गेल्या किमान तीन-चार दशकांची आपल्याला माहीत असलेली जागतिक आर्थिक, व्यापारी, भूराजनैतिक संबंधांची घडी वेगाने विस्कटत आहे. याचे परिणाम अनेक आंतरराष्ट्रीय क्षेत्रांवर होणार आहेत तसेच ते आंतरराष्ट्रीय वित्तक्षेत्रावरदेखील होणार आहेत. आंतरराष्ट्रीय वित्तक्षेत्रात अनेक उपक्षेत्रे मोडतात हे खरे, पण प्रमुख देशातील भांडवली बाजारांना त्या देशांच्या आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या आरोग्याचा ‘बॅरोमीटर’ मानले जाते. जागतिकीकरणाच्या काळात देशांच्या आणि जागतिक अर्थव्यवस्थेचे मोठ्या प्रमाणावर ‘कॉर्पोरेटीकरण’ आणि ‘वित्तीयीकरण’ झाल्यानंतर तर या ‘बॅरोमीटर’ची चर्चा सामान्य नागरिकांतदेखील होत असते.
त्याला कारणेदेखील आहेत. भांडवली बाजारात नोंदीकृत कंपन्यांच्या समभागांच्या किमती आणि भांडवली बाजाराचे निर्देशांक भविष्यवेधी असतात. कालपर्यंत जे घडून गेले आहे त्याचे प्रतिबिंब समभागांच्या आजच्या किमतीत आणि निर्देशांकात पडलेले असतेच. पण भविष्यात काय घडू शकते याचे अंदाज बांधतच गुंतवणूकदार समभागांच्या किमतींची बोली लावत असतात. समभागामधील गुंतवणूकदार जास्तीत जास्त परताव्याच्या मागे असतात हे अर्धसत्य आहे; ते कमीत कमी जोखीम उचलू इच्छितात हेदेखील तेवढेच खरे आहे. पण आंतरराष्ट्रीय जोखीम सतत वाढत असतानादेखील अनेक प्रमुख देशातील भांडवली बाजार ऐतिहासिक उच्चांकावर आहेत.
वाढत्या आंतरराष्ट्रीय जोखमी
गेली तीन वर्षे सुरू असणाऱ्या रशिया युक्रेन, इस्रायल पॅलेस्टाईन युद्धांमुळे जग अशांत झाले आहे. डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर, त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे आधीचे अनेक संदर्भ वेगाने बदलत आहेत. उदा देशादेशांमधील व्यापार, जागतिक पुरवठा साखळ्या, भू-राजनैतिक समीकरणे विशेषत: अमेरिका चीन संबंध, आंतरराष्ट्रीय भांडवलाची आवक-जावक इत्यादी पूर्वीसारखे राहणार नाही, हे आता स्पष्ट होऊ लागले आहे.
याचे गंभीर विपरीत परिणाम प्रमुख देशातील भांडवली बाजारातील नोंदीकृत कंपन्यांच्या विक्री आणि नफ्यावर होऊ शकतात; ज्याचे प्रतिबिंब भांडवली बाजाराचे भविष्यवेधी निर्देशांक कमकुवत होण्यात पडेल अशी सार्थ भीती या वर्षाच्या सुरुवातीच्या काही महिन्यांत व्यक्त होत होती. पण तसे घडलेले मात्र नाही. उलटपक्षी जागतिक अर्थव्यवस्थेतील वाढत्या जोखमींना न जुमानता प्रमुख देशांतील भांडवली बाजार नवनवीन उच्चांक प्रस्थापित करत आहेत. अमेरिकेतील नॅसडॅक, डाऊ-जोन्स, जपानमधील निक्की-२२५, ब्रिटनमधील ‘एफटीएसई’ ऐतिहासिक उच्चांकावर आहेत. तर भारताचा निर्देशांक ऐतिहासिक उच्चांकापेक्षा फक्त चार टक्क्यांनी खाली आहे. फक्त चीन आणि हाँगकाँगमधील निर्देशांक त्यांच्या ऐतिहासिक उच्चांकाच्या जवळपास नाहीत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या विविध घोषणांना फक्त काही महिनेच होत आहेत. त्यांचे अमेरिकेच्या आणि एकूणच जागतिक राजकीय, व्यापारी आणि आर्थिक व्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांचे ‘स्फटिकीकरण’ होण्यास अजून काही कालावधी जावा लागेल. दुसरे महत्त्वाचे म्हणजे, चीनने आपल्या राजकीय आणि आर्थिक महत्त्वाकांक्षा कधीच लपवून ठेवलेल्या नाहीत. ट्रम्प यांनी अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर मोकळी केलेली जागा घेण्यास चीन उत्सुक आहे. चीनच्या कोणत्याही वरकरणी आततायी कृतीला (उदा. तैवानची छेडछाड) अमेरिकेकडून कडवी प्रतिक्रिया येणार हे नक्की. हे फक्त एक उदाहरण. अशा घटना कधी घडतील हे कोणालाही सांगता येणार नाही. पण ज्या वेळी घडतील त्या वेळी त्याचे बहुआयामी गंभीर परिणाम आंतरराष्ट्रीय भांडवली बाजारावर होणार हे मात्र नक्की.
सद्याकालीन भांडवली बाजारावर आघात करू शकणाऱ्या अनेक शक्ती कार्यरत आहेत. पण आपला या लेखातील मुद्दा वेगळा आहे. बाहेरून होणाऱ्या आघातांमध्ये तगून राहून भांडवली बाजार पुन्हा उसळी मारू शकतात. पण भांडवली बाजारामध्येच संरचनात्मक ताण-तणाव असतील तर त्यांची ही शक्ती कमकुवत झालेली असते. तसे संरचनात्मक ताण-तणाव सद्याकालीन भांडवली बाजारामध्ये तयार झाले आहेत.
संरचनात्मक ताण-तणाव
एखाद्या सुट्या देशातील भांडवली बाजार नेहमीच वर-खाली होत असतात. पण सर्वच प्रमुख देशातील भांडवली बाजार एकाच वेळी कोसळण्याचे प्रसंगदेखील घडले आहेत. उदा. १९३० मधील महामंदी, २००८ मधील अमेरिकेतील सब-प्राइम अरिष्ट आणि २०२० मधील कोरोना महासाथ. गेल्या दोन दशकांत आंतरराष्ट्रीय भांडवली बाजारामध्ये जे संरचनात्मक बदल झाले आहेत ते आधीच्या अरिष्टांच्या काळात अस्तित्वातच नव्हते. सद्याकालीन संरचनात्मक ताण-तणावांची मुळे या संरचनात्मक बदलांमध्ये आहेत.
बरीच मोठी यादी करता येईल. (१) अनेक महाकाय कंपन्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रात मोठी भांडवल गुंतवणूक करत आहेत. त्यातून ‘प्रचंड नफा’ होईल या आशेने त्या सर्व कंपन्यांच्या समभागांच्या किमती अवाजवी पातळीवर पोचल्या आहेत. अशा गुंतवणूक करणाऱ्या सर्वच कंपन्या एकाच प्रमाणात यशस्वी होतील अशी शक्यता कमी. अशा परिस्थितीत अपयशी सिद्ध झालेल्या कंपन्यांच्या समभागांच्या किमती धडाधड कोसळू शकतात. (२) केंद्रीय बँका, भांडवल बाजार नियामक मंडळांच्या नियमनाच्या चिमटीत न येणाऱ्या, बँकिंगसदृश व्यवहार करणाऱ्या (शॅडो बँकिंग) विविध प्रकारच्या वित्तसंस्था प्रत्येक देशात वेगाने वाढत आहेत. भविष्यात त्यांच्याकडे जमा होणारे भांडवल मुख्य प्रवाहातील बँकांकडे जमा होणाऱ्या भांडवलापेक्षादेखील जास्त असेल असे अंदाज व्यक्त होत आहेत. वाढणाऱ्या ‘शॅडो बँकिंग’ मधून एक नवीन प्रकारची जोखीम जन्माला येत आहे. (३) कर्ज काढून समभागांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचे प्रमाण वाढते आहे. समभागांच्या किमती सतत वाढत असताना या मार्गातून वाजवी परतावा मिळू शकतो. पण किमती खाली येऊ लागल्यावर मात्र तो मार्ग आतबट्ट्याचा ठरतो. अशा आतबट्ट्याच्या व्यवहारातून होऊ शकणाऱ्या तोट्याचे प्रमाण कमी ठेवण्यासाठी एकाच वेळी अनेक कर्जदार-गुंतवणूकदार समभागांची विक्री करू लागल्यामुळे शेअर बाजार निर्देशांकदेखील वेगाने घसरतात. निर्देशांक खाली आल्यामुळे इतर गुंतवणूकदारही आपले समभाग विकायला काढतात. क्रिया प्रतिक्रियांची एक साखळीच तयार होते. (४) गेल्या काही वर्षात भांडवली बाजारामध्ये समभागांचीची खरेदी- विक्री करणाऱ्या, कोणताच मानवी हस्तक्षेप नसणाऱ्या, आज्ञाप्रणाली (अल्गोरिदम) विकसित झाल्या आहेत. त्याचा आणि ‘कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली’चा वापर करत निमिषार्धात समभागांची खरेदी- विक्री करणाऱ्या ‘हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग’ कंपन्या तयार झाल्या आहेत. अमेरिकेत तर दिवसभरातील एकूण व्यवहारांपैकी ७० टक्के व्यवहार अशा पद्धतीने होत आहेत. मशिन्सवर लिहिल्या गेलेल्या सर्वच आज्ञाप्रणाली जास्तीत जास्त परतावा व कमीत कमी जोखीम घेण्यासाठीच लिहिलेल्या असल्यामुळे एकाच तर्कावर बेतलेल्या असतात. त्यामुळे मार्केट संतुलित न राहता एकाच बाजूला झुकण्याचा धोका तयार होतो. त्यात भर पडू शकते सायबर हल्ल्याची. (५) भांडवली बाजार जगातील अनेक देशांत कार्यरत असली तरी त्यातील व्यवहारांचे फक्त मूठभर देशात केंद्रीकरण झाले आहे. जगातील सर्व भांडवली बाजारचे एकत्रित बाजारमूल्य १२७ ट्रिलियन डॉलर्स आहे. त्यापैकी फक्त पाच देशांचा (अमेरिका, चीन, युरोपियन युनियन, जपान आणि भारत) वाटा दोन तृतीयांश भरतो. या दोन तृतीयांशापैकी एकट्या अमेरिकेचा वाटा ५० टक्के आहे, जो १५ वर्षांपूर्वी ३० टक्के होता. एवढेच नाही तर अमेरिकेतील फक्त दहा महाकाय कंपन्यांचे बाजारमूल्य अमेरिकेच्या एकूण बाजारमूल्याच्या ५० टक्के आहे. याला वित्तीय परिभाषेत ‘कॉन्सन्ट्रेशन रिस्क’ म्हणतात.
निरीक्षणात्मक निष्कर्ष
जागतिकीकरणामुळे आणि तंत्रज्ञान विकासामुळे भांडवल एका देशाच्या सीमा ओलांडून दुसऱ्या देशात जाणे- येणे सुकर आणि कमी खर्चीक झाले. गुंतवणुकीसाठी उपलब्ध भांडवलाची चर्चा करताना संपूर्ण जग एक एकांक झाला आहे. गुंतवणुकीसाठी उपलब्ध असणारे हे महाकाय भांडवल खरे तर वस्तुमाल / सेवांचे उत्पादन करणाऱ्या उत्पादक मत्तांमध्ये गुंतवले जावयास हवे. पण थिजलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेत असे भांडवल शोषून घेण्याची क्षमता क्षीण झाली आहे. त्यामुळे हे अतिरिक्त भांडवल भांडवली बाजारासकट विविध वित्तीय मत्तांच्या खरेदी- विक्रीत गुंतवले जाते. त्याशिवाय अनेक कारणांमुळे कुटुंबांची बचत परंपरागत बँकांमधील ठेवी, सरकारच्या अल्पबचत योजनांऐवजी भांडवली बाजाराकडे वळत आहेत. केंद्रीय बँकादेखील समभागामध्ये गुंतवणूक करण्यासाठी बँकांना, नागरिकांना कर्जे देण्यास प्रोत्साहन देऊ लागल्या आहेत. दुसऱ्या शब्दात सध्याचे भांडवली बाजार ‘लिक्विडिटी ड्रिव्हन’ झाले आहेत.