मुंबईजवळ ठाण्यात राहणाऱ्या एका पारशी न्यायाधीशाची मुलगी वयाच्या सातव्या वर्षी – १९४७ साली- नृत्यशिक्षण घेण्याचा आग्रह धरते, सुखवस्तू घरात तिचा हट्ट मान्यही होतो आणि कथ्थक, भरतनाट्यम आणि मणिपुरी या तीन शैलींचे रीतसर शिक्षण घेतल्यावर, वयाच्या १५ व्या वर्षी ती नवा हट्ट धरते- स्वत:चे नृत्यपथक चालवेन म्हणते! तो काळ उदयशंकर यांचे नृत्यपथक खरोखरच जागतिक कीर्तीचे झालेले असण्याचा. ‘मी एकटी माझ्या पथकासह नाचणार, सिनेमानट्या नटांशी करतात तसे प्रेमाचे चाळे नाही करणार’ अशी विनवणी वडील अनिच्छेनेच ऐकतात. पण हा प्रवास इथवरच थांबणारा ठरत नाही.

हिंदी चित्रपटसृष्टीतून १९५० च्या दशकाअखेर बोलावणे आले, तेव्हा मात्र वडिलांच्या इच्छेविरुद्ध त्या वागल्या आणि निर्माते चंदूलाल शहा यांच्या ‘जमीन के तारे’ या चित्रपटात त्या झळकल्या- याच चित्रपटाच्या श्रेयनामावलीत दिलेल्या ‘मधुमती’ या टोपणनावाने पुढेही वावरू लागल्या. ‘झनक झनक तोरी बाजे पायलिया’, ‘तेरे नैना तलाश करें जिसे’ किंवा ‘ओ मेरी प्राणसजनी चंपावती आ जा’ या (आज पन्नाशीपार असलेल्यांना सहज आठवू शकणाऱ्या) गाण्यांसह ६० हून अधिक चित्रपटांत त्यांनी नृत्ये केली. पुढे नर्तक पतीसह काढलेल्या नृत्यशिक्षण वर्गांचे काम सांभाळले आणि गोविंदा, चंकी पाण्डे, फराह, तब्बू, अक्षय कुमार या अभिनेत्यांच्या नृत्यगुणांना पैलू पाडले!

वयाच्या ८७ व्या वर्षी, १५ ऑक्टोबर रोजी मधुमती यांचे निधन झाले, त्याआधीच्या काही वर्षांत नव्यानेच बोकाळलेल्या यूट्यूब वाहिन्यांना त्यांनी दिलेल्या मुलाखतींतून विशेषत: त्यांच्या विवाहाचे आणि नंतरच्या आयुष्याचे तपशील उलगडले होते. त्यांचे पती दीपक मनोहर हे मूळचे हरियाणाचे भांगडा नर्तक. अभिनेते सुनील दत्त यांच्या सांगण्यावरून दीपक मुंबईत आले. ‘नया दौर’(१९५७) मधल्या भांगडा नृत्यात दीपक चमकले आणि साधारण त्याच सुमारास हुटोक्षी यांना भेटले. तेव्हा दीपक विवाहित होते, त्यांची पत्नी नर्तक होती आणि त्यांना चार मुलेही होती. या कुटुंबाशी हुटोक्षी यांचा स्नेह होता. सीमेवरल्या जवानांसाठी १९६२ च्या भारत-चीन युद्धावेळी सुनील दत्त व नर्गीस यांनी स्थापलेले ‘अजंठा कलापथक’ या साऱ्या नर्तकांसह दौऱ्यावर असतानाच दीपक यांच्या पत्नीचे निधन झाले. तेव्हा त्यांच्या मुलांचा सांभाळ करणाऱ्या हुटोक्षींना पाहून नर्गिस यांनी सुचवले- दीपकशी तू लग्न का नाही करत? हुटोक्षी तेव्हा २१ वर्षांच्या. त्यात दीपक यांनी अटच घातली- ‘माझ्या मुलांना सावत्र भावंडे नकोत!’ तीही त्यांनी पाळली. ‘चंपावती आ जा’सारख्या एखाद्या नृत्यात दोघेही आहेत, पण एरवी एकमेकांच्या व्यावसायिक प्रगतीआड न येता हे दाम्पत्य चित्रपट स्वीकारत राहिले. पुढे दीपक यांनी स्वत:ची नृत्यशाळा सुरू केली, तिथेही त्या वर्ग घेत. या दाम्पत्याने चाळिशी ओलांडली तोवर या वर्गांतली मुले मधुमती यांना ‘गुरुमाँ’ अशीच हाक मारत. अखेर १९७६ च्या ‘चरस’ या चित्रपटानंतर मधुमती यांनी चित्रपटसंन्यास जाहीर केला आणि ‘अमर अकबर अँथनी’तल्या पाहुण्या भूमिकेचा अपवाद वगळता तो पाळला. चित्रपटसृष्टीत १९५१ पासून प्रवेश केलेल्या हेलन यांचे नाव तोवर कमी कपड्यातली (बहुतेकदा ‘कॅबरे’) नृत्ये करण्यासाठी प्रसिद्ध असले तरी, कमी कपड्यांतल्या नृत्यांमध्येही भारतीय शास्त्रीय नृत्यपद्धतींचा बाज यशस्वीपणे आणण्याचे श्रेय मधुमती यांचेच!