राजेश बोबडे
सर्वधर्मसमभावाचे प्रणेते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समृद्ध भारताचे चिंतन करताना म्हणतात, ‘‘यापुढे हरिजनांसाठी नुसती मंदिरेच खुली करून भागणार नाही तर आपली हृदयमंदिरेही हरिजनांना खुली करावी लागतील. जगाचे नेतृत्व करण्याचे स्वप्न भारताला पूर्ण करायचे असेल तर कोणत्याही घटकाची अवहेलना चालणार नाही. प्रत्येक घटकाने भेदाभेद विसरून राष्ट्र-जीवनाशी एकरूप झाले पाहिजे. अन्यथा चीन व पाकिस्तानशी युद्ध तर दूरच राहो पण तिसरीच एखादी शक्ती आपल्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही.
श्रीरामचंद्राने रावणाशी लढाई करताना सर्व जातींची वानरसेना संघटित केली व त्यांच्याशी समानत्वाच्या भूमिकेवरून समरसता दर्शविली. श्रीकृष्णाने कंसाचा संहार करण्यासाठी नाना जातींतील गोपाळांची संघटना केली. छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याची पताका उंच ठेवणाऱ्यांतील उच्चनीच भेद विसरले होते. त्या सर्वाच्या एकजुटीतूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापले, राखले आणि संवर्धिले. आज राष्ट्राला याच सामाजिक क्रांतीची गरज आहे. प्रसंगी तरुणांनी या क्रांतीकरिता बंड केले पाहिजे, असे सुचवून महाराज म्हणतात, वाडवडिलांची नाराजी पत्करूनही त्यांनी हरिजनोद्धाराचे व्रत स्वीकारले पाहिजे. नुसती सभेत, वनभोजनात, हॉटेलात किंवा चव्हाटय़ावरच अस्पृश्यता नष्ट करून भागणार नाही. ती मनातून, जीवनातून, घरादारांतून आणि कल्पनेतूनही नष्ट करावयास हवी. तेजस्वी राष्ट्राच्या निर्मितीसाठी ब्राह्मणांपासून महारांपर्यंत सर्वानी भारतात राहणारा- तो भारतीय व महाराष्ट्रात राहणारा तो मराठा हे मनाशी पक्के बिंबविले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात सर्वानीच आपापसांतील भेदाभेदांना मूठमाती देऊन आपण सारे मराठे आहोत हे मनावर बिंबविले होते. तरच दिल्लीचे तख्त फोडण्याची हिंमत बाळगता येईल. ज्या वेळी पेशवाईत पुन्हा मतभेदांचा उद्भव झाला त्या वेळी इंग्रजांना मराठय़ांवर विजय मिळविता आला. म्हणून आज जर कशाची आवश्यकता असेल तर ‘अस्पृश्य’ या शब्दाचे समूळ उच्चाटन करण्याचीच आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सर्वानाच समान संधी मिळाली पाहिजे. आपण अस्पृश्य आहोत अशी भावनाच आता टाकून देऊन आम्ही भारतीय आहोत, भारतासाठीच जगणार आणि भारतासाठीच प्रसंगी प्राणार्पणही करणार, असा पक्का निश्चय केला पाहिजे. स्पृश्यास्पृश्य भेदाभेदांना मूठमाती दिल्याशिवाय एकात्म संघराज्य निर्माण होणार नाही. असल्या भेदाभेदांना मूठमाती देऊन राष्ट्रघटक म्हणून जगा आणि स्वत:चा व राष्ट्राचा उत्कर्ष साधा एवढीच माझी इच्छा आहे,’’ असे सांगून महाराज भजनात म्हणतात,
या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे
हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे
नांदोत सुखे गरीब-अमीर एक मतांनी
मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी
स्वातंत्र्य-सुखा या सकलांमाजि वसू दे
दे वरचि असा दे.