राजेश बोबडे
सांप्रदायिक बुवांच्या प्रवृत्तीबद्दल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रश्न उपस्थित करतात. त्यांची दशा व दिशा स्पष्ट करताना ते म्हणतात, कुणी म्हणेल की ‘‘बुवा म्हणविणाऱ्यांच्याने धर्म कार्य होत नसेल तर अधिक धर्मप्रचारक का निर्माण करू नयेत?’ मी म्हणेन, कामधंद्यात असलेल्या लाखो लोकांनाच जर खाण्याची मारामार, तर पुन्हा एवढा समाज निर्माण केल्यास सध्याचे कोटय़वधींच्या संख्येत असलेले असे लोक त्या कास्तकारांच्या छातीवर बसून काय धर्माची जागृती करणार, असे वाटावयास लागते.
बरे, स्वस्थ बसावे तर प्रत्येक बुवाच्या तोंडी ध्रुवपद ठरलेलेच असते की, ‘धर्म किती लोपला! मनुष्यपणाचा किती नाश झाला! ’ पण ताळय़ावर आणावयाचे कुणी, हा डोळय़ासमोर उभा राहतो. कोणी आपल्या सद्हृदय अंत:करणाने या बाबतीत पुढे आला, तर त्याच्यामागे पालुपद लागलेच समजा, ‘त्याने धर्म भ्रष्ट केला. साधुसंतांचा मान बुडविला. जुनी रूढी तोडली. आम्हा लोकांची मिळकत गमावली व शास्त्रपुराणाला बट्टा लावला!’ एवढय़ानेच त्यांचे भागत नाही. कार्यात अडथळा आणेपर्यंतही मजल जाते,’’ असे महाराज स्पष्ट करतात.
ते म्हणतात, ‘‘धर्माच्या व्यापकतेची एवढीच व्याख्या करावयाची काय? की जो जें करतो तो त्याचा धर्म! बुवा जे करतात तो त्यांचा धर्म! यजमान पाप करून क्षमा मागतात तो त्यांचा धर्म! तसेच बुवावर जे ताशेरे ओढतात तो त्यांचा धर्म व ऐकणारे मजा पाहतात तो त्यांचा धर्म! असेच जर होऊ लागले तर माणुसकीला जागा राहणार नाही. कारण त्यामुळे समाजाच्या धारणेची जी व्यवस्था तो धर्म न वाटता, मी म्हणजे समाज आणि मला आवडतो तो धर्म असे होऊ लागणार नाही का? आपला स्वच्छंदी निभाव उत्तम लागण्याकरिता हे बरे, पण जेथे समाजाचा प्रश्न येतो तेथे ही बजबजपुरी काय कामाची?’’ असा प्रश्न महाराज करतात.
‘‘एका व्याख्यात्याने एकदा आपले स्वैरविचारी व्याख्यान दिले. तो म्हणाला, ‘आपल्या व्यक्तिसुखाशिवाय धर्माची व्याख्या करणे फजूल आहे. ज्यात आम्ही सुखी, तोच आमचा धर्म! मग आम्हाला दुसऱ्याचे काय करावयाचे आहे! मरत असतील लोक, नसेल त्यांना बुद्धी!’ हे रात्रीचे व्याख्यान संपून एक दिवसही गेला नव्हता. लोक त्यावर चिडले होते की ‘वाहवारे मतलबी धर्म सांगणारा!’ कर्मधर्मसंयोगाने दुसऱ्याच दिवशी त्याच्या घराला अचानक आग लागली. तो चौकात आला आणि ओरडून व्याख्यान (?) देऊ लागला- ‘बंधूंनो! धावा धावा! सर्व मिळून माझी एवढी इमारत वाचवा!’ तेव्हा लोक आले नि हसत हसत म्हणाले ‘तुम्हाला कुणाची गरज नाही तर आम्ही धावून तुमचे घर का विझवावे? तुम्ही पाहा तुमचे,’ तेव्हा तो घाबरून म्हणाला- ‘बंधूंनो! क्षमा करा. मी त्या बाबतीत चुकलो खरा. धर्म हा सर्वाना सांधणारा व सर्वाचे सुख पाहणारा असतो. सारांश, प्रत्येकाने जबाबदारीला ओळखून राहणे व ‘मी जेवढा माझ्याकरिता तेवढाच समाजाकरिताही आहे’ हे पटवून घेणे, या योगाने समाजाचाच नव्हे तर जगाचा प्रश्न सुटणार आहे,’’ असे महाराज सांगतात.