दिल्लीवाला
संसदेत दोन आठवडे काळय़ा कपडय़ातील लोक बघायची सवय लागली होती, कधी कधी वाटतं हे काँग्रेसवाले पांढऱ्या कपडय़ात कसे वावरले? अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी चित्र मूळ पदावर आलेलं होतं. बहुधा काँग्रेसवाले काळे कपडे घालायचे विसरले असावेत. त्यांचं ‘मोदी सरकार लोकशाही विरोधी’ नावाचं आंदोलन अजूनही सुरू आहे. अखेरच्या दिवशी त्यांना आपापल्या गावाला पळायचं असेल म्हणून काँग्रेसचे खासदार संसदेत पुन्हा परीटघडीत आले होते. राज्यसभेत अलीकडं नवी प्रथा सुरू झालीय. नवे सभापती आले आहेत, ते हसतमुखाने सभागृहात येतात, आत येता येता सगळय़ा सदस्यांना नमस्कार करतात. त्यामुळे ते आले की, विरोधकही त्यांना नमस्कार करतात. सगळे नमस्कार-चमत्कार झाल्यावर गोंधळ सुरू होतो. अखेरच्या दिवशी आदरातिथ्य झालं, पण सभागृहात सगळीकडं पांढरे कपडे दिसत होते. त्यात एक ठिपका काळय़ा रंगाचा होता. ते दिग्विजय सिंह होते. काँग्रेसमध्ये स्वत:चं वेगळंपण टिकवण्यात दिग्गीराजांचा हात कोणी धरणार नाही. ते पक्षासाठी इतकी वक्तव्यं करत असतात की, त्यांना थांबवायचं कसं हा प्रश्न असतो. एका काँग्रेस नेत्याला विचारलं की, तुम्ही या नेत्यांचं काय करणार? या प्रश्नामुळं ते इतके त्रासले की, वाटलं त्यांची दुखरी नस दाबली गेली. काही लोक बोलतात, त्यांना थांबवणार कसं, असं म्हणत या नेत्यानं विषय बदलण्याचा प्रयत्न केला. राज्यसभेत दिग्गीराजांना बघताच सभापतींनी विचारलं, तुम्ही एकटेच काळय़ा कपडय़ात आलात! बहुधा दिग्विजय सिंह यांचं लक्ष नसावं, सभागृह सुरू झाल्यामुळं काँग्रेसच्या सदस्यांचाही गोंधळ सुरू झाला, त्यात तेही सामील झाले होते.
३२ नंबरमधून ३४ मध्ये जायला किती वेळ लागतो?अमित शहांना सगळे घाबरतात, त्यांच्या पक्षाचे सरदार ते संसद भवनाच्या लॉबीत दिसायच्या आत गायब होतात. त्यांचं व्यक्तिमत्त्वही तसंच आहे. ते दालनातून बाहेर आले की, आसपासच्या परिसरावर नजर टाकतात. त्यांची सगळी जरब त्यांच्या डोळय़ात आहे, ते हसऱ्या चेहऱ्याने बघत असतील तरीही समोरून येणाऱ्या सरदाराला ते आपल्यावर रागावले असावेत असा भास होतो. दिवसाढवळय़ा कोणाच्या नजरेत कशाला यायचं म्हणून ते पळून जात असावेत. अमित शहांसाठी व्हरांडा मोकळा केलेला असतो. त्यांचा मूड असेल तर ते चार नंबरच्या दारात थांबतात. मग, ते किती वेळ बोलत थांबतील सांगता येत नाही. हुशार पुढारी नेहमीच पत्रकारांचा चाणाक्षपणे वापर करून घेत असतो. पूर्वी काँग्रेसची सत्ता असताना त्यांच्या पक्षातील चाणक्यही हेच करत होते. त्यामुळं अमित शहा जे करतात, त्यात नवं काही नाही. अमित शहांना हलक्याफुलक्या गोष्टी प्रसारमाध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचाव्या असं वाटतं तेव्हा ते थांबतात. त्यांना आपले कोण आणि त्यांचे कोण हे माहिती असतं. ते आपल्या लोकांना दारात उभं राहून माहिती देत असतात. त्यांना त्यांच्या लोकांना काही गंभीर गोष्टी सांगायच्या असतील तर वेगळी मैफल जमते. लखीमपूर हत्याकांड प्रकरणामुळं वादात सापडलेल्या टेणींना मंत्रिमंडळातून काढलं जाणार नाही हे अमित शहांनी सांगितलं होतं. परवा अमित शहांचा मूड चांगला होता. ते चौथ्या दरवाजात येऊन थांबले, गप्पा सुरू केल्या. त्यांना राहुल गांधींवर बोलायचं होतं. भाजपच्या इतर नेत्यांना चिंता होती, तशी त्यांनाही ‘काळजी’ पडली असावी. राहुल गांधी वरच्या कोर्टात का गेले नाहीत, असा प्रश्न न विचारणारा भाजपचा नेता सापडणार नाही. अमित शहांनी हाच प्रश्न विचारला. ‘काय चाललंय त्या राहुल गांधींचं? सत्र न्यायालयात जायला किती वेळ लागतो?’ अमित शहांच्या म्हणण्यात तथ्य होतं. न्यायदंडाधिकाऱ्यांचं न्यायालय आणि जिल्हा-सत्र न्यायालय एकाच आवारात आहे. एका खोलीतून दुसऱ्या खोलीत म्हणजे ३२ नंबरच्या खोलीतून ३४ नंबरमध्ये जायचं, तेवढं जायला असा किती वेळ लागतो, असं अमित शहांचं म्हणणं होतं. पण, राहुल गांधी सुरतला जायलाच तयार नव्हते. कनिष्ठ न्यायालयानं निकाल दिल्यानंतर १० दिवसांनंतर ते ३४ नंबरमध्ये गेले. राहुल गांधी तुरुंगात गेले तर आठ र्वष तरी निवडणूक लढवता येणार नाही. त्यावर, अमित शहा म्हणाले, त्यानंतरही आठ र्वष लागतील!
मंत्री असावेत तर असे..
मोदींच्या मंत्रिमंडळात आक्रस्ताळे, अत्यंत उर्मट, डोक्यात हवा गेलेले मंत्री कोण-कोण हे आता लोकांना कळलेले आहे. लोक मोदींच्या प्रेमात असल्याने त्यांच्या सहकाऱ्यांबद्दल ते उघडपणे बोलत नसावेत. इथं मंत्री महिला आहे की पुरुष, महत्त्वाचं नाही. आगाऊपणा कोणीही करू शकतं. राज्यसभेत सत्ताधारी बाकावर बसलेल्या नेत्यानं मागं वळून आपल्या सहकाऱ्यांना शांत कसे बसलात, व्हा सुरू, असा आदेश दिला होता. त्यांनी मानेनं असा इशारा दिला की, तात्काळ भाजपच्या खासदारांमध्ये एकदम त्वेष निर्माण झालेला दिसला. हा नेता खरे तर महापालिकेच्या प्रभागातदेखील निवडणुकीला उभा राहिलेला नसेल, पण तो सध्या इतक्या केंद्रस्थानी आहे की, त्याला मान दिला नाही तर काय होईल याची सदस्यांनाही कल्पना आहे. एका मंत्र्यांची ख्याती अशी की, त्यांच्याकडं नवं खातं दिलं की, तिथल्या सचिवांवर संक्रांत आलीच म्हणून समजा. त्यांची परस्पर बदली होते असं नव्हे, हे मंत्री सचिवांना त्यांची औकात दाखवून देतात. तुम्ही लायकीचे नाहीत, तुम्ही मला आवडत नाहीत, हे सांगायला हे मंत्री अजिबात कचरत नाहीत. त्यांनी ३५ वर्षांचा अनुभव असलेल्या एका वरिष्ठ महिला सचिवाला दिल्लीतून तीन दशकांनंतर त्यांच्या मूळ राज्यात पाठवलं होतं. या वरिष्ठ सचिवांनी शांतपणे सेवेचा राजीनामा दिला आणि स्वत:ची लाज राखली. या मंत्र्यांना इतकी दर्जेदार मंत्रालयं मिळाली होती, पण तिथल्या सेवकांना नाराज करण्यापलीकडे त्यांनी काही कमावलेलं नाही!
तोच तोच विषय कशाला काढता?
विरोधकांच्या एकीच्या चर्चा वगैरे ठीक आहेत! आम्ही एकत्रच असं भाजप सोडून सगळे म्हणू लागले असल्यानं आता फक्त भाजपला सत्तेवरून बाजूला करायचं तेवढं राहिलंय असं वाटावं. पण, विरोधकांच्या गोटातील विसंवाद शरद पवारांनी मुलाखत देऊन उघड केल्यामुळे काँग्रेसवालेही मोकळेपणाने बोलू लागतील. एकीच्या नावाखाली बाहेरून गप्प असणारे विरोधक आतून मात्र एकमेकांवर जाम वैतागलेले आहेत. काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या घरात शरद पवारांनी थेट राहुल गांधींना फैलावर घेतलेलं काँग्रेसच्या नेत्यांना आवडलेलं नाही. त्या बैठकीत राहुल गांधी फारसं बोलले नाहीत. त्यांचं म्हणणं होतं की, मी अडचणीच्या मुद्दय़ावर उघडपणे बोलणार नाही! नागपूरमध्ये राहुल गांधींच्या होणाऱ्या जाहीर सभेत ते काय करतात हे आता कळेल. पवारांनी खरगेंच्या भोजनबैठकीत विषय संपवून टाकला होता. मग, ते नागपूरमध्ये सावरकरांवर पुन्हा कशासाठी बोलले, असं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं होतं. आम्ही आमच्या पक्षाचे विचार बाजूला ठेवायचे, तोंड दाबून बुक्क्यांचा मार तुमच्याकडून सहन करायचा, तरीही तुम्ही पुन्हा सावरकरांवर बोलणार? काँग्रेसवाल्यांना वाटतं की, राहुलपेक्षा पवार सावरकरांचा विषय काढताहेत. त्यांनी असं करू नये! ही आतली खदखद पवारांना कोण सांगणार? कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूक असताना काँग्रेसला विरोधकांच्या एकीमध्ये गडबड झालेली परवडणार नाही हा साधासोपा हिशोब आहे. म्हणून कदाचित काँग्रेसचे नेते पवारांबद्दल बोलायला नाखूश आहेत. खरगेंच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत सोनिया गांधीही होत्या. त्या काय म्हणाल्या माहीत नाही, पण विरोधकांच्या एकीवर त्यांचा भर असावा असं दिसतंय. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात कामकाज झालं नसलं तरी, मुद्दा पटवून देण्यासाठी काँग्रेसची धडपड सुरू होती. संसदेच्या आवारात पदयात्रा, मोर्चा, निदर्शनं होत राहिली, तिथं सोनिया गांधी काँग्रेस खासदारांसोबत होत्या. मोर्चामधून विजय चौकापर्यंत त्या गेल्या नसतील, पण संसद भवनच्या मुख्य द्वारातून आंदोलनासाठी बाहेर पडणाऱ्या पक्षाच्या संसद सदस्यांना पाठिंबा देण्यासाठी सोनिया गांधी दररोज संसदेत येत होत्या हे विशेष!
