प्रति,
मा. मुख्यमंत्री,
सविनय सेवेशी सादर की खाली सही करणारे आम्ही दोघेही सध्या सिंधुदुर्ग जिल्हा महसुली प्रशासनात पटवारी म्हणून कार्यरत आहोत. आपण छत्रपतींच्या पुतळा अनावरणासाठी आले असताना विमानतळावर आम्ही केलेले स्वागत येथील अधिकाऱ्यांना रुचले नाही व आम्हाला निलंबित करण्यात आले. हा आमच्यावर झालेला अन्याय आहे. तो कसा हे सविस्तर सांगण्यासाठी हा पत्रप्रपंच!
आम्ही दोघेही बीड जिल्ह्यातील आहोत. नोकरीच्या निमित्ताने कोकणात आलो असलो तरी आमच्यावर जे काही राजकीय व प्रशासकीय संस्कार झाले त्याला बीडची पार्श्वभूमी आहे. आमच्या जिल्ह्यात कोणताही मोठा नेता, मंत्री वा मुख्यमंत्री येवो, त्यांचे स्वागत सर्वप्रथम पटवाऱ्यांनी करण्याची प्रथा आहे. कारण हीच व्यक्ती महसुली प्रशासनाचा कणा असते. दौऱ्यावर आलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींची सर्व प्रकारची सरबराई करण्याची जबाबदारी त्याचीच असते. सरबराईच्या संदर्भात निर्देश जरी महसुली अधिकाऱ्यांना मिळत असले तरी प्रत्यक्ष काम व खर्च आम्हीच करत असतो. त्यामुळे स्वागताचा पहिला मान पटवाऱ्याचा अशीच प्रथा बीडमध्ये आहे. तेथील प्रशासकीय आचारसंहितेचे, राजशिष्टाचाराचे पालन आम्ही केले हा आमचा दोष कसा काय असू शकतो? काही महिन्यांपूर्वी वाळू उपशाच्या एका प्रकरणात लाच घेतल्याच्या आरोपावरून आम्हाला निलंबित करण्यात आले व मुख्यालयाशी संलग्न करण्यात आले. आम्ही बीडच्याच आमच्या ‘आका’च्या माध्यमातून ही कारवाई निरस्त करून घेतली, पण केवळ बीडचे असल्यामुळे आम्हाला नव्याने कार्यक्षेत्रात नेमणूक देण्यात आली नाही. आता तुम्हाला केवळ शाल पांघरली म्हणून पुन्हा आम्हाला निलंबित करण्यात आले. इतक्या कमी कालावधीत दोनदा निलंबन हा अन्याय असल्याची आमची भावना झालेली आहे.
लाचखोरीच्या प्रकरणात अटक झाल्यावर आम्ही जामिनावर असलो तरी आम्हीही राज्याचे नागरिक आहोत व आम्हाला मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्याचा अधिकार आहे. आमच्या बीडमध्ये असे अनेक नेते व कर्मचारी जामिनावर सुटलेले आहेत. त्यातले नेते तर मंत्र्यासोबत व्यासपीठावर असतात व कर्मचारी त्यांच्या सेवेत. बीडची हीच संस्कृती आम्ही इथे जोपासण्याचा प्रयत्न केला यात आमचा काय दोष? बीडसुद्धा आपल्याच राज्यातील जिल्हा आहे याची जाणीव तुम्हाला आहेच. आमच्या बीडमध्ये लाचखोरीकडे कुणीही गांभीर्याने बघत नाही. अपहरण, खून असे काही घडले तरच त्याकडे संशयाने बघितले जाते. त्यामुळे आम्ही फार मोठा गुन्हा केला असे आम्हाला वाटत नाही. नोकरीत अशा लहानसहान अडचणी येतच असतात. त्यावर मात करत शासकीय कर्तव्य बजावण्याचे काम आम्ही प्रामाणिकपणे करत आहोतच.
आम्ही विनापरवानगी मुख्यालय का सोडले असा प्रश्न आता वरिष्ठ विचारत आहेत. त्यातही फार तथ्य नाही. आम्हाला संलग्न केले असल्याने मुख्यालयात कोणतेही काम देण्यात आलेले नाही. दिवसभर नुसते बसून राहण्याचा कंटाळा येतो. तो दूर व्हावा यासाठीच आम्ही एक उच्च प्रतीची शाल घेऊन तुमच्या स्वागतासाठी आलो. त्याचे चित्रीकरण करून तक्रार करणारे माजी आमदारसुद्धा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत अडकले आहेत, हे आपण लक्षात घ्यावे. अलीकडे बीडला बदनाम करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. आम्ही त्याचेच बळी ठरलो अशी आमची भावना झाली आहे. त्यामुळे कारवाई मागे घेऊन आमची आंतरजिल्हा बदली करून बीडमध्ये नेमणूक देण्यात यावी ही विनंती!
आपले नम्र,
दोघेही निलंबित पटवारी