डॉ. श्रीरंजन आवटे

भारतीय राजकीय व्यवस्थेचा आत्मा असलेल्या २१ व्या अनुच्छेदाने प्रत्येक व्यक्तीच्या जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याची हमी दिलेली आहे…

साधारण ख्रिास्तपूर्व ५३९ मधली ही गोष्ट आहे. प्राचीन पर्शियाचा राजा ‘सायरस द ग्रेट’ याने बॅबिलिऑन साम्राज्याचा पाडाव केला. आणि हे आक्रमण आपण का केले, याचे स्पष्टीकरणही त्याने दिले. हे स्पष्टीकरण देणारा शिलालेख म्हणजे सायरस सिलिंडर. या शिलालेखात या राजाने गुलामगिरीच्या प्रथेचा धिक्कार केलेला आहे. राजा म्हणतो की, मला साम्राज्यामधल्या सर्व धर्मांच्या प्रथांविषयी आदर आहे. कोणत्याही धर्माचा, व्यक्तीचा अवमान होईल असे कृत्य साम्राज्यामध्ये होणार नाही, याची मी ग्वाही देतो. प्रत्येकाला संपत्ती मिळवण्याचा अधिकार आहे. कोणी कोणाचा स्वातंत्र्याचा हक्क हिरावून घेऊ शकत नाही. प्रत्येकाला मुक्त जगण्याचा हक्क आहे, असे सविस्तर लिहिलेला हा शिलालेख म्हणजे मानवी हक्कांचे आद्याक्षर आहे. इराकमधील हॉरमझड रासद यांनी हा इतिहास समोर आणला आणि त्यानंतर जगण्याच्या मूलभूत हक्कांचा अवघा पट उलगडला. विसाव्या शतकाच्या मध्यावर मानवी हक्कांबाबत जागरूकता निर्माण झाली तेव्हा सायरस सिलिंडरचा दाखला दिला गेला. मानवी हक्कांचा हा उगम असल्याचेही दावे केले गेले.

हेही वाचा >>> संविधानभान : मौनाचा अधिकार

पुढे आधुनिक काळात प्रसिद्ध झालेल्या अमेरिकेचा स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यावरही सायरस सिलिंडरचा प्रभाव आहे. या जाहीरनाम्यातले सर्वांत महत्त्वाचे विधान आहे ते स्वातंत्र्याबाबत. निर्मिकाने (द क्रिएटर) सर्वांना समान दर्जा दिला आहे. सर्वजण समान आहेत. त्याचसोबत निर्मिकाने काही अविभाज्य हक्क दिले आहेत. हे हक्क कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. या हक्कांमध्ये तीन बाबींचा उल्लेख आहे. जगण्याचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क आणि सुखाचा शोध घेण्याचा हक्क. जगण्याच्या आणि स्वातंत्र्याच्या हक्कासोबत सुखाचा, आनंदाचा शोध घेण्याचा हक्क अमेरिकन स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याने मान्य केला, हे विशेष नोंदवण्याजोगे आहे. त्या तीनही बाबींमध्ये एक सूत्र आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. जपानच्या संविधानातही स्वातंत्र्याचा आणि जगण्याचा हक्क मान्य केला आहे. इ.स. १७८९ मध्ये झालेल्या फ्रेंच राज्यक्रांतीचा नारा ‘स्वातंत्र्य, समता आणि बंधुता’ यावर आधारित असला तरी स्वातंत्र्याचा आणि जगण्याचा मूलभूत हक्क हे त्याचे केंद्र होते. आयर्लंडच्या १९३७ सालच्या संविधानानेही स्वातंत्र्याच्या आणि जगण्याच्या मूलभूत हक्काचे रक्षण राज्यसंस्था करेल, अशी ग्वाही दिलेली होती.

हेही वाचा >>> संविधानभान : एक गुन्हा, एक खटला, एक शिक्षा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताच्या संविधानसभेतही यावर चर्चा झाली. त्यानुसार हा हक्क मान्य केला गेला. संविधानातील २१ वा अनुच्छेद हा भारतीय राजकीय व्यवस्थेचा आत्मा आहे. या अनुच्छेदाने प्रत्येक व्यक्तीच्या जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याची हमी दिलेली आहे. या अनुच्छेदात म्हटले आहे: कायद्याद्वारे प्रस्थापित कार्यपद्धती अनुसरल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीस तिचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य यांच्यापासून वंचित ठेवले जाणार नाही. हा सर्वांत मूलभूत हक्क आहे. या हक्काशिवाय स्वतंत्र देशाचे स्वतंत्र संविधान अस्तित्वात येऊ शकत नाही. माणसाला जगण्याचा हक्क आहे. तो स्वातंत्र्याशी जोडलेला आहे. जगणे आणि स्वातंत्र्य वेगवेगळे करता येऊ शकत नाही. इ.स. १९४८ मध्ये जेव्हा वैश्विक मानवी हक्कांचा जाहीरनामा मांडला जात होता तेव्हाही या मुद्द्यावर चर्चा झाली. त्यानुसार मानवी हक्कांच्या जाहीरनाम्यातील तिसरे कलम आहे: प्रत्येक व्यक्तीस जगण्याचा, स्वातंत्र्याचा आणि सुरक्षेचा हक्क आहे. भारताच्या संविधानात आणि वैश्विक मानवी हक्कांच्या जाहीरनाम्यात हा मूलभूत हक्क मान्य केला गेला. या हक्काशिवाय माणूस स्वतंत्र असू शकत नाही. देश स्वतंत्र असू शकत नाही. या हक्काने जगण्याची, स्वातंत्र्याची पूर्वअट सांगितली आहे. हा मूलभूत हक्क केवळ नागरिकांनाच नव्हे तर प्रत्येक व्यक्तीला आहे, हे समजून घेतले पाहिजे. सायरस सिलिंडर ते भारतीय संविधानाचा एकविसावा अनुच्छेद ही जगण्याच्या हक्काची दीर्घ जीवनरेषा आहे. poetshriranjan@gmail.com