निखिलेश चित्रे
लेखक मारिओ वार्हास योसा हे नाव पहिल्यांदा कळलं, ते चंद्रकांत पाटलांच्या ‘विषयांतर’ या लेखसंग्रहातून. त्यातला योसाच्या ‘आन्ट हूलिया अॅण्ड द स्क्रिप्टरायटर’ या कादंबरीवरचा लेख वाचून या कादंबरीविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली. यथावकाश ही कादंबरी मिळवून वाचली आणि मग या लेखकाचं नाव ज्या ज्या पुस्तकावर असेल ते मिळवून वाचत गेलो.
साठच्या दशकात जागतिक साहित्यात गदारोळ माजवणाऱ्या लॅटिन अमेरिकन ‘बूम’ पिढीचा हा लेखक. त्याच्या पिढीतला दुसरा एक तेवढाच महत्त्वाचा लेखक गाब्रिएल गार्सिया मार्खेज. मार्खेज आणि योसा यांचं नातं सुरुवातीला मैत्री, नंतर शत्रुत्व असं चढउतारांतून गेलं. मराठी वाचकांत मार्खेज हे नाव जसं आणि जेवढं लोकप्रिय आहे, तेवढं योसाचं नाही. तसा तो या बूम पिढीच्या लेखकांमध्ये सगळ्यांत धाकटा. त्याचा पहिला आणि एकमेव कथासंग्रह ‘लोस हेफेस’ (इंग्रजीत तो ‘द कब्ज अॅण्ड अदर स्टोरीज’ या नावानं प्रसिद्ध झाला. पण मूळ नावाचा अर्थ ‘म्होरके’ असा होतो.) १९५९ साली प्रसिद्ध झाला. त्यातल्या सर्वच सहा कथांमधले आशयघटक त्याच्या नंतरच्या अनेक कादंबऱ्यामध्ये विस्तारपूर्वक आलेले दिसतात. त्याची पहिली कादंबरी ‘टाइम ऑफ अ हीरो’ त्याच्या लष्करी प्रशिक्षणशाळेतल्या अनुभवांवर आधारित होती. ही कादंबरी गाजली. तिच्यावरून वाद झाले आणि तिला पुरस्कारही मिळाले. तिनं मारिओ वार्हास योसा या नावाची लॅटिन अमेरिकन सांस्कृतिक पटलावर ठळक नोंद केली. त्यानंतर आलेली ‘ग्रीन हाऊस’ तिच्या संरचनेसाठी लक्षवेधक ठरली. जंगल आणि वाळवंट अशा दोन ठिकाणी घडणारं कथानक आणि भरपूर पात्रं असलेल्या या कादंबरीवर योसाच्या लाडक्या विल्यम फॉकनरचा स्पष्ट प्रभाव होता. त्यानंतरच्या ‘कन्व्हर्सेशन्स इन द कॅथिड्रल’ या कादंबरीत मात्र योसाला स्वत:चा आवाज सापडला. पेरूमधल्या जनरल ओद्रियाच्या हुकूमशाही राजवटीतला भ्रष्टाचार हा मुख्य आशयघटक असलेली ही कादंबरी एका श्रेष्ठ कादंबरीकाराच्या घडणीतला महत्त्वाचा टप्पा आहे. योसाच्या या सगळ्या कादंबऱ्यांमध्ये अर्थपूर्ण वाङ्मयीन प्रयोग आहेत. त्यावर फॉकनरची सावली असली तरी त्यातली निखळ कथा सांगण्याची ताकद आणि वाचकाला गुंतवून ठेवणारी शैली यामुळे त्या आजही वाचल्या जातात. योसाच्या या सुरुवातीच्या तीन कादंबऱ्या त्याच्या आणखी एका वाङ्मयीन संस्काराकडे निर्देश करतात. तो म्हणजे १९व्या शतकातली युरोपीय कादंबरी. ‘कन्व्हर्सेशन्स इन द कॅथिड्रल’च्या सुरुवातीला दिलेलं, ‘कादंबरी ही राष्ट्रांची खासगी गोष्ट असते’ हे बाल्झाकचं अवतरण पुरेसं बोलकं आहे. त्याचबरोबर या कादंबऱ्यांवर व्हिक्तोर ह्यूगोचा रोमँटिसिझम आणि आलेक्सांद्र द्याुमाँच्या लोकप्रिय लेखनशैलीचाही प्रभाव जाणवतो. वार्हास योसाच्या सगळ्या कादंबऱ्यांमध्ये साहसकथेचा काही ना काही अंश असतो- कदाचित आयुष्याकडेही तो एक साहसकथा म्हणून बघत असावा, असं त्याच्या आयुष्यातल्या ठळक घडामोडींकडे पाहिलं तर वाटतं.
कादंबरीची समग्रता…
वयाची ३३ वर्षं पूर्ण व्हायच्या आत त्यानं तीन अशा कादंबऱ्या लिहिल्या होत्या ज्या त्याचं नाव जागतिक साहित्याच्या इतिहासात कोरून ठेवायला पुरेशा होत्या. हे आश्चर्यकारक होतंच. पण त्याहून जास्त आश्चर्य म्हणजे त्यानं त्यानंतर तेवढ्याच दीर्घ आणि दर्जेदार कादंबऱ्या सातत्यानं लिहिल्या. त्याच्या सगळ्याच कादंबऱ्या रचना आणि कथनाच्या पातळीवर गुंतागुंतीच्या आणि लेखनासाठी आव्हानात्मक आहेत. समग्र कादंबरी लिहायची त्याची महत्त्वाकांक्षा होती. (त्याच्या शब्दांत ‘ला नोबेला तोताल’ किंवा ‘टोटल नॉव्हेल’). म्हणजे, ज्या कादंबरीत सामग्रीची आणि निवेदन-स्वरांची विपुलता असते आणि जी समग्र मानवी अस्तित्वाला सामावून घेते, अशी कादंबरी. त्याच्या एकूण कादंबरी लेखनाचा आवाका पाहिला, तर त्याला अशी समग्र कादंबरी लिहिण्यात यश आलं असं नक्कीच म्हणता येतं.
१९७०च्या दशकात त्यानं हलक्याफुलक्या पण बहुस्तरीय आशय असलेल्या कादंबऱ्याही लिहिल्या – ‘कॅप्टन पान्तोजा अॅण्ड द स्पेशल सर्व्हिस’ ही अफलातून विनोदी कादंबरी आणि थोडीशी आत्मकथनात्मक, थोडीशी सेर्व्हांतेसच्या शैलीची झाक असलेली ‘आन्ट हूलिया अॅण्ड द स्क्रिप्टरायटर’. यापैकी ‘आन्ट हूलिया…’ मध्ये त्यानं वेताळपंचविशीसारख्या कथाकूटांचा कादंबरीच्या संरचनेत अर्थपूर्ण वापर केला. या कादंबरीच्या संरचनेत तर कल्पकता आहेच, पण तिच्या पृष्ठभागावरच्या तिरकस विनोदाखालची भेदक सामाजिक टिप्पणी आजही सुसंगत आणि अर्थपूर्ण आहे.
गंभीर आणि खेळकरही
योसाच्या कल्पित साहित्यात प्रामुख्यानं दोन मुख्य प्रवाह आहेत असं म्हणता येईल. एका प्रवाहात व्यामिश्र, गंभीर, सामाजिक/ राजकीय आशय असलेल्या (हिंसा, सत्तेचा दुरुपयोग, भ्रष्टाचार इ.) कादंबऱ्या येतात; आणि दुसऱ्या प्रवाहात थोड्या हलक्याफुलक्या, खेळकर, आणि तथाकथित ‘सोप्या’ साहित्यप्रकारांशी खेळणाऱ्या कादंबऱ्या.
पहिल्या प्रकारात- ‘वॉर अॅट द एन्ड ऑफ द वर्ल्ड’ (ब्राझीलमधल्या एक धार्मिक संप्रदायावर आधारित), ‘द स्टोरीटेलर’ (परंपरा आणि आधुनिकता यातला संघर्ष), ‘फीस्ट ऑफ द गोट’ (डॉमिनिकन हुकूमशहा त्रूजीयोच्या हत्येच्या कटावर आधारित) आणि ‘हार्श टाइम्स’ (ग्वाटेमालामधल्या लोकशाहीचा अमेरिकेनं घडवलेला ऱ्हास) अशा कादंबऱ्यांचा समावेश करता येईल. दुसऱ्या प्रवाहात- ‘नोटबुक्स ऑफ दॉन रिगोबेर्तो’ (लैंगिक साहसकथा), ‘द बॅड गर्ल’ (भावनात्मक आणि थोडीशी खट्याळ प्रेमकथा), किंवा लितुमा या पात्राभोवती फिरणाऱ्या दोन पोलीस तपासकथा- ‘डेथ इन आन्देज’ आणि ‘हू किल्ड पालोमिनो मोलेरो?’- अशा काही कादंबऱ्या येतात.
योसा हा एक विलक्षण कथनकार आणि प्रभावी शैलीकार होता. हल्ली चलनी नाण्यासारखी बनलेली आणि लॅटिन अमेरिकनच नव्हे, तर विलक्षणाचं तत्त्व असलेल्या कोणत्याही साहित्यकृतीसाठी सरसकट वापरली जाणारी ‘मॅजिक रिअॅलिझम’ किंवा ‘जादूमय वास्तववाद’ ही संज्ञा योसाच्या साहित्याला लावता येत नाही. त्याला ढोबळ अर्थानं वास्तववादी लेखक म्हणता येईल. योसाचा वास्तववाद नेमका कशा प्रकारचा आहे, हे स्पष्ट करण्यासाठी त्यानंच याविषयी एका मुलाखतीत केलेलं भाष्य महत्त्वाचं आहे. तो म्हणतो- ‘मला वास्तववादी लेखक व्हायचं होतं, याचा अर्थ मी विलक्षणाचं महत्त्व नाकारलं असा अजिबात नाही, कारण बोर्खेस आणि काल्विनोसारख्या लेखकांचा मी चाहता वाचक आहे. फक्त, माझा स्वभाव जगलेल्या वास्तवाचं आरेखन करण्याचा होता, कल्पनेतल्या वास्तवाचं नव्हे. मात्र, त्याच वेळी मला वास्तवाची छायाचित्रासारखी नक्कल करणाऱ्या साहित्यालासुद्धा ठाम नकार द्यायचा होता. मला मदाम बोवारी वाचल्यावर आपल्याला नक्की कसं लिहायचंय आहे, हे कळलं. ती कादंबरी एकीकडे वास्तवाचं वर्णन करण्याचा आव आणते, मात्र त्याच वेळी वास्तवापलीकडे निघून जाते.’ योसाचा वास्तववाद हा असा वास्तवापलीकडची किंवा त्यातच दडलेली अनेक सुप्त वास्तवं मोकळी करणारा आहे. हे करताना त्यानं कादंबरीच्या संरचनेची विविध प्रकारे अर्थपूर्ण मोडतोड केली. निवेदनातल्या काळाची एकरेषीयता विस्कटली, अनेक निवेदक वापरले, एकाच परिच्छेदात (कधी एकाच वाक्यातसुद्धा) वेगवेगळे काळ एकत्र आणले, एकाच कादंबरीत निवेदनाच्या विविध तऱ्हा वापरल्या. हे सगळं करण्यामागे निव्वळ नावीन्याची हौस किंवा उथळ प्रयोगशीलता नव्हती. तर कादंबरीच्या घाटाविषयीचं मूलभूत चिंतन आणि अभ्यास होता. रिल्कंच्या ‘लेटर्स टु अ यंग पोएट’च्या धर्तीवर योसानं ‘लेटर्स टु अ यंग नॉव्हेलिस्ट’ हे छोटं पुस्तक लिहिलं. होतकरू कादंबरीकाराला कादंबरी लेखनाचे मंत्र सांगणारं हे पुस्तक कादंबरीच्या रचनेविषयी मौलिक अंतर्दृष्टीनं भरलेलं आहे.
आधी वाचक, मग लेखक…
योसा हा पट्टीचा वाचक होता. त्यानं अनेक मुलाखतींमधून, लेखांमधून आपल्या आयुष्यातलं वाचनाचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. त्याच्या नोबेल पुरस्कार स्वीकारताना केलेल्या भाषणाचं शीर्षकच ‘इन प्रेज ऑफ रीडिंग अॅण्ड फिक्शन’ असं आहे. ‘मी वाचक आधी, आणि लेखक नंतर आहे,’ असं तो नेहमी म्हणायचा. योसाच्या प्रचंड पुस्तकसंग्रहाची त्याच्या हयातीतच आख्यायिका बनत गेली. त्याच्या संग्रहात सुमारे २५ हजार पुस्तकं आहेत. १९५८ साली तो मायदेश पेरू सोडून पाच वर्षं युरोपमध्ये वास्तव्य करण्यासाठी निघाला, तेव्हा आपली सुमारे हजारेक पुस्तकं पुठ्ठ्याच्या खोक्यांमध्ये नीट बंदिस्त करून, त्यात डांबराच्या गोळ्या घालून त्यानं आपल्या आजीआजोबांच्या घराच्या माळ्यावर ठेवली होती. तो पाच वर्षांनी परतला तेव्हा या संग्रहाला उद्ध्वस्त शहराची अवकळा आली होती. अनेक खोके फाटून कोसळायच्या बेतात होते. अनेक अर्धवट उघडलेले, वाकडे झालेले. त्यातली पुस्तकं दमट झालेली, त्यांच्या पानांवर बुरशीचा थर, पुस्तकांच्या पानांतून किड्यांनी पाडलेली आरपार भोकं. या नष्टप्राय संग्रहाकडे पाहताना त्याला एका दुर्मीळ पुस्तकाची आठवण झाली. पास्कुआल दे गायानगोस या लेखकाच्या शिलेदारी कादंबऱ्यांवर (शिव्हॅलरी रोमान्स) लिहिलेलं एक समीक्षात्मक पुस्तक त्या संग्रहात होतं. पण अशा अवस्थेत ते टिकलं असण्याची शक्यताच नव्हती. त्यानं आशा सोडून दिली. पण पुस्तकांच्या बाबतीत चमत्कार घडणं काही नवं नाही. योसाला ते पुस्तक खूप दिवसांनंतर एका जुन्या पुस्तकांच्या दुकानात सापडलं. दुकानदाराला ते पुस्तक योसाचंच आहे हे माहीत नव्हतं. त्यानं ते मूळ मालकालाच घसघशीत किमतीला विकलं. विकत घेतलेल्या प्रत्येक पुस्तकाच्या आतल्या कोऱ्या पानावर आपलं नाव, विकत घेतल्या दिवसाची तारीख, शहराचं नाव अशी माहिती लिहून ठेवायची योसाची सवय इथे कामी आली. त्यानं पुस्तक उघडून विक्रेत्याला आतलं पान दाखवलं. विक्रेत्यानं लगेच किंमत अर्धी केली.
पुस्तकाचं गुणांकन
संग्रहातलं पुस्तक वाचून झालं की त्याच्या फ्लॅपवर बारीक अक्षरात पुस्तकाला वीसपैकी गुण द्यायची योसाची पद्धत होती. पुस्तकाचा लेखक हयात नसेल, तर तो हे गुणांकन स्पष्ट दिसेल असं लिहायचा, मात्र लेखक हयात असेल, किंवा परिचयाचा असेल, तर हे गुण कुठे तरी आतल्या पानांवरच्या कोपऱ्यात बारीक अक्षरांत लिहून ठेवलेले असायचे. पॅरिसमध्ये गेल्यावर योसानं आपला नष्ट झालेला पुस्तकसंग्रह परत उभारायला सुरुवात केली. तिथून तो लंडनला गेला, मग बार्सिलोना आणि शेवटी लिमा या आपल्या मूळ शहरात परत आला. आज योसाच्या लिमामधल्या घरात या संग्रहाचा सर्वात मोठा भाग, म्हणजे २० हजार पुस्तकं आहेत, दोनेक हजार त्याच्या माद्रिदमधल्या घरात, तर उर्वरित पॅरिसमध्ये. या अफाट संग्रहाची ‘कंट्रोल रूम’ त्याच्या लिमामधल्या घरात आहे. तिथल्या कंप्युटरमध्ये संग्रहातल्या प्रत्येक पुस्तकाचं नाव, प्रतींची संख्या, ठिकाणा, कपाट आणि शेल्फ या सगळ्यांची माहिती आहे.
आपल्या संग्रहात दाखल झालेलं कोणतंही पुस्तक योसानं कधीही काढून टाकलेलं नाही. एकदा संग्रहात पुस्तक आलं, की त्याची शेल्फवरची जागा पक्की व्हायची. तिथून ते उचललं जायचं, ते फक्त वाचण्यासाठी. पण त्याची हकालपट्टी कधीच व्हायची नाही. मग ते पुस्तकं बरंवाईट कसंही असो. ‘माझ्या संग्रहातली पुस्तकं सरकारी नोकरांसारखी आहेत. त्यांना त्यांच्या जागेवरून हटवता येत नाही,’ असं तो गमतीनं म्हणायचा.
वाचनाची विभागणी
योसाच्या लाडक्या पुस्तकांच्या त्याच्याकडे अनेक प्रती होत्या. काही पुस्तकांच्या दुर्मीळ पहिल्या आवृत्त्याही होत्या. त्याच्या आयुष्यावर आणि लेखनावर निर्णायक परिणाम करणाऱ्या मादाम बोवारीची १८५७ साली प्रकाशित झालेली पहिली आवृत्ती त्यानं लंडनच्या एका दुर्मीळ वस्तू विक्रेत्याकडून घेतली. त्याच्या ‘द रिअल लाईल ऑफ आलेहान्द्रो मायता’ या कादंबरीच्या इंग्रजी अनुवादाचे हक्क विकून मिळालेले सगळे पैसै त्यानं या दुर्मीळ आवृत्तीसाठी खर्च केले. तसंच ‘वे टू पॅराडाइज’ या कादंबरीसाठी मिळालेला अॅडव्हान्स ह्यूगोच्या ‘ले मिझेराब्ल’ची पहिली आवृत्ती विकत घेण्याच्या कामी आला.
आपल्या वाचनाची विभागणी योसा तीन प्रकारांमध्ये करायचा : एक- कामासाठी करावं लागणारं वाचन. यात कादंबरीसाठी करावं लागणारं संशोधन, लेखांसाठी धुंडाळावे लागणारे संदर्भ असं वाचन येतं. दोन- पुनर्वाचन. आवडलेली अनेक पुस्तकं योसा आयुष्याच्या विविध टप्प्प्यांवर वारंवार वाचायचा. तीन- समकालीन घडामोडींची अद्यायावत माहिती घेण्यासाठी केलेलं वाचन. अर्थात, हे प्रकार काही निर्लेप नव्हते. ते एकमेकांत मिसळत राहायचे.
फ्लोबेरचं मादाम बोवारी आणि बोर्खेसचं ‘फिक्शन्स’ ही पुस्तकं तो कायम जवळ बाळगायचा. फ्लोबेरचा अद्भुत वास्तववाद आणि बोर्खेसच्या कथांमधील वास्तव अद्भुतता हे दोन ध्रुव योसाच्या लेखनात एकवटलेले दिसतात, ते कदाचित त्यामुळेच!