चीनमध्ये भ्रष्टाचारविरोध हा सध्याचा परवलीचा शब्द आहे. याचे कारण साधे आहे. भ्रष्टाचाऱ्यांना शिक्षा करू, स्वच्छ प्रशासन देऊ, अशा घोषणा करणे हे राजकीयदृष्टय़ा फायद्याचे असते. त्याने सत्तेवर पक्की मांड ठोकता येते. यातून भ्रष्टाचार खरोखरच कमी होतो का? शंकाच आहे. एका भ्रष्टाचारविरोधी परिषदेत बोलताना झी जिनिपग यांनी अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना एक गंभीर इशारा दिला होता, की तुमच्या बायका, मुले, नातेवाईक, मित्र आणि कर्मचाऱ्यांना लगाम घाला. आपल्या सत्तेचा वापर वैयक्तिक फायद्यासाठी करणार नाही अशी शपथ घ्या. याला आता दहा वष्रे झाली. जिनिपग आता चीनचे अध्यक्ष आहेत आणि ‘ब्लूमबर्ग’च्या एका खास वृत्तानुसार खाणी, बांधकाम येथपासून मोबाइल फोन कंपन्यांपर्यंत अनेक क्षेत्रांत त्यांच्या परिवाराचे व्यावसायिक हितसंबंध आहेत. तेव्हा चीनमधील आतापर्यंतची सर्वात मोठी भ्रष्टाचारविरोधी कारवाई म्हणून ज्या प्रकरणाचा उल्लेख केला जातो, त्याकडे जरा सावधपणेच पाहिले पाहिजे. चीनचे माजी अंतर्गत सुरक्षा प्रमुख ज्यो यूंगकांग हे या कारवाईच्या केंद्रस्थानी आहेत. नुकतेच त्यांना आणि त्यांच्या इष्टमित्र-परिवारातील ३०० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून साडेचौदा बिलियन डॉलर किमतीची मालमत्ता जप्त करण्यात आली. हे ज्यो यूंगकांग म्हणजे साधे प्रकरण नाही. फोर्ब्सच्या २०११ च्या सर्वात शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत ते २९ व्या क्रमांकावर होते. तेल आणि सुरक्षा या क्षेत्रांवरील त्यांचा प्रभाव जोखून या मासिकाने त्यांचा गौरवोल्लेख ‘चीनचे डिक चेनी’ असा केला होता. दोन वर्षांपूर्वी ते चीनच्या अंतर्गत सुरक्षा प्रमुख पदावरून निवृत्त झाले. त्याबरोबर झी जिनिपग यांनी त्यांच्याविरोधात चौकशी सुरू केली. याचे कारण म्हणजे त्यांचे जिनिपगविरोधातील उद्योग. चीनची १७ वी नॅशनल काँग्रेस २००७ मध्ये झाली. त्यानंतर झी जिनिपग यांची हत्या करून त्यांच्याऐवजी बो झिलाइ या वजनदार मंत्र्याला अध्यक्षपदी बसविण्याचा कट यूंगकांग यांनी रचला होता, अशा बातम्या आहेत. हे कदाचित सरकारी सत्य असू शकेल. एक मात्र खरे, की बो झिलाइ यांच्यावर नंतर भ्रष्टाचार आणि सत्तेचा दुरुपयोग केल्याचा आरोप ठेवण्यात आला. त्यावरून त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. त्याविरोधात यूंगकांग यांनी आवाज उठवला होता. आता यूंगकांग यांनाही झिलाइ यांच्याच रस्त्याने जावे लागणार, हे स्पष्ट आहे. राजकीय विरोधकांचा काटा काढण्यासाठी भ्रष्टाचारविरोधाचे हत्यार प्रभावी ठरते याचे हे आणखी एक उदाहरण. त्याचबरोबर अशा अन्यच हेतूंनी प्रेरित असलेल्या भ्रष्टाचारविरोधातून अंतिमत: भ्रष्टाचाराचे काहीही वाकडे होत नाही, याचेही हे आणखी एक उदाहरण म्हणावे लागेल. माओ, डेंग झिओिपग ते झी जिनिपग यांच्यापर्यंत प्रत्येकानेच अशा स्वच्छता मोहिमा सुरू केल्या होत्या आणि तरीही ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनलच्या भ्रष्टाचार निर्देशांकात चीन ८०व्या स्थानी असतो आणि तेथे बो झिलाइ यूंगकांग यांच्यासारखे नेते जन्मतच असतात. याचे महत्त्वाचे कारण चीनमधील भ्रष्टाचाराला व्यवस्थेचे स्वरूप आले आहे. त्यामुळे त्यांच्या या सगळ्याच मोहिमा चिनी बनावटीच्या उत्पादनासारख्या भासतात. तसे नसते, तर चीनमधील न्यू सिटिझन्स मोहिमेचे प्रणेते आणि भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे नेते झ्यू झियांग यांनाच चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली नसती. सार्वजनिक ठिकाणी सभा घेऊन शांतता भंग केल्याच्या किरकोळ गुन्ह्य़ासाठी त्यांना ही शिक्षा झाली. हे सर्व पाहता जिनिपग यांचा भ्रष्टाचारास सक्त विरोध आहे, असा जो माहोल सध्या उभा करण्यात येत आहे, तो किती पोकळ आहे हे लक्षात येते. यात मौज अशी की हा असा ‘चायनामेड’ भ्रष्टाचारविरोधच सध्या अन्य देशांतही लोकप्रिय आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Apr 2014 रोजी प्रकाशित
भ्रष्टाचारविरोधाची चिनी बनावट!
चीनमध्ये भ्रष्टाचारविरोध हा सध्याचा परवलीचा शब्द आहे. याचे कारण साधे आहे. भ्रष्टाचाऱ्यांना शिक्षा करू, स्वच्छ प्रशासन देऊ, अशा घोषणा करणे हे राजकीयदृष्टय़ा फायद्याचे असते.

First published on: 01-04-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chinese design against corruption