लोकप्रतिनिधींसाठी मतदारांनी नैतिक चौकटी आखण्याचा काळ मागे पडला आहे. बुलेट, जेसीबी अशा चिन्हांसह राजकीय पटमांडणी होते, जुगार पुढे चालू राहतो… नीतीशास्त्रात ज्यांचे पारडे अधिक उजवे अशा पांडवांनी द्यूत खेळताना द्रौपदीला पणाला लावले. बाईची किंमत धर्म राजाच्या लेखी नक्की काय असेल, असा प्रश्न या चिरंतन महाकाव्याच्या चिकित्सक अभ्यासकांनी गेल्या शंभरेक वर्षांत अनेकदा विचारला. पण महाभारत हे असंच आहे. विस्कटलेल्या राजकीय पटावरचे नीतीशास्त्र सांगणाऱ्या या ग्रंथातून अनेक प्रश्न निर्माण होतात. तिथे न्यायाची बाजू घ्यायला, समजावून सांगायला भगवान श्रीकृष्ण तरी होते. आता राजकीय पटावर डाव मांडताना सारे नीतीशास्त्र बाजूला ठेवले तर चालते, अशी शिकवण असणाऱ्या सध्याच्या काळात ऑनलाइन पत्ते खेळणे अनैतिक आणि चूक कसे ठरवावे? – द्यूत हा आपल्या परंपरेचा भाग आहे. आपले आजचे राजकारण हाही जुगारच आहे. पटावरच्या सोंगट्या मांडताना, बदलताना बटबटीत आणि आक्रमक राजकीय चिन्हांची रचना मागेच संवेदनाहीन झाली आहे. आता त्याचे ढोल- ताशे आणि नगारे मोठ्या आवाजात आदळत राहतात कानावर. पण तो आवाजही सवयीचा झाला आहे.
राजकीय पटाचे संकेत आणि त्याचा भोवताल लोक कसे स्वीकारतील, याचा नेम नसतो. ‘रॉयल एन्फील्ड’ची ‘बुलेट’ आता प्रचारात अग्रभागी असते. आपला राजकीय व्यवहार बहुतांश वेळा न्यूनतेवर मात करणाऱ्या हिंसेला मान्यता देणारा असतो. बुलेटचा दणदणाटी आवाज सत्ता पक्षाचा दबदबा सांगण्यास पुरेसा असतो, हे विश्लेषणाच्या पातळीवर माहीत असतं नेत्यांना. अखेर राजकीय पटमांडणीमध्ये संकेतांना, चिन्हांना महत्त्व असतंच. या रचनेत आता उत्खनक किंवा जेसीबी- पोकलेन आले आहेत. त्यांची अजस्राता, उपसा करण्याची शक्ती आम्ही सत्ता गाजवू शकतो, या क्षेत्रात खोऱ्याने पैसे ओढता येतो, असा त्यातील संदेश. त्यामुळे क्रेनला लावलेल्या पुष्पहारातून आपली छबी टिपली जावी यासाठीचा पैसे खर्चून आटापिटा होतो.
समूह मानसिकतेवर दबदबा निर्माण करणारी अनेक चिन्हं. काही वर्षांपूर्वी डरकाळी फोडणारा वाघ हे चिन्ह खूप मिरवलं गेलं. आजही ते आहेच. ‘कोण आला रे कोण आला…’ या घोषणेच्या पुढे अनेक पक्षाचे वाघ बाहेर यायचे. ‘पँथर’चंही वजन होतं एकेकाळी. हिंस्रा प्राण्यांचे संकेत वापरून समूह मनावर पकड घेता येते, हे गृहीत धरून राजकीय संकेत आखले गेलेले असतील का? उत्तर होकारार्थीच येईल बहुतेक. अलीकडच्या काळात राजकीय व्यासपीठावर त्रिशूल किंवा तलवारी भेट म्हणून दिल्या जातात. म्यान केलेली तलवार बाहेर काढून ती उंचावण्याचे प्रकारही होतात. यात धार्मिक ओळख अधिक गडद व्हावी असे प्रयत्न अधिक महत्त्वाचे. कधी रुद्राक्ष माळ वापरातून, भगवे कपडे घालण्यावरून किंवा कधी दाढी वाढवून धार्मिक ओळख जपली जावी, यासाठी प्रोत्साहन दिलं जातं.
जनमानसावर प्रभाव निर्माण करण्यासाठी अनेक प्रकारे क्लृप्त्या आखल्या जातात कारण आपलं राजकीय मन हे सतत दुभंगलेलं असावं, ही नेत्यांची इच्छा. सध्या हिंदू – मुस्लीम, दलित – दलितेतर अलीकडच्या काळात मराठा- ओबीसी अशा सहा कप्प्यांमध्ये मतदारांना विभागण्यात आलं आहे. या पलीकडचं पाहू शकणारा मतदार हा सातव्या श्रेणीतला. तो फार तर ‘लाभार्थी’ व्हावा, अशा राजकीय व्यवस्थेत कोणी परदेशात ‘कसिनो’मध्ये दिसले किंवा कोणी सभागृहात पत्ते खेळताना दिसले तरी त्यात वावगं वाटण्याचं काही कारण नाही. सभागृहाचं पावित्र्य वगैरे तशा सर्वसामान्यांच्या कल्पना. त्यांना आपण महत्त्व देण्याचं काही कारण नाही, असं राजकीय नेत्यांना वाटणं साहजिक आहे. स्वत: पत्नीला द्याूतात वस्तूप्रमाणे लावण्याची दुर्बद्धी जर महाभारत काळात होती, तर हे असे छोटेसे खेळ सहन करायला काय हरकत आहे? एका बटबटीत राजकीय संस्कृतीचा खेळ आता बहरात असताना हे सारे घडून येणे स्वाभाविकच म्हणावे लागेल.
कपाळवर मोठा नेमाटा ओढून, मनगटी २५-३० दोरे गुंडाळले नसतील तर तो राजकीय कार्यकर्ता कसला? असा ‘सैनिक’ घडविण्यासाठी एका पिढीने मेहनत घेतली आहे. त्याच वेळी कार्यकर्ते, स्वयंसेवक घडवण्यासाठी बौद्धिक वर्ग घेतले जायचे. अशा शिबिरांतून घडवलेले कार्यकर्ते सतरंजी उचलायला आणि नेतेपदावर मात्र हा नेमाटा लावलेला बटबटीतपणा. पाचही बोटात दहा तोळ्यांच्या सोन्याच्या अंगठ्या घालणारा. इथवरच्या सांस्कृतिक बदलामध्ये द्यूत हेच आपल्या राजकीय संस्कृतीचे खरे चिन्ह असायला हवे. येथे आपल्या सोंगट्या पुढे न्यायच्या असतील तर पुढे जाणाऱ्याला मारून पुढे जायचे, हा या खेळाचा नियम. काही जिल्ह्यांत मारून अर्थ जीवे मारून असाही घेतला जातो.
द्यूत हा खेळ शिव-पार्वतीच्या काळापासूनचा, हे प्राचीन कथांमधून समोर येतेच. या खेळाचे फासे दगडाचे, हस्तिदंताचे, लाकडाचे होते. सिंधुसंस्कृतीमध्येही द्यूत खेळाचे पुरावे आहेत. द्याूत क्रीडेसाठी स्वतंत्र द्यूतसभा बांधल्या जात. ऋग्वेद काळापासून द्यूत खेळणे हे वाईट ठरवले गेले, असा संदर्भ भारतीय सांस्कृतिक कोषात आढळतो. जुगारी द्यूत गृहात येत, त्यांच्यावर करही लावला जाई, असे संदर्भ भागवतामध्येही आहेत. हिंदू धर्मशास्त्रात कोजागिरी पौर्णिमा आणि बलिप्रतिपदा या दोन दिवशी द्यूत खेळण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. म्हणून या दिवसाला द्यूत पौर्णिमा आणि द्यूत प्रतिपदा असेही म्हटले जाते. वेरूळमध्ये एक शिल्पपट्टच सारीपाटाचा आहे. सोंगट्याचा हा खेळ पुढे पत्त्यांमध्ये रूपांतरित झाला की नाही माहीत नाही.
पण पत्ते हे चीनचे अपत्य. चीनमध्ये कागदी चलनाचा वापर सातव्या शतकात रूढ होता. या चलनालाच चिनी लोक पत्त्याप्रमाणे वापरत असावेत. साधारणत: १४८० च्या कालखंडात फ्रान्समध्ये पत्ते बनवले गेले म्हणे. काहींच्या मते पत्ते- गंजीफा- भारतातच बनवले गेले. भारतात इ.स. ८०० च्या सुमारास पत्ते खेळले गेले असावेत. ती परंपरा आता गावाच्या पारावर जशी जपली जाते तशीच ती विधिमंडळाच्या सभागृहातही जपणारे नेते आहेत. युरोपात बाराव्या- तेराव्या शतकापासून पत्ते प्रचलित होते. इटलीमध्ये १२९९ सालातले पत्ते सापडले. टॅरो पत्त्यांची संख्या ७८. एका पत्त्यांच्या डावात जोकर असतो. काही पत्ते ‘मूर्ख’ म्हणून गणले जाण्याची पद्धत होती. लाभाचा असेल तर शुभ आणि नसेल तर अशुभ असेही सांगितले जाते.
पण पत्ते खेळणे आपल्याकडे अगदी सहज. त्यामुळे असल्या इतिहासापेक्षा द्यूत खेळण्यासाठी आपल्याकडे रोजच पौर्णिमा आाणि प्रतिपदा. गावातल्या एका कट्ट्यावर डाव मांडणाऱ्यांची टोळी असायची. आजही असते. अगदी गणपतीच्या भर मंडपातच पत्त्यांचा डाव मांडला गेल्याच्या आणि त्यावर पोलिसांचा छापा पडल्याच्या बातम्या नव्या नाहीत. यामध्ये अस्थानी जुगाराचा डाव मांडणे हा गुन्हाच. मग तो गणपतीच्या मंडपाच्या मागच्या बाजूला असेल किंवा विधिमंडळाच्या सभागृहात. पण पत्त्याच्या डावावरून राजकीय पटावर टीका टिप्पणी झाली ती पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या सरकारवर. भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन आपल्या तडाखेबंद भाषणात एकदा म्हणाले होते ‘ये सरकार ताश की गड्डी है. ५२ पत्ते और दो जोकर.’
नीतिमूल्य हे दोन शब्द एकत्रपणे वापरण्याने बऱ्याचदा गोंधळ होतो. नीती म्हणजे धोरण आणि त्याचे मोल म्हणजे मूल्य असं मनात असतं. पण मोल आणि मूल्य यात एक नैतिक चौकट असते. ही नैतिक चौकट भिरकावून देत काहीही विकत घेता येऊ शकतं, अशी मानसिकता हीच आताच्या राजकीय पटाची खरी ओळख. त्यामुळेच मग ‘खोके – ओके’ अशा घोषणा पुढे येतात. अशा वातावरणात होणाऱ्या हाणामाऱ्या असोत की, सभागृहात ऑनलाइन पत्ते खेळणे… यातील आक्षेपाचा मुद्दा अस्थानी वर्तनाचा आहे. अन्यथा भारतीय मतदारांनी बहुपत्नीत्व, भ्रष्टाचाराचे आरोप यांना कधीच मागे सोडून दिलं आहे. त्या आधारे लोकशाहीतील लोकप्रतिनिधींसाठी जय – पराजयाच्या नैतिक चौकटी आखण्याचा काळ मागे पडला आहे. परिणामी नवं महाभारत कधीही घडू शकतं. आता शहाणिवेचे फासे उलटेच पडू लागले आहेत. कोणीही सखा-त्रातासुद्धा आता दृष्टिपथात नाही. अशा काळात लोकशाहीचं पुरतं वस्त्रहरण होऊ नये, अशी इच्छा मानत बाळगण्यापलीकडे कोणाच्या हातात काय आहे?
suhassardeshmukh@expressindia.com