नेहमीच्या सवयीप्रमाणे पहाटे चारला उठलेल्या अक्षयकुमारने मोबाइलवर नजर टाकली तर संदेशांचा ढीग साचलेला. उत्सुकतेपोटी त्याने बघायला सुरुवात केली तर पहिलाच संदेश देवाभाऊंचा. ‘धन्यवाद, तुम्ही संत्र्यांवर प्रश्न विचारला व मी दिलेले उत्तर वाचून आता केवळ विदर्भच नाही तर राज्यातील नागरिक मीठ टाकून संत्री खायला लागलेत.’ वाचून अक्षय हसला. मग त्याला आंब्यापासून संत्र्यांपर्यंतचा प्रवास आठवला. चित्रपटांनी दिली नसेल एवढी प्रसिद्धी या दोन प्रश्नांनी दिली. आता सत्ताधाऱ्यांच्या मुलाखती घेत फिरावे काय? चित्रपटापेक्षा यात जोखीम शून्य. शिवाय मानधनालाही कुणी नकार देणार नाही. हा विचार मनात येताच त्याचा ट्रेडमिलवरचा वेग आपसूक वाढला. तयार होऊन तो खाली आला तर अभ्यागतांच्या कक्षात अनोळखी चेहऱ्यांची गर्दी दिसली.
हे कोण असतील असा प्रश्न त्याच्या मनात आला, तो विचारण्याआधीच एकेकाने ओळख करून द्यायला सुरुवात केली. देशातील भाजप व मित्रपक्षांद्वारे शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव एका रांगेत बसलेले बघून त्याला काय ताट वाढून ठेवलेले असेल याची कल्पना आली. ‘चला, एकेकाने सुरुवात करा, अट फक्त एकच. तुम्हाला जो प्रश्न माझ्या तोंडून अपेक्षित आहे त्याचे उत्तर तुमचे मुख्यमंत्री काय देणार हेही मला आताच सांगायचे.’ सर्वांत आधी उत्तर प्रदेशाचे अधिकारी म्हणाले, ‘आमच्या सरांना पेरू कसे खाता असा प्रश्न विचारायचा. कारण प्रयागराज त्यासाठीच प्रसिद्ध आहे. त्यावर योगीजी कच्च्या पेरूची भाजी करून खातो असे उत्तर देतील.’ हे ऐकून अक्षय चमकलाच. त्याने मागे वळून वर बघितले तर ट्विंकल रागाने बघत असल्याचा भास त्याला झाला. मग मध्य प्रदेशचे सचिव म्हणाले, ‘यादवजींना सीताफळाविषयी प्रश्न विचारायचा. ते अंगात अॅप्रान व हातात ग्लोव्ह्ज घालून सीताफळ फोडतात व त्यावर थोडे तिखट टाकून खातात असे उत्तर देतील.’ नंतर बिहारमधून आलेले अधिकारी बोलले.
‘आमच्या नितीशजींना लिचीविषयी विचारा. त्यावर ते आधी लिची सरळ तोंडात टाकायचो, पण आता वय झाल्यामुळे ती आधी फोडतो. त्यातला गर आधी खातो व वरचे कवच लहानशा खलबत्त्यात कुटून ठेचा बनवून खातो असे म्हणतील.’ ही उत्तरे ऐकून अक्षयला मजा यायला लागली. फिटनेससाठी आपणही आयुष्यभर अनेक फळे खाल्ली, पण या नव्या पद्धतीने कधीच नाही. मग आंध्र प्रदेशचे सचिव म्हणाले. ‘आमचे चंद्राबाबू आधी केवळ बैंगनपल्ली आंबाच खायचे, पण एनडीएत सामील झाल्यापासून त्यांना आघाडीचे महत्त्व कळले व आता ते आंबा व पपई खातात. या प्रश्नावर ते संगणकावर बसल्यावर दोन्ही फळे एकत्रित करून काट्याने खातो असे म्हणतील.’ हे ऐकून अक्षयला चंद्राबाबूच्या चतुराईचे कौतुक वाटले.
मग आसामचे सचिव बोलू लागले. ‘आमच्या हेमंतजींना काजीनिमू म्हणजे लिंबू आवडते. त्यावर ते निमूचे दोन काप करून दातात धरून चोखून खातो व साल फेकून देतो असे म्हणतील.’ शेवटी हरियाणाचे अधिकारी म्हणाले, ‘आमच्या नायबजींना टरबुजावर विचारा. त्यावर ते मध्ये एक मोठे छिद्र करून त्यात चमचा टाकून खातो असे उत्तर देतील.’ हे ऐकल्यावर अक्षयने सर्वांची निमंत्रणे स्वीकारली. नंतरच्या दोन महिन्यांत सर्व राज्यांतल्या कार्यक्रमाला भरपूर प्रसिद्धी मिळाली. देशभर मुख्यमंत्र्यांच्या फलसेवनाचीच चर्चा सुरू झाली. सहा महिन्यांनी अक्षयकडे राष्ट्रीय फळे उत्पादक संघटनेचे लोक आले व सर्व देशी फळांचे ब्रँड अॅम्बेसिडर व्हा असा प्रस्ताव ठेवला. तोही घसघशीत बिदागीसह. तो स्वीकारल्यावर अक्षयने चित्रपट संन्यासाची घोषणा केली.