सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्लीच्या तीन दिवसांच्या व्याख्यानमालेत शेवटच्या दिवशी प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम ठेवला होता. त्यामध्ये भागवतांना प्रश्न विचारला गेला की, भाजपचा पुढचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार आणि कधी ?… त्यावेळी ‘आम्ही ठरवायचा असता तर इतका वेळ लागला असता का,’ असा मार्मिक प्रतिप्रश्न करून भागवत यांनी संघ आणि भाजपमध्ये नेतृत्वावरून रस्सीखेच कशी सुरू आहे याची चुणूक दाखवून दिली होती. काहींच्या म्हणण्यानुसार, ही रस्सीखेच केवळ भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदापुरती सीमित नाही. हे खरं असेल तर संघाला संघटनेची सूत्रं कोणा दुसऱ्याच्या हाती द्यायची असावीत. हा दुसरा जर मोदी-शहांना पसंत नसेल तर काय करणार, हा प्रश्न आहे. गाडं इथंच अडलं आहे, असं म्हणतात. संघाला फक्त संघटनेचंच नव्हे तर, भविष्यातील भाजपच्या वाटचालीचं नेतृत्वच दुसऱ्याकडं द्यायचं असेल तर हा प्रश्न आणखी गंभीर बनतो. झालंही बहुधा तसंच असावं. मोदींच्या नंतर कोण या प्रश्नाचं उत्तर भागवत यांनी दिल्लीतील प्रश्नोत्तरात दिलं नाही, ते म्हणाले की, आम्ही कोणीच ७५ व्या वर्षी निवृत्त होणार नाही. पण, बऱ्याचदा संघाचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे असतात. या उत्तरात कोणते दात दिसले हे संघ आणि भाजपमधील संबंधित मंडळींना कळलं असू शकतं. मोदींनंतर अमित शहा संघाला हवेत की नकोत, हेही ठरलं असेल. संघाचं सगळं गोपनीय असतं, त्यामुळं आत्ता काहीच कळायला मार्ग नाही. संघाच्या नेतृत्वाला शहांचं वावडं नसलं तरी, ते मोदींइतके प्रिय नाहीत हे उघडच आहे. नाहीतर आत्तापर्यंत भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष नेमलाही गेला असता. अलीकडं दिल्लीतील केशवकुंज या संघाच्या मुख्यालयात संघाच्या वरिष्ठ नेत्यांची ये-जा वाढलेली आहे. तिथं भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याला संघातील वरिष्ठ नेत्याने भेट नाकारली असं म्हणतात. हा भाजपचा नेता तीन तास ‘केशवकुंज’मध्ये होता, ‘आम्ही वरती बोलू’ असं सांगून त्याची बोळवण केली गेली. याच नेत्याने गेल्या आठवड्यामध्ये खासगी गप्पांमध्ये भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष बिहार निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दहा दिवसांत निवडला जाईल असं सांगितल्याचं कळतं. कधी कधी या गप्पांमधील माहिती खरी असते पण, प्रत्येक वेळी तसंच होईल असं नव्हे. पण, या नेत्याच्या म्हणण्याचा अर्थ होता की, बिहारमध्ये भाजप जिंकला तर संघाला भाजपच्या विद्यामान नेतृत्वाचं म्हणणं ऐकावंच लागेल. संघाला तडजोड करण्याशिवाय पर्याय नसेल. त्यामुळं भाजपचं नेतृत्वमंडळ बिहारच्या निकालाची वाट पाहात असावं. मोदी-शहा आणि संघ यांच्यामध्ये तडजोड झाली तर शहांचं भाजपच्या संघटनेवरील वर्चस्व अबाधित राहील. असं झालं तर भाजपअंतर्गत नेतृत्वावरून सुरू असलेला संघर्ष आणखी तीव्र होईल हे नक्की! खरं तर संघ मोदींच्या पलीकडं पाहू लागल्याचे संकेत भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीतील दिरंगाईतून मिळाले आहेत. शहांनी संघटनेमध्ये लक्ष घालू नये, संघटना आम्हाला हव्या असलेल्या नेत्याकडे सुपूर्द केली जाईल. मग, हाच नेता भाजपच्या भविष्याची काळजी घेईल, असं बहुधा संघाला सुचवायचं असावं. म्हणूनच संघाकडून बहुधा मोदी-शहांना फारसं आवडणार नाही असं नाव पुढं केलं गेलं असावं असं दिसत आहे. या व्यक्तीकडं भाजपची सूत्रं देणं म्हणजे मोदी-शहांची गच्छंती करणं. हे तर इतकं सोपं नाहीच. गेली ११ वर्षं मोदी-शहांची भाजप आणि केंद्रातील सत्तेवरील पकड पाहिली तर इतक्या सहजासहजी आयुधं खाली टाकली जातील अशी सुतराम शक्यता नाही. त्यामुळं मोदी-संघ, शहा-संघ या रस्सीखेचीत संघाला हव्या असलेल्या व्यक्तीला आणखी काही वर्षं तरी शांत बसून राहावं लागू शकतं.

‘दस हजारी’ सर्वांवर भारी?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं म्हणणं आहे की, बिहारमध्ये ‘एनडीए’ला १६० जागा मिळतील. इतक्या जागा खरोखरच मिळतील की नाही हे माहीत नाही पण, ‘एनडीए’ला बिहारमधील सत्ता राखता आली तर त्याचं सगळं श्रेय मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या ‘दस हजारी’ला द्यावं लागेल. तसं झालं तर नितीशकुमार यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदावर बसवण्याशिवाय शहांना पर्याय उरणार नाही. पहिल्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर भाजपच्या नेत्यांना ‘दस हजारी’ भरवसा वाटू लागला आहे. पहिला टप्पा तुलनेत ‘एनडीए’ला फायद्याचा होता, दुसऱ्या टप्प्यात ‘महागठबंधन’ मुसंडी मारू शकतो असा अंदाज बांधला जात आहे. सीमांचलच्या भागांमध्ये काँग्रेस-राष्ट्रीय जनता दल या पक्षांना मुस्लीम-यादव, दलित मतदारांचा पाठिंबा मिळेल असं मानलं जातं. सीमांचलमध्ये प्रचार करणाऱ्या महागठबंधनच्या काही नेत्यांच्या म्हणण्यानुसार, इथं तर जातीशिवाय कोणी काही बोलतच नाही. इथं ब्राह्मणांबाबत बोलू नका, तिथं यादवांबाबत बोलू नका, असं सगळं जातीचं किचकट गणित आम्हाला सांगितलं जातंय. त्यानुसार आम्ही प्रचार करत आहोत. बिहारमध्ये चर्चा सुरू आहे ती, दस हजारीची. म्हणजेच नितीशकुमार यांनी प्रत्येक कुटुंबातील महिलांना देऊ केलेले दहा हजार रुपये. ही दस हजारी बिहारमधील गेमचेंजर ठरेल असं भाजपला वाटतं. ज्यावेळेला काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि ‘महागठबंधन’चे तमाम नेते, तेजस्वी यादव वगैरे बिहारमध्ये व्होटर अधिकार यात्रा करत होते तेव्हा नितीशकुमार सरकारने महिलांना दहा हजार रुपये वाटायला सुरुवात केली होती. आत्तापर्यंत दीड कोटी महिलांना दहा हजार रुपये मिळालेले आहेत. बिहारसारख्या गरीब राज्यात एका महिलेकडं एकावेळी दहा हजार रुपये येणं याचा अर्थ काय असतो हे सगळ्यांना कळू शकतो. पहिल्या टप्प्यातील मतदानांमध्ये महिलांचा टक्का अधिक असल्याचं पाहायला मिळालं आहे. मध्य प्रदेश, हरियाणा आणि महाराष्ट्रात काय झालं ते पाहिलेलं आहे. बिहारमध्ये ते का होणार नाही, असं भाजपचे नेते विचारू लागले आहेत.

प्रदेश काँग्रेसचा ‘दिखावा’

काँग्रेसचं केंद्रीय नेतृत्व बिहारच्या निवडणुकीत गुंतलेलं असल्यामुळं असेल किंवा राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीरही व्हायच्या होत्या म्हणूनही असेल राज ठाकरेंचं काय करायचं हा निर्णय अजून घेतलेला नाही. पण, प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी आपलं म्हणणं पक्षश्रेष्ठींना सांगितलं आहे असं म्हणतात. राज ठाकरे महाविकास आघाडीत नाहीत. त्यांची उद्धव ठाकरेंशी युती होईल. महाविकास आघाडीने मतचोरी आणि मतदारयाद्यांमधील चुकांचा मुद्दा उचलून धरला आहे. त्यात राज ठाकरेही सहभागी झाले आहेत. हे सगळे मिळून राज्य निवडणूक आयोगाकडं गेले होते. दिल्लीतही केंद्रीय निवडणूक आयुक्तांचीही या पक्षांच्या नेत्यांनी भेट घेतली. हे सगळं खेळीमेळीनं होत असलं तरी, काँग्रेसला राज ठाकरे नकोत! प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ राज्यात थांबलेच नाहीत, ते दिल्लीत येऊन बसले. परवाच्या मोर्चालाही ते गेले नाहीत. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात वगैरे काही काँग्रेस नेते दोन ठाकरेंच्या मध्ये बसलेले दिसत असले तरी, हे ठाकरे अधिकृतपणे एकत्र आले की काँग्रेस बाजूला जाईल असं दिसतंय. राज ठाकरेंची परप्रांतीयांची भूमिका, मराठीची भूमिका काँग्रेसला झेपणारी नाही. आमचा पक्ष राष्ट्रीय आहे, आम्हाला बिहारमध्ये, केरळमध्ये, पश्चिम बंगालमध्ये, आसाममध्ये निवडणुका लढवायच्या आहेत. राज ठाकरेंना महाराष्ट्राबाहेर जायचं नाही. आम्ही देशव्यापी आहोत. काँग्रेसला काय करायचं ते काँग्रेसला कळतं, असं काँग्रेसच्या एका नेत्याचं म्हणणं होतं. या नेत्याचं सपकाळ यांच्याशी पटो वा न पटो पण, राज ठाकरेंच्या मुद्द्यावर हे दोघे एकत्र आहेत असं दिसतंय. राज ठाकरेंबरोबर प्रदेश काँग्रेस गेल्यास मुंबई पालिका निवडणुकीत उत्तर भारतीय एकतर्फी भाजपकडं जातील ही काँग्रेसची भीती अगदीच अनाठायी आहे असं नव्हे. पण, बिहारच्या निकालानंतरच काँग्रेसच्या नेतृत्वाशी चर्चा होईल अस दिसतंय.

बरहुकूम

एका घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीने गेल्या महिन्यात एकामागून एक अनेक केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन विविध राष्ट्रीय आणि प्रशासकीय विषयांवर चर्चा केली. एक पत्रक काढून मंत्र्यांनी भेट घ्यावी असं सांगण्यात आलं होतं असं म्हणतात. केंद्रीय मंत्री शिष्टाचाराचा भाग म्हणून अशा नवनियुक्त व्यक्तींची भेट घेत असतात. त्यामध्ये काही गैर नाही. पण, बरहुकूम आज्ञा पाळली जाण्याची ही पहिलीच वेळ असावी. या भेटींमध्ये प्रशासन, केंद्र-राज्य समन्वय, तसेच केंद्र सरकारच्या विविध योजना प्रभावीपणे राबवण्यासंदर्भात चर्चा झाली. घटनात्मक पदावरील या व्यक्तीने प्रमुख सरकारी कार्यक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेतला. कल्याणकारी योजनांची पारदर्शक व जलद अंमलबजावणी झाली पाहिजे असं त्यांचं मत होतं. पायाभूत सुविधा, शिक्षण आणि सामाजिक कल्याण या क्षेत्रांतील कामकाजावरही त्यांनी मंत्र्यांशी मतांची देवाणघेवाण केली असं म्हणतात. मंत्रालयांमधील समन्वय मजबूत करून विकास योजनांची उद्दिष्टे वेळेवर साध्य करावीत, असाही त्यांचा आग्रह होता असं सांगितलं जातं. पण, हा सगळा खटाटोप करून नेमकं त्यांच्या काय हाती लागलं हे माहीत नाही. केंद्रीय मंत्र्यांनाच त्यांच्या मंत्रालयासंदर्भात काय निर्णय घेतले जातात हे माहीत नसतं असं म्हटलं जातं, तर हे मंत्री अशा भेटीगाठीत सांगणार तरी काय? असो.