सई केसकर
एकटेपणातून सुरुवात करून, शांतपणे एकटेपणाकडे परतणाऱ्या नायकाची गोष्ट डेव्हिड सलॉय यांच्या ‘फ्लेश’ कादंबरीतून सांगितली जाते. शिवाय ती ‘शरीर’ या संकल्पनेची वाचकाला वेगवेगळ्या पद्धतीनं आठवणदेखील करून देते. ‘बुकरायण’ या वार्षिक सदराचे यंदाचे दहावे वर्ष. त्यातील पहिला लेख…

आपली शरीरं आपल्या आयुष्यांची साक्षीदार असतात. बऱ्याचदा असं होतं की आपल्या डोक्यातले विचार, आपलं जगाबद्दलचं आकलन, आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल आपल्या बुद्धीनं केलेलं विश्लेषण यातच आपण इतके हरवून जातो की या सगळ्याची जाणीव करून देणाऱ्या शरीराचा विशेष विचारच होत नाही. शरीराच्या सगळ्या गरजांची आपल्याला इतकी सवय झालेली असते की या जगात आपण शरीराच्या माध्यमातून आलो आहोत, आणि हे शरीर संपल्यावर आपलं या जगातलं अस्तित्वदेखील संपणार आहे याचाच आपल्याला विसर पडतो.

शरीर हे सर्व भोगांचं माध्यम आहे अशा अर्थाचं बरंच काही अनेक धर्मग्रंथांमध्ये लिहिलेलं आहेच, पण हे कळायला धर्मग्रंथांपर्यंतही जावं लागत नाही. ती जाणीव आपल्याला काळच करून देत असतो. आपल्या भोवतालचे धोके, संधी, विसावण्याची ठिकाणं आणि माणसं या सगळ्या शक्यतांशी आपली शरीरं जोडलेली असतात. या जगात सदेह वावरण्याची आपल्याला इतकी सवय असल्यानं आपण एक शरीर आहोत याचा जगण्याच्या ओघात आपल्याला विसर पडतो.

डेव्हिड सलॉयची ‘फ्लेश’ ही कादंबरी मात्र अगदी शेवटच्या पानापर्यंत आपल्याला ‘शरीर’ या संकल्पनेची वेगवेगळ्या पद्धतीनं आठवण करून देते. सलॉयची ही सहावी कादंबरी आहे आणि यंदाच्या बुकर पारितोषिकाच्या लघुयादीत तिला स्थान मिळालं आहे. या कादंबरीचा नायक, इश्तेव्हान, हंगेरी देशातून इंग्लंडमध्ये स्थलांतर करतो आणि मोठमोठे चढउतार असणारं आयुष्य जगून पुन्हा आपल्या मूळ गावी परततो. ‘फ्लेश’ त्याच्या काहीशा चमत्कारिक, असामान्य आणि दिशाहीन आयुष्याची गोष्ट.

कादंबरीची सुरुवात इश्तेव्हान पंधरा वर्षांच्या असतानाच्या काळात होते. अबोल आणि बुजऱ्या अशा या मुलाचे सहज मित्र होत नाहीत. त्याच्या आईबरोबर तो शहराच्या गरीब वस्तीतल्या एका इमारतीत राहत असतो. आईच्या आग्रहाखातर एका मध्यमवयीन शेजारणीकडे तो वाणसामानाच्या पिशव्या उचलून आणून देऊ लागतो. त्या शेजारणीच्या पुढाकारानंच मग त्या कोवळ्या वयात तो तिच्याशी शरीरसंबंध ठेवू लागतो. या प्रकरणातून त्याच्या आयुष्याला एक भलतीच, दुर्दैवी कलाटणी मिळते आणि एका अर्थानं त्याच्या पुढील आयुष्याचा प्रवासच त्या प्रसंगातून सुरु होतो.

इश्तेव्हान अबोल आणि बुजरा असल्यामुळे त्याच्या आयुष्यात अशा विचित्र घटना घडताहेत आणि जे काही घडतं त्यावर त्याचं विशेष नियंत्रण नाही असं वाचकाला वाटू लागतं; किंबहुना तो असं का वागतो, असाही एक प्रश्न सतत मनात येत राहतो. त्याचं आणि त्याच्या आजूबाजूच्या माणसांचं जग यांच्यात एक काचेचा पडदा आहे, ज्यातून तो जग बघू शकतो, पण ते त्याच्यापर्यंत पूर्णपणे पोहोचत नाही अशी त्याची एकूण मानसिकता वाटते. त्याच्या तरुणपणीच्या काही प्रसंगांमध्ये प्रकर्षानं काम्यूच्या ‘मर्सो’ची आठवण होत राहते.

समोरच्या व्यक्तीनं एखादा प्रस्ताव ठेवला तर इश्तेव्हान अगदी क्वचितच नकार देताना दिसतो. पण त्याला ती गोष्ट मनापासून करायची आहे किंवा नाही, याबद्दल वाचक साशंकच राहतो. याला अपवाद केवळ लैंगिक कृतींचा. त्याच्या आयुष्यात आलेल्या वेगवेगळ्या बायकांबरोबरचे त्याचे शरीरसंबंधच त्याला या जगाशी जोडून ठेवत आहेत, असं वाटत राहतं. जरी तो पुढाकार घेऊन नेहमीच असे संबंध प्रस्थापित करत नसला आणि त्याच्या आयुष्यात येणाऱ्या स्त्रियांबद्दल त्याला नेहमीच आकर्षणही वाटत नसलं तरी त्यांच्याबरोबर राहता राहता त्याला स्वत:मधलं काहीतरी गवसत असतं. त्याला जशी स्वत:च्या वासनेची जाणीव होते तशीच स्वत:मध्ये दडलेल्या हिंसेचीही वारंवार जाणीव होत राहते. लैंगिक संबंध आणि हिंसा या दोनच बाबतीत तो ‘कर्ता’ आहे असं वाटतं.

कथा कोणत्या काळात घडते हे स्पष्टपणे लिहिलं नसलं, तरी कथेत आलेल्या कोविडकाळातल्या वर्णनामुळे ती साधारण गेल्या दोन दशकांमध्ये घडते हे स्पष्ट होतं. हंगेरीत काही वर्षं सैन्यात काम केल्यानंतर इश्तेव्हान इंग्लंडमध्ये स्थलांतर करतो. तिथल्या श्रीमंतांना जसे सुरक्षा कर्मचारी आणि वाहनचालक लागतात त्या प्रकारचं प्रशिक्षण घेऊन तो अशा एका अतिश्रीमंत जोडप्यासाठी काम करू लागतो. ही संधीदेखील त्याला एका आकस्मित योगायोगानं मिळते; एका विशिष्ट वेळी एखाद्या ठिकाणी हजर असल्यामुळे त्याच्या आयुष्याला पुन्हा एकदा एक नवीन दिशा मिळते.

त्यानंतरची अनेक वर्ष तो आर्थिक सुबत्ता उपभोगतो. पण ती सुबत्तादेखील त्यानं सक्रियतेनं मिळवलेली नसून, त्याच्याकडे आपणहून चालत येते आणि बराच काळ तो त्याबद्दलही उदासीनच राहतो. त्याला नैतिक काय किंवा अनैतिक यातला फरक माहिती असला, तरी त्याच्या निर्णयांत (किंवा त्याच्याकडून घेतल्या गेलेल्या निर्णयांत!) नैतिकतेचा विशेष अडसर होत नाही. तो काही निर्णयच घेत नाही, समोर जे येईल ते करत जातो, असंच त्याचं व्यक्तिमत्त्व आहे. पण कथा जशी पुढे जाते तसं काहीच न करणं हादेखील एक निर्णयच आहे, हे लेखकानं फार प्रभावीपणे दाखवून दिलेलं आहे.

सलॉयच्या शैलीबद्दल सतत अचंबा वाटत राहतो. ती शब्दबंबाळ तर नाहीच, पण बऱ्याच प्रसंगांत अतिशय तुटक संवादांतून कथा पुढे जाते. ते संवाद केवळ संवाद म्हणून वाचले तर त्यांतून काहीच अर्थबोध होणार नाही इतपत ते कंटाळवाणे आणि तुटक आहेत. एखाद्यानं प्रश्न विचारल्यावर, उत्तरादाखल तोच प्रश्न पुन्हा विचारण्याची संतापजनक सवय इश्तेव्हानला आहे. त्यामुळे प्रत्येक संवादात एक तोचतोपणा आहे. पण त्याचा कंटाळा न येता उलट आपली उत्कंठा वाढत जाते. असा एक अतिशय कुतूहलवर्धक प्रसंग कादंबरीत आहे.

नोएमी नावाच्या एका मुलीला इश्तेव्हान एका ‘डेट’सदृश सहलीला घेऊन जातो. त्या प्रसंगातले सगळे संवाद अतिशय उथळ आणि तुटक आहेत, पण त्या संवादांच्या आजूबाजूने अगदी मोजक्या शब्दांत सलॉय तो संबंध प्रसंग आपल्यासमोर बांधत जातो. मुळात ती आपल्याबरोबर येणार का यातली अनिश्चितता; ती यायला तयार झाल्यानंतर ती आपल्याला हवं ते करू देईल का, याबद्दलची अनिश्चितता; ज्या जागी ते जातात त्या तलावाकाठची शांतता; त्या दोघांचंही काही न बोलता एकमेकांची परीक्षा घेत राहणं आणि त्या दोघांमध्ये असलेला भर तारुण्यातला तीव्र शारीर ताण – हे सगळं त्या तुटक संवादांतून कसं काय उभं राहतं हे एक आश्चर्यच आहे.

संवादांच्या जोडीनं परिस्थितीची अचूक पण तरीही फार लक्ष वेधून न घेणारी वर्णनं केल्यामुळं ते प्रसंग चित्रदर्शी होतात. शब्दांच्या प्रभावाच्या बाहेरच्या अनेक शरीरसंकेतांनी संभाषण घडत असतं. कादंबरीच्या मुखदुर्बळ नायकाच्या दृष्टीनं हे शरीरसंकेतच अधिक महत्त्वाचे. भाषेच्या माध्यमाबाहेरचं संभाषण चित्रपटांत किंवा रंगमंचावर सहज दाखवता येऊ शकतं, पण ते लेखनासारख्या माध्यमात उतरवता येण्याचं कसब या लेखनाचं बलस्थान आहे.

इश्तेव्हान आणि त्याचे प्रेमसंबंध एकटेपणा, वासना आणि प्रेम या तीन सूत्रांमध्ये गुंफलेले आहेत. त्याच्या प्रेमाची, वासनेची आणि एकाकीपणाची वर्णनं वाचताना लक्षात येतं की या तीन गोष्टींची गफलत झाल्यामुळे खूनही होऊ शकतात किंवा बाहेरून सुखी भासणारे संसारही थाटले जाऊ शकतात. आपण एखाद्या व्यक्तीबरोबर का आहोत, याचं उत्तर शोधताना नेहमी या तीन सूत्रांवर कादंबरीतली पात्र जशी अडखळतात, तसे वाचकही अडखळत असावेत. म्हणूनच अशा गोष्टी कितीही असामान्य आणि विचित्र वाटल्या तरी आपल्याला जवळच्या वाटतात.

इश्तेव्हानचा एकाकीपणा कोणत्याही भावनिक किंवा शारीर अनुभवांना बधत नाही. तो अभेद्या आहे. त्याला कधी सोबतीची गरज वाटत नाही. एकटेपणाची भीतीही वाटत नाही. वेगवेगळ्या टप्प्यांवर बघितलेले वेगवेगळ्या परिस्थितीतले मृत्यूदेखील त्याला त्याच्या एकटेपणातून बाहेर काढू शकत नाहीत, पण त्याला याची खंत वाटत नाही.

निदान कादंबरीच्या पूर्वार्धात तरी तसं वाटत नाही. त्याच्या या स्वभावामुळे तो कधी धूर्त, कधी स्वार्थी आणि कधी थेट क्रूरच वाटतो. एखाद्या नायकाबद्दल जे कौतुक किंवा अनुकंपा वाटायला हवी तशी त्याच्याबद्दल वाटत नाही. उलट अधूनमधून त्याची चीडच येत राहते. पण त्याच्या आजूबाजूच्या अनेक पात्रांच्या आयुष्याला एकाकीपणानं ग्रासलेलं आहे आणि या एकाकीपणावर ते वेगवेगळे उपाय शोधताना दिसतात – कधी लैंगिक संबंधांत, कधी पैशात, कधी व्यसनांत, कधी धर्मात.

कादंबरीच्या उत्तरार्धातला बापाच्या भूमिकेतला इश्तेव्हान थेटपणे प्रेमळ भासू लागतो. मुलाबद्दल अभिमान, चिंता, ममता अशी प्रेमाची सगळी रूपं त्याच्या वागण्यात दिसू लागतात. त्याच्या तुटक बोलण्यातूनही मुलाबद्दल असलेली माया दिसू लागते. त्याची भिरभिर बंद होऊन तो त्याच्या मुलामुळे आता एका जागी स्थिरावेल असं वाटू लागेपर्यंत कथेला पुन्हा एक कलाटणी मिळते. एक एक करून त्यानं बांधलेलं सगळंच बेचिराख होत जातं. त्याच्याच पूर्वकर्मामुळे तो एका मोठ्या आर्थिक संकटात सापडतो आणि त्याला दिवाळखोरी जाहीर करावी लागते. त्याच्या उपजत अलिप्त असण्याला आता मात्र पराभवाची जोड मिळते. तो पुन्हा एकटा होतो.

तेव्हा मात्र असं वाटतं की कदाचित तो एकटाच प्रामाणिकपणे जगला. जिवंत राहण्यातही एक प्रकारचा ताण असतो, व्याकुळता असते. जगण्याला सतत एक अर्थ देत राहावा लागतो, ध्येय शोधत राहावं लागतं – तसं केलं नाही, तर व्याकुळतेच्या भोवऱ्यात अडकण्याचा धोका असतो. म्हणून आपण आपले निर्णय कुठल्या तरी नैतिक मूल्यांवर किंवा समाजाच्या मान्यतेवर तपासून बघत राहतो. इश्तेव्हान तसं काही करत नाही. तो खचून गेला असला, तरीही त्याच्याकडे जे घडेल ते स्वीकारण्याचीही ताकद आहे.

कदाचित त्याच्यात आणि सभोवतालच्या जगात असलेली ती काचेची भिंत त्याला अशी ताकद देत असेल. त्यामुळे कादंबरीच्या ओघात जरी एखाद्या नायकाबद्दल आपल्याला जसं कौतुक वाटतं तसं त्याच्याबद्दल वाटत नसलं, तरी एकटेपणातून सुरुवात करून, शांतपणे एकटेपणाकडे परतणारा इश्तेव्हानच खरा नायक ठरतो.

बुक-नेट : बॅन बुकक्लब…

२०२१ सालापासून म्हणजे ट्रम्प यांच्या हातून पहिल्यांदा सत्ता जाण्याच्या काही महिने आधीपासून अमेरिकी शाळांतील वाचनालयांमध्ये शुद्धीकरणाचे प्रयोग राबविले जात आहेत. पुन्हा ट्रम्प सत्तेवर आल्यानंतरच्या काही महिन्यांत अश्लील, अश्लाघ्य, असंस्कारी म्हणून मुलांच्या वाचनास बंदी करण्यात आलेल्या पुस्तकांची संख्या १६ हजारांपुढे गेली असल्याचा ‘पेन अमेरिका’ संस्थेचा अहवाल दोन दिवसांपूर्वीचा. त्यांतील अनेक पुस्तके ही जगप्रसिद्ध लेखकांची आहेत. स्टिव्हन किंग याची सगळीच खूपविकी पुस्तके जगभरात वाचली जातायत. त्या पुस्तकांवरदेखील शाळांच्या समित्यांनी आता आक्षेप घेतलाय. (किंग यांचा जगजाहीर ट्रम्पविरोध हेच कदाचित त्याचे कारण.) एकुणात साऱ्या अमेरिकी तारांकित व्यक्ती बुकक्लब काढून आपल्या अनुयायांना पुस्तके वाचायला लावतायत. देश मात्र ‘बॅन बुकक्लब’ अशी छबी निर्माण करत आपले हसे करून घेतेय. या अहवालात मांडलेली निरीक्षणे आणि इतर कोणती पुस्तके बंदी घालण्यात आलीत, त्याचा तपशील पुरवणारे वृत्त.

https://tinyurl.com/429hjurp

पारितोषिकप्राप्त तीन कथा

फ्रान्सिस फोडर् कोपोला या चित्रपट दिग्दर्शकाचे गेली २५ वर्षे सुरू असलेले ‘ऑल स्टोरी’ मासिक दर महिन्याला दृश्यिक कल्पना लढवत आकर्षक मुखपृष्ठासह आणि उत्तम कथा-मुलाखतींसह सादर होते. पूर्वी या मासिकाच्या संकेतस्थळावर छापील मासिकातील जुने लेख-कथा यांच्या वाचनाचे मुक्तद्वार होते. आता मधल्या वर्षांत त्यावर बरेच नियंत्रण आणण्यात आले. वार्षिक कथा स्पर्धांतील विजेते आणि इतर विशेष कारणांशिवाय इथल्या लेखनाचे उपलब्धीऔदार्य त्यांच्याकडून क्वचित पाहायला मिळते. नुकतेच इथल्या तीन कथांना ‘अमेरिकन सोसायटी ऑफ मॅगझीन एडिटर्स अॅवॉर्ड फॉर फिक्शन’ हे पारितोषिक मिळाले. या निमित्ताने पुढील काही दिवसांसाठी दोन कथा पूर्णपणे उपलब्ध झाल्यात. या दुव्यांवरून त्या उतरवता येतील.

https://tinyurl.com/yc2esw7m

saeekeskar@gmail.com