‘राजपक्ष’ हे नाव उच्चारल्यावर श्रीलंकेतील भ्रष्ट आणि सत्तापिपासू मंडळींची एक फळीच मनश्चक्षूंसमोर येते. बहुतेक श्रीलंकावासीयांच्या दृष्टीने खलनायकी ठरलेल्या याच नावाची, परंतु सत्तारूढ-सत्ताभ्रष्ट कुटुंबाशी काहीएक संबंध नसलेली एक व्यक्ती मात्र सध्या त्या देशातील असंख्य क्रिकेटप्रेमींसाठी नायक ठरली आहे. भानुका राजपक्ष या फलंदाजाने आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध आपल्या संघाला संभाव्य पराभवाच्या गर्तेतून अक्षरश: एकहाती बाहेर काढले. ५ बाद ५८ अशी अवस्था झालेली असताना, राजपक्षने चोपलेल्या ४५ चेंडूंतील नाबाद ७१ धावा सामन्याला कलाटणी देणाऱ्या ठरल्या. वानिंदू हसरंगासह त्याने केलेली भागीदारी श्रीलंकेला १७० धावांपर्यंत घेऊन गेली. ते लक्ष्य गाठणे पाकिस्तानला जमले नाही. श्रीलंकेचा हा लढाऊ बाणा केवळ या अंतिम सामन्यापुरता मर्यादित नाही. या स्पर्धेचे संभाव्य विजेते म्हणून भारत आणि पाकिस्तानकडे पाहिले जात होते. श्रीलंकेचा उल्लेख संभाव्य दावेदार म्हणूनही कोणी करत नव्हते. या संघाची स्पर्धेतली सुरुवातही अडखळती होती.

सलामीच्या सामन्यात त्यांना अफगाणिस्तानकडून दारुण पराभव पत्करावा लागला होता. पण साखळी टप्प्यात बांगलादेशवर आणि मग पुढील टप्प्यात अफगाणिस्तान, भारत आणि पाकिस्तानला हरवत हा संघ अंतिम फेरीत पोहोचला आणि पुन्हा एकदा पाकिस्तानविरुद्ध जिंकला. म्हणजे सुरुवातीचा सामना गमावल्यानंतर या संघाने सलग पाच सामने जिंकले आणि प्रत्येक सामना हा जणू अंतिम सामनाच, या भावनेने ते खेळले. राजपक्षचा उल्लेख सुरुवातीस झाला. परंतु श्रीलंकेच्या या दिग्विजयाचे एक ठळक वैशिष्टय़ म्हणजे, कोणा एक-दोन खेळाडूंच्या कौशल्यावर विसंबून न राहता प्रत्येक सामन्यात वेगवेगळय़ा खेळाडूंनी योगदान दिले. याला म्हणतात सर्वंकष सांघिक प्रयत्न! भारतात बिनमहत्त्वाच्या सामन्यात विराट कोहलीचे शतक नि पराभूत सामन्यात रोहित शर्माच्या अर्धशतकाची चर्चा सुरू होती. पाकिस्तानमध्येही पराभवापेक्षा चर्चा कर्णधार बाबर आझम याला सूर गवसला कसा नाही, याचीच! खेळापेक्षा खेळाडूंचे आणि सांघिक यशापेक्षा वैयक्तिक कौशल्याचे स्तोम माजवणारे या दोन्ही देशांतील क्रिकेटप्रेमी श्रीलंकेच्या यशासमोर खुजे वाटू लागतात, ते यामुळेच. तसे पाहता श्रीलंका हा देश सध्या मोठय़ा संकटांना सामोरा जात आहे. अन्न, औषधे, वीज, इंधन अशा जीवनावश्यक घटकांना बहुसंख्य श्रीलंकन पारखे झाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या संकटावर नजीकच्या भविष्यात तोडगा निघण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. आशिया चषक स्पर्धा त्याच देशात व्हायची होती, पण आर्थिक कंबरडे मोडल्यामुळे ती ऐन वेळी संयुक्त अरब अमिरातींमध्ये आयोजित करावी लागली. कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडण्याचा कोणताही तोडगा सापडत नाही, चलन उभारीची कोणतीही चिन्हे नाहीत. या प्रतिकूल पार्श्वभूमीवर श्रीलंकेच्या जिगरबाज खेळाडूंनी क्रिकेटच्या मैदानावर दाखवलेल्या संघभावनेची खुमारी त्यामुळेच अधिक आहे. निव्वळ कौशल्य आणि आर्थिक सुस्थैर्याच्या जोरावर खेळाच्या मैदानावर विजयलाभ होतोच असे नाही, हे यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले. श्रीलंकेच्या विजयापेक्षाही पाकिस्तानच्या पराभवात उत्सव मानणाऱ्या येथील अनेक अल्पमती क्रिकेटरसिकांच्या आकलनापलीकडची ही बाब आहे. आगामी विश्वचषकासाठी एक दावेदार म्हणून श्रीलंकेच्या संघाचाही विचार करावा लागेल, हे लंकन मंडळींनी मैदानावर एकाहून एक सरस विजय मिळवून दाखवून दिले आहे.