‘पॅरिस रिव्ह्यू’च्या डेली ब्लॉगवर डॅनिएल.ए. जॅक्सन यांचा ‘फिश टेल्स’ या चुकीच्या कारणांनी प्रवाहाबाहेर गेलेल्या (आणि अलीकडेच नव्याने प्रकाशित झालेल्या) कादंबरीबद्दल लघुनिबंध प्रकाशित झालाय. नेटी जोन्स यांच्या १९८३ मध्ये रॅण्डम हाऊसतर्फे प्रकाशित झालेल्या या कादंबरीत विशेष काय होते? जोन्स यांनी ७०च्या दशकातील आपल्या काही प्रमाणात बेताल, मद्यापी, तामसी आणि कामसी आयुष्याला कादंबरीरूप दिले होते. अनेक प्रकाशकांनी नाकारल्यानंतर प्रसिद्ध लेखिका-संपादिका (पुढे नोबेल- मानकरी) टोनी मॉरिसन यांच्यापर्यंत कांदबरीचे बाड पोहोचले. त्यांनी ती संपादित करून छापली. मग या अग्रेसर कृष्णवंशीय लेखिकेचे वाचकांकडून स्वागत झाले. पण मुख्य धारेतील वृत्तपत्रांनी ‘अश्लील कादंबरी’ असा शिक्का मारून तिला कोंडीत पकडले.
आता मात्र ही कादंबरी नव्याने गवसली आहे. जोन्स यांची ही कादंबरी नव्या स्वरूपात वाचण्याची इच्छा निर्माण करणारी सजग चिकित्सा वाचनीय आहेच, शिवाय या लेखात संदर्भ असलेला आणखी एक लेख.
https://tinyurl.com/46 bw832n
https://tinyurl.com/3dxrdrz7
पुस्तकाचे दुकान असेही…
‘फोर्टीफोर्थ अॅण्ड थर्ड बुकसेलर’ या अमेरिकी पुस्तक दुकानाचे नाव ठरले ते अमेरिकेचे ४४ वे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यामुळे. हे ‘इण्डिपेण्डट’ ग्रंथ दालन करोना ऐन भरात असताना २०२१ मध्ये उघडले गेले. यात फक्त कृष्णवंशीय लेखक-प्रकाशकांची पुस्तके उपलब्ध आहेत. इतरही काही फक्त कृष्णवंशीय लेखकांची पुस्तके विकणारी दुकाने आहेत. पण या दुकानाच्या मालकाचा दालनातील फेरफटका आणि ग्रंथमाहितीसाठी हा व्हिडीओ पाहा. पर्सिव्हल एव्हरेटपासून कैक कृष्णवंशीय लेखक-लेखिकाच अमेरिकी साहित्यात झळकताहेत. ते का? याचे उत्तर इथे या व्हिडीओतून मिळणार नाही; पण असेही पुस्तक दुकान असू शकते हे उमजेल.
https://tinyurl.com/44u4m7be
कादंबरी निर्मितीबाबत मुलाखत…
पर्सिव्हल एव्हरेट यांच्या ‘जेम्स’ या कादंबरीला अमेरिकेतील एका विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य वाचन कार्यक्रमाअंतर्गत (२०२५-२६) निवडले. मार्क ट्वेन यांच्या ‘हकलबरी फिन’चे पुनर्कथन असलेल्या या कादंबरीवर आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची बरसात होत असताना गेल्या आठवड्यात प्रकाशित झालेली एव्हरेट यांची मुलाखत. ‘जेम्स’ची निर्मितीप्रक्रिया विस्तारात मांडणारी.
https://tinyurl.com/2wmefkhe