आज इतिहासजमा झालेल्या घटना ज्यांनी अनुभवल्या, आपल्या देशाचा नकाशा बदलताना ज्यांनी पाहिला, त्यांच्यावर आधारित साहित्य नेहमीच वाचकांना भुरळ पाडत आले आहे. फाळणीवर आधारित कथा, कविता, चित्रपटांना उदंड प्रतिसाद देणारे भारतीय हे निश्चितच जाणून आहेत. दुसरे महायुद्ध ही जगाच्या इतिहासातील एक अतिमहत्त्वाची घटना. त्यानंतर तुकड्या-तुकड्यांत विभागलेला जर्मनी आणि या तुकड्यांचं पुन्हा एकत्र येणं अनुभवलेल्या पिढीची प्रातिनिधिक कथा मांडणारी कादंबरी- ‘कैरोस’. जेनी एरपेनबेक लिखित या कादंबरीच्या मायकेल हॉफमन यांनी केलेल्या इंग्रजी अनुवादाला नुकतंच बुकर पारितोषिकाने गौरविण्यात आले. जर्मन कादंबरीच्या इंग्रजी अनुवादाला बुकरने सन्मानित केले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. प्रेम आणि द्वेष या दोन्ही भावनांचे चित्रण तर ही कादंबरी करतेच, मात्र त्याबरोबरच त्या काळातील सामाजिक, राजकीय स्थिती आणि तिचे समान्यांच्या जीवनावर झालेले सूक्ष्म परिणामही टिपते.

‘कैरोस’ १९८०च्या सुमारास बर्लिनमध्ये घडते. बर्लिनची भिंत कोसळण्यापूर्वीचा म्हणजेच अमेरिका आणि सोव्हिएत रशियातील शीतयुद्ध समाप्त होण्याच्या आसपासचा हा काळ…एक तरुण मुलगी आणि तुलनेने प्रौढ पुरुष यांच्यातील ही प्रेमकथा आहे. यातील नायकाची पार्श्वभूमी नाझी फॅसिझमची असून आता तो कम्युनिझमकडे वळला आहे. पूर्व जर्मनीतील घडामोडींचा या दोघांच्या मनांवर असलेला पगडा कादंबरीत चित्रित करण्यात आला आहे. स्वातंत्र्य, निष्ठा, प्रेम आणि ताकद याविषयी अनेक प्रश्न ‘कैरोस’ उपस्थित करते. कादंबरी जेवढी प्रेम आणि उत्कटतेविषयी आहे, तेवढीच ती सत्ता आणि संस्कृतीविषयीही आहे. दोन जीवांचे एकमेकांत गुंतणे, स्वत:लाच उद्ध्वस्त करणाऱ्या भावनिक भोवऱ्यात अडकून पडणे हे जर्मनीच्या तत्कालीन इतिहासाशी जोडले गेले आहे. हा इतिहास पानोपानी उपस्थिती लावतो. एका कम्युनिस्ट-सोशलिस्ट राजवटीचे मुक्त बाजारव्यवस्थेत होणारे स्थित्यंतर, त्यादरम्यान तिथल्या रहिवाशांच्या आजवरच्या समजांना आणि जाणिवांना बसणारे हादरे, त्यातून निर्माण होणारी भावनिक अस्थिरता, त्याचा त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यावर होणारा परिणाम अशी संपूर्ण साखळी जोडलेली आहे.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Booknews kairos novel german short essay amy
First published on: 25-05-2024 at 04:40 IST