महेश सरलष्कर

देशात राष्ट्रीय पक्ष ही मान्यता आठच पक्षांना आहे. ‘आप’ त्यांत नसला तरी ही मान्यता मिळवण्यासाठीच गुजरातमध्ये किमान प्रमुख विरोधी पक्ष होण्याचा प्रयत्न केजरीवाल करत असून त्यासाठी काँग्रेसविरोधात त्यांच्या सभांचा रोख आहे. पण शहरी मतदारसंघांत तर त्यांची गाठ भाजपशीच असेल..

भाजपने देशाला दाखवून दिले आहे : लोकांमध्ये वातावरणनिर्मिती केली की, सत्य नेमके काय हे जाणून घेण्याच्या भानगडीत कोणी पडत नाही. एखाद्या गोष्टीबद्दल इतक्या आत्मविश्वासाने बोलायचे की, समज सत्यामध्ये परावर्तित होतो. नोटाबंदीमुळे दहशतवादाचा नायनाट होईल असे भाजपने सांगितले होते आणि लोकांनी भाजपचा दावा खरा मानला होता. भाजपचा हा खेळ आता आम आदमी पक्षही (आप) शिकायला लागला आहे. ‘आप’ने लोकांचा समज करून द्यायला सुरुवात केली आहे की, भाजपच्या विरोधात फक्त ‘आप’च लढू शकतो. अन्य प्रादेशिक पक्षांत वा काँग्रेसमध्ये ही ताकद नाही. खरा विरोधी पक्ष आम्हीच आहोत असे ‘आप’ला सांगायचे आहे.

वर्षअखेरीस गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेची निवडणूक होणार असून तिथे ‘आप’ सत्ताधारी भाजपविरोधात लढत असला तरी, त्याचे लक्ष्य काँग्रेसच्या जागी स्वत: विरोधी पक्ष बनण्याचे असावे. अन्यथा ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस पक्ष आता संपल्यात जमा असल्याचे सातत्याने सांगितले नसते. सध्या केजरीवाल गुजरातमध्ये धूमधडाक्यात प्रचार करत आहेत. तिथे त्यांचा शाब्दिक प्रहार भाजपपेक्षा काँग्रेसवर अधिक दिसतो. तिथे प्रत्येक जाहीर भाषणामध्ये केजरीवाल यांनी काँग्रेसविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली दिसते. इकडे नितीशकुमार, लालूप्रसाद यादव दिल्लीत येऊन काँग्रेसशिवाय विरोधकांची महाआघाडी होऊ शकत नाही, असे सांगत असताना केजरीवाल मात्र काँग्रेसला फारसे महत्त्व द्यायला तयार नाहीत. हा केजरीवाल यांचा, लोकांच्या मनात काँग्रेसविषयी समज निर्माण करण्याचा खेळ असू शकतो! भाजपपेक्षा काँग्रेसविरोधात बोलणे ही ‘आप’ची राजकीय अपरिहार्यता झाली असावी असे दिसते.

दिल्लीच्या विधानसभेत काँग्रेस नाही, तर भाजपचे तीन आमदार आहेत. पण दिल्लीत आपल्याला विरोधक नाहीत असे ‘आप’ला वाटते. दिल्ली महापालिका ताब्यात घेतली की, भाजपला धडा शिकवल्याचे समाधान ‘आप’ला मिळू शकते. पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता ‘आप’ने हिसकावून घेतली, तिथे काँग्रेस विरोधी पक्षात असल्यामुळे तिथल्या नेत्यांनी ‘आप’ सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे. पण केजरीवाल यांचे म्हणणे आहे की, पंजाब असो नाहीतर अन्य राज्ये-काँग्रेसचे अस्तित्व संपत आले असेल तर काँग्रेस काय आरोप करतो वा मुद्दे उपस्थित करतो त्याकडे लक्ष कशाला द्यायचे? असे विधान करून केजरीवाल यांनी, पंजाबातील ‘आप’ सरकारपुढे असलेल्या प्रश्नांवर प्रत्युत्तर देणे टाळले आणि काँग्रेस संपणार असेल तर प्रमुख भाजपविरोधक म्हणून ‘आप’ काय म्हणते याकडे लक्ष द्या, असे सुचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. राष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधून घेतले की, राष्ट्रीय स्तरावरचा नेता म्हणून महत्त्व प्राप्त होते, शिवाय, पक्षाची ताकद वाढण्याचा भासही निर्माण करता येतो. भाजप आणि ‘आप’ची मोठे होण्याची आणि टिकून राहण्याची पद्धत एकसमान दिसते. सुरत महापालिकेत ‘आप’चे नगरसेवक जिंकून आल्यानंतर केजरीवाल यांनी गुजरातकडे लक्ष दिले. गुजरात वा हिमाचल प्रदेशमध्ये भाजपविरोधात बहुमतात येण्याइतके यश मिळण्याची शक्यता कमी असल्याचे ‘आप’लाही माहिती आहे. पण काँग्रेस पक्ष संपुष्टात आला असून भाजपविरोधात आम्हाला मते द्या, असे आवाहन करण्याचा लाभ मिळू शकतो, हे ‘आप’चे गणित आहे. गुजरात असो वा हिमाचल प्रदेश, काँग्रेसची खरोखरच किती मते ‘आप’ला मिळतील याबाबत शंका आहे. गुजरातमध्ये काँग्रेसला तुलनेत ग्रामीण भागांतून अधिक मते मिळतात. भाजपची शहरी भागांवर अधिक पकड आहे. सुरत महापालिकेत ‘आप’ला मिळालेले यश पाहता, ‘आप’चाही मतदार ग्रामीण भागांपेक्षा शहरी भागांत अधिक असू शकतो. मग, ‘आप’ भाजपची मते घेणार की, काँग्रेसची?

गुजरातमध्ये गेल्या वेळी काँग्रेसने भाजपला जबरदस्त टक्कर दिली होती, या वेळी काँग्रेसने अपेक्षित लक्ष दिलेले नाही. त्यामुळे काँग्रेसला तिथे फटका बसू शकतो असे मानले जात आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा सुरू असली तरी, ती ना गुजरातमध्ये जाईल, ना हिमाचल प्रदेशमध्ये. ही यात्रा या राज्यांमध्ये पोहोचेपर्यंत तिथल्या विधानसभेच्या निवडणुका झालेल्या असतील. भारत जोडो यात्रेतून काँग्रेसला मजबूत करायचे असेल तर, ही यात्रा राजकीय व्हायला हवी असे काही काँग्रेस नेत्यांचे म्हणणे होते. त्यामुळे ही यात्रा गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधून जायला हवी होती. राहुल गांधी देशभर फिरत आहेत पण ते निवडणुका होणाऱ्या राज्यांमध्ये जाणार नसतील तर त्याचा राजकीय लाभ काँग्रेसला मिळणार कसा, असा सवाल उपस्थित केला जात आहे. गोव्यामध्ये काँग्रेसचे आठ आमदार भाजपने पळवले. ही पळवापळवी काँग्रेसने होऊ कशी दिली, असे केजरीवाल म्हणाले होते. पंजाब आणि दिल्लीमध्येही भाजपने ‘आप’चे आमदार फोडण्याचा प्रयत्न केला, आम्ही तो हाणून पाडला. मग, हेच काम काँग्रेसला का करता आले नाही, हा केजरीवाल यांचा युक्तिवाद रास्त ठरतो. गुजरातमध्ये काँग्रेसने शक्ती पणाला लावली नाही तर, काँग्रेस तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरेल आणि ‘आप’ गुजरातमधील विधानसभेत विरोधी पक्ष होईल, असा अंदाज ‘आप’कडून बांधला जात आहे. भाजपच्या बालेकिल्ल्यात म्हणजे गुजरातमध्ये ‘आप’ विरोधी पक्ष झाला तर, केजरीवाल यांना, ‘बघा आम्ही सांगत होतो, काँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात आले,’ अशी शेखी मिरवण्याची संधी मिळेल.

वास्तविक, गेल्या काही वर्षांपासून काँग्रेस इतकी कमकुवत झाली आहे की, हा पक्ष आणखी किती रसातळाला जाणार, असा प्रश्न कोणालाही पडू शकेल. अशा स्थितीतही काँग्रेसची १९-२१ टक्के मते कायम राहिलेली आहेत. भाजपचा पराभव करायचा असेल तर काँग्रेसला ४०-४५ टक्के मते मिळवावी लागतील; पण विरोधी पक्षांच्या महाआघाडीत राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेसलाच सर्वाधिक मते मिळतात आणि लोकसभेत अन्य प्रादेशिक पक्षांच्या तुलनेत काँग्रेसचेच खासदार जास्त असतात. त्यामुळे काँग्रेसला कितीही कमी मते पडली तरी, दोन्ही लोकसभा निवडणुकांनंतर काँग्रेस हाच प्रमुख विरोधी पक्ष ठरला. आगामी लोकसभा निवडणुकीतही नितीशकुमार वगैरे विरोधी पक्षनेत्यांच्या महाआघाडी बनवण्याच्या प्रयत्नामध्ये काँग्रेसचे स्थान महत्त्वाचे असेल. तिथे ‘आप’ला किती जागा असेल, हाही प्रश्न आहे. खरे तर ‘आप’चे अस्तित्व पंजाब आणि दिल्लीपुरते सीमित आहे. गोव्यात प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे. केजरीवाल यांचा सगळा खटाटोप ‘आप’ला राष्ट्रीय पक्ष बनवण्याचा आहे. त्यासाठी काही करून केजरीवाल यांना गुजरातमध्ये यश मिळवणे गरजेचे आहे. गुजरातमध्ये भाजपला लक्ष्य करून अपेक्षित यश मिळणार नाही, त्यापेक्षा काँग्रेसविरोधात आक्रमक झाल्यास काही जागा पदरात पडू शकतील का, याचा अंदाज केजरीवाल घेत आहेत. त्यामुळे ते सातत्याने काँग्रेसविरोधात बोलताना दिसतात. चार राज्यांत ‘आप’ला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली तर, ‘आप’ हा राष्ट्रीय पक्ष ठरू शकतो. काँग्रेसविरोधातील ‘आप’ची आक्रमक भूमिका राष्ट्रीय पक्ष बनण्याच्या तयारीचा भाग असल्याचे मानले जात आहे. आत्ता काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, नॅशनल पीपल्स पार्टी, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि भाजप असे आठ मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष आहेत. भाजप आणि बसप हे दोन पक्ष वगळले तर विरोधी पक्षांच्या कथित महाआघाडीमध्ये उर्वरित राष्ट्रीय पक्षांना महत्त्व आहे, उत्तरेतील हिंदूी पट्टय़ात फक्त काँग्रेसचे अस्तित्व आहे. ‘आप’ला राष्ट्रीय विरोधी पक्ष म्हणून उत्तरेकडील राज्यांमध्ये स्वत:ची जागा निर्माण करायची आहे. त्यामुळे काँग्रेस आता संपलेला पक्ष असल्याची विधाने करून समज (परसेप्शन) तयार करण्याचा खेळ ‘आप’कडून खेळला जात आहे.

mahesh.sarlashkar@expressindia.com