चैतन्य प्रेम

एका मर्यादेपलीकडे जगसुद्धा कुणाला आधार देऊ शकत नाही, पण सद्गुरू मात्र अखंड आधार देत असतात. अखंड या शब्दाचा अर्थ एका जन्मानं त्यांचा आधार खंडित होत नाही, असा आहे! म्हणजेच प्रत्येक जन्म आणि त्या जन्मातली सद्गुरूभेट ही शिष्यासाठी जरी नवीन असली, तरी सद्गुरूंना तो शिष्य नवा नसतो! भगवंतांनी गीतेत अर्जुनाला सांगितलं होतं की, तुझेमाझे अनेक जन्म झाले आहेत, तुला ते आठवत नाहीत, पण मी ते जाणतो. मागेच म्हटल्याप्रमाणे, हा तुझा माझा चौऱ्याहत्तरावा जन्म आहे, असं साईबाबांनी एकदा शामाला सांगितलं होतं. याचाच अर्थ प्रत्येक जन्मी ‘शामा’ बाबांना नव्यानं भेटत होता, पण त्याचा हा जन्मप्रवास प्रत्येक जन्मी बाबा जाणत होते. मग जो खरा आपला आहे त्या जिवाला प्रत्येक जन्मात आपल्याजवळ आणण्याची, त्याचा आपल्यावर विश्वास बसविण्याची, त्याच्या मनात आपला बोध बिंबवण्याची आणि त्या बोधानुसार जगण्याची इच्छा त्याच्या मनात जागती ठेवण्याची किती दीर्घ प्रक्रिया सद्गुरू पार पाडत असतात, हे समजणं आपल्या आवाक्यातलंही नाही. या अत्यंत दीर्घ प्रक्रियेसाठी सद्गुरूंना किती श्रमावं लागत असेल! ‘श्रमावं’ हा आपल्याला कळतो एवढय़ासाठी योजलेला शब्द आहे! त्यांच्या खऱ्या कष्टांची व्याप्ती आपल्या बुद्धीपलीकडची आहे. तर असा जो खरा आपला आहे तो प्रत्येक जन्मी नवनव्या नात्यागोत्यांच्या विणीत गुंतून जगताना सद्गुरू पाहतात. सद्गुरूंपेक्षा त्या नात्यांची वीण पक्की आहे, असं हा जीव त्याच्या देहबुद्धीनुसार मानत असतो. म्हणताना तो म्हणतो की, तुम्ही सर्वस्व आहात, पण प्रत्यक्षात त्याला नात्यांचा गुंता अधिक जवळचा आणि जिव्हाळ्याचा वाटत असतो. या पाश्र्वभूमीवर स्वामी महाराज म्हणतात :

सहकुटुंब सहपरिवार, दास आम्ही हे घरदार।।

तवपदी अर्पु असार, संसाररहित हा भार।।

हे गुरुराया, सहकुटुंब सहपरिवार आम्ही तुझे दास आहोत आणि हे घरदारही तुझंच आहे. तुझ्या चरणी हा असार संसार आम्ही अर्पण करीत आहोत. इथं ‘तवपदी अर्पु असार, संसाररहित हा भार’ यात ‘संसाररहित’ हा शब्द थोडा चकवा देणारा वाटतो. तो ‘संसारसहित’ही असला पाहिजे, असं वाटतं. कारण संसाराशिवायचा भार कोणता? त्यामुळे हा चरण ‘तवपदी अर्पु असार, संसारसहित हा भार,’ असा असेल, असं वाटतं. पण थोडा विचार केला की जाणवतं संसाराशिवायचा सांसारिक भारही खूप मोठा आहे! म्हणजे साधं कुटुंबासाठीच्या कष्टांचा भार आहे तो वेगळाच, पण त्या कुटुंबाच्या चिंतेचा जो भार आहे तो त्या प्रत्यक्ष कष्टांपेक्षा मोठा आहे! घरासाठी माणूस भरपूर कष्ट घेतो, पण त्या कष्टांपेक्षा त्या घरासाठीच्या चिंतेचा भार कितीतरी पटीनं अधिक असतो. तेव्हा माणूस प्रत्यक्षात जे शारीरिक कष्ट अशाश्वतासाठी उपसतो त्यापेक्षा त्या अशाश्वतासाठी त्याच्या मनातील चिंतेची व्याप्ती कैकपटीनं अधिक असते. त्या चिंतेपायी मानसिक कष्टही कैकपटीनं अधिक असतात. त्यामुळे हे गुरुराया, सहकुटुंब सहपरिवाराचा म्हणजेच आप्तस्वकीयांच्या गोतावळ्याचा भार तर तुझ्या पायी अर्पण करतोच, पण त्या गोतावळ्याशी निगडित चिंतांचा मानसिक भारही तुझ्या पायी आम्ही अर्पण करतो. असार असलेला, अशाश्वत असलेला हा संसार तुझ्या शाश्वत चरणांपाशी आम्ही सोडत आहोत. हे सोडणं मानसिकच आहे. प्रत्यक्षात काहीच सोडायचं नाही, पण त्याला मनानं चिकटणं तेवढं सोडायचं आहे.