‘इथे जमलेल्या सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षक मित्रांनो, दुष्काळी भागात असलेल्या आपल्या शाळेतील राजूने बारावीच्या परीक्षेत प्रत्येक विषयात ३५ गुण मिळवून संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले. या ‘घवघवीत’ यशाबद्दल त्याचा आज सत्कार करण्यासाठी येथे जमलो आहोत. हा सत्कार कुणाच्या हातून करावा असा प्रश्न आमच्यासमोर होता. अखेर आपल्याच शाळेतून नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना त्यासाठी गळ घातली. आमचा सत्कार करायचा सोडून त्याचा का, असा त्यांचा प्रश्न होता. पण या ३५ टक्क्यांची प्रेरणा अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळावी असे सांगितल्यावर ते तयार झाले. या पाचही गुणवंतांचे सर्वांनी टाळ्यांनी स्वागत करावे. (एकही टाळी वाजत नाही). बरं, ठीक आहे. तर आता आपण राजूच्या यशोगाथेकडे वळू या. वर्गात ‘बॅक बेंचर’ म्हणून ओळखला जाणारा हा विद्यार्थी यावेळी अनुत्तीर्ण होणार असे आम्ही सर्वांनी गृहीत धरले होते. प्रत्येक चाचणी व सराव परीक्षेच्या वेळी आम्ही त्याची समजूत काढायचो. अभ्यास कर म्हणायचो पण तो त्याचे जीवनविषयक तत्त्वज्ञान सांगून आम्हाला शांत बसवायचा. आज त्याचे आई-वडील इथे बसले आहेत. त्यांनाही अनेकदा शाळेत बोलावून घेतले. आईने तर एकदा आमच्या समक्ष याला मारले, पण राजूवर त्याचा काडीचाही परिणाम झाला नाही. मी काठावर का होईना पण उत्तीर्ण होईन व शाळेची मान खाली जाऊ देणार नाही असे तो म्हणायचा. आज त्याला मिळालेल्या प्रसिद्धीने भारावून जात आईने आमच्या समक्ष त्याची माफी मागितली. (प्रचंड टाळ्या). राजूमधला आम्हाला भावलेला सर्वात चांगला गुण म्हणजे त्याच्यातला आत्मविश्वास. आता काहीजण म्हणतात की सहापैकी काही विषयांत त्याला नक्कीच ३२ वा ३३ गुण मिळालेले असतील व तपासनीसाला दया येऊन त्याचे गुण वाढवत उत्तीर्ण केले असेल. आम्ही सर्व शिक्षक मात्र हे मानायला तयार नाही. सर्वच विषयांत बरोबर ३५ गुण हा योगायोग असू शकत नाही. यामागील खरे कारण फक्त आणि फक्त राजूच सांगू शकेल. (पुन्हा टाळ्या). आज दहावी व बारावीत जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी जीवघेणी स्पर्धा सुरू झालेली आहे. सराव परीक्षेत जरी एखादा गुण कमी मिळाला की विद्यार्थ्याला ताप येतो, पालक धावत शाळेत येतात. हेच गुणवंत विद्यार्थी सर्वांचे आदर्श असे वातावरण निर्माण झाल्याने बेताचे गुण मिळवणाऱ्यांवर येणारा ताण कमी व्हावा, आदर्शाच्या व्याख्येत बदल व्हावा याच हेतूने आज या सत्काराचे आयोजन केले आहे. गुणस्पर्धेच्या मागे न लागता जमेल तसा अभ्यास केला तर यश मिळू शकते, हेच राजूने आज सर्वांना दाखवून दिले. त्यामुळे मंचावर उपस्थित असलेल्या गुणवंतांनी मोठ्या मनाने राजूचा सत्कार करावा अशी विनंती करतो.’

मग बक्षीस देऊन सत्कार पार पडतो. त्यानंतर राजूला बोलण्याची गळ घातली जाते. तो म्हणतो ‘गुणांच्या स्पर्धेत नसलेल्या लाखो विद्यार्थ्यांची मानसिकता शाळेने समजून घेतली त्याबद्दल आभार. काहीजण म्हणतात मला ‘ग्रेस’ मिळाली पण मी मात्र ‘ग्रेसफुली’ आयुष्याला सामोरे जाईन असे वचन आज देतो, काठावर उत्तीर्ण होणारेसुद्धा विद्यार्थीच असतात हा समज आता समाजात अधिक दृढ होईल. धंदा असो वा नोकरी मी आयुष्यभर काठावर का होईना पण यश मिळवत राहीन. शेवटी ‘स्ट्रगल’ महत्त्वाचा.’ भाषण संपताच राजूच्या भोवती साऱ्यांचा गराडा पडतो. त्या गर्दीतून ते पाचही गुणवंत कशीबशी वाट काढून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतात.