झाली. दुसरी गोष्ट आहे खाण्याकडे अजिबातच लक्ष न देणे. करोनाच्या काळात अभ्यास आणि परीक्षेच्या तणावामुळे माझे हिमोग्लोबिन सातवर गेले होते. रोज नीट आहार घेणं फार गरजेचं आहे. फळं, खजूर, काळे मनुके, शेंगदाण्याचा लाडू, राजगिरा, तूप, बीट, नाचणीचे लाडू या सगळ्याचा वापर आहारात करायचा आहे. स्वतःच्या तब्येतीची काळजी घेण्याची सवय ही अभ्यासासाठीच नाही तर पुढे आयुष्यभरासाठीसुद्धा उपयोगी पडते. माझे आरोग्य, माझा अभ्यास आणि माझी परीक्षा याला सगळ्यात जास्त महत्त्व द्यायला हळूहळू शिकायचं आहे. सुधा मूर्ती यांनी ‘बकुळ’ नावाचं खूप सुंदर पुस्तक लिहिलंय. त्याचा संदर्भ घेऊन सांगते ‘कोणीतरी मला समजून घेईल आणि बोट धरून मला पैलतीरी घेऊन जाईल’ असा विचार माणसाला निष्क्रिय बनवतो. त्यामुळे स्वतःसाठी स्वतःच सक्रिय व्हा. आपल्या अभ्यासाची आणि करिअरची काळजी आपणच केली पाहिजे आणि त्यासाठी आवश्यक त्या सगळ्या गोष्टी अंगी बाणवल्या पाहिजेत.
अर्थातच ही सगळी माझी वैयक्तिक मते आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे लाखो विद्यार्थी आहेत आणि त्यांची वेगवेगळी मते असूच शकतात. फक्त स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेषतः मुलीच्या बाबतीत फारसे न चर्चिलेले मुद्दे समोर आणण्याचा हा छोटासा प्रयत्न..,
लेखिका उपशिक्षणाधिकारी आहेत.