राजेश बोबडे

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपले विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी १९४३ मध्ये ‘श्रीगुरुदेव’ मासिक काढले. याबाबत विवेचन करताना महाराज म्हणतात, ‘‘जेव्हा पक्षापक्षांच्या भेदभावना समाजाला वाटेल त्या दिशेने नेतात, तेव्हा एकाच्या रूढीसाठी होत असलेला अखिल समाजाचा नाश माझ्यासारख्या अल्पशिक्षित माणसाला पाहावत नसेल तर विद्वान कसे पाहू शकतात याचेच आश्चर्य वाटते. याकरिता वर्तमानपत्रात लेख द्यावेत तर जागा फार गुंतेल. वर्तमानपत्रांचा ओघ वेगाने पक्षोपक्षी व अवास्तव राजकारणाकडे जात आहे. त्यांच्या या धामधुमीत खेडय़ांतील जीवन कसे सुधारावे आणि त्यांना कसे पुढे आणावे, याचा ते फारसा विचारच करताना दिसत नाहीत. लोकांनाही बातम्याच वाचनाचा नाद लागलेला दिसतो. पण यामुळे देशासाठीच्या कार्यात जेवढा प्राण निर्माण व्हायला हवा, तेवढा होणार नाही.’’

‘‘जगातील सर्वच विषय राजकारणाने आटोपत नसतात. सध्याच्या काळात लोकांचे विचार व भावना डळमळीत झालेल्या आढळतात. देशात सुव्यवस्था केवळ बातम्या सांगून निर्माण होत नसते, त्याकरिता तसे वागणारे हजारो लोक डोळय़ांसमोर दिसावे लागतात. तरच त्याचा परिणाम होऊ लागतो. आज आमच्या देशात जाती, पंथ, राजकारण व धर्मनिरपेक्ष मानवतेची उपासना करणाऱ्या आदर्श सेवकांची गरज आहे. हा जनसेवक-समाज मग तो कोणत्याही संस्थेचा असो वागणुकीने शुद्ध व आपल्या स्वार्थाकरिता कुणावरही टोळधाड घालणारा नसावा. दुसऱ्यांचेही सत्कार्य आपलेच समजून त्यांना प्रोत्साहन देणारे लोक आज हवे आहेत. नाहीतर माझी गाय दुबळी मग शेजारच्या उत्तम गाईला महत्त्व का यावे, अशी मत्सरी वृत्ती ठेवून मनात झुरणारे व माझी गाय दुबळी म्हणून या काळात गाई सुंदर होऊच शकत नाहीत, असा सिद्धांत सांगणारे लोक असणे धोक्याचे. स्वत:ला पुढारी व बुवा म्हणवणाऱ्या कितीतरी लोकांनी हजारो लोकांना फसविले आहे. इतरांना बिघडवणे हाच त्यांना उत्तम मार्ग वाटतो.’’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘‘मला एकजण म्हणाले, ‘काय हो महाराज! दुनिया कुठे चालली आहे आणि तुम्ही तिला पुरातन स्वरूप देऊ पहाता, हे कसे जमेल! जनसाधारण लोक जिकडे जातात तिकडेच गेले पाहिजे.’ मी त्यांना सांगितले, याकरिता माझा जन्म नाही. लोकांना विशाल ध्येयावर आरूढ करून त्यांच्यात राष्ट्रीयता व धार्मिकता निर्माण करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करणार आहे. त्याकरिता संप्रदाय मला साथ देतील तर त्यांच्याशी सहकार्य करेन, जाती साथ देतील तर त्यांच्या एकतेतून कार्य करेन, वर्तमानपत्रे मदत करतील त्यांची मदत घेईन, मित्र साथ देतील तर त्यांच्याशी सहकार्य करेन व हे सर्व जन आपापली मनोवृत्ती विकृत दाखवतील तर मी त्यांची साथ सोडून माझ्याने होईल तसे अनपढ व श्रद्धावान लोक हाती धरून आपल्या आत्मसमाधानाकरिता आपल्या ध्येयमार्गाने जमेल तशी सेवा करेन. माझा हा मार्ग कुणालाही दु:ख देणारा नाही, हे मी जाणून आहे. सध्या वर्तमानपत्रांचा कल बहुधा राजकारणाकडे तर माझा सेवाभाव निर्माण करण्याकडे आहे. केवळ कायद्याने राज्यस्थापना करण्याऐवजी मला सेवेने राजकारणाचे महत्त्व पटवून द्यायचे आहे.