राजेश बोबडे

जगरहाटीबाबत सजग करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘बीजाला जमीन लागेपर्यंत अंकूर वाढत नाही; हे आपण पाहतोच ना! व अंकुराला उत्तम खताशिवाय फळे येणे कठीण. तसेच माणसाचेच काय पण सगळय़ा जीविताचे आहे. मला माझे मित्र विचारतात की आता या देशाचे काय होणार? मी म्हणतो जे कधीच झाले नाही असे नाही होणार. जो नेहमीचा परिपाठ आहे तसेच होणार. जर आजचे चालक, शासक, नोकर, पंडित, साधू व कार्यकर्ते आपले काम इमानदारीने, लोकसेवावृत्तीने व घेतलेल्या जबाबदारीने करीत वागणार तर त्यांचे आसन काही काळ स्थिर राहणार व त्यात फरक पडणार तर घोडे अडणार, खड्डय़ातही पडणार. निसर्ग आपला अधिकार घेऊन तिथे कोणी उभे करणार.’’

हेही वाचा >>> चिंतनधारा: पतनशील पांडित्य

‘‘देवाजवळ आपला आणि परका कसा राहणार? त्याला सर्वच व्यवस्था करावयाची असते व तो आता नवीन ते काय करणार? त्याने हे नाटक केव्हाचेच रचले आहे. त्याचा अनुभव घेणे, समजणे व आपली पावले तशी टाकणे एवढेच तर शीलवान माणसाचे काम असते. हे जाणून माणूस चालेल तर कीर्ती व मूर्तीची स्मृती ठेवून जाईल. नाही तर जाईल हे तर खरेच पण काय ठेवून जाईल हे सांगता येणार नाही! एकंदरीत जगाचे म्हणा की देशाचे, प्रदेशाचे म्हणा की ग्रामाचे, सध्या तरी दिवस बदलत्या काळाचे व कष्टमय स्वरूपाचे आहेत. त्यात सर्वानाच कष्ट आहेत, असे मला म्हणावयाचे नाही. पण सज्जनाच्या, नम्र माणसाच्या तर कष्टच राशी उतरले आहेत. त्यांनी धीर धरून आपले कर्तव्य इमानदारीने करावे; व लोकांत होईल तेवढे सेवेचे धन, मान व प्रेमरूपी बँक भरून ठेवावी. आततायीपणा करून लालसा, मान, पैसा, सत्ता मागण्याला धावतील तर त्यांची पुण्याई संपून ते मूळच्या पदाला येतील. मग ती व्यक्ती असो वा समाज. हे चालूच राहणार.’’

हेही वाचा >>> चिंतनधारा: गणेशोत्सव समाजशिक्षणाचे साधन व्हावे

‘‘आपण कितीतरी जणांचे जन्म, मृत्यू, तारुण्य, वृद्धत्व पाहात आलो आहोत. पण समाज, संप्रदाय यांचे आयुष्य त्यांच्या पुण्याईने कमीअधिक वर्षांचे असते, पण आज तर फार मोठमोठय़ा धर्माची व संप्रदायांची अदलाबदल पाहण्यास मिळू लागली आहे. नवीन उदयोन्मुख विचारांच्या व्यक्तींचा, समाजाचा, धर्माची नावे नोंदणाऱ्या समाजाचाही प्रकाश जुन्या धर्मावर, व्यक्तित्त्वावर पडू लागला आहे. माणसाला वाटते खरे, की माझी सरंजामशाही, माझे नेतृत्व, माझी महंतगिरी, माझा जुन्या शास्त्राचा अभ्यास, माझी जम बसविलेली सत्ता याला कसा धक्का बसणार? पण जेव्हा चालत्या जगाची आठवण येते तेव्हा याचा अनुभव मोठमोठय़ांना येतो की नाही? जग हे असे चालले आहे. आपण त्याबरोबर चाललो तरच आपला काही टिकाव लागेल. नाहीपेक्षा आजचे गुरू उद्याचे शिष्य होणार व आजचे राजे उद्याचे नागरिक व्हायला चार दिवसांचाही वेळ लागणार नाही.’’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

rajesh772@gmail.com