Extreme obedience presupposes ignorance in the one who obeys; it even presupposes it in the one who commands : he has no need to deliberate, to doubt, or to reason; he has only to will.– Montesquieu
आज्ञाधारकाचं अज्ञानी असणं टोकाच्या आज्ञापालनात अनुस्यूत असतं. तसं पाहिलं तर टोकाच्या आज्ञापालनात आज्ञाधारकाप्रमाणेच, आज्ञा देणाऱ्याचं अज्ञानी असणंसुद्धा गृहीत धरलं जातं. त्याला विचारविनिमय करण्याची, शंका उपस्थित करण्याची आणि विचारशील असण्याची आवश्यकता नसल्यानं फक्त इच्छा व्यक्त करणं पुरेसं असतं. दैवी अवतारासारखा आज्ञा देणारा कुणालाही बांधील नसतो. पण सगळे त्याला बांधलेले असतात. अशा प्रकारचं टोकाचं आज्ञापालन निरंकुश हुकूमशाहीचं व्यवच्छेदक लक्षण असतं – जिथं लहरीपणा, अपारदर्शकता, अतार्किकता, गूढता यांसारख्या अज्ञानमूलक गोष्टींचा बोलबाला असतो.
निरंकुश हुकूमशाही राजवटीत विचारविनिमयाचा अभाव असल्याने त्या अनुरूप शिक्षणाचंही सुमारीकरण केलं जातं. सोप्या आणि मोजक्याच धार्मिक तत्त्वांचा सतत भडिमार करून प्रत्येकाच्या हृदयात खोलवर भीती निर्माण करणं निरंकुश हुकूमशाहीतील शिक्षणाचं मुख्य उद्दिष्ट असतं. कारण निरंतर भय हे अशा राजवटींचं आधारभूत तत्त्व असतं. भयग्रस्त वातावरणात इतरांशी येणारा संबंध मुक्त नसून मर्यादित असतो. त्यामुळे प्रत्येक कुटुंब एखाद्या पृथक आणि बंदिस्त राज्यासारखं आत्मकेंद्रित राहून जगत असतं. त्यात प्रत्येक व्यक्ती आपापल्या कोषातच राहते. थोडक्यात, निरंकुश हुकूमशाहीत ज्ञानाची भीती आणि वावडं असल्यानं चिकित्सक शिक्षणाची आवश्यकता नसते.
निरंकुश हुकूमशाहीतल्या शिक्षणाबद्दलचं उपरोक्त वर्णन १७४८ मध्ये प्रकाशित झालेल्या The Spirit of Law या मोन्तेस्किअच्या बृहद् ग्रंथातलं आहे. या वैचारिक ग्रंथात मोन्तेस्किअनं जगभरच्या आणि इतिहासातल्या विविध शासनपद्धतींचं तपशीलवार वर्णन आणि सूक्ष्म विश्लेषण करून त्यांचं तीन प्रकारांमध्ये वर्गीकरण केलं आहे : रिपब्लिकन, मोनॅर्किक आणि डेस्पॉटिक (लोकशाही, राजेशाही, हुकूमशाही). अर्थात यात लोकसत्ताक पद्धतीची निरनिराळी रूपं, राजेशाहीचे विविध प्रकार आणि निरंकुश हुकूमशाहीची स्वरूपं असे अनेक प्रकार विशद केले आहेत. मूलभूत मानवीय भावना राजकीय (शासक आणि शासित यांच्यादरम्यानच्या) संबंधांच्या मुळाशी काम करत असल्यानं या तीन प्रमुख शासन पद्धतींच्या आधारभूत भावनांची चर्चा करताना मोन्तेस्किअ स्पष्ट करतो की, लोकसत्ताक राजवटींमध्ये माणूस प्रेमापोटी ( Love), राजेशाहीत प्रतिष्ठेसाठी (Honour) आणि निरंकुश हुकूमशाहीत भीतीपोटी इतरांशी व्यवहार करत असतो. शिक्षण हे प्राप्त मानवी अवस्थेच्या पुनर्निर्मितीचं, तसंच वांछित अवस्थेच्या निर्मितीचंही साधन असल्यानं प्रस्थापित राजवटीचं चरित्र शिक्षण व्यवस्थेतूनही प्रतिबिंबित होत असतं.
मोन्तेस्किअच्या समग्र लिखाणात वैज्ञानिक, राजकीय आणि तत्त्वज्ञानात्मक पैलूंचा अंतर्भाव असल्यानं तो प्रबोधनपर्वाचा प्रातिनिधिक तत्त्वज्ञ म्हणून ओळखला जातो. प्राप्त मानवी वास्तवाचं तपशीलवार वर्णन, विविध अंगांनी विश्लेषण आणि वर्गीकरण ही त्याच्या पद्धतीशास्त्राची वैज्ञानिक बाजू आहे. पण तटस्थपणे केलेल्या आकलनापुरता स्वत:ला मर्यादित न करता जे अनिष्ट वाटतं त्याच्या विरोधात मोन्तेस्किअ राजकीय भूमिका घेतो. उदाहरणार्थ, विविध शासन पद्धतींचं विश्लेषण करून तो साधार परखड टीका करतो की, कशा प्रकारे निरंकुश हुकूमशाही प्रबोधनपर्वाच्या मूल्यांसाठीच नव्हे तर एकूण समाज आणि राज्यसंस्थेसाठीसुद्धा घातक आहे. थोडक्यात- वर्णनात्मक, विश्लेषणात्मक आणि टीकात्मक पैलूंच्या पुढे जाऊन मोन्तेस्किअ प्रबोधनपर्वाचा तत्त्वज्ञ म्हणून वांछित शासन पद्धतीविषयी ळीँ रस्र्र्र१३ ऋ छं६ या त्याच्या परिपक्व विचारकृतीत ‘सत्ताविभाजनाचा आणि संतुलनाचा’ रचनात्मक प्रस्ताव मांडतो. त्याविषयी प्रस्तुत लेखाकांत चर्चा करू.
प्रबोधनपर्वातला मैलाचा दगड ठरलेला The Spirit of Law हा वैचारिक ग्रंथ राजकीय तत्त्वज्ञानातल्या ‘सत्ताविभाजन’ या सिद्धांतासाठी जगप्रसिद्ध आहे. मोन्तेस्किअ नमूद करतो की लोकसत्ताक शासन पद्धती आणि राजेशाहीत न्यायाविषयी आस्था असली तरी या दोन्ही शासन पद्धती कधीही कोसळून निरंकुश हुकूमशाही जन्माला येऊ शकते. निरंकुश हुकूमशाहीला स्वत:चं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी अज्ञान, विषमता, गरिबी, गुलामगिरीची वाढ करणं अपरिहार्य असतं. त्यामुळे निरंकुश हुकूमशाही फक्त व्यक्तीचाच नाश घडवून आणत नाही तर समाज आणि अंतत: राज्यसंस्थेचा नाश घडवून आणते. त्यामुळे सत्तेचं विकेंद्रीकरण हितावह असतं जेणेकरून सत्ता एका व्यक्तीच्या हातात एकवटून तो निरंकुश होणार नाही. मोन्तेस्किअ लिहितो : That anyone who possesses power has a tendency to abuse it is an eternal truth. They tend to go as far as the barriers will allow.
खरं तर, सत्ताविभाजनाच्या सिद्धांताचं महत्त्व अधोरेखित करणारा मोन्तेस्किअ हा पहिला तत्त्वज्ञ नसून जॉन लॉकसारखे अनेक पूर्वसुरी होऊन गेले आहेत. पण मोन्तेस्किअच्या विस्तृत आणि सुसंघटित मांडणीमुळे सत्ताविभाजनाच्या सिद्धांताचं मुख्य श्रेय त्याला दिलं जातं. तो सत्तेचं विभाजन दोन पातळींवर सुचवतो. सर्वप्रथम राज्यसंस्था आणि नागरी समाज यांमध्ये स्पष्ट भेद करतो. तो नमूद करतो की शासक आणि शासित यांच्यात मध्यस्थी करणाऱ्या स्वतंत्र नागरी संस्था लोकशाही मूल्यांना टिकवून ठेवण्यात निर्णायक भूमिका पार पाडतात. मोन्तेस्किअ नागरी समाजाला राज्यसंस्थेचा आधार बनवून राजकीय सत्तेचं अतीतवादी धार्मिक अधिष्ठान नाकारतो. दुसऱ्या पातळीवर, राज्यसत्तेचं ‘विधि मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ’ असं विभाजन करून कार्यकारी मंडळ विधिमंडळाला जबाबदार असलं पाहिजे आणि त्यांच्यातील न्याय्य समतोल राखण्यासाठी स्वतंत्र न्यायमंडळ हवं, हेही सुचवतो. थोडक्यात, मोन्तेस्किअच्या मांडणीत सत्तेच्या विभाजनाशी समतोल राखल्यानं व्यक्तीचा उत्कर्ष, समाजाची प्रगती आणि राज्याची भरभराटही होते; कारण अशा उदारमतवादी व्यवस्थेत माणसांमध्ये एकमेकांविषयी, समाजाविषयी प्रेम, आत्मीयता, आपलेपणा वाढतो. थोडक्यात, राजकारणाचं ईश्वरी अधिष्ठान नाकारून मोन्तेस्किअनं राजकारणाला मानवी इच्छा, स्वातंत्र्य आणि विवेकाचा प्रांत केल्यामुळे कॅथोलिक चर्चनं या ग्रंथाचा समावेश निषिद्ध पुस्तकांच्या यादीत करून त्याच्या प्रकाशनावर आणि विक्रीवर बंदी आणली.
याआधी मोन्तेस्किअच्या ‘पर्शियन लेटर्स’ (१७२१) या तत्त्वज्ञानात्मक साहित्यकृतीतून मोन्तेस्किअनं तत्कालीन फ्रान्समधल्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनाच्या मूळाशी असलेल्या धारणांविषयी मूलभूत प्रश्न उपस्थित केले होतेच. मग १७३४ मध्ये प्रकाशित केलेल्या Considerations on the Causes of the Greatness of the Romans and their Decline या पुस्तकात रोमन रिपब्लिकचा उदय, रोमन साम्राज्याचा विस्तार, निरंकुश रोमन सम्राटांच्या राजवटी आणि अंतत: रोमनांचा शेवट का आणि कसा झाला याची कारणमीमांसा त्यानं केली. खरं तर, ही दोन्ही पुस्तकं मोन्तेस्किअनं उतरत्या वयात प्रकाशित केलेल्या The Spirit of Law (१७४८) या दीर्घ ग्रंथाची पूर्वतयारी म्हणून ओळखली जातात. फरक इतकाच की पहिल्या पुस्तकात तत्कालीन वास्तवाविषयी परखडपणे मूलभूत प्रश्न उपस्थित केले जातात. दुसऱ्या पुस्तकात त्यांना ऐतिहासिक प्रकाशात पाहिलं जातं. तर तिसऱ्या पुस्तकात मोन्तेस्किअ रचनात्मक प्रस्ताव मांडतो. लुई अल्तुसरच्या दृष्टीनं पाहायचं झालं तर ‘पर्शियन लेटर्स’मध्ये प्रश्न मूलभूत उपस्थित करून तत्कालीन वास्तवावर परखड टीका करणारा मोन्तेस्किअ ‘क्रांतिकारक’ वाटतो; तर The Spirit of Law मध्ये सत्ताविभाजनाचा सिद्धांत मांडून इंग्लंडमधील संवैधानिक राजेशाही आदर्श शासनपद्धती म्हणून अधोरेखित करणारा मोन्तेस्किअ ‘परंपरावादी’ वाटतो.
खरं तर, ३१ खंड आणि सातशेहून अधिक प्रकरणांची व्याप्ती असलेला The Spirit of Law हा ग्रंथ म्हणजे मोन्तेस्किअच्या तब्बल ३० वर्षं चाललेल्या बौद्धिक श्रमाचं फलित आहे. त्यात सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक, भौगोलिक, ऐतिहासिकसंदर्भांत आकार घेणाऱ्या मानवी वास्तवाला तत्त्वज्ञानात्मक पातळीवर भिडण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयत्न आहे. पुस्तकाचं शीर्षक सूचित करतं त्याप्रमाणे शासन आणि शासित यांच्या संबंधांच्या मुळाशी असणाऱ्या ‘लॉ’ या संकल्पनेच्या अनुषंगानं उपस्थित होणारा ‘सत्तेचा प्रश्न’ या पुस्तकाचा मध्यवर्ती विषय आहे. त्यामुळे, The Spirit of Law या पुस्तकाचा तात्त्विक गाभा समजण्यासाठी या शीर्षकातल्या ‘लॉ’ या शब्दाची प्राथमिक चर्चा आवश्यक आहे.
पारंपरिक दृष्टीनं, ‘लॉ’ या शब्दाचा अर्थ आज्ञा, आदेश ( commandments) असा होतो. त्यामुळे, ‘लॉ’ शब्दाच्या पारंपरिक अर्थात अज्ञानमूलक असं टोकाचं आज्ञापालनसुद्धा अनुस्यूत आहे. मात्र, मोन्तेस्किअला ‘लॉ’चा पारंपरिक अर्थ अभिप्रेत नसून वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या धर्तीवरचा ‘नियम’ हा आधुनिक अर्थ अभिप्रेत आहे. ज्याप्रमाणे, वरवर पाहता अनियमित वाटणाऱ्या बहुविध आणि गतिशील गोष्टींच्या मुळाशी काहीतरी नियमित घडताना दिसतं त्याला नियम म्हटलं जातं त्याप्रमाणे प्रत्येकानं डोळसपणे निरीक्षण, विश्लेषण आणि विचार करून शोध घेतला तर कळेल की ‘लॉ’ ही फक्त निराधार ‘आज्ञा’ आहे की साधार ‘नियम’ आहे. थोडक्यात, नियमाला तथ्यात्मक तार्किक किंवा नैतिक आधार असतो. मोन्तेस्किअला अपेक्षित मानवी स्वातंत्र्य म्हणजे नियमबाह्य व्यवहार नसून ‘साधार नियमांतर्गत’ मिळालेल्या मुक्त अवकाशातली अभिव्यक्ती असते. मानवी व्यवहाराच्या मुळाशी असलेल्या नियमांचं जाळं जोपर्यंत वैश्विक विवेकाचं ( universal reason) स्थलकाल सापेक्ष प्रतिबिंब असेल, तोपर्यंत मानवी स्वातंत्र्याचा अवकाश अबाधित राहील.
