मंचरमध्ये नुकत्याच झालेल्या ‘आधी करार, मग विवाह’ सोहळय़ाची चर्चा वाऱ्यासारखी राज्यभर पसरल्यावर अनेक विवाहेच्छुक तरुण-तरुणींनी त्याचे अनुकरण सुरू केले. त्यातला एक मसुदा आमच्या हाती लागला. तो जसाच्या तसा..
तो – लग्नानंतर आईची आठवण आल्यावर रडून दर आठवडय़ाला शहरात असलेल्या माहेरी जाता येणार नाही. याच मुद्दय़ावरून आईला आपल्याकडे वारंवार बोलावता येणार नाही. ‘तुला काही कळत नाही, तू बावळट आहेस’ असले शेरे अपवादात्मक स्थितीतच ऐकले जातील. सुटीच्या दिवशी शॉपिंग केलीच पाहिजे असा आग्रह सोडून द्यावा लागेल. कार्यालयातून येताना झालेल्या प्रत्येक ‘उशिरा’कडे संशयाने बघता येणार नाही. घरी मित्र वा माझे पाहुणे जेवायला आले, तर त्यांच्यासमोर चेहरा हसरा ठेवावा लागेल. एखाद्या वस्तूसाठी तीनदा हट्ट धरूनही मी त्याला प्रतिसाद दिला नाही, तर तो विसरावा लागेल. लग्नानंतर माझे वर्तन मैत्रीपूर्णच असेल, पण कधी कधी माझा पुरुषी अहंकार डोकावलाच, तर त्याचा त्रास करून घ्यायचा नाही. मला झोपेत घोरण्याची सवय आहे. त्या आवाजात शांतचित्ताने झोपी कसे जायचे, हे तुला शिकून घ्यावे लागेल. आजकाल घराघरांत राजकीय मतभेदाचे पेव फुटले आहे. माझा स्वभावच सरकारविरोधी. त्यामुळे माझी मते तुला हसतखेळत ऐकून घ्यावी लागतील. आपण दोघेही नोकरीत आहोत. कार्यालयीन वेळा सारख्या असल्या तरी, कार्यालये वेगळी असल्याने सोडायला आणि घ्यायला या अशी अपेक्षा तुला बाळगता येणार नाही. वादाचे प्रसंग उद्भवलेच, तर ते फक्त सुटीच्या दिवशीच सोडवले जातील. तोवर दोघांनाही कळ सोसावी लागेल.
ती – लग्नानंतर माझ्या आईबाबांचे नाव घेऊन मला हिणवता येणार नाही. ‘तुझी आई अशी.. तुझी आई तशी’ हे शब्द तोंडातून बाहेर पडले तर मी लगेच तुझ्या आईवडिलांचे अवगुण गायला सुरुवात करेन. ‘तुम्हा बायकांना काही कळत नाही’ असली लिंगभेदी वाक्ये मला सहन होणार नाहीत. माझे मित्र-मैत्रिणी वा माहेरचे लोक घरी जेवायला आले, तर लगेच कपडे घालून बाहेर पडायचे नाही. त्यांच्या स्वागतात तुझाही सहभाग विनातक्रार दिसायला हवा. मला बागकामाची आवड आहे. मी लावलेल्या झाडांना महिन्यातून किमान १५ दिवस पाणी देण्याची सवय लावून घ्यावी लागेल. एखाद्या मुद्दय़ावरून तू तुझ्या आईची तारीफ केली, तर मला वाईट वाटणार नाही, पण लगेच माझीही तारीफ करावी अशी माझी अपेक्षा असेल. ‘तू सुंदर दिसतेस’ असे अधूनमधून मला उद्देशून म्हणत राहावे लागेल. मी घरखर्चात तुझ्या बरोबरीने मदत करेन, पण माझा पगार किती, बँकेत साठवणूक किती असले प्रश्न मी अजिबात ऐकून घेणार नाही. घोरण्याच्या आवाजात शांतचित्ताने झोप शक्य नसल्याने कृपया तू उपचार घेणेच उत्तम. मी सरकार समर्थक असल्याने माझेही मुद्दे तुला ऐकून घ्यावे लागतील. समर्थक असल्याने वाद घालण्याची सवय आहेच मला. त्यावर कोणत्याही दिवशी तोडगा काढायला मी तयार असेन.
..हा मसुदा या दोघांमध्ये बरेच दिवस फिरत राहून, त्यात फेरफार होत फिरत राहिला. त्यात असहमतीचेच मुद्दे अधिक असल्याने दोघेही लग्नाची तारीख वारंवार पुढे ढकलत राहिले.