वयाच्या आठव्या वर्षी मैफलीत साथ करण्याची संधी, वयाच्या बाराव्या वर्षी कर्नाटकशैलीचे व्हायोलिनसम्राट द्वारम् वेंकटस्वामी नायडू यांच्या एकलवादनाला मृदुंगसाथ आणि त्यानंतर अनेक प्रख्यात गायक-वादकांसह वादन, महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होण्याआधीच राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याकडून, अ. भा. आंतर-विद्यापीठीय स्पर्धेतील ‘सर्वोत्कृष्ट कलाकारा’चे पदक… पण पदवी-शिक्षण पूर्ण होतानाचे वय २७… वरदा कमलाकर राव यांच्या आयुष्यातली, १४ ते २२ ही वर्षे कुठे गेली होती? त्या वाढत्या वयातच मृदंगम् – वादक म्हणून त्यांची सैद्धान्तिक बैठक तयार होत होती. या वाद्याचे धडे दोन गुरूंकडून घेतल्यानंतर तिसरे गुरू, पद्माश्री पालघाट मणि अय्यर यांच्याकडे गुरुकुल पद्धतीने कमलाकर राव शिकू लागले होते. अय्यर यांनीही राव यांना पुत्रवत मानून त्यांना सारी विद्या दिली आणि मृदुंगमवादनाचे एकल कार्यक्रम करण्याइतपत तयार तर केलेच, पण कर्नाटक संगीतासह हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीतातही साथ करण्यासाठी राव यांना सिद्ध केले. अशी चतुरस्रा मृदुंगविद्या घेऊन वडिलांच्या आग्रहाखातर महाविद्यालयात येईस्तोवर, वयाची एकविशी उलटून गेलेली होती.

हेही वाचा >>> व्यक्तिवेध : सुधाम्मा

कमलाकर यांचे वडील वरदा राव हे हॉटेल आणि लॉजमालक. राजमुंद्री या राहत्या गावासह अनेक ठिकाणी त्यांची गुंतवणूक होती. म्हणजे काहीही न शिकतासवरता कमलाकर यांना कमाईची भरपूर संधी होतीच. पण बापानेही पोराचे मन जाणले, वयाच्या पाचव्या वर्षीच गावातल्या भजनमंडळात मृदंग वाजवणाऱ्यांकडे शिकायला नेले आणि पोरानेही वडिलांच्या मायेचे चीज केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या ‘वरदाराव कमलाकर राव’ यांचे निधन ११ नोव्हेंबर रोजी सकाळी झाले. वयाच्या ८८ व्या वर्षी, व्याधिग्रस्त न होता आणि मृदुंगावर हात चालवणे शक्य असताना ते गेले. त्याआधी मे २०१९ मध्ये, त्यांच्या ८५ व्या वर्षाचे औचित्य साधून त्यांच्या सन्मानार्थ सहा दिवसांचा महा-संगीत महोत्सव राजमहेन्द्रवरम (पूर्वचे राजमुंद्री) येथे आयोजित करण्यात आला होता. गावाचे नाव मोठे करण्यात राव यांचा वाटा केवळ लाक्षणिक अर्थानेच असला तरी, ‘विद्वान कमलाकर राव’ हे नाव संगीतक्षेत्रात किती मोठे आहे याचा प्रत्यय त्या सोहळ्यात कला सादर करणाऱ्या अनेक प्रख्यात गायक-वादकांमुळे आला. चित्ती बाबू, नेन्दुनुरी कृष्णमूर्ती, बालमुरलीकृष्णन यांच्यासह अनेक परदेशदौरे त्यांनी केले. मात्र एकल मृदुंगवादनाचे त्यांचे कार्यक्रम संख्येने कमी झाले. भिडस्त स्वभावामुळेही असेल; पण १९९९-२००० सालच्या ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कारा’खेरीज केंद्र सरकारशी निगडित असा एकही सन्मान त्यांना मिळाला नव्हता.