scorecardresearch

चिंतनधारा : श्रद्धेला जोड आचार-विचारांची

‘असा हा अनियमितपणा ज्ञानाच्या चर्चेत जरी शोभून गेला तरी त्याचे आम्हाला काहीच महत्त्व वाटत नाही.

chintandhara 22
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

राजेश बोबडे

श्रद्धेची आवश्यकता व श्रद्धेच्या निर्मितीविषयी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात- ‘मी काही सेवा करणारे असे पाहिले आहेत की, एखाद्या वेळी तर त्यांच्या सेवेला पारावारच उरत नाही. भजन करतील तर पहाटे पाच वाजेपर्यंत, ज्ञान-चर्चा करतील तर सारा दिवस गारद आणि नंतर मग इतका आळस की दुसरा पूर्ण दिवस एखाद्या आजारी व्यक्तीप्रमाणे घालवतील! सूर्योदय होऊन गेला, दहाही वाजले तरी बुवा पडलेलेच आहेत बिछान्यावर! मग काय, उठले बाराला आणि कशीबशी चूळ भरून टाकून बसले जेवायला! कोणी विचारले की- काय हो, स्नान वगैरे झाले काय? तर ते म्हणतात, अहो, फुकट नाही अशी अवस्था येत, याला पूर्वपुण्याईच लागते. आपल्याला माहीत नाही का काल मी रात्रभर भजनासाठी जागलो ते! मग आजही सर्व केलेच पाहिजे, हे कुठले शास्त्र? पाहू आता फुरसतीने स्नान आणि पूजाअर्चा!’

‘असा हा अनियमितपणा ज्ञानाच्या चर्चेत जरी शोभून गेला तरी त्याचे आम्हाला काहीच महत्त्व वाटत नाही. मनुष्याने आपली नित्यकर्मे निसर्गासारखी नियमितपणे चालतील, असेच वागले पाहिजे. उगीच मनाच्या मर्जीप्रमाणे, उच्छृंखलतेने तीन दिवस भजनभक्तीत घालवावेत आणि तीन महिने रुग्णाप्रमाणे, असल्या कार्याचा आढावा उन्नतीसाठी उपयुक्त ठरेल असे मला वाटत नाही. मनाच्या अनावरतेने घडलेला परमार्थही परमार्थ राहत नाही, मग घडलेली अनियमितता तर वाईटच ना? या दृष्टीने साधकात सर्वाच्या आधी हा विचार निश्चित व्हायला हवा, की प्रथम आम्ही काय करावे म्हणजे कोणी असो नसो, आम्ही आहोत तोपर्यंत विसरणार नाही अशी सदिच्छा जागृत राहील. त्या इच्छेचेच आम्ही मनन करीत राहू. म्हणजे तोंडपूजा म्हणवावयास कारण असलेला काळिमा आमच्यातून निघून जाईल नि निष्ठावंत म्हणवण्याला आमचा आत्मा आम्हाला भाग पाडेल; तसेच आम्ही व्यवहार व परमार्थाच्या अधिकारवृत्तीचा पाया आमच्यात निर्माण करू शकू.’ याचा विचार व आचार झालाच पाहिजे असे म्हणून महाराज ग्रामगीतेत साधकाला त्याच्या दिनचर्येविषयी विचारताना म्हणतात..

प्रथम कळु दे तुझी साधना।

काय ठेवितोसी आपुली धारणा।

दिनचर्येची रचना।

कैसी रचना आहे तुझ्या।।

मराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-03-2023 at 00:02 IST
ताज्या बातम्या