पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाची प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक अशी विभागणी केली जाते. ‘प्राचीन काळी पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा जन्म, मध्ययुगीन काळात मृत्यू आणि रेनेसाँच्या उत्खननात पुनर्जन्म होऊन आधुनिकतेची पहाट झाली,’ असं मानलं जातं. पंधराव्या शतकात सुरू झालेल्या वैचारिक आणि सांस्कृतिक पुनरुत्थानासाठी जो ‘रेनेसाँ’ (Renaissance) हा फ्रेंच शब्द वापरला जातो, त्याचा मूळार्थ पुनर्जन्म असा होतो. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानासंदर्भात ‘जन्म’, ‘मृत्यू’ आणि ‘पुनर्जन्म’ या शब्दांचा उलगडा करणं आवश्यक आहे. याआधी आपण पाहिलं की सॉक्रेटिसपूर्व काळातही तत्त्ववेत्ते होऊन गेले. त्यामुळे इसवीसनपूर्व पाचव्या शतकात पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा जन्म झाला नसून मानवी बुद्धीला मध्यवर्ती स्थान देणाऱ्या विशिष्ट मानवतावादी तत्त्वज्ञानाचा उदय झाला. मध्ययुगातील कॅथोलिक वळणात या सॉक्रेटिक वारशाचा शेवट होऊन पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाला धर्मसत्तेच्या पोलादी चौकटीत वावरावं लागल्यामुळे मध्ययुगाचा उल्लेख ‘अंधारयुग’ (डार्क एजेस) असा केला जातो.
प्रस्तुत लेखांकात सॉक्रटिक वळण आणि कॅथोलिक वळण यातील संक्रमण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. त्यासाठी आधी, तत्कालीन राजकीय संदर्भाची आणि विशेषत: रोमन साम्राज्याच्या पतनाची चर्चा करणं आवश्यक आहे. कारण रोमन साम्राज्याच्या पतनासह प्राचीन जगाचा शेवट होतो आणि मध्ययुगाची सुरवात होते.
लौकिक साम्राज्याचा शेवट
इ.स. ४१० मध्ये व्हिजिगोथ नावाची ‘रानटी’ जमात प्रगतीचा आणि ‘सभ्यतेचा’ उच्चांक गाठलेल्या रोमचा ताबा घेते. त्यांचा धाडसी नेता अॅलेरिक रोमचा मालक बनतो. ही घटना तत्कालीन रोमन समाजाला जबरदस्त मानसिक धक्का देणारी ठरते. अनेक शतकं रोम एका बलाढ्य, ईश्वरसदृश साम्राज्याचा केंद्रबिंदू होतं. या राजकीय महाशक्तीला शाश्वत समजलं जाई. पण अॅलेरिक वाटेवरच्या एखाद्या क्षुल्लक गावाप्रमाणे रोमवर चालून गेला. अॅलेरिकच्या संदर्भात वापरलेला ‘रानटी’हा शब्द ‘इतरत्वाचं’ द्याोतक आहे. प्राचीन काळी ग्रीकांच्या नजरेत ग्रीक सोडून इतर सगळे रानटी होते. नंतर रोमनांच्या नजरेत रोमन सोडून इतर सेल्टिक, फ्रॅन्क, व्हिजिगोथ, ऑस्ट्रोगोथ आणि तत्सम जमाती रानटी समजल्या जात होत्या. आजचे फ्रेंच, जर्मन, इंग्लिश, स्पॅनिश इत्यादी लोक म्हणजे रोमन वसाहतींमधील पूर्वाश्रमीच्या रानटी जमातींचे वंशज. खरंतर या रानटी समजल्या जाणाऱ्या जमाती भाडोत्री सैनिक म्हणून अनेक शतकं रोमन साम्राज्याच्या विशाल सीमा सांभाळण्याचं काम करायच्या. मात्र पाचव्या शतकात रोमन साम्राज्याला उतरती कळा लागल्यावर या जमातींनी उचल खाल्ली आणि रोमन साम्राज्याचा शेवट घडवून स्वतंत्र राज्यांची स्थापना केली. आजच्या फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड, स्पेन सारख्या पूर्वाश्रमीच्या रोमन वसाहतींची स्वतंत्र राज्य म्हणून सुरुवात याच कालखंडात झाली. इ. स. ४१० मधल्या रोमच्या शर्मनाक पतनानंतर एका बाजूला रोमन साम्राज्याच्या पोटातून हळूहळू युरोपीय मध्ययुगीन राज्यं उदयाला आली. दुसऱ्या बाजूला या लौकिक राज्यांना धार्मिकदृष्ट्या बांधून ठेवण्यासाठी कॅथोलिक चर्च या धर्मसत्तेचा उदय झाला.
पारलौकिक साम्राज्याची सुरुवात
कॅथोलिक चर्चच्या इतिहासावर एक दृष्टिक्षेप टाकल्यास लक्षात येईल की १५व्या शतकात पाश्चात्त्य राजेशाहींना प्याद्यांप्रमाणे नियंत्रित करणाऱ्या या धर्मसत्तेची सुरुवात साधीच होती. सुरुवातीची तीनेक शतकं तर ख्रिास्ती धर्माच्या अनुयायांनी रोमन साम्राज्यात भूमिगत राहून धार्मिक चळवळ चालवली. त्याकाळी रोमन वसाहतींमध्ये रोमन धर्मश्रद्धांसह स्थानिक धर्मश्रद्धा अस्तित्वात होत्या. ख्रिास्ती धर्माच्या प्रचारकांनी अशा प्रतिकूल वातावरणात अतिशय चिवटपणे एकेश्वरवादी धर्माचा प्रचार-प्रसार केला. पहिल्या टप्प्यात त्यांचा वावर एखाद्या गुप्त पंथाप्रमाणे होता. त्यांच्याकडे संशयाने पाहिलं जायचं. तिसऱ्या शतकापर्यंत त्यांच्या सदस्यांनी हळूहळू रोमन प्रशासनात आणि सैन्यात प्रवेश केला. या मिशनरी कार्यात अनेकदा त्यांना ‘हौतात्म्य’ही पत्करावं लागलं.
मात्र चौथ्या शतकाच्या सुरुवातीला अशी निर्णायक घटना घडते की हा भूमिगत पंथ अचानक रोमन सम्राटाचा अधिकृत धर्म बनून सम्राटमान्यता पावतो. इ. स. ३१२ मध्ये मेलव्हियन ब्रिजच्या ऐतिहासिक लढाईच्या पूर्वसंध्येला रोमन सम्राट कॉन्स्टन्टाइनला आकाशात क्रॉसचं चिन्ह दिसतं. दुसऱ्या दिवशी लढाईत त्याचा निर्णायक विजय होतो. त्यामुळे कॉन्स्टन्टाइननं रोमन देवतांचा त्याग करून ख्रिास्ती धर्म स्वीकारला, असा वृतान्त ख्रिास्ती इतिहासकारांच्या लिखाणात आढळतो.
कॉन्स्टन्टाइननं ख्रिास्तधर्माला सम्राटाश्रय दिल्यानं पाश्चात्त्य इतिहासालाही निर्णायक वळण मिळालं. या वळणानंतर ख्रिास्ती धर्म एक प्रभावशाली धर्मसत्ता म्हणून उदयास आली. कॉन्स्टन्टाइनच्या नंतर काही प्रमाणात रोमन उच्चभ्रू वर्गानंही पारंपरिक रोमन देवतांऐवजी ख्रिास्ती धर्माचा स्वीकार केला. सर्वसामान्य रोमनांनी मात्र ख्रिास्ती धर्म स्वीकारला नव्हता. रोमबाहेरच्या रोमन वसाहतींमधल्या रानटी आणि निम-रानटी मानल्या जाणाऱ्या बहुतेक जमातींसाठी ख्रिास्ती धर्मश्रद्धाच काय रोमनांच्या धर्मश्रद्धाही त्याज्य होत्या.
कॉन्स्टन्टाइनच्या धर्मांतरानंतर जवळपास शंभर वर्षांनी म्हणजे ४१० मध्ये रोमच्या पतनाची सुरुवात होऊन ४७६ मध्ये शेवट झाला. रोमच्या पतनाकडे विविध दृष्टिकोनांतून पाहिलं जातं. तेव्हाच्या सर्वसामान्य रोमनांची भावना होती की पारंपरिक रोमन देवतांच्या कोपामुळेच रोमन साम्राज्याचा नाश झाला! ज्युपिटरचा त्याग केला म्हणून संकटसमयी ज्युपिटर मदतीला आला नाही!
या युक्तिवादाला कॅथोलिक धर्माचे दोन दिग्गज सेंट ऑगस्टीन आणि सेंट जिरोम यांनी सविस्तर उत्तर दिलं . या दोन्ही कॅथोलिक तत्त्ववेत्त्यांनी रोमची लूट, जाळपोळ अनुभवली होती. रोम पुरेसं ख्रिास्ती नसल्यानंच ईश्वराची अवकृपा होऊन रोमचं पतन झालं, अशी हळहळ तत्कालीन सेंट जिरोमनं व्यक्त केली. सेंट ऑगस्टीनच्या पांडित्यपूर्ण युक्तिवादाकडे वळण्याआधी कॅथोलिक वळणाच्या या प्रमुख शिल्पकाराचा संक्षिप्त परिचय गरजेचा आहे.
‘डॉक्टर’ ऑगस्टीन (इ. स.३५४- ४३०)
‘डॉक्टर’ हा शब्द docere (शिकवणं) या लॅटिन क्रियापदापासून बनला आहे. मध्ययुगीन काळात डॉक्टर म्हणजे असा शिक्षक ज्याला धर्मशास्त्राचं सखोल, मूलभूत आकलन असे. त्याअर्थी ऑगस्टीन ख्रिास्ती धर्मशास्त्राचा अतिशय प्रभावशाली डॉक्टर समजला जातो. त्याची शिकवण अनेक शतकं पॅट्रॉलॉजीसाठी अर्थात धर्मसंस्थेच्या कारभारासाठी मार्गदर्शक ठरली आहे. ऑगस्टीनचा जन्म उत्तर आफ्रिकेतल्या Berber जमातीत झाला. कमालीची प्रतिभा आणि ज्ञानलालसा असलेल्या या महत्त्वाकांक्षी तरुणानं विविध तत्त्वज्ञानं आत्मसात केली. काही काळ तो स्वैराचारी जीवन जगला. पुढं स्टोइक तत्त्वज्ञानाच्या मदतीनं ज्ञानमार्गी झाला. लौकिकदृष्ट्या पाहता, त्याच्या विलक्षण विद्वत्तेमुळे अवघ्या तिशीत तो साक्षात रोमन सम्राटाची ‘लेखणी’ बनला. एका रोमन वसाहतीचा गव्हर्नरही होणार होता. मात्र वयाच्या ३३व्या वर्षी मिलान इथं त्याची ऐतिहासिक भेट बिशप अॅम्ब्रोज या प्रभावी व्यक्तिमत्त्वाशी होते. या निर्णायक भेटीमुळे ऑगस्टीन कॅथोलिक धर्माचा स्वीकार करून त्याची विद्वत्ता आणि वाक्पटुता कॅथोलिक चर्चच्या प्रचारप्रसारासाठी वापरतो. तो मंत्रमुग्ध करणारा उपदेशक होता. त्यानं विपुल लिखाणही केलं. ‘कन्फेशन’ आणि ‘सिटी ऑफ गॉड’ ही त्याची महत्त्वाची पुस्तकं. ‘कन्फेशन’ तर पाश्चात्त्य परंपरेतलं पहिलं आत्मचरित्र समजलं जातं आजही स्वकथनाचा वस्तुपाठ मानलं जातं.
एक महत्त्वाचा तत्त्वज्ञ म्हणून ऑगस्टीननं आपलं स्थान कायम केलं आहे. काळाच्या संकल्पनेविषयी तो इमॅन्युएल कांटचा आणि मानवी बुद्धीच्या मर्यादा निदर्शनास आणून दिल्यामुळे तो १७व्या शतकातल्या ब्लेज पास्कालचा पूर्वसुरी ठरतो. मानवी बुद्धीला केंद्रस्थानी ठेवून सॉक्रटिक वारसा चालवणारे तत्त्ववेत्ते त्याला अहंकारी आणि भरकटलेली मेंढरं वाटतात. त्याच्या दृष्टीनं धर्मशास्त्रातला ईश्वरी प्रकाशच मनुष्याला या नश्वर, पापी नगरीतून बाहेर काढू शकतो. येशूच्या शिकवणीबाहेर मोक्ष नाही, हा त्याच्या पोलादी चौकटीचा गाभा. ओघानंच मानवी बुद्धीला, स्वातंत्र्याला आणि ऐहिक जीवनाला महत्त्व देणारी ग्रीक आणि रोमन जीवनदृष्टी या पोलादी चौकटीत तग धरू शकली नाही.
रोमच्या पतनासंदर्भात ऑगस्टीन लिहतो की रोम लौकिकतेचं, पापाचं प्रतीक असल्याने रोमचा नाश झाला. रोम हे मनुष्याच्या स्वप्रेमाचं प्रतीक आहे. मनुष्य जितका स्वत:च्या आणि ऐहिक जीवनाच्या प्रेमात असतो तितका तो ईश्वरापासून दुरावतो. ईश्वरकृपा अवगत करण्यासाठी माणसाने अनिवार्यपणे आत्मपीडा आणि आत्मग्लानीचा मार्ग स्वीकारला पाहिजे. ऑगस्टीन त्याच्या ‘सिटी ऑफ गॉड’ मध्ये दोन प्रकारच्या प्रेमांची चर्चा करतो- ‘‘दोन प्रकारच्या प्रेमातून दोन प्रकारच्या नगरी निर्माण झाल्या आहेत. ईश्वराप्रत तिरस्कार करून स्वप्रेमापोटी लौकिक नगरी आणि स्वत:प्रत तिरस्कार बाळगून ईश्वरप्रेमापोटी ईश्वरीय नगरी.’’
ऑगस्टीननच्या तत्त्वज्ञानात ‘स्व’ या मूलभूत संकल्पनेचं पूर्णपणे अवमूल्यन झालेलं आहे. सॉक्रटिक वळणादरम्यान बौद्धिक स्वातंत्र्य ‘स्व’चं सारतत्त्व समजलं गेलं होतं. खरंतर, ‘स्व’ च्या अवमूल्यनाची प्रक्रिया ग्रीक सिटी-स्टेटसच्या विघटनाबरोबरच सुरू झाली होती. ग्रीक शहरराज्यांच्या पोषक वातावरणात ‘स्व’चे नैतिक, ज्ञानात्मक, सौंदर्यात्मक, सामाजिक, राजकीय पैलू आविष्कृत झाले होते. मात्र शहरराज्यं जाऊन रोमन साम्राज्यकाळ सुरू झाल्यावर सार्वजनिक अवकाश संपुष्टात आल्यानं ‘स्व’च्या ज्ञानात्मक, सामाजिक, राजकीय शक्यताही नष्ट झाल्या. साम्राज्यवादी वातावरणात मनुष्य राजकीयदृष्टया पराधीन, दैववादी बनला. स्टोइकांनी नमूद केल्याप्रमाणे तो फक्त स्वत:च्या अंतरंगात स्वातंत्र्याचा अनुभव घेऊ शकत होता. कॅथोलिक वळणाच्या परलोकवादी साम्राज्यात तर मनुष्याच्या अंतरंगाचाही ताबा घेतला गेला.
थोडक्यात, सॉक्रेटिक वळणात सुरू झालेला ‘स्वत:ला जाणून घे’ पासूनचा प्रवास ग्रीक शहरराज्यांच्या विघटनानंतरच्या साम्राज्यात ‘स्वत:ची काळजी घे’ पर्यंत येतो आणि परलोकवादी साम्राज्यात ‘स्वत:ला चर्चच्या ताब्यात दे’ इथपर्यंत येऊन पोहोचतो. त्यामुळे, तत्त्वज्ञानाचा अर्थ लावताना सभोवतालच्या राजकीय, सामाजिक आणि भौतिक परिस्थितीचा परामर्श घेणं गरजेचं आहे. कारण रोमन साम्राज्याच्या वाताहतीनंतर निर्माण झालेल्या अराजकता, दारिद्र्य, अविद्या आणि आत्मग्लानीच्या दलदलीतच परलोकवादी आणि जीवनद्वेष्ट्या तत्त्वज्ञानाचं कमळ फुललं आहे.