कॅप्टन शुभांशु शुक्ला ज्या दिवशी आंतरराष्ट्रीय मोहिमेत सहभागी होऊन अवकाश स्थानकाकडे रवाना झाले, त्यांची अवकाशकुपी प्रतिसेकंदाला ७.५ किलोमीटर वेगाने पृथ्वीभोवती कक्षेत फिरत होती, त्या दिवशी छत्रपती संभाजीनगरच्या सिद्धार्थ उद्यानाच्या बाजूला विश्वनाथ दुर्वे यांनी नेहमीप्रमाणे आपली पथारी टाकली आणि पिंजऱ्यातल्या आपल्या नंदूबरोबर ग्राहकाची वाट बघत बसले. नंदू हा त्यांचा पोपट. भविष्य जाणून घेण्यासाठी गिऱ्हाईक आले, की तो बाहेर येतो. एक कार्ड चोचीत धरतो. पुढ्यात ठेवतो. ते वाचून दुर्वे भविष्य सांगतात. भविष्य जाणून घ्यायला आलेला माणूस तेव्हा जगातला सर्वांत उत्तम माणूस असतो आणि त्याच्या भोवतालची सारी माणसं वाईट. परिस्थिती, भोवताल आणि विशेषत: ग्रहस्थिती कमालीची प्रतिकूल. त्याला समाधान वाटेल असे दिलासायुक्त शब्द ऐकण्यासाठी तो काही रक्कम द्यायला तयार असतो.

गजानननगर भागात राहणारी, पासष्टीतली दुर्वे नावाची व्यक्ती अशा दिलासादायक शब्दांतून दररोज किमान ३०० रुपयांची कमाई करते. खूप पाऊस वगैरे असेल तर सुटी; अन्यथा रोज भविष्य पाहावयास येणारे पाच-सात नक्की असतात. रस्त्यावरच्या पोपटाला भविष्य सांगणाऱ्याची आणि भविष्य सांगणाऱ्याला त्या पोपटाची भाषा येते, असं गृहीत धरून आपल्या आयुष्यात पुढे काय घडेल हे ज्योतिष सांगणाऱ्याला कळतं, हा विश्वास काही आजचा नाही. त्यामुळेच वेधविधान करता येतं, असा दावा करणाऱ्यांची बाजारपेठ आहे हजारो कोटींपेक्षा अधिकची. त्यात पोपटवाले ज्योतिषी म्हणजे नगण्यच.

प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तो एखादा असतो. राशीफल, हस्तरेषा, अंक भविष्य, वास्तुदोष, टॅरो कार्ड यांसह ‘लकी स्टोन’, कासव यांसह गळ्यातले ताईत, गंडे-दोरे आणि अलीकडे राजकीय मंडळींनी पुन्हा चर्चेत आणलेले अघोरी पंथाचे खेळ अशी मोठी बाजारपेठ आहे. याची जाणीव नसणारी म्हणजे कुडमुडे, भविष्याची बाजारपेठ न कळालेले, पण आता नंबर पाठवा आणि ज्योतिष जाणून घ्या असे ट्वेंटी फोर बाय सेवन उपलब्ध असणारे ‘गुरुजी’ जगभर आहेत. हव्या त्या भाषेत, हव्या त्या पद्धतीने, समस्येची नेमकी कुंडली पकडण्याचा दावा करणारे, त्यासाठी ‘एआय’चा वापर करणाऱ्यांनी बाजारपेठेची पकड घेतली आहे. करोनानंतर श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरकाची चर्चाही बंद झाली आहे. स्वबळावर आणि कष्टाने आपण परिस्थिती बदलू शकतो, हा विश्वास नष्ट करणं हे या बाजारपेठेचं काम आहे.

खरं तर पक्षी आणि गूढत्व हे समाजमनात कसं रुजवलं गेलं काय माहीत? मृत्यूच्या भयाचा अंधार म्हणून कावळा हा पक्षी. मृत्यूनंतर १४ दिवस होईपर्यंत हिंदू शास्त्रांमध्ये गरुड पुराण वाचतात. गरुड पुराण पुढच्या जन्माचा प्रवास सांगतं असा विश्वास यामागे असतो. भविष्य सांगणारी मंडळी पोपट बाळगतात, त्याचं कारण त्याची जीभ असावी. बोलणारा पोपट शिकवल्यावर दिलासादायक शब्द बोलू शकतो. वाणी गोड असल्याने पोपट अनेक वर्षं या बाजारपेठेतील प्रमुख पक्षी होता. भविष्य सांगणाऱ्या व्यक्तीचं खास आसन असतं.

आता बहुतांश गुरुजींसमोर लॅपटॉप असतो. व्हॉट्सअॅपवर जन्मतारीख आणि जन्मवेळ सांगितली, की काही क्षणांत भविष्य सांगणारी मंडळीही आता आहेत. अगदी वैद्यकीय प्रवेशासाठी मुलाची किंवा मुलीची पत्रिका पाहून ‘डॉक्टर’ होण्याचा योग आहे की नाही हे सांगणारे आहेत. आता दररोज पाच राशींना कसं भवितव्य चांगलं किंवा कोणत्या राशीच्या व्यक्तीने सावध राहावं, अशा वावड्याही पेरल्या जातात. हे सारं एका ‘क्लिक’वर उपलब्ध असताना आता सत्ता, संपत्तीच्या उपाययोजनांमध्ये ‘काळी जादू’ हा शब्द पुन्हा परवलीचा होईल, अशी लक्षणे दिसू लागली आहेत.

महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात कोकणातील एक मंत्री एका आसनावर बसतो आणि समोर काळ्या कपड्यातील एक तांत्रिक पूजा करताना दिसतो, हे चित्र आता महाराष्ट्राला अस्वस्थ वगैरे करत नाही. पूर्वी घबाड मिळावं यासाठी किंवा गुप्तधनासाठी एखादा गुन्हा होत असे. आता अमावास्या आणि पौर्णिमेची चर्चा मंत्रालयात सुरू असते. लिंबू-मिरची, काळी बाहुली या फारच किरकोळ बाबी ठरू लागल्या आहेत. या क्षेत्रातील ऑनलाइन बाजारपेठ कमालीची फोफावली आहे. कोणती हस्तरेषा कसा परिणाम करते, श्रीमंत माणसांच्या हस्तरेषांचे वळण कसे असते हे सांगणारे ‘व्हिडीओ’ उपलब्ध आहेत. बोटाच्या टोकावर भविष्याची काळ आणि वेळ ठरू लागली आहे.

दिल्ली दरबारी काँग्रेसच्या सत्तावर्तुळात चंद्रास्वामी यांचे नाव चर्चेत असायचे. अगदी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या निधनानंतर सर्वप्रथम त्यांच्या निवासस्थानी पोहचणाऱ्या माणसांमध्ये ते होते, अशी नोंद आहे. सत्य साईबाबाच्या भक्तांचा राजकीय मेळाही मोठा होता. महाराष्ट्रात युती सरकारच्या काळात भैयू महाराज यांचाही वावर होता. अध्यात्म आणि भोंदूगिरीचे कमालीचे मिश्रण तयार आहे. ते अजोड झाले आहे. आता राजकीय भवितव्य आणि त्यातील सुरक्षितता, यासाठी होमहवन, यज्ञ हे अगदीच सहज वृत्तीचा भाग बनून गेले आहेत. त्यामुळे हरिनाम सप्ताहांपेक्षाही रामकथा सांगणारी मंडळी भविष्य सांगतात आणि त्याच्या उदात्तीकरणावर कोणाचे आक्षेप नाहीत.

एखादा तरुण महाराज क्रिकेटही खेळतो, भविष्यही सांगतो आणि संगणकही चालवतो. तो गर्दी जमवतो आणि त्याआडून राजकीय प्रचारही करतो. काही वर्षांपूर्वी ज्योतिष हे कसे वैज्ञानिक नाही, असे सांगणारे वक्तव्य शोधले तरच सापडू शकले असते, पण ज्योतिष जाणून घेण्यासाठी एका क्लिकवर सारे उपलब्ध असताना एखाद्या घटनेचे वैज्ञानिक महत्त्व जाणून घेण्यासाठी वेळ कोणाला आहे? विवाह संस्थेमध्ये बिनाकुंडलीचे काहीच होऊ शकत नाही, ही दृढ गाढ श्रद्धा आहे. या श्रद्धेची आता बाजारपेठ झाली. आणि बाजारपेठेचे नियम सर्वांना पाळावे लागतात.

राष्ट्रपतीपदाचा अर्ज भरण्यापूर्वी तत्कालीन संसदीय कार्यमंत्री प्रमोद महाजन यांनी एपीजे अब्दुल कलाम यांना प्रश्न विचारला होता, तुम्हाला कोणत्या मुहूर्तावर अर्ज भरायला आवडेल? तेव्हा ते म्हणाले होते, प्रत्येक क्षण माझ्यासाठी मुहूर्तच असेल. पृथ्वी स्वत:भोवती अक्षात फिरते आणि आपल्याला दिवस आणि रात्र मिळतात. तुम्हाला जो योग्य असेल, तो दिनांक योग्यच असेल.’ अशी वक्तव्ये लक्षात ठेवण्याची आताशा कोणाला गरज वाटत नाही. आपण फलज्योतिष आणि गणित ज्योतिष जणू एकच आहेत, असे मानून चालतो.

फलज्योतिषाला विज्ञानाचा आधार नाही. आणि गणित ज्योतिष हे भविष्य वेध घेण्यासाठी आवश्यक. तर्क आणि समोरच्या व्यक्तीची मानसिकता माहीत असेल, तर फलज्योतिषातील काही शब्द वापरून कोणालाही सहज फसवता येऊ शकते, हे आता बाजारपेठेला माहीत आहे. शुक्रतारा मंदवारा अशा गाण्याने ग्रह आणि ताऱ्यांतील फरकच संपवून टाकला.

१२ व्या शतकात भास्कराचार्य नावाचे नामांकित ज्योतिषी होऊन गेले. त्यांनी ‘सिद्धान्तशिरोमणी’ हा ग्रंथ लिहिला. त्यांच्यानंतर गणेशदैवज्ञ हेही मोठे ज्योतिषी होऊन गेले. त्या ग्रंथाच्या आधारे पुढे आकाशस्थित ज्योती वेध घेण्याची परंपरा सुरू राहिली. पुढे अनेक वेध यंत्रे बनवली गेली. संहितास्कंध या ग्रंथाला मुहूर्तस्कंध म्हटले जाते. ग्रह, धूमकेतू, नक्षत्रे यांच्या आधारे भारताचे नऊ विभाग कल्पून त्यातील प्रत्येक विभागावर कोणत्या नक्षत्राचे आधिपत्य आहे, ग्रहांचे युद्ध आणि युती, यांचे फल काय मिळते याच्या आधारे शुभाशुभ शकून ठरवले गेले.

वराहमिहीर या नावाच्या अभ्यासकाने या क्षेत्रात खूपशा नोंदी करून ठेवल्याचे ग्रंथात म्हटले आहे. घटिका आणि पळ या आधारे मुहूर्त ठरविण्याची पद्धत आजही रुजलेली आहे. मुहूर्त या विषयावर अनेक ग्रंथ आहेत. लल्लाचा ‘रत्नकोश’, श्रीपतीची ‘रत्नमाला’, ‘राजमार्तंड’, केशवाचे ‘मुहूर्ततत्त्व’, नारायणाचा ‘चिंतामणी’, नीलकंठाचा ‘तोडरानंद’, रामभटाचा ‘मुहूर्त चिंतामणी’, रघुनाथाची ‘मुहूर्तमाला’, पद्मानाभाचा ‘व्यवहारप्रदीप’ आदी नावे भारतीय संस्कृतीकोशात नमूद करण्यात आली आहेत. शुभाशुभ शकुन संहितास्कंदावर अवलंबून असल्याचे सांगण्यात येते. मुळात फलज्योतिष विज्ञान नाही हे माहीत असले, तरी त्यांची बाजारपेठ मात्र वाढत गेली.

आता निवडणुकीच्या राजकारणात मुहूर्ताचे अवडंबर एवढे आहे, की एक नामनिर्देशन मुहूर्ताचे आणि दुसरे मिरवणुकीचे, हा अलिखित नियमच झाला आहे. त्यामुळे गावोगावी प्रत्येक मतदारसंघात ‘आमदारांचे गुरुजी’ अशी स्वतंत्र ओळख असणारे ज्योतिषी आहेत. त्यांनी दिलेले गंडेदोरे, तावीज, भस्माच्या पुड्या खिशात ठेवून सारे व्यवहार करणारी मंडळी कमालीची अंधश्रद्ध आहे. अगदी होळीत नारळ कोणत्या मुहूर्तावर सोडावा, असेही विचारले जाते. अशा नोंदी घेण्यासाठीचे स्वीयसहायक वेगळे आहेत.

विज्ञानाच्या आधारे अधिक भूतकाळात जाणाऱ्या माणसांनी भोवताल भरला आहे. भविष्याचा वेध घेण्यासाठी विज्ञान लागते; पण त्यासाठी अजूनही आपण पुराणातील गृहीतकावर आधारलेल्या बाबींचा आधार घेतो आहोत. केवळ आडाख्यांच्या आधारे, दिलासादायक शब्दांच्या आधारे अनिश्चितता आणि अस्थैर्य यातून बाहेर पडण्यासाठी भविष्य पाहणाऱ्यांची संख्या वाढते आहे, तशी बाजारपेठ फुलते आहे. वेध घेण्यासाठी आवश्यक उपग्रहांच्या उड्डाणांना ‘मुहूर्त पाहा’ असा फतवा निघाला नाही, म्हणजे बरेच काही मिळवले असे म्हणण्याची वेळ आली आहे. भविष्याची काळ-वेळ आता रस्त्यांवरून इंटरनेटवर आली आहे. त्यामुळे अंधश्रद्धेच्या नावाने कारवाई करा म्हणणे म्हणजे जुगार खेळणाऱ्याला पकडा आणि ऑनलाइन रमी सुरू ठेवा, असे म्हणण्यासारखे होईल. भविष्य हे असे बदलते आहे. त्यामुळे इच्छा असो की नसो, तुम्ही तुमचा हात दाखवा किंवा पत्रिका, कारण ‘गुुरुजी’ ऑनलाइन आहेत.