राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘दरवर्षी गणेशोत्सव येतो. त्यानिमित्ताने माणूस आपल्या अंगातील उत्साहाला वाव देत असतो. हा उत्साह चांगल्या प्रकारे प्रकट झाला पाहिजे. आज तसे म्हणता येणार नाही. कोणातरी बुवाला, साधूला बोलावून कार्यक्रम साजरा करणे किंवा नाच तमाशे करून लोकांचे मनोरंजन करणे एवढेच आजच्या गणपती उत्सवाचे स्वरूप आहे, ही वस्तुस्थिती तरुणांना भूषणावह नाही. त्यात तरुणांच्या शक्तीचा कोणत्याही प्रकारे विकास होत नाही. असला तर त्यात त्या शक्तीचा दुरुपयोगच आहे. वास्तविक गणेशोत्सव हा राष्ट्रीय उत्सव आहे. त्यामागे एक जिवंत परंपरा आहे. गणपती उत्सवामुळे राष्ट्रात तेज निर्माण व्हावे, जनतेत चैतन्य निर्माण व्हावे, तरुणांचा उत्साह राष्ट्राच्या कारणी लागावा असा या उत्सवाच्या परंपरेमागे हेतू आहे. परंतु या उत्सवाच्या निमित्ताने देशातले हजारो रुपये खर्ची पडतात. त्या पैशांचा राष्ट्राला, समाजाला, काही उपयोग होणार नसेल तर ते सारे व्यर्थ गेले असे मानणारा मी माणूस आहे.’’

‘‘या उत्सवाचा उपयोग राष्ट्राच्या उभारणीसाठी झाला पाहिजे. मग कितीही रुपये खर्च झाले तरी त्याचे मला काही वाटणार नाही. गणपती उत्सव हे समाजाला शिक्षण देण्याचे एक साधन आहे. बसावे कसे, उठावे कसे, एवढे ज्ञान जरी समाजाला मिळाले तरी राष्ट्राच्या उत्थानाचे फार मोठे काम पार पडेल. सामाजिक सभ्यतेत अनेक गोष्टी येतात. एकता, धार्मिकता, प्रेम, माणुसकी या सर्व बाबींचा सामाजिक सभ्यतेत अंतर्भाव होतो. ही सभ्यता अशा उत्सवांतून शिकता आली पाहिजे. आजची आपल्या भारत देशाची स्थिती अशी विचित्र आहे की इथला एकटा माणूस सज्जनासारखा बसतो. पण चार माणसे एकत्र आली तर ती सैतानासारखी वागतात. परदेशात नेमकी याउलट स्थिती आहे. तेथला माणूस सामुदायिक शिस्तीचा अधिक चाहता आहे, चार लोकांत तो अधिक चांगला, अधिक सभ्य वागतो. एकटा असताना एखादवेळी वेगळा वागू शकतो. आपल्या देशात ही सामुदायिक शिस्तीची प्रवृत्ती अधिक प्रमाणात वाढली पाहिजे.’’

‘‘आज आपल्यासमोर अनेक प्रश्न आहेत. शेती-विकासाचे, अधिक उत्पादनाचे प्रश्न आहेत. गोवध- बंदीचे प्रश्न आहेत.परंतु हे प्रश्न व्यक्तिगत सामर्थ्यांने सुटणार नाहीत. त्यासाठी प्रयत्नपूर्वक सामुदायिक शक्ती उभारावी लागेल आणि गणपती उत्सवासारख्या काही चांगल्या प्रथांचा त्यासाठी उपयोग करून घ्यावा लागेल. या परिवर्तनाच्या पद्धतीलाच मी धर्म मानत आलो आहे. धर्म म्हणजे कर्तव्य. धर्म म्हणजे टाळ कुटणे अशी धर्माची व्याख्या कधीही अस्तित्वात नव्हती. धर्म हे कर्तव्य-जागृतीचे एक साधन आहे. गणपती उत्सव किंवा इतर धार्मिक सामाजिक उत्सव हे त्यापैकीच प्रकार आहेत. अशा उत्सवातून माणसाला राष्ट्रीयत्वाचे क्षात्रधर्माचे शिक्षण मिळाले पाहिजे. गणपती उत्सवसुद्धा आपण एवढय़ाचसाठी साजरा केला पाहिजेत. तो केवळ चैनीसाठी व करमणुकीसाठी साजरा केला गेला, तर त्यामुळे देशाचे व आपलेसुद्धा फार मोठे नुकसान होईल.’’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजेश बोबडे