सौरभ सद्योजात

महाकाय शहराचा श्वास समजून घेण्याचा प्रभावी मार्ग म्हणजे, त्याबाबत निर्माण झालेल्या साहित्याशी संवादत राहणं! मुंबईशी यत्किंचित संबंध नसणाऱ्या व्यक्तीलाही ज्यातून या शहराची प्रकृती स्पष्टपणे कळू शकेल, अशा पुस्तकाविषयी…

मुंबईत असतानाकामावर जाण्याकरिता उशीर झाल्यास तुम्ही फलाटावरून वेगाने निघणाऱ्या आणि खचाखच भरलेल्या डब्यात चढू पाहता. तेव्हा डब्यातील अनेक हात तुम्हाला आत खेचू लागतात आणि काठावरच का असेना, पण उभं राहण्याकरिता जराशी जागा करून देतात. त्यांचा हात धरू पाहणारी व्यक्ती ही हिंदू आहे वा मुसलमान, ख्रिाश्चन आहे वा ब्राह्मण किंवा अस्पृश्य किंवा मुंबई शहरातली आहे की बाहेरची हे त्यांच्यासाठी गौण असतं. तुम्ही ‘सिटी ऑफ गोल्ड’च्या दिशेने निघालात हे पुरेसं असतं…

सुकेतु मेहता यांच्यासारख्या साक्षेपी लेखकाने मुंबई शहराची करून दिलेली ही ओळख. मुंबईशी यत्किंचित संबंध नसणाऱ्या व्यक्तीलाही यातून या शहराची प्रकृती स्पष्टपणे कळू शकेल. या शहराची लांबी-रुंदी मोजणाऱ्या जवळपास प्रत्येकाला दिवसरात्र भाकरीचे चंद्र दिसतात. स्वप्ने एव्हाना क्षीण झाली नसतील तर समुद्राच्या क्षितिजावर त्यांचाही आभास होत असतो.

नारायण सुर्वे यांच्या भाषेत समुद्र- उनाड पोराने कलंडावी दौत तसा हा निळा सागर भासतो. आणि त्या सागराच्या काठावर वसलेलं, त्रिकाळ धडधडत राहणारं मुंबई नावाचं एकमेवाद्वितीय शहर, दर दिवशी कित्येकांना पोटात घेतं अथवा उत्सर्जित करत असतं. अशा महाकाय शहराचा श्वास समजून घेण्याचा प्रभावी मार्ग म्हणजे, त्याबाबत निर्माण झालेल्या साहित्याशी संवादत राहणं! आणि म्हणून आजघडीच्या मुंबईचं स्पंदन समजून घेण्यासाठी- अनिंदिता घोष संपादित ‘दी ओन्ली सिटी’ या ताज्या आणि रसरशीत कथासंग्रहाशी सख्य करणं क्रमप्राप्त ठरतं.

‘दी ओन्ली सिटी’ ही अठरा कथांनी गुंफलेली माळ आहे. या माळेत ओवल्या गेलेल्या कथा या मुंबईच्या विविध भागांतून, लोकांकडून आणि परिस्थितीकीय प्रश्नांच्या मंथनातून वर आल्या असाव्यात. मुंबईच्या बाबतीत सामान्यत: एक साचेबंद निर्माण झालेला आहे. त्यातही साहित्यात, सिनेमात पुनरावृत्ती झालेले (अजूनही होत असलेले) विशिष्ट विषय जसं की अर्थार्जन, झोपडपट्ट्या आणि दारिद्र्य, सिनेसृष्टीतील बेचव अफवा आणि गुंडगिरीच्या अतिरंजित कथा यांनी तो साचेबंद मनात पक्का करून टाकला. परंतु मुंबई शहराचे, तिच्या गर्भात राहणाऱ्या सर्वस्तरीय लोकांच्या आयुष्याचे इतरही अनेक महत्त्वाचे पदर आहेत.

अशा सूक्ष्म पदरांचा ऊहापोह या अठरा कथांच्या माध्यमातून झाल्याचं दिसतं. समुद्राकाठी, वांद्र्यात, डोंबिवली स्थानकाच्या गर्दीत, मलबार हिलच्या वैभवात, झगमगत्या डान्स बारमध्ये आणि जीवघेण्या एकांतातून खणून काढलेल्या या कथा आत्ममग्न करतात. लेखनशैलीतल्या वैविध्याचं सोनं लुटवतात. दारिद्र्याच्या अंधारात हरवलेली माणसं, लोकलच्या फेऱ्यात अडकलेला मध्यमवर्ग आणि सुखवस्तू श्रीमंतीच्या अंतराळात चाचपडणारे लोक असे तीनही आर्थिक स्तर या कथांमधून डोकावताना दिसतात.

या संग्रहात लागलेला दु:खाचा, दीर्घ तीव्र मध्यम म्हणजे लिंझी परेरा यांची ‘स्ट्रेज्’ ही कथा. ग्रांट रोड स्टेशनच्या फलाटावर वाढलेलं, शोषण झालेलं आणि एकांतात खितपत पडलेलं बालपण मुंबईचा भेसूर चेहरा दाखवतं. देते देते म्हणणारी मुंबई जेव्हा दु:खापल्याड काही देत नाही तेव्हा तिच्याशी सख्य तोडणारी माणसं कशी निष्ठुर होत असावीत याचं ते प्रभावी चित्रण आहे. भ्रष्ट यंत्रणा, वर्दीत वावरणारी संवेदनाहीन माणसं आणि गतीच्या प्रवाहात झोकून घेतलेल्या लोकांचं अमानवी आयुष्य अधोरेखित करण्याचं काम या कथानकाने सक्षमपणे केलं आहे. याच कथेच्या समकक्ष ‘युअर मीट इन माय हँड्स’ समजून घेता येऊ शकते.

‘मांसभक्षण हे तो आत्मभक्षण’ असं ठरवून टाकणारी सरकारी यंत्रणा, मांसाहारी व्यक्तींना पवित्रापवित्रच्या कसोटीवर दोषी ठरवून फाशी देत असेल तर? मांस तस्करी करून मिळवावं लागत असेल तर? हे प्रश्न दूरचे वाटतात खरे. परंतु जीत थयील यांच्या कथेचा सूर सांगतो की ते आजचेच आहेत. आणि सत्यच आहे ते! कोणी काय खावं किंवा खाऊ नये यांबाबत सदोदित दक्ष असणारे समाजघटक आपल्या भवताल आहेतच. ही कथा त्याच हुकूमशाही वृत्तीची, जुनाट आणि अमानवी विचारांच्या अंगाची साल सोलून दाखवते.

यांसह काहींच्या वाट्याला दारिद्र्य, अन्याय्य वागणूक आणि असुरक्षिततेच्याही पल्याड असणारा एकाकीपणाचा शाप आलेला असतो. काही त्या एकाकीपणाची वाट चुकवण्यासाठी भोगलालसा, अवलंबन आणि कामाचा सोस यांचा आधार घेतात. मुंबईसारख्या शहरात अशा एकाकीपणाला एक वेगळं आकारमान प्राप्त होत असावं. ‘व्हेअर दी लाइट्स नेव्हर गो आऊट’मधून ती खदखद जाणवत राहते.

लोकल ही मुंबईला धडधडत ठेवणारी धमनी आहे. त्यातून दिवसाला लाखोंचे जथे वाहत असतात. आणि त्यात पुरुषांनी खचाखच भरलेल्या डब्यांत जशी गाणी, भजनं आळवली जातात, तसाच अनिवार होणारा शारीरस्पर्शाचा खेळ सुरू असतो. ‘टू बाय टू’ या कथेत त्याची सशक्त मांडणी झाल्याचे दिसते. मुंबईचे बहुतांश भाग अशक्त असले तरी तिची काही काया ही सोन्याची आहे. हे उच्चभ्रू श्रीमंतीचं आणि तिच्या उदरात वाढणाऱ्या प्रश्नांचंही शहर आहेच. नव्यानेच टोलेजंग आणि उच्चभ्रू टॉवरमध्ये स्थिरावलेलं एक जोडपं आणि जोडीदारांच्या अदलाबदलीचा चक्रावून टाकणारा पण अलगद उलगडत जाणारा गुंतागुंतीचा खेळ एका कथेचं अवकाश व्यापतो.

अनिंदिता घोष यांची ‘नॉर्मल नेबर्स’ ही कथा उच्चभ्रू वसाहतीतल्या नातेसंबंधांची, अलिखित कायद्यांची मांडणी करते आणि आयुष्याचा पुनर्शोध घेणाऱ्या स्त्रीचा सुखावलेला चेहरा दाखवते. याच्या दुसऱ्या बाजूस, आपल्या मुलीला उच्चभ्रू शाळांमधून दाखले देत फिरणाऱ्या आणि त्यातून व्यावसायिक जाळं उभं करू पाहणाऱ्या वृत्तीशीही भेट घडते. ‘हूडभॉय हाऊस’मधून अकबर प्रयाग यांनी कुतूहलाच्या वाट्याला आलेलं दु:ख आणि पालकत्व झटकून निभ्रांत झालेले पालक यांचं अप्रतिम वर्णन केलं आहे. यांसह चिरडून टाकू शकणाऱ्या गर्दीतही आशावाद आणि करुणा तग धरू शकण्याचं सकारात्मक चित्र ‘आई ताई’ या भावनाप्रधान कथेत आहे.

रणजित होसकोट यांच्यातल्या कवीची काव्यमय भाषाशैली ‘दी पेंटर्स लास्ट स्टॉप’मधून स्पष्टपणे आकळून येते. बॉलीवूड बेबीमधून सिनेसृष्टीची गुंतागुंत, होतकरू अभिनेत्रींचं जीवनमान आणि पुरुषांना अक्कलहुशारीने हाताळण्याची तयारी दिसून येते. शांता गोखलेंच्या ‘दी स्टोरीटेलर्स टेल’मध्ये दादरचं मराठी घर दरवळत राहतं. हा संग्रह मुंबईबाबतच्या ग्रंथांत महत्त्वाचा गणला जावा अशा दर्जाचा निश्चित आहे. परंतु यातल्या काही कथांमध्ये मुंबईची आर्द्र आणि बेधुंद करणारी पुरेशी हवा नाही असं म्हणायला वाव आहे.

‘दी ओन्ली सिटी’ मधल्या जवळपास सर्व कथा परतून येण्याबाबत भाष्य करतात. व्यक्ती, भावना, परिस्थिती, अंधार, सुख, भास की इतर काहीही. परंतु परतण्याशी या कथांचा जवळून अथवा दुरून संबंध येतो हे दिसून येतं. इवल्याश्या अर्पणपत्रिकेत त्याची ग्वाही मिळतेच अर्थात. नारायण सुर्वे यांच्या मुंबई कवितेतल्या ओळींपासून या पुस्तकाचं गमभन सुरू होतं. मुंबईच्या मूळ भाषेला आणि त्याद्वारे प्रसृत झालेल्या साहित्याला सन्मान देण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न वाटतो. मुंबईसारख्या मातृवत्सल शहराची थोरवी वर्णावी तेवढी अल्पच वाटेल. तिचे म्हणून काही प्रश्न आहेत. दु:ख आहे, अवहेलनेतून आलेला संताप आहे. पण समुद्राचा मृदंग ऐकत, क्षितिजाकडे पाहत आणि

City of stars City of Stars

Are you shining just for me?

City of Stars

There’ s so much that I can’ t see

असं गुणगुणत राहणाऱ्या लोकांचं हे शहर आहे. हे शहर आणि त्याच्या सर्व काळात येणाऱ्या सर्व कथा अमर होवोत!

iamsaurabh09 @gmail.com