दगड करणारी पौष महिन्यातली थंडी. जणू शरीरातून रक्त वाहात नसून गोठवून टाकणारा बर्फच नसानसांत साचला आहे असं वाटायला लावणारी. हलकू नावाचा छोटा शेतकरी. बायकोनं त्याच्यासाठी एक कांबळं घ्यायला काही पैसे गाठीला बांधून ठेवलेले आहेत. एका देणेकऱ्याचा तगादाही हलकूच्या मागे आहे. वेळेत पैसे दिले नाहीत तर तो चार माणसांत शिव्या घालील ही भीती. हलकू म्हणतो, ‘कांबळं पुन्हा घेऊ, पण आधी त्याचे पैसे देऊन टाकू.’ हलकू ते पैसे देऊन टाकतो. आता शेतात राखणीला जायचं तर उबदार कापडं नाहीत. कांबळं घेण्याची इच्छा तशीच मरून गेली.
हलकू आणि त्याचा लाडका कुत्रा जबरा शेतात राखणीला जातात. थंडीनं अंग कुडकुडत असतं. हलकूसोबत जबराही कुडकुडत असतो. कूस बदलून, हातपाय पोटाशी घेऊन काहीही होत नाही. एवढंच नाही तर जबराला कुशीत घेऊनही थंडी काही केल्या कमी होत नाही. हलकू आकाशाकडे पाहतो. रात्र भरात आहे. अजून अर्धी रात्र काढायची आहे. हलकूच्या शेताजवळच एक आमराई आहे. पानगळीचा मोसम असल्यानं झाडांच्या वाळल्या पानांचा खच खाली पडलेला. हलकूला वाटलं वाळलेली पानं गोळा करून त्याचा मोठा ढीग करून पेटवून देऊ आणि शेकत बसू. तो जातो. पानांचा ढीग करतो. आमराईत सगळा अंधार. झाडावरून ठिबकणारे दवाचे थेंब. त्याने जमिनीवर गळालेल्या पानांचा मोठा ढीग तयार केला. त्याला असं वाटलं की तो आता थंडीला जाळून भस्मसात करणार. ढीग पेटवल्यानंतर उजेडाने आमराईत झाडांच्या सावल्या दिसू लागल्या. हलू लागल्या. जणू अंधाराच्या समुद्रात अनेक नौकाच हेलकावे खात आहेत असं वाटू लागलं.
हळूहळू जाळ कमी होतो पण विस्तव असतोच. त्याची ऊबही असते. एवढ्यात काहीतरी आवाज येतो. जबरा थेट शेताकडे धावत जातो. हलकू विस्तवाजवळच बसलेला आहे. शेतात काही जनावरं घुसल्याची चाहूल त्याला लागते. तो नीलगायींचा कळप असतो पण तातडीने उठावं असं हलकूला वाटत नाही. तो तसाच बसून राहतो. एक वेळ उठायचा प्रयत्नही करतो पण अंगाला झोंबणारा गार वारा त्याला जागीच जखडून टाकतो. जबरा जीवाच्या आकांताने चवताळतोय, तुटून पडतोय. त्याच्या भुंकण्याचा आवाज हलकूला येत राहतो. तो त्या शेकोटीजवळच बसलेला आहे. नीलगायींनी सगळं पीक तुडवलेलं असतं. त्याला त्या शेकोटीजवळच डोळा लागतो. नवरा घरी कसा आला नाही म्हणून सकाळी ऊन पडल्यानंतर त्याची बायको मुन्नी शेतात येते. ‘तुम्ही इकडे आमराईत जाळ करून बसलात. तिकडे सगळ्या पिकाचा सत्यनाश झालाय.’ असं म्हणत ती नवऱ्याला जागं करते. मग दोघेही शेताच्या बांधावर येतात. जबरा रात्रीच्या घटनेनं थकूनभागून उन्हाची किरणं अंगावर घेत पहुडलेला असतो. हलकू आणि त्याची बायको शेताची झालेली दशा पाहतात. बायको चिंतित झालेली असते पण हलकूच्या चेहऱ्यावर मात्र समाधान असतं. बायको म्हणते, ‘आता मजुरी करून मालगुजारी भरावी लागेल.’ हलकू अतिशय आनंदाने म्हणतो, ‘गेलं तर जाऊदे पीक. रात्री मरणाच्या थंडीत इथं येऊन कुडकुडत तर पडावं लागणार नाही ना आता.’
प्रेमचंद यांची ‘पुस की रात’ ही तशी लोकप्रिय असलेली कथा. भारतीय शेतकऱ्याचं इतकं जिवंत चित्र भारतीय कथेत अपवादानंच आढळतं. शेतातलं पीक उद्ध्वस्त झाल्यानंतर अन्य कुठल्या लेखकाच्या कथेत शेतकऱ्यानं आक्रोश केला असता. धाय मोकलून तो रडला असता. इथं शेतकरी आनंदाने म्हणतोय, ‘जाऊ दे. या मरणयातनांतून सुटका तर झाली.’ सर्व काही गमावल्यानंतरचं दु:ख वाटण्यापेक्षा सुटका झाल्याचा आनंद वाटावा अशी परिस्थिती. एवढे भोग की जिथं पराभूत होणंसुद्धा मुक्तीचा आनंद देऊन जातं. कथेचा असा शेवट करायला विराट अशा मानवी जीवनाच्या सुखदु:खांचा थांगपत्ता असावा लागतो.
‘ईदगाह’ कथेत हमीद हा पाच-सात वर्षांचा अनाथ मुलगा. आईवडिलांचं छत्र हरवलेला. अमिना आजी त्याचा सांभाळ करते. ईदच्या दिवशी सगळी लहान मुलं नवनवे कपडे घालून सजतात, आनंदाने बागडत ईदगाहवर जातात. नमाज झाल्यानंतर खेळणी वगैरे खरेदी करतात. आजीनं खर्च करण्यासाठी दिलेल्या पैशांत हमीद एक लोखंडी चिमटा घेतो. बाकीची मुलं त्याची टर उडवतात. असलं कुठं खेळणं असतं का? घरी आल्यानंतर अमिना आजी विचारते, ‘चिमटा कशाला आणलास?’ हमीद म्हणतो, ‘भाकरी करताना गरम तव्यावर तुझी बोटं भाजतात म्हणून…’ इथं आजी लहान मुलासारखं रडायला लागते आणि हमीद हा एकाएकीच बुजुर्ग वाटायला लागतो. अशा असंख्य कथा, नवी दृष्टी देणाऱ्या, जगण्याचं मोल सांगणाऱ्या, आसपासच्या बारीकसारीक घटना- प्रसंगातून सत्याला आरपार भिडणाऱ्या. अर्थात प्रेमचंद यांच्या लेखनावरही काही प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात आली पण या प्रश्नांना पुरून उरणारी त्यांची कथासृष्टी अजरामर आहे आणि वाचकांच्या मनावर या लेखकाचं अधिराज्य आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातली भारतीय समाजव्यवस्था, कुटुंबव्यवस्था, नातेसंबंध, गावं, शहरं यांची संरचना, समाजजीवन, सामाजिक प्रश्न असं सारं काही समजून घ्यायचं असेल तर प्रेमचंद यांचं साहित्य आपल्याला वाट दाखवायला मदत करतं.
जवळपास अडीचशेहून अधिक कथा आणि गोदान, गबनसारख्या महत्त्वाच्या कादंबऱ्या लिहिणाऱ्या प्रेमचंद यांना भारतभरातला वाचक ओळखतो. इतकंच नाही तर भारतीय भाषांत त्या त्या प्रांतातल्या या प्रतीचं लेखन करणाऱ्या लेखकाची तुलना प्रेमचंद यांच्याशी केली जाते. विजयदान देठा म्हणजे राजस्थानीतले प्रेमचंद, तकळी शिवशंकर पिल्ले म्हणजे मल्याळम भाषेतले प्रेमचंद असं उत्तरेतल्या, दक्षिणेतल्या लेखकांचंही त्या त्या भाषेत मूल्यमापन केलं जातं. हिंदीत तर सरळ सरळ विभागणीच केली जाते. प्रेमचंद यांच्या आधीचं साहित्य आणि त्यांच्यापासून पुढचं साहित्य. कथात्म साहित्याशिवाय वेगवेगळ्या नियतकालिकांच्या संपादनाच्या निमित्तानं त्यांनी केलेलं लेखनही विपुल आहे. वंचना पाठीशी होत्याच. त्यामुळे आयुष्यात वणवणही बरीच करावी लागली. प्रिटिंग प्रेससारखा व्यवसाय दिवसेंदिवस गाळात रुतत चालला. मग कधी नाममात्र वेतनावर लखनऊच्या एका प्रकाशकासाठी संपादकीय सल्लागार म्हणून जावं लागलं. इथलीच त्यांची एक आठवण. प्रेमचंद यांच्याकडे एक जुनी स्लीपर होती. एका खिळ्याच्या आधारे ती वापरात होती. खिळा वर यायचा तेव्हा ते वरवंट्यानं ठोकायचे. नवीन स्लीपर घेण्याची गरज पडू नये यासाठी ती धडपड असायची. पण हाच खिळा पायात घुसला आणि त्यामुळे जखम झाली. चार दिवस भयंकर ठणक आणि वेदना. त्यांच्या पादत्राणांविषयी ‘प्रेमचंद के फटे जूते’ हा हरिशंकर परसाई यांचा निबंध तर प्रसिद्धच आहे. अशा अनेक प्रसंगांमधून या लेखकाचं साधेपण दिसून येतं.
एका कंपनीशी करार केल्यानंतर चित्रपट लेखनासाठी गाव सोडून मुंबईतही यावं लागलं. इथं मात्र ते फारसे रमले नाहीत. चित्रपट लेखनासाठी तडजोडी कराव्या लागतात हे मान्य करूनही त्यांचा या दुनियेत टिकाव लागला नाही. अनेक बरेवाईट प्रसंग पचवत ते जीवनाला सामोरे गेले. लिहिण्यावरची निष्ठा मात्र तसूभरही ढळली नाही. अभावांनी पिच्छा सोडला नाही, दुसरीकडे लौकिकाचा उजेड दिवसेंदिवस पसरत चाललेला होता. देशभरातून वेगवेगळ्या कार्यक्रमांना बोलावणं यायचं. त्यातले बरेच ते टाळायचे. शांतपणे आपलं काम अथक करत राहायचं असा त्यांचा स्वभाव होता. ‘रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग’ अशी झटापट आयुष्याशी चाललेली. त्यांच्या चरित्राला अमृतराय यांनी दिलेलं ‘कलम का सिपाही’ हे नाव यथार्थच आहे. एका मुलानं लिहिलेलं आपल्या पित्याचं तब्बल ६५०पानांचं हे चरित्र त्यांच्या कथा, कादंबऱ्यांमधले उतारे, लेख, भाषणे, डायरी, आठवणी अशा अनेक संदर्भांनी युक्त आहे. मराठीत बलवंत जेऊरकर यांनी ‘प्रेमचंद : लेखणीचा शिलेदार’ या नावानं त्याचा अनुवाद केला आहे.
मध्यमवर्गीय, शेतकरी, शेतमजूर, पूर्वास्पृश्य, स्त्रिया, लहान मुलं, वृद्ध अशा सगळ्या घटकांना कवेत घेणारा एवढा मोठा लेखक अपवादात्मकच मानावा लागेल. स्त्रीजीवनाचं दर्शन घडवणाऱ्या असंख्य व्यक्तिरेखा त्यांनी निर्माण केल्या. ‘निर्मला’सारख्या कादंबरीतून आलेलं स्त्रीजीवन आजचं वाटावं असं आहे. पारंपरिक बंधनात जखडलेल्या, हुंड्यासारख्या समस्येची शिकार झालेल्या असंख्य निर्मलांची ही गोष्ट. जिथे त्यांच्या भावनांना कोणतीच किंमत नसते, त्यांच्या इच्छा- आकांक्षा कोणाच्या खिजगिणतीतही नसतात. त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या प्रसंगातही त्यांचं मत विचारात घेतलं जात नाही. केवळ सोसणं हेच जणू त्यांच्या आयुष्याचं प्रयोजन आणि प्राक्तनही!
केवळ निर्मलाचीच किंवा हलकूचीच गोष्ट आजची वाटते असं नाही. त्यांचं सर्वच लेखन आजच्या काळाच्या कसोटीवर टिकतं. प्रेमचंद आजही समकालीन वाटतात ते अनेक अर्थानं. त्यांचं अवघं लेखन हा जिवंत आस्थेचा विस्तीर्ण असा प्रदेश आहे.