फुटबॉल खेळणाऱ्या बलाढ्य देशांची चर्चा होते त्या वेळी ब्राझील, जर्मनी, इटली, फ्रान्स, स्पेन ही नावे हमखास घेतली जातात. परंतु इंग्लिश फुटबॉल माध्यमांच्या प्रभावामुळे असेल किंवा आणखी काही कारण असेल, अर्जेंटिनाचे नाव टाळण्याकडेच कल असतो. या देशात ब्राझीलइतकीच समृद्ध फुटबॉल संस्कृती आहे. तीन वेळा जगज्जेतेपद पटकावलेल्या अर्जेंटिनाने ब्राझीलपेक्षा अधिक वेळा कोपा अमेरिका ही दक्षिण अमेरिकेतील खंडीय फुटबॉल स्पर्धा जिंकलेली आहे. अर्जेंटिनाचा गौरवोल्लेख प्राधान्याने दिएगो मॅराडोना, लिओनेल मेसी या फुटबॉलपटूंच्या संदर्भात होत असतो. परंतु खेळाडूंइतकीच या देशाला फुटबॉल प्रशिक्षकांची वैभवशाली परंपरा आहे. या परंपरेतील एक नाव होते सेसार लुइस मेनोटी.

हेही वाचा >>> व्यक्तिवेध : फ्रँक स्टेला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अर्जेंटिनाने पहिल्यांदा १९७८मध्ये विश्वचषक जिंकला, त्या संघाचे प्रशिक्षक मेनोटी होते. तो विजय डागाळलेला होता, असे अनेक पाश्चिमात्य फुटबॉल विश्लेषकांना वाटते. पण यांतीलच अनेकांनी मेनोटी यांना, ते निवर्तल्याचे समजल्यानंतर मोकळ्या मनाने आदरांजलीही वाहिली. अर्जेंटिनाच्या लष्करी राजवटीने ती फुटबॉल विश्वचषक स्पर्धा ‘अर्जेंटिनाचा उदय’ म्हणून मिरवत, भ्रष्टाचारी आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटकांच्या संगनमताने आणि युरोपिय देशांच्या नाकावर टिच्चून भरून दाखवली होती. परंतु डाव्या विचारसरणीचा प्रभाव असलेले आणि लष्करी राजवटीविषयी तिटकाराच बाळगणारे मेनोटी यांना मात्र त्यांच्या हाताखालील खेळाडूंनी वेगळ्याच कारणासाठी विश्वचषक जिंकावा असे मनापासून वाटत होते. अर्जेंटिनाचे तत्कालीन लष्करशहा होर्गे राफाएल विडेला यांची राजवट अत्यंत निष्ठुर म्हणून ओळखली जात असे. या अत्याचाराचा वरवंटा अनुभवलेल्या हजारो फुटबॉलप्रेमींचे काही घटका मनोरंजन व्हावे अशी मेनोटी यांची माफक अपेक्षा होती. अर्जेंटिनाचा राष्ट्राभिमान तेवत राहावा, यासाठी त्यांच्यापेक्षा उत्तम प्रशिक्षक त्या काळी अर्जेंटिनात उपलब्ध नव्हता. मेनोटी यांना ‘उजव्या शैली’तील फुटबॉलचा – हे त्यांचेच शब्द – विलक्षण तिटकारा होता. धसमुसळा, अखिलाडू धाटणीचा खेळ हे तोपर्यंत अर्जेंटिनाच्या फुटबॉलचे वैशिष्ट्य होते. मेनोटी यांनी ‘मुक्त’ शैली संघात घोटवली. वेगवान, प्रवाही, नेत्रदीपक, आक्रमक खेळास प्रोत्साहन दिले. यातूनच मारियो केम्पेस आणि डॅनिएल पासारेलासारखे विख्यात फुटबॉलपटू उदयास आले. या संघाने अंतिम लढतीत त्या वेळच्या बलाढ्य नेदरलँड्स संघाला ३-१ असे हरवले. त्या वेळी ‘प्रशिक्षक’ मेनोटी अवघे ३९ वर्षांचे होते. हा त्यांच्या प्रशिक्षक कारकीर्दीतील परमोच्च क्षण. पुढे त्यांनी युवा संघालाही जगज्जेतेपद मिळवून दिले, बार्सिलोनासारख्या युरोपिय क्लबला मार्गदर्शन केले. सेसार लुइस मेनोटी एखाद्या विचारवंतासारखे दिसायचे आणि वावरायचे. बहुधा त्यामुळेच त्यांची कारकीर्द कधी डागाळली नसावी!