राजेश बोबडे
बुवा लोकांत शिरलेल्या अपप्रवृत्तीवर प्रहार करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रश्न करतात की, सज्जनांनो! मला सांगा की बुवाबाजीच्या ढोंगाने धर्माचा दुबळेपणा जाईल काय? खरोखरच बुवांच्या नावलौकिकाचे ब्रीद राहील काय? आपल्या मायभूमीचे पांग फिटेल काय नि धर्माची स्थापना होईल काय? अहो, ‘उद्धार! उद्धार!! मोक्ष! मोक्ष!!’ काय घेऊन बसला आहात? उद्धार काय फक्त घरदार सोडून, अंगाला राख फासून व कामंधदा सोडूनच होतो?
गोरा कुंभारासारखा बेधुंद भक्तीमध्ये रंगलेला पुरुष – ज्याच्या भक्तीच्या रंगात स्वत:चा मुलगा पायाखाली तुडविला गेला असताही ज्याला आपले देहभान नव्हते – अशा भक्तश्रेष्ठानेही आपला मडकी घडविण्याचा उद्योग सोडला नव्हता. भक्त जनाबाईसारख्या भक्तिमती बाईनेही आपले गोवऱ्या वेचणे बंद केले नव्हते. अशी कितीतरी प्रमाणे देता येतील की, महान तपस्वी लोकसुद्धा अरण्यात असताना आपल्याच बळावर व स्वावलंबी वृत्तीनेच राहात असत. मग आजच भक्तीला व बुवांना असे आळशीपणाचे स्वरूप का आले की, भक्तिवान म्हटला की त्याच्या पोटापाण्याचा प्रश्न कुणाकडे हात पसरल्याशिवाय सुटतच नाही! बरे चला, ज्याला आपल्या सत्कर्तव्यातून जराही फुरसत मिळत नाही, ज्याने आपली दिनचर्या चोवीस घंटेही परोपकारांतच गुंतविली आहे, ज्याचा क्षणही उगीच टवाळी करण्यात जात नाही, ज्यापासून लोक चालता -बोलताही तोच फायदा घेत आहेत, अशा महापुरुषाची व्यवस्था करणे समाजाला आवश्यकच असते की ज्याने समाजाची सेवा करण्याव्यतिरिक्त आपले जीवन जराही शिल्लक ठेवले नाही. परंतु असे तरी कसे म्हणावे की हे सर्व बुवा असाच धर्मोपदेश करतात म्हणून?
महाराज इथे काही वचनांचा दाखला देतात. गुरू गोविंदसिंह म्हणतात – ‘मी माझा एक एक शीख सव्वा लाख शत्रूशी लढवीन नि धर्माची स्थापना करीन!’ स्वामी विवेकानंद असे उद्गारतात की – ‘एका प्रांतात एक जरी महात्मा खरा त्यागाने व कळकळीने काम करीत असला तरी तो त्या विभागात आपल्या प्रिय धर्माबद्दलची शत्रुत्वबुद्धी वा अनास्था प्रामुख्याने कधीही वाढू देणार नाही.’ अशी अनेक संतांची वचने व त्यांचे त्या वेळचे कार्य पाहिले म्हणजे असे विरळ महात्मेही समाजात एक विशिष्ट प्रभावी कार्य घडवून आणतात असे अगदी स्पष्ट दिसून येते. पण आताच्या प्रसंगी ज्या हिंदूस्तानात सर्वच धर्मातील करोडोंनी बुवांची संख्या मोजली जाते त्यांची धर्मनीती, माणुसकी, त्यांचा उज्ज्वल बाणा, त्यांचे दैवी तेज, कलाकौशल्य, उद्योग वगैरे का नष्ट व्हावेत याचे आश्चर्यच नाही का विचारवंत माणसाला वाटणार?