scorecardresearch

देशकाल : प्रसारमाध्यमांना जात असते?

इंग्रजी माध्यमांना बाजूला सारत आपले स्थान निर्माण करणाऱ्या हिंदी माध्यमांची आपल्या व्यावसायिक गाभ्याबाबत इतकी घसरण कशी झाली?

media

योगेंद्र यादव

त्या दिवशी मी ‘आज तक’ या वृत्तवाहिनीवर होतो. सुरेंद्र प्रताप सिंग, ऊर्फ ‘एसपी’ या दिग्गज माणसाने सुरू केलेली ही पहिली स्वतंत्र हिंदी वृत्तवाहिनी. त्यांच्या इंग्रजी वाहिनीवर बोलण्यासाठी मला नियमित बोलावले जाते, पण त्यांच्या हिंदी वाहिनीला खरे तर मी नको आहे, असे अलीकडे माझ्या लक्षात आले आहे. माझ्यावर अनौपचारिक, अघोषित बंदी घालण्यात आली आहे, असे मला सांगण्यात आले. पण ही माहिती मी पडताळून पाहू शकलो नाही.

मी वर उल्लेख केला आहे तो कार्यक्रम कर्नाटक निवडणुकीसंदर्भात होता. काँग्रेसने फूट पाडणारे ओबीसी कार्ड खेळून विजय मिळवला आहे, हे राहुल गांधींनी जात जनगणनेला दिलेल्या अचानक समर्थनावरून स्पष्ट होते, असे वाहिनीचे म्हणणे होते. त्यांनी थेट म्हटले नसले तरी ते तसेच होते. त्यांना म्हणायचे होते की भाजपचा पराभव त्याच्या स्वत:च्या अक्षमतेने आणि भ्रष्टाचाराने नव्हे तर घाणेरडय़ा जातीय राजकारणामुळे झाला आहे, ज्याचा परिणाम जात जनगणनेच्या राष्ट्रव्यापी मागणीवर होईल. आणि मग, विरोधाभास पुरेसा अधोरेखित करण्यासाठी, अँकरने प्रेक्षकांना २० पैकी १३ मुख्यमंत्री ब्राह्मण होते आणि लोकसभेचा एकचतुर्थाश भाग ब्राह्मणांचा होता, ही आठवण करून दिली. आठवलेली एखादी जुनी गोष्ट सांगतो आहोत असे तिच्या चेहऱ्यावरचे भाव होते.

माझी बोलण्याची वेळ आली तेव्हा माझ्या डोक्यात एसपींची प्रतिमा होती. पूर्व उत्तर प्रदेशातील राजपूत कुटुंबात जन्मलेले परंतु कोलकाता येथे वाढलेले, एसपी जातीय अन्यायाच्या मुद्दय़ांवर अत्यंत तीक्ष्ण होते आणि सामाजिक न्यायाशी संबंधित बातम्यांवर असंवेदनशील किंवा उदासीन भाषा वापरल्याबद्दल पत्रकारांना ताकीद देत असत. ‘आज तक’च्या सुरुवातीच्या काळात त्यांनी सामाजिकदृष्टय़ा वैविध्यपूर्ण न्यूजरूम कशी निर्माण केली याचा मी साक्षीदार होतो.

त्यामुळे माझे म्हणणे मांडायची वेळ आली तेव्हा मी काहीसा नाराजच होतो. पण मी स्वत:ला सावरले आणि चार मुद्दे मांडले. एक, म्हणजे तीन टक्के लोकसंख्येचे राजकीय वर्चस्व ही कोणत्याही सुसंस्कृत समाजासाठी अभिमानाची नाही तर चिंतेची बाब असू शकते. दोन, ‘आज तक’च्या स्वत:च्या अत्यंत अचूक मतदानोत्तर पाहणीने काँग्रेसकडे ओबीसींचा असमान झुकाव असल्याच्या गृहीतकाचे खंडन केले होते. तीन, भाजप इतर सर्वाप्रमाणेच जातीचे राजकारण करते आणि सर्वात निष्ठावान परंतु अदृश्य जाती-आधारित व्होट बँक, म्हणजे द्विज असणाऱ्या हिंदूचा पाठिंबा मिळवते. चौथी, २०१० मध्ये संसदेत भाजपने पाठिंबा दिलेल्या आणि २०१८ मध्ये तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मान्य केलेल्या जात जनगणनेच्या मागणीमध्ये नवीन किंवा असामान्य असे काहीही नाही.

कार्यक्रमानंतर, मी ब्राह्मणी नॉस्टॅल्जियावरची ‘आज तक’ची क्लिप ट्वीट केली. पण मी मांडलेल्या युक्तिवादाला कोणताही प्रतिसाद न देता टीकास्त्र सुरू झाले. माझे वर्णन मानसिक पातळीवर निराश, राजकीयदृष्टय़ा अयशस्वी, संधिसाधू आणि देशविरोधी असे केले गेले. माझ्या बाजूनेही काही जण या वादात उतरले. वाहिनी आणि अँकर यांना ब्राह्मण वर्चस्ववादासाठी जाब विचारण्यात आला. मला ब्राह्मणविरोधी (लक्षात घ्या की मी ब्राह्मणांविरुद्ध एक शब्दही बोललो नव्हतो) आणि यादव असल्याबद्दल शिव्यांची लाखोली वाहण्यात आली. मी प्रतिसाद देण्याचा प्रयत्न केला, पण कचऱ्याच्या डब्यात डुबकी मारण्यातील व्यर्थता लवकरच लक्षात आली.

हिंदी पत्रकारितेवरील पुस्तक

तरीही एका प्रश्नाने माझी पाठ अजिबात सोडली नाही. हिंदी पत्रकारितेचे विशेषत: हिंदी टीव्ही बातम्यांचे जग, इतक्या खालच्या पातळीवर कसे गेले आहे? मला हा प्रश्न एसपीला विचारायला आवडेल, कारण त्याच्या टीममधील बहुतेक प्रशिक्षणार्थी पत्रकार चॅनल प्रमुख बनले आहेत. पण ‘आज तक’ ही पूर्णवेळ हिंदी वाहिनी बनण्याआधीच एसपी आम्हाला सोडून गेला.

म्हणून मी मृणाल पांडे यांच्या अलीकडच्या पुस्तकाकडे वळलो. ‘दैनिक हिंदूस्थान’ या प्रमुख हिंदी वृत्तपत्राच्या पहिल्या महिला संपादक आणि आदरणीय हिंदी संपादकांमधील शेवटच्या काही जणांपैकी एक असलेल्या मृणाल पांडे यांच्या ‘द जर्नी ऑफ हिंदी जर्नालिझम इन इंडिया: फ्रॉम राज टू स्वराज अ‍ॅण्ड बियॉण्ड’ या पुस्तकात छापील हिंदी माध्यमांच्या सुरुवातीच्या दिवसांपासून टीव्ही माध्यमाचा उदय, त्यांचे वर्चस्व आणि आताचा डिजिटल माध्यमांपर्यंतचा आढावा आहे. ही ऱ्हास आणि अधोगतीची नाही तर हिंदी माध्यमांच्या उत्कर्षांची कथा आहे. वसाहतवादी सत्तेविरोधात, आर्थिक अडचणींविरोधात आणि सांस्कृतिक दुय्यमपणाच्या वागणुकीविरोधात संघर्ष करत अत्यंत यशस्वी झालेल्या हिंदी भाषिक पत्रकारांची कहाणी मृणाल पांडे यांनी या पुस्तकात सांगितली आहे. जागतिक पातळीवर मुद्रित माध्यमांची घसरण सुरू असताना हिंदी प्रसारमाध्यमे कशी तरारून उभी राहिली, त्यांनी इंग्रजी माध्यमांना कसे मागे टाकले आणि आपले स्थान कसे हस्तगत केले याचे त्यांनी दस्तऐवजीकरण केले आहे.

ही सगळी कहाणी माझा प्रश्न आणखी टोकदार करते. एखादा उद्योग चांगला चालायला लागला, उदाहरणार्थ इथे हिंदी माध्यमे, की तुम्हाला आणखी वर जाण्यासाठी व्यावसायिक मानके निश्चित करावी लागतात. हे पुस्तक वृत्त उद्योगात डिझाइन आणि फॉन्टपासून छपाई आणि जाहिरातीपर्यंत तांत्रिक मानके कशी सुधारली आहेत हे सांगते. पण मग बातम्या आणि दृष्टिकोन हा या व्यवसायाचा गाभा आहे. तो इतका घसरला आहे त्याचे काय आणि तो इतका का घसरला आहे? इंग्रजी आणि इतर भारतीय भाषांमधील पत्रकारिता आणि पत्रकारांची कहाणी वेगळी नाही. भारताबाहेरील माध्यमांनाही गुणवत्तेचा फटका बसला आहे, कदाचित तिथे भारताइतकी घसरण झालेली नाही.

त्या पुस्तकात प्रसारमाध्यमांचे टॅब्लॉइडीकरण आणि सार्वजनिक क्षेत्राचे पुन्हा सरंजामीकरण होणे या जर्मन विचारवंत जर्गेन हॅबरमास यांनी मांडलेल्या संकल्पनांची चर्चा करण्यात आली आहे. मृणाल पांडे यांच्या पुस्तकाने मला हिंदी माध्यमांची, विशेषत: टेलिव्हिजनची सद्य:स्थिती समजून घेण्यासाठी तीन मु्द्दे लक्षात आणून दिले.

टीव्हीवरच्या बातम्या उच्चवर्णीयांसाठीच

पहिला आणि सर्वात उघड मुद्दा आहे राजकीय भूमिकेचा. राजकीय सत्तेच्या जवळ असणे या गोष्टीचा हिंदी माध्यमांना नेहमीच त्रास सहन करावा लागला आहे. परंतु २०१४ मध्ये ‘‘सेन्सॉरशिप आणि स्व-सेन्सॉरशिप’’ अशी नवीन पद्धत सुरू झाली. त्यात सरकार समर्थक माध्यमांना प्रोत्साहन मिळू लागले आणि अधिकृत रेष ओलांडून त्या पाऊल टाकणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला निर्दयीपणे चुकीचे ठरवले जाऊ लागले.

दुसरा मोठा घटक म्हणजे माध्यमांचे अर्थशास्त्र. मुळात, माध्यमांकडे योग्य पद्धतीने पैसे कमविण्याचा आणि स्वतंत्र राहण्याचा कोणताही मार्ग नाही. औपचारिक राजकीय अर्थव्यवस्थेच्या वादात न पडता, जुन्या मालकांची जागा त्यांच्या पुढच्या अमेरिकेतून शिकून आलेल्या पिढीने कशी घेतली, व्यवस्थापकांनी संपादकांना कसे बाजूला केले, विक्रीयोग्य बातम्या विश्वासार्ह बातम्या कशा होऊ लागल्या आणि पेड न्यूज ही गोष्ट कशी स्वीकारली गेली याबद्दल हे पुस्तक सांगते.

शेवटी, हे पुस्तक हिंदी न्यूजरूम्सच्या समाजशास्त्राचा मुद्दा मांडते. ‘‘महिला टीव्हीवर दिसण्याच्या तुलनेत टीव्ही बातम्यांनी किंचित चांगले काम केले असे वाटते. कारण प्रेक्षकांना तरुण आणि सुंदर चेहरे अँकर म्हणून पाहणे आवडते, असे मानले जाते’’ या मुद्दय़ाची नोंद घेत त्या महिलांना वगळण्याकडे लक्ष वेधून घेतात. आणि हिंदी न्यूजरूम्समधल्या जातिभेदाच्या मुद्दय़ाची त्यांनी दखल घेतली याचा मला आनंद आहे. हिंदी माध्यमे, विशेषत: टीव्ही हा ‘उच्चवर्णीय’ हिंदूचा, बहुतांशी ब्राह्मणांचा बालेकिल्ला आहे, हे गुपित राहिलेले नाही. या बाबतीत हिंदी वृत्तमाध्यमे इंग्रजी माध्यमांपेक्षा वाईट आहेत. यातून एक सोयीची सामाजिक परिस्थिती निर्माण होते. अशा ठिकाणी ब्राह्मणांना त्यांच्या राजकीय सत्तेच्या स्थानावरून काढून टाकले गेले तर त्यातून एक उत्स्फूर्त आणि अचिंतनशील व्याकूळता निर्माण होते.

माध्यम समीक्षक उर्मिलेश म्हणतात की ‘आज तक’वरील माझ्या टिप्पणीवरील प्रतिक्रियांनी त्यांना आश्चर्य वाटले नाही कारण टीव्ही बातम्यांचे जग हे ‘उच्च जातींचे जग’ आहे. माझे म्हणणे ज्यांना पटत नाही त्यांनी प्रसारमाध्यमांमधील आणि टीव्ही माध्यमातील प्रमुख निर्णयकर्ते कोणत्या जातीतून आलेले असतात याची माझ्याशी सार्वजनिक चर्चा करावी असे आमंत्रण ते देतात. मला हे ‘आज तक’ संदर्भात करायचे आहे. पण त्यांच्याकडून मला या चर्चेचे आमंत्रण येईल असे वाटत नाही. 

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-05-2023 at 00:03 IST

संबंधित बातम्या