राजेश बोबडे  

‘‘पुराणातील चरित्रावरून कोणालाही संपूर्ण देव म्हणता येणार नाही. परंतु आम्हालाही संपूर्ण देवाची कल्पना नसल्यामुळे त्यांच्यातील दोष सोडून देऊन गुणांची उपासना आम्ही करतो. दुसऱ्या दृष्टीने तुलसीदासाप्रमाणे- ‘समर्थको नहि दोष गुसाई’ अशा प्रमाणेही थोरांच्या जीवनाकडे पाहाण्यात येते. अमर बोधशक्तीही मानवी शरीरात आल्यावर त्यांना मर्यादा व गुणदोष प्राप्त होतातच, मात्र श्रीगुरुदेव सेवामंडळाच्या अधिष्ठानावर असणाऱ्या आत्मशक्तीमध्ये अनात्मशक्ती प्रवेशच करू शकणार नाही, असे हे शुद्ध अधिष्ठान आहे. ज्यांनी तत्त्व ओळखले, असे म्हटले जाते ते हेच तत्त्व! या तत्त्वास नाश नाही. आत्मशक्तीचा नाश कधीही होणे शक्य नाही. म्हणूनच आम्ही मूर्ती वा व्यक्ती ही साधने समजतो व अशा महापुरुषांतील आत्मशक्तीचे चिंतन करून ती प्राप्त करणे हे ध्येय समजतो,’’ असे तुकडोजी महाराज म्हणतात.

हेही वाचा >>> चिंतनधारा : गुरुदेव, व्यक्ती नव्हे शक्ती!

‘‘इतके गंभीर तत्त्वज्ञान सर्वाच्या पचनी पडणार नाही, म्हणून अधिष्ठानाचे स्पष्टीकरण करणारी मंडळाची संक्षिप्त पद्धती उपयोगात आणली आहे, पण तुम्ही हे लक्षात घ्यावे, की अधिष्ठान हे मूर्तिरूपाने किंवा वस्तुरूपाने अस्तित्वातच नाही. आम्ही ज्या वेळी व ज्या ठिकाणी आवाहन करू त्या वेळेस व त्याच ठिकाणी देव प्रगट होतो. अशी ही बाह्य साधनाची योजना आहे. आम्ही उत्थान करताच तो गुप्त होतो. हे देवत्व जगातल्या प्रत्येक वस्तूवरही आम्ही आरूढ करू शकतो. एरवी विकारजन्य अशी कोणतीही वस्तू देव होऊ शकत नाही. एखाद्याने मोठय़ा माणसाचा निरोप आणला तर निरोप आणण्यापुरता तो अधिकारीच ठरतो. त्याचप्रमाणे महंमद पैगंबर वा येशू ख्रिस्तादी महापुरुष ही आत्मशक्तीच्या निरोपाची द्वारेच होत. आज लोक अशा महापुरुषांना देव मानतात. आम्ही त्यांच्याजवळील ज्या तत्त्वामुळे त्यांना देव मानले जाते, ते तत्त्व वेगळे काढले आहे. त्या चेतनाशक्तीलाच आम्ही ‘गुरुदेव’ म्हणून संबोधतो.’’

हेही वाचा >>> चिंतनधारा : व्यक्तिपूजेचे बंड दूर करायचे आहे

‘‘ज्या वेळी जी साधने आवश्यक वाटली त्या साधनांचा देव समाजाने निर्माण केला. शस्त्रास्त्रांची ज्या वेळी आवश्यकता होती, त्या वेळेस धनुष्य देऊन श्रीरामास धनुर्धारी केले. श्रीकृष्णास लीला-विहारी आम्हीच केले. समाजात ज्या गोष्टी आवश्यक असतील त्या ज्याच्याजवळ नैसर्गिकरीत्या असतात, त्याला देव म्हणण्यात येते. अशा व्यक्ती वेळोवेळी निसर्गानेच जन्माला येतात. व ज्याची गरज तोच प्रिय या न्यायाने प्रिय ठरतात. अशा रीतीने आम्ही अनेक देव बनवले म्हणून देव अनेक झाले. आजही समाजास मुठीत धरणाऱ्यासच उद्या देवच म्हटले जाईल. अनेक रूपांनी अनेक देव निर्माण झाले. एका काळात एका देवाने, दुसऱ्या काळात दुसऱ्या देवाने कार्य केले. यासाठी शेवटपर्यंत त्यांच्या कार्याचे स्मरण ठेवणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. मात्र आमचा देव कोणताही बुवा नव्हे, सांप्रदाय नव्हे. तर सर्व ज्यात समरस होतात, अशा तत्त्वासच ‘गुरुदेव’ मानून चिंतनाच्या मार्गाने उपासना रूढ करण्यात आली आहे. हे सेवामंडळाचे तत्त्वज्ञान सर्वानी लक्षात ठेवले पाहिजे.’’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

rajesh772@gmail.com