आपल्याकडे गुरुनाथ नाईक तसेच शरश्चंद्र वाळिंब्यांनी लिहिलेल्या ‘रातराण्यां’च्या डिटेक्टिव्ह स्टोऱ्या आठवत असतील, तर त्यांच्यासाठी एक उत्तम लेख. पण तो लेख जिथे आहे, त्या व्यासपीठाबद्दलही थोडे अवांतर समजून घेणे गरजेचे. ‘क्राइमरीड्स डॉटकॉम’ गुन्हेकथा आवडणाऱ्यांसाठी सर्वोत्तम संकेतस्थळ मानले जाते. या लेखन प्रकारात काय सुरू आहे, कोण लिहीत आहेत, कुणाचे वाचन ‘फक्कड-पकड’ प्रकारातील आहे, याचा सारा तपशील येथे असतो. नव्या पुस्तकांबरोबर अज्ञात लेखकांची खंडीभर नावे हाती लागतील. अॅलिसन गुडमन यांचा लेख ‘पोक्त महिला डिटेक्टिव्हां’चा समांतर गुन्हेकथांतील वावर याविषयी आहे. जुन्या कथांमधील महिला डिटेक्टिव्हांसह बरेच माहिती नसलेले संदर्भ पुरवणारा.
https://tinyurl. com/mr6 juuhw6
ग्रंथदुकानांत फिरणारी…
बेथ बार्थोलोम्यू नावाच्या एका छायाचित्रकार आणि वाचकाचा हा व्हिडीओ. दक्षिण कोरियाच्या पर्यटनादरम्यान तिथल्या पुस्तकांच्या दुकानांच्या भेटीचा. त्या दुकानांच्या फेरफटक्यासह अनेक अवांतर माहिती देणारा. आता हा ३७ मिनिटांचा व्हिडीओ इथल्या पुस्तक जगाबद्दल सांगतोच, वर ‘स्टारफिल्ड लायब्ररी’ या रील्स-फोटोंमधून समाजमाध्यमावर बऱ्यापैकी व्हायरल असलेल्या चकचकीत दुकानातही नेतो. पण या लिंकचा हेतू त्यापुरता मर्यादित नाही. या बाईंच्या यूट्यूब चॅनलचा धांडोळा घेतला, तर गेल्या वर्ष-दोन वर्षांत या ग्रंथदुकान पर्यटक बाईंनी इंडिपेण्डन्ट बुकशॉप्सच्या अनेक वाऱ्या केल्याचे पुरावे सापडतील. त्यामुळे या व्हिडीओनंतर इतर पाहण्यासाठी वेळेचे बरेच नियोजन करणे गरजेचे ठरेल..
https://tinyurl. com/255r37 yx
ऑस्टेन भारतीय लेखिकेच्या नजरेतून
या वर्षभरात जेन ऑस्टेनच्या २५० व्या जयंतीनिमित्ताने भरपूर उत्तमोत्तम लेख वाचायला मिळणार आहेत. डॉक्युमेण्ट्री आणि टीव्ही मालिकांचाही पर्याय आहेच. पण लेखिका शशी देशपांडे यांनी लिहिलेला खास लेख. ‘स्क्रोल’च्या ‘ग्रेट रायटर्स’ मालिकेतला. ‘स्क्रोल’ची ही मालिकाच उपलब्ध आहे, हे लेख वाचायला जाणारे शोधून काढतील अशी अपेक्षा.
https://tinyurl.com/38eck3 ss