केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना राग येणे अगदी साहजिकच होते. तसाही त्यांना राग फार लवकर येतो आणि त्यांच्या त्रासिक भावना चेहऱ्यावर लगेच उमटतात. लोकसभेत आणि राज्यसभेत सीतारामन बोलायला लागल्या की, विरोधी पक्षांपैकी कोणी ना कोणी तरी त्यांच्या मुद्दय़ाला, विधानाला आक्षेप घेतो. सीतारामन यांच्या भाषणामध्ये मध्ये मध्ये बोलून अडथळा आणण्याचे प्रसंग अनेकदा घडलेले आहेत. राज्यसभेत वित्त विधेयकावरील चर्चेनंतर सीतारामन उत्तर देत असताना काँग्रेसचे नासीर हुसेन, शक्तिसिंह गोहिल असे अनेक सदस्य मध्येच बोलून सीतारामन यांना अडवत होते. हाच प्रकार लोकसभेतही घडला होता. सीतारामन बोलत असताना तृणमूल काँग्रेसचे सौगत राय यांनी टिप्पणी करायला सुरुवात केली. राय यांच्यासारख्या ज्येष्ठ सदस्याने बालिशपणा केल्यामुळे सीतारामन संतापल्या होत्या. सौगत राय यांना मध्ये मध्ये बोलायची सवय आहे. लोकसभाध्यक्ष ओम बिर्लाना अनेकदा राय यांना थांबवावं लागतं. ‘‘मी बोलत असताना मध्ये मध्ये बोलण्याची काही सदस्यांना सवय लागली आहे’’, असं सीतारामन म्हणाल्या होत्या. राज्यसभेतही हाच प्रकार झाल्यानंतर सीतारामन म्हणाल्या की, मी कुठलाही मुद्दा समजावून सांगायला तयार आहे. पण, माझं बोलणंही पूर्ण होऊ देणार नसाल तर मी काहीही करू शकत नाही. कोणी रनिंग कॉमेंटरी करत असेल तर त्यांच्याकडं मी लक्ष देणार नाही. त्यांना उत्तर द्यायला मी बांधील नाही! असं म्हणून त्या खाली बसल्या. मग, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी सीतारामन यांना इतर सदस्यांकडं लक्ष न देण्याचा सल्ला दिला.

पेन चोर

राज्यसभेतील ७२ सदस्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन अखेरचं अधिवेशन ठरलं. सहा वर्षांचा कार्यकाळ संपल्याने ते निवृत्त झाले. त्यातील काही सदस्य पुन्हा निवडून येतील हा भाग वेगळा. पण, काहींना नवी सुरुवात करावी लागेल. गेल्या वेळी गुलाम नबी आझाद निवृत्त झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अश्रू अनावर झाले तसं यावेळी झालं नाही. मोदी भावनिक झालेले दिसले नाहीत, त्यांनी निवृत्त होणाऱ्या सदस्यांना शुभेच्छा दिल्या. ‘‘आझादी का अमृत महोत्सवा’’चं महत्त्व देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं आवाहन केलं आणि मोदी निघून गेले. आझादांमध्ये जेवढी भावनिक गुंतागुंत होती, तेवढी बहुधा यावेळच्या सदस्यांमध्ये नसावी. मोदी सभागृहातून गेल्यावर इतर सदस्यांची भाषणं सुरू राहिली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्माही निवृत्त झाले. त्यांच्याबद्दल बोलताना कोणी तरी म्हणालं की, आनंदजी शिस्तबद्ध भाषण करतात, नोट्स काढतात, ते स्वत: कधी पेन आणत नाहीत, मग माझ्याकडून ते पेन घेत असत.. हा किस्सा ऐकून सभापती व्यंकय्या नायडू यांनाही स्वत:चा किस्सा आठवला. लोकसभा वा राज्यसभेचे सदस्य असताना नायडूंनाही पेन बाळगण्याची सवय नव्हती, कोणाकडून तरी उसनं पेन घ्यायचं, नोट्स काढायच्या आणि सभागृहात बोलायचं ही त्यांची नेहमीची पद्धत होती. ‘‘मी दुसऱ्याकडून पेन घ्यायचो, पण ते परत करायला विसरायचो. मी कधीही दुसऱ्याचं पेन परत केलं नाही. मी आणि जनार्दन रेड्डी दोघेही दुसऱ्याच्या पेनवर डोळा ठेवून असायचो. हा प्रकार लक्षात आल्यावर इतर सदस्यांनी पेनाचं टोपण काढून पेन द्यायला सुरुवात केली होती’’, असा हा किस्सा सत्तरी ओलांडलेल्या नायडूंनी सभापतींच्या खुर्चीत बसून सांगितला. आता नायडूंना राष्ट्रपती होण्याचे वेध लागले आहेत, पण त्यांना मोदी संधी देतील का, अशी जोरदार चर्चा संसदेत रंगली होती.

मुद्देही उरले नाहीत!

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपने चारीमुंडय़ा चीत केल्यामुळं विरोधक नरमले होते. विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर लगेच संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा उत्तरार्ध सुरू झाला. त्यामुळं विरोधकांना स्वत:ला सावरायलाही वेळ मिळाला नाही. चार आठवडय़ांमध्ये दोन-चार दिवस सभागृहांमध्ये गोंधळ झाला असेल. बाकी कामकाज इतकं सुरळीत सुरू होतं की, संसदेचं अधिवेशन सुरू आहे की, बंद पडलं हेही कोणाला कळतं नव्हतं. लोकसभेत सकाळच्या सत्रात शून्य प्रहर होत असे. विधेयकांवर वा अनुदानित मागण्यांवर चर्चा असेल तर तो दुपारच्या सत्रात होत असे. खासदारांना मुद्दा उपस्थित करण्यासाठी मोकळा वेळ मिळत होता, जितके मुद्दे मांडायचे तेवढे मांडा, असं मोकळंढाकळं धोरण लोकसभाध्यक्षांनी अवलंबलेलं होतं. राज्यसभेचा कारभार तुलनेत शिस्तबद्ध असतो. शून्यप्रहर आणि प्रश्नोत्तराच्या तासाला व्यंकय्या नायडू आवर्जून उपस्थित असतात. बाकी दिवसभराचं कामकाज उपसभापती हरिवंश आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या पॅनेलवरील सदस्य सांभाळत असतात. पण, यावेळी राज्यसभेतही सदस्यांना शैथिल्य आलं होतं की काय असं वाटावं अशी परिस्थिती होती. एक दिवस तर शून्य प्रहरात सभागृह तहकूब करावं लागलं होतं. ही तहकुबी विरोधकांनी गदारोळ केला म्हणून नव्हे तर शून्यप्रहरात सदस्यांकडे सभागृहात मांडण्यासाठी पुरेसे मुद्दे नव्हते. सदस्यांनी मुद्दे उपस्थित केल्यावरदेखील दहा मिनिटांचा वेळ बाकी उरला होता. मग, दहा मिनिटांसाठी सभागृह तहकूब करून सदस्यांनी विश्रांती घेतली!

मी नाव कुठं घेतलं?

राज्यसभेत कुठल्या तरी मुद्दय़ावर काँग्रेसचे शक्तिसिंह गोहिल बोलायला उभे राहिले. ते गुजरातचे असल्याने आपल्या राज्यातील संदर्भ नेहमी देत असतात. त्यांच्या संदर्भासहित स्पष्टीकरणात गोहिल अधूनमधून मोदींची आठवण काढतात वा अनेकांना अप्रत्यक्षपणे मोदींची आठवण करून देतात. मोदींचं प्रत्यक्ष नाव घेतलं की, भाजपचे सदस्य लगेचच विरोध करायला लागतात, गोंधळ घालायला लागतात, राजापेक्षा राजनिष्ठ असल्याचं प्रमाण देतात. पण, मोदींचं नाव न घेता टिप्पणी केली की, भाजपच्या सदस्यांच्या सदस्यांची कोंडी होते. मोदींचं नाव घेतलं नाही म्हणून विरोध केला नाही तर निष्ठा दिसणार कशा, या भावनेनं ते बाकावरून उभं राहून शिरा ताणून ताणून विरोधी पक्षाच्या सदस्याला गप्प बसवण्याचा प्रयत्न करतात. भाजपचे चाणाक्ष नेतेही सोनिया गांधी वा नेहरूंचं नाव न घेता त्यांच्यावर टिप्पणी करतात, तेव्हा काँग्रेसच्या सदस्यांचीही अशीच कोंडी होते! गोहिल म्हणाले की, तळागाळातून आलो असं म्हणून सातत्याने गळा काढण्याची काही लोकांना सवय झाली आहे. महात्मा गांधी गरीब घरातून आले नव्हते, त्यांच्याकडे कोणती उणीव नव्हती, दक्षिण आफ्रिकेतही त्यांची वकिली चांगली सुरू होती, पैसाही मिळत होता, तरीही त्यांनी सर्व ऐषआराम सोडून देऊन स्वांतत्र्य चळवळीत उडी घेतली, संघर्ष केला. गांधी मनाने गरीब नव्हते. एखादी व्यक्ती झोपडपट्टीतून आली असेल, पण ती मनाने गरीब असेल तर लोकांना काहीच फायदा होत नाही. काहींना आपण गरीब घरातून आलो असं सांगत सहानुभूती मिळवण्याची सवय लागली आहे, पण त्यांचं मन गरीब आहे!.. गोहिल यांची ही टिप्पणी टोकदार होती. या टिप्पणीत टोमणा कोणाला मारला हे भाजपवाल्यांना बरोबर कळलं. मग, ते गोहिल यांना नाहक विरोध करायला लागले.