जमिनी हडप करण्याचे प्रयत्न आणि त्या वाचवण्याची भूमिपुत्रांची धडपड हा झगडा बराच जुना आहे. फकीर मोहन सेनापती यांच्या छ माण आठ गुंठया कादंबरीतील जमिनीसाठी संघर्ष करणारा शेतकरी भारतीय कादंबरीतील अशा नायकांचा आद्या प्रतिनिधी.

जमिनीच्या तुकड्यावर राबराब राबणाऱ्यांना त्या ठिकाणाहून हुसकावून लावण्याची कारस्थानं सदैव रचली जातात. जे कष्टतात त्यांची जमिनीवर अपार माया असतेच, पण जे या जमिनी टाचेखाली घेण्याची जबर आकांक्षा बाळगून असतात त्यांची ओरबडण्याची तहान त्याहून अफाट असते. त्यांचा जबडा विशाल असतो. या जबड्यात भक्ष्य म्हणून आलेले जीव त्यातून सुटण्याची प्राणांतिक धडपड करतात पण ती यशस्वी होत नाही. सत्तेची ताकद अनेक पातळ्यांवर दमवते.

जमिनी घशात जातानाची शेवटची धडपड पालीच्या तुटलेल्या शेपटाप्रमाणे वळवळत असते. फकीर मोहन सेनापती यांची ‘छ माण आठ गुंठ’ ही १५० पानांची कादंबरी स्वत:च्या जमिनीचा तुकडा वाचवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या एका शेतकऱ्याची कथा सांगते. त्यामुळे ही कादंबरी केवळ उडिया साहित्याच्या आधुनिकतेची पायाभरणी करणारी नाही, तर एकूणच भारतीय कादंबरीची नांदी मानली जावी या प्रकारची आहे.

शेख दिलदार हा मिदनापूरचा एक टोलेजंग साम्राज्य असलेला जमीनदार. रामचंद्र मंगराज हा या जमीनदाराकडे वसुलीचे काम करणारा माणूस. आधी कोणीच नसणारा हा मंगराज पुढे स्वत:च प्रचंड संपत्तीचा मालक बनतो. भागीया आणि सारीया या कष्टाळू जोडप्याकडे एक सुपीक असा जमिनीचा तुकडा असतो. संपूर्ण शिवारात हीच जमीन जास्त उपजावू असते. हे जोडपं आपल्या शेतात राबतं, पण त्यांना मूलबाळ नसतं. आपल्याला मूलबाळ नसल्याची खंत त्यांना आहे. धूर्त मंगराज हे हेरून गावातल्या देवीच्या पुजाऱ्याशी संगनमत करतो.

भागीया व सारीया या जोडप्याला फसवतो. गावातल्या देवीची पूजा केल्यानंतर तुम्हाला मूलबाळ होईल असं त्यांना एकाकरवी सांगितलं जातं. हेसुद्धा तो मंगराजच पेरतो. या सांगण्यावरून हे दोघे पूजा करतात. त्याचवेळी त्या जागेवरून एक आवाज येतो, ‘माझ्यासाठी तुम्ही एक मंदिर बांधा. तुम्हाला धनाची कधी कमी पडणार नाही. मुलं बाळं होतील. पण माझा आदेश मानला नाही तर मी भागीयाला जीवे मारून टाकीन’… एके ठिकाणी लपलेल्या माणसाच्या तोंडूनच हे बोललं गेलेलं असतं.

पण त्यावर भागीया आणि सारीया हे दोघे नवरा बायको विश्वास ठेवतात. हे सगळं मंगराजचं कारस्थान असतं. तरीही जणू कुठून तरी आकाशवाणीच झाली, असं या जोडप्याला वाटत असतं. रोज पोटापाण्यासाठी कष्टणारी ही माणसं मंदिर कुठून बांधतील? मंदिर उभारणीसाठी भागीया मंगराजकडे कर्ज मागायला जातो. मी पैसे देईन, पण त्या बदल्यात तुला जमीन गहाण ठेवावी लागेल, असं त्याला सांगितलं जातं. अखेर कर्जाच्या बदल्यात जमिनीचा तुकडा गहाण ठेवला जातो. शेवटी कर्ज काही फिटत नाही. मंगराज ती जमीन हडप करतो. डोक्यावरचं कर्ज आणि नैराश्य यामुळे भागीया अक्षरश: वेडा होतो. एक दिवस त्याची पत्नीही मरून जाते.

कादंबरीच्या शेवटी मंगराजही तुरुंगात जातो. अनेक घटना प्रसंग या कादंबरीत आहेत. जी खलपात्रं आहेत त्यांच्यावरही अखेर दयनीय वेळ येते. अकृत्रिम शैली असलेलं हे गद्या वाचनीय आहे, पण सर्वात महत्त्वाची आहे ती या कादंबरीतली समकालीनता. कादंबरीच्या कथानकात कारुण्य असलं तरी अधून मधून तिरकस अशी शैली या कादंबरीला आणखीच वाचनीय करते. भाषा साधी सरळ आहे. जणू समोर काही लोक ऐकायला बसले आहेत आणि एखादं कथानक सांगितलं जातंय अशा पद्धतीने कादंबरीचे निवेदन आहे. म्हणून ही कादंबरी केवळ वसाहतकालीन सरंजामी व्यवस्थेचे सरधोपट चित्रण करत नाही तर ती एक रूपक म्हणून आपल्यासमोर येते.

…फकीर मोहन सेनापती यांनी चार कादंबऱ्यांसह काही कथा लिहिल्या. त्यांची आत्मकथाही प्रसिद्ध आहे. पण त्यांची सर्वात गाजलेली कादंबरी म्हणजे ‘छ माण आठ गुंठ’. सेनापती यांची दृष्टी सुधारकाची होती. त्यांच्या काही कथांमध्ये आलेलं स्त्री जीवनाचं चित्रण प्रगतिशील अशा दृष्टिकोनातून आलेलं आहे. रेवतीसारख्या कथेत एका मुलीच्या मनात असलेली शिक्षणाची जिद्द खूप उत्कटतेने आलेली आहे. सव्वाशे वर्षांपूर्वी अशा जाणिवा साहित्यात उमटणं ही मोठीच गोष्ट मानली पाहिजे.

१९ व्या शतकात ओडिसामध्ये मिठाच्या उद्याोगाला एक स्थान होतं. इंग्रजी राजवटीत या उद्याोगावर जी एकाधिकारशाही निर्माण झाली, तिचा तिथल्या जनजीवनावर मोठा परिणाम झाला. साधं सरळ जीवन जगणाऱ्या माणसांच्या आयुष्यात संकटं उभी राहिली. फकीर मोहन सेनापती यांच्या ‘बालासोर का देसी नमक’, ‘पुनर्मूषकोभव’ या कथांमधून हे चित्रण वाचायला मिळतं. धर्माच्या नावावर जे अवडंबर माजवलं जातं आणि या क्षेत्रातल्या अपप्रवृत्ती कसा दांभिक व्यवहार करतात त्यावर प्रहार करणाऱ्याही त्यांच्या काही कथा आहेत. उडिया कथेचे जनक म्हणूनच ते ओळखले जातात.

…प्रेमचंद यांची ‘गोदान’ १९३६ साली प्रसिद्ध झाली. त्यातल्या होरी या गरीब शेतकऱ्याला फक्त एक गाय खरेदी करण्याची इच्छा असते. त्याच्याकडेही जमिनीचा एक तुकडा आहे. हा होरी म्हणजे तमाम भारतीय शेतकऱ्यांचा जणू प्रतिनिधीच. प्रेमचंद यांनी एका छोट्या शेतकऱ्याचा संघर्ष गोदानमधून अजरामर केला. तो रुढीग्रस्त अशा दोरखंडाने बांधलेला आहे. इथे सरंजामदारी आहे, सावकारी आहे. गाव आणि शहर अशा दोन्ही पातळ्यांवर हे कथानक पुढे सरकतं. या कादंबरीत वर्गसंघर्षही आहे.

भारतीय शेतकरी कर्जातच वाढतो, कर्जातच जगतो आणि कर्जातच मरतो याचे सूचन करणारी ही कादंबरी. ज्यात संघर्ष आहे आणि कारुण्यही! जीवनाच्या अखेरपर्यंत होरीची ही झटापट चाललेली आहे. गोदान हे त्याचं स्वप्न तो कधीही पूर्ण करू शकत नाही. या कादंबरीतल्या होरीच्याही आधीची ‘छ माण आठ गुंठ’मधल्या भागीयाच्या जीवनसंघर्षाची कहाणी आहे. एका अर्थाने भारतीय कादंबरीत आलेला पहिला शेतकरी नायक म्हणून भागीयाचा निर्देश करावा लागेल असंही अनेक जाणकारांचं म्हणणं आहे. ‘छ माण आठ गुंठ’ कादंबरीतही गाय आहेच. मंगराज भागीयाची गाय चोरून नेतो.

‘दो बिघा जमीन’ मधला शंभू (बलराज सहानी) सुद्धा आपल्या जमिनीच्या तुकड्यात असाच राबत होता. गावातल्या ठाकूर हरनामसिंहकडे शेकडो एकर जमीन आहे पण शंभूच्या जमिनीचा तुकडा त्याच्या डोळ्यात सलतो. गावात कारखाना उभारायचे निश्चित होते तेव्हा हा शंभूच्या जमिनीचा तुकडाच आड येत असतो. आज ना उद्या शंभू तो तुकडा आपल्याला विकून टाकेल असं त्या जमीनदाराला वाटत असतं. पण त्याच्या जबड्यात जाऊ पाहणारा आपल्या जमिनीचा तुकडा वाचवण्यासाठी शंभू शहरात येतो. रक्त ओकेपर्यंत रिक्षा ओढण्याचे काम करतो.

पुन्हा आपल्या गावी परततो. तेव्हा त्याच्या जमिनीच्या तुकड्यावर कारखान्याचे काम सुरू झालेलं असतं. तिथली मूठभर माती तो उचलतो तेव्हा तिथले वॉचमन त्याला हाकलून लावतात. ज्याची जमीन असते, त्यालाच विस्थापित केलं जातं. जमिनीच्या तुकड्यांच्या अशा अनेक कहाण्या आपल्याला अवतीभवती आढळतात. जमिनी हडप करण्याचे प्रयत्न आणि या प्रयत्नातून जमिनी वाचवण्याची भूमिपुत्रांची धडपड हा झगडा बराच जुना आहे. जमीन हे अनेक संघर्षातलं महत्त्वाचं कारण आहे. या संघर्षात बदलत जाणारे मानवी संबंध वर उल्लेख केलेल्या दोन्ही कादंबऱ्यांमध्ये सापडतील. फकीर मोहन सेनापती यांची कादंबरी १८९७ यावर्षी उडिया भाषेत प्रसिद्ध झाली होती. ‘छह बिघा जमीन’ या नावाने तिचा हिंदी अनुवाद प्रसिद्ध आहे.

…आज या संघर्षाची रीत बदलली पण सत्तेचा वरवंटा आणि त्याखाली दबणारे जीव यांच्यातला संघर्ष तोच आहे. भागीयाच्या जमिनीचा तुकडा मंगराज हडपतो. पण तसं करताना त्याला इच्छापूर्तीसाठी देवीचे मंदिर बांधायला सांगितलं जातं. ते बांधण्यासाठी त्याला स्वत:ची जमीन गहाण टाकावी लागते. सत्ता श्रद्धेचा वापर कसा करते हे त्यातून दिसून येईल. आताही गोव्यापर्यंत जाणाऱ्या महामार्गासाठी ज्यांना जमिनीवरून हुसकावून लावण्याचं ठरतंय त्यांना ‘शक्तिपीठ’ दाखवलं जातंय…

लेखक साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

aasaramlomte@gmail.com