गिरीश कुबेर

एलॉन मस्क भारतात आल्यावर त्या मिठयाबिठया होतीलच. त्याच्यासाठी पायघडयाही अंथरल्या जातील. पण तो आत्ताच का येतोय आपल्याकडे? काय हवंय त्याला? 

How To Make Raw Banana Chivda
Raw Banana Chivda: मुलांच्या खाऊच्या डब्यासाठी बनवा ‘कच्चा केळींचा चिवडा’ ; चटपटीत अन् पौष्टिक पदार्थ कसा बनवायचा? साहित्य, कृती लिहून घ्या
Important aspects of bike maintenance
बाईक मेंटेनन्सच्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टींकडे कधीही करू नका दुर्लक्ष
Here are six tips to make your old car look new
तुमची जुनी कार नवी दिसण्यासाठी ‘या’ सहा टिप्स करतील मदत; कार दिसेल नेहमी चकाचक
NEET exam, NEET exam Crisis, Uncertainty for 23 Lakh Medical Aspirants, Court Delays neet exam, Regulatory Failures, Regulatory Failures in neet exam, neet exam, neet medical exam, neet exam news, neet news
‘नीट’ दिलेल्या २३ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याविषयी काहीच गांभीर्य नाही?
jaggery use for hair problem should you apply jaggery directly to your hair
केसांना गूळ लावल्याने केस वाढण्यासह होतात नैसर्गिकरीत्या मजबूत? याबाबत डॉक्टर काय म्हणतात घ्या जाणून….
Benefits Of Drinking Tulsi Water
तुळशीचे पाणी पिण्याचे अमृतासमान फायदे वाचा; सर्वाधिक फायद्यांसाठी कसे करावे सेवन? वाचा आहारतज्ज्ञांचा स्पष्ट सल्ला
Loksatta editorial SEBI issues show case notice to Hindenburg in case of financial malpractice on Adani group
अग्रलेख: नोटिशीचे नक्राश्रू!
2-2-2 diet really beneficial for weight loss
वजन कमी करण्यासाठी ‘२-२-२ आहार पद्धत’ खरंच फायदेशीर आहे का? काय सांगतात तज्ज्ञ…

सध्या आपल्याकडे सुरू असलेल्या ‘लोकशाहीच्या सर्वात मोठया’ वगैरे उत्सवाच्या मांडवात लवकरच आणखी एक उत्सव साजरा केला जाईल. एलॉन मस्क भारतात येतोय. आंतरराष्ट्रीय राजकारणात अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं जे स्थान तीच आंतरराष्ट्रीय उद्योगात मस्कची प्रतिमा. गेल्या वर्षी त्यानं ‘ट्विटर’ घेतल्यापासनं जगाला तो जरा जास्तच कळायला लागला. त्याच्या मालकीचं ट्विटर- आता  एक्स -आहे. त्याच्या मालकीचा उपग्रह आहे. उपग्रह प्रक्षेपक कंपनीचा तो मालक आहे. उपग्रहामार्फत दळणवळण सेवा देणारी कंपनी त्याची आहे. आणि ‘टेस्ला’ तर त्याचीच. या ‘टेस्ला’साठी तो आपल्याकडे येणार आहे.

त्याची भेट ही म्हणजे उत्सवच असेल. टिम कुक, सुंदर पिचाई, मार्क झकरबर्ग, बिल गेट्स, जेफ बेझोस वगैरे व्यक्ती त्यांच्या त्यांच्या उद्योगांमुळे दंतकथा बनून गेल्यात. आणि त्यामुळे हे कथानायक आपल्याकडे येतात तेव्हा त्यांचं जंगी स्वागत होतं, आपल्याकडची पॉवरफुल माणसं त्यांना मिठया मारतात, त्याची छायाचित्रं माध्यमांत झळकतात, आपल्या पॉवरफुलांमुळे येणाऱ्या पाहुण्यांचे डोळे कसे दिपले वगैरे भाकडकथा घोळवून घोळवून सांगितल्या जातात आणि या पाहुणचारामुळे भारावलेले हे कथानायक मग माध्यमांना ‘बाईट’ देतात: भारत हेच आता जगाचं आशास्थान आहे.. भारताची प्रगती स्तिमित करणारी आहे.. भारताचं नेतृत्व अतुलनीय आहे.. वगैरे. छान वाटतं आपल्या या प्रगतीच्या कथा इतरांकडून ऐकताना.

आता मस्क आल्यावरही हे सगळं काही होईल. थोडंसं कदाचित जास्तही होईल. म्हणजे त्याचा लौकिक लक्षात घेता आणि आपल्याकडचा लोकशाहीतला सुरू असलेला सर्वात मोठा उत्सव वगैरे लक्षात घेता मस्क न जाणो ‘अगली बार.. चारसो पार’ वगैरे घोषणाही देऊन जाईल. शेवटी तो मस्क आहे. निवडणूक आचारसंहिता भंग वगैरे मुद्दे त्याला थोडेच लागू होतात? परत काही कोट रुपयांच्या गुंतवणुकीची आशा तो दाखवू शकतो. या घोषणेचा लोकशाहीच्या सर्वात मोठया उत्सवात फायदाही होऊ शकतो.

हेही वाचा >>> निवडणुकीच्या धामधुमीत दूरदर्शनची वृत्तवाहिनी भगवी

या मस्कची व्यक्तिरेखा सादर करणं हा काही इथला विषय नाही. त्यामुळे त्यानं बोलिव्हियात लिथियमच्या खाणींवर ताबा मिळावा यासाठी काय काय उद्योग केले, त्या देशात मस्कविरोधात आंदोलन का झालं, बॅटऱ्यात अत्यावश्यक असलेलं कोबाल्ट तो कसं मिळवतो वगैरे मुद्दयांची चर्चा करण्याची गरज नाही. आपल्याला विचारात घ्यायचाय एकच मुद्दा. भारताला भेट द्यावी, इथल्या गुंतवणुकीसाठी प्रयत्न करावेत असं मस्क याला आताच का वाटलं? गेले जवळपास दशकभर प्रयत्न सुरू होते मस्कनं भारतात यावं यासाठी. आपले दिल्लीतले आणि काही राज्यांतलेही राजकारणी डोळयात प्राण एकवटून वाट पहात होते त्याच्या आगमनाची. मस्क येईल, गुंतवणुकीची घोषणा करेल आणि त्याच्यासमवेत मोठया विजयी मुद्रेनं आपल्याला छायाचित्रं काढता येतील.. ही आशा किती जणं बाळगून होते. किमान दोनदा तर तो येणार येणार म्हणता म्हणता आलाच नाही. अनेकांचे त्याला मिठीत घेण्यासाठी फैलावलेले हात तसेच राहिले. पण आता मात्र तो नक्की येतोय! नक्की म्हणजे नक्की.. उत्सवातल्या उत्सवासाठी. पण प्रश्न हाच. आता(च) का?

याचं खरं उत्तर- जे सांगितलं जाणार नाही; ते- आहे: त्याची अमेरिकेत गटांगळया खाऊ लागलेली टेस्ला. गेल्या वर्षभरात त्याच्या मोटारींची मागणी चांगलीच घटलीये. नुसतं टेस्लाच नाही तर एकंदर ‘ईव्ही’.. ‘ईव्ही’.. असा जो काही आचरटपणा सुरू होता, त्याला ओहोटी लागलीये. विजेवर चालणाऱ्या या मोटारींचं आकर्षण कमालीचं घटलंय आणि मुख्य म्हणजे त्यांच्या किमतीच्या मनानं हे प्रकरण तितकं काही उत्तम नाही, याचं भान विकसित जगात तरी अनेकांना यायला लागलंय. ताज्या तिमाहीतली मोटारविक्रीची आकडेवारी मस्कच्या कंपनीनं आताच, २ एप्रिलला, जाहीर केली. तीनुसार त्याने या काळात फक्त तीन लाख ९० हजार इतक्याच मोटारी विकल्या. गेल्या तिमाहीच्या तुलनेत हे प्रमाण १० टक्क्यांनी कमी आहे. गेल्या वर्षी या काळात टेस्लाचं बाजारपेठीय मूल्य होतं १ लाख २० हजार कोटी डॉलर्स इतकं अगडबंब. अवघ्या १०-१२ महिन्यांत ते घसरून ५५,००० कोटी डॉलर्सवर आलंय. त्याच्या कंपनीचे समभाग साधारण ३० टक्क्यांनी घसरलेत आणि वॉल स्ट्रीटवरच्या अनेक बडया बँकर्सनी टेस्लाबाबत सावधानतेचा इशारा द्यायला सुरुवात केलीये. हे नुसतं इतकंच नाही. तर मस्क महाशयांनी घोषणा केलीये. कसली तर टेस्लामधनं किमान १० टक्के कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची. या कंपनीचा जर्मनीत बर्लिनजवळ एक कारखाना आहे. तिथे आताच अडचणी सुरू झाल्यात.

पण हे नुसतं एकटया मस्क याचंच झालंय असं नाही. आपल्याला फक्त मस्क आणि टेस्लाच माहिती. पण आज जगभरात किमान अर्धा डझन असे नवे नवउद्यमी असतील की ज्यांनी मस्कप्रमाणे स्वत:चे ‘ईव्ही’ ब्रँड विकसित केलेत. उदाहरणार्थ फिस्कर, हायफाय, रिविएन, ल्युसिड मोटर्स, ली ऑटो, बीवायडी ऑटो, निओ, क्षेपेंग वगैरे. यातल्या काही कंपन्यांनी तर आपलं उत्पादनच बंद केलंय. कारण? अर्थातच मागणी नाही. आणि या तर सगळया नव्या कंपन्या. फोर्ड, टोयोटा, जनरल मोटर्स, फोल्क्स वॅगन, बीएमडब्ल्यू वगैरे पारंपरिक मोटार कंपन्यांच्या ईव्ही येतायत ते वेगळंच. या सगळया कंपन्यांनी आपलं उत्पादन कमी केलंय आणि काही मोटारीच्या बॅटऱ्या बनवणाऱ्या कंपन्या तर दिवाळखोरीत निघाल्यात. या सगळया कंपन्यांचं एक निरीक्षण आहे. ते असं की विजेवर चालणाऱ्या मोटारींचा कारखाना तगून राहायचा असेल तर त्याला किमान पाच लाख मोटारी विकाव्या लागतात. म्हणजे इतक्या मोटारी विकल्या गेल्या नाहीत तर कारखाना नफा मिळवणं दूरच, त्याची कमाईही सुरू होत नाही. आणि स्वस्तातल्या स्वस्तातली टेस्ला (मॉडेल वाय) घ्यायची तर मोजावे लागतात ५२ लाख रु. आणि मॉडेल ‘एक्स’ची किंमत आहे २.१ कोटी रु. अन्य नव्या ब्रँड्सच्या मोटारी यापेक्षा दोनपाच लाखांनी स्वस्त इतकाच काय तो फरक.

टेस्लाची भारतातील गुंतवणूक लांबली, एलॉन मस्क यांनी दौरा पुढे ढकलला! नव्या दौऱ्याबाबत दिले संकेत

आणि गंमत अशी की काही निवडक धनाढयांनाच परवडेल अशी ही ‘टेस्ला’ आता जागतिक स्पर्धेतही मागे पडलीये. तिला मागे टाकणारी कंपनी कोणती? तिचं नाव आहे ‘बीवायडी’. आपल्याला वाईट वाटेल; पण चीनची आहे ती. तिची महागातली महाग मोटार येते ५३-५५ लाख रुपयांत आणि स्वस्तातली स्वस्तात पडते २९-३० लाख रुपयांत. या चिनी कंपनीची भरारी इतकी आहे की मस्कदेखील हादरलाय.

..म्हणून मग ही भारतभेट! जगात विकसित देशांत लाथाडलं जाण्याची वेळ आली की अनेकांना भारत आठवतो. एलॉन मस्क हा काही याला अपवाद असायचं कारण नाही. तेव्हा त्याला आताच भारतात यावं असं वाटलं असेल तर ते त्याच्या दृष्टीने योग्यच.. त्याचा प्रश्न नाही.

तो आपला आहे!  मस्क भारतात येईल. मिठया वगैरे होतील. तो गुंतवणुकीची घोषणाही करेल. त्यासाठी त्याला काही सवलती दिल्या जातील -न जातील. पाठोपाठ ही गुंतवणूक कशी आपण ‘मिळवली’ याच्या विजयकहाण्या सांगितल्या जातील आणि टाळया वाजवणारे टाळया वाजवतील.  अशा वेळी आपले राष्ट्रीय प्राधान्यक्रम काय? ते ‘मेक इन इंडिया’ वगैरेचं पुढे काय झालं वगैरे प्रश्नांनी उगाच शिणण्यात काय अर्थ?

लहान मुलांचं खाणं, औषधं, रसायनं असोत किंवा अगदी मोटारींचा मुद्दा असो. जगात ज्यांना कोणी वाली नसतो त्यांना आश्रय द्यायला आपण असतो. ‘अरेवा’ या डब्यात गेलेल्या अणुऊर्जा कंपनीला मायदेशी फ्रान्समध्येही कोणी विचारत नव्हतं. पण तिला भारतात पायघडया घातल्या गेल्या.. असो.

जगी ज्यास कोणी नाही.. या गाण्यातला ‘देव’ काढून भारत घातला की झालं. नाहीतरी बाजारपेठ हाच देव मानण्याचा आजचा काळ..!

girish.kuber@expressindia.com

@girishkuber