शिवकुणाल वर्मा, लेफ्टनंट जनरल
‘फ्रॉम रिव्हेली टु रिट्रीट’ हे लेफ्टनंट जनरल शंकरराव थोरात यांचे आत्मचरित्र अनेक वर्षांच्या अनुपलब्धतेनंतर, येत्या २४ सप्टेंबर रोजी पुन्हा वाचकांहाती येत आहे. त्यासाठी पुण्यामध्ये, सेनाप्रमुख जनरल अनिल चौहान यांच्यासह लष्कराच्या दक्षिण व मध्य विभागीय प्रमुखांच्या उपस्थितीत सोहळा होतो आहे. हा केवळ एखाद्या आत्मचरित्राच्या आवृत्तीचा प्रकाशन समारंभ नसून, लेफ्टनंट जनरल थोरात यांच्या दूरदृष्टीतून आजच्या लष्करी आव्हानांसाठी प्रेरणा घेण्याचा क्षण आहे. कारण याच लेफ्टनंट जनरल थोरात यांनी १९६२ च्या चिनी आक्रमणाचा नेमका अंदाज वर्तवला होता. त्यांच्या म्हणण्याकडे आपण तेव्हा लक्ष दिले असते, या द्रष्ट्या लष्करी अधिकाऱ्याच्या हाती जर लष्करप्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली असती, तर भारताचा इतिहास १९६२ आणि १६६५ च्या युद्धांनी डागाळला नसता.

अर्थात लेफ्टनंट जनरल थोरात यांनी १९६२ च्या चिनी आक्रमणाचाच नेमका अंदाज बांधला होता, पण मी १९६५ मध्ये पाकिस्तानशी लढावे लागलेले युद्धसुद्धा मोजतो आहे. लक्षात घ्या- जर १९६२ मध्ये, चिनी आक्रमणखोरीला आपण यशस्वीपणे पायबंद घालू शकलो असतो, तर १९६५ मध्ये पाकिस्तानची आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत तरी झाली असती का? निश्चितच नाही… त्यामुळे, लेफ्टनंट जनरल थोरात यांना लष्कराचे प्रमुखपद न देण्याची तत्कालीन सत्ताधाऱ्यांची चूक आपल्याला महागात पडली, असे म्हणावे लागते. विशेषत:, मार्च १९६० मध्येच लेफ्टनंट जनरल थोरात यांनी आखलेल्या ‘एग्झरसाइज लाल किल्ला’ या लष्करी योजनेची योग्य दखल त्या वेळी घेतली गेली असती, तर भारतीय सेनादलांना १९६२ च्या पराभवाने खचावे लागलेच नसते.

अनेकांना आजही, लेफ्टनंट जनरल थोरात म्हणजे कोण हे माहीत नसेल. त्यांच्यासाठी अल्पपरिचय देणे आवश्यक आहे. लष्करात ‘एसपीपी थोरात’ या इंग्रजी आद्याक्षरांनीच ज्यांचे नाव आजही आदराने घेतले जाते, ते शंकरराव पांडुरंग पाटील- थोरात १९०६ मध्ये जन्मले. सैन्याधिकारी म्हणून निवड झाल्यावर (ब्रिटिशांच्या ताब्यात भारत असल्याने) इग्लंडमध्ये बर्कशायरजवळील ‘रॉयल मिलिटरी अकॅडमी सॅण्डहर्स्ट’मध्ये त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. सॅण्डहर्स्ट या छोट्या गावातील त्या अकादमीची ख्याती आजही कायम आहे. शारीरिक आणि मानसिक शक्तीची तसेच निर्णयक्षमतांची कसोटी पाहणारे ते प्रशिक्षण घेऊन थोरात भारतात परतले. त्या वेळच्या अनेक ब्रिटिशकालीन लष्करी अधिकाऱ्यांनी स्वतंत्र्यानंतरही मायदेशाचे रक्षण उत्तमरीत्या केले, त्या पिढीतील थोरात हे एक होते. काही वर्षांतच त्यांच्याकडे लष्कराच्या पूर्व विभागाचे प्रमुखपद देण्यात आले.

या पदावर असताना, लखनऊ येथे मार्च १९६० मध्ये थोरात यांनी चिनी आक्रमणखोरीचा अंदाज बांधून पूर्ण मोहिमेची रंगीत तालीम (कमांड पोस्ट एग्झरसाइझ) आखली आणि तडीस नेली. हाच तो ‘लाल किल्ला एग्झरसाइझ’. यासाठीची कागदोपत्री आखणी १९५९ पासूनच त्यांनी सुरू केली होती. मात्र जनरल थिमय्या १९६१ मध्ये पदावरून निवृत्त झाले तेव्हा त्यांच्या जागी थोरात हेच नवे लष्करप्रमुख म्हणून योग्य ठरले असते, ते पद त्यांना मिळाले नाही. असे का घडले, याचे कारण – किंवा राजकारण- असे की, नेहरूंचा त्या काळात लेफ्टनंट जनरल बी. एन. कौल यांच्यावरच भरवसा होता आणि जनरल थिमय्यांनंतर हे पद जनरल प्राण थापर यांच्यासारख्या आज्ञाधारक अधिकाऱ्याला मिळाले आणि त्यामुळे कौल यांचा उत्कर्ष सोपा झाला. चोख काम करणारे, राजकीय वरिष्ठांकडे कामापेक्षा अधिक लक्ष न देणारे थोरात मागे पडले.

पण इतिहासाकडे आज पाहताना हा केवळ व्यक्तींच्या निवडीपुरता भाग मानता येत नाही. त्या काळात लष्कराला दिसणाऱ्या वास्तवापासून राजकीय गृहीतके किती दूर होती, हेही यातून दिसते. ‘लाल किल्ला एग्झरसाइझ’ या सांकेतिक नावाने थोरात यांनी आखलेली मोहीम ही चिनी आक्रमणखोरीचे सारे धोके लक्षात घेणारी होती. ‘आसाम रायफल्स’चा अभ्यासही मी केलेला असल्याने (माझे २००९ सालचे पुस्तक त्याविषयी आहे) माझे निरीक्षण असे की, ऐन दुसऱ्या महायुद्धात जपानी फौजा त्या काळच्या ब्रम्हदेशात (आजचा म्यानमार) थडकल्या आणि आसामच्या दिशेने येऊ लागल्या असताना बॉब खाथिन्ग यांच्या नेतृत्वाखाली ‘व्हिक्टर फोर्स’ या पथकाने जी कामगिरी यशस्वी केली होती, तिच्याशी ‘लाल किल्ला एग्झरसाइझ’चे साधर्म्य होते. जपान्यांच्या रसदीचे मार्ग तोडून, दोन-तीन ठिकाणीच त्यांना झुंजवत ठेवून ईशान्येचा प्रदेश त्या वेळी राखण्यात आला होता.

‘लाल किल्ला एग्झरसाइझ’नुसार अशीच आखणी थोरात यांना अपेक्षित होती. मात्र त्यासाठी मनुष्यबळ कमी आहे, प्रशिक्षण आणि शस्त्रास्त्रे यांचीही वानवा आहे, हे केवळ कागदोपत्री विधान नव्हते तर तालमीतून ते सिद्धही झालेले होते. बळ वाढवून आपण मॅकमोहन रेषेलगत चौक्यांची संख्या जास्तीत जास्त वाढवली पाहिजे आणि प्रसंगी ही रेषा योजनापूर्वक ओलांडून शत्रूला गाफील गाठले पाहिजे, त्याच वेळी ‘२ आसाम रायफल्स’ ने आणखी आघाडी घेऊन चिन्यांचे रसदमार्ग तोडले पाहिजेत, अशी ही गनिमी काव्याची मोहीम होती.

यातला गनिमी काव्याचा भाग महाराष्ट्राच्या मातीतून आलेला आहे, याची जाणीव मला आहे. थोरातांचे घराणे कोल्हापूरचे, लढवय्यांचेच. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून या युद्धतंत्राची महती अनेकांना अवगत आहे. पण, १९६० सालच्या आसपास भविष्यातल्या लष्करी घडामोडींचाही वेध अचूकपणे थोरात यांनी घेतला होता आणि त्याकडे आपल्या धोरणकर्त्यांनी पुरेसे लक्ष द्यायला हवे होते, हा मुद्दा इथे महत्त्वाचा आहे.

या मोहिमेचा संपूर्ण दस्तावेज नवी दिल्लीत पोहोचावा आणि त्याआधारे काहीएक कार्यवाही सुरू व्हावी, यासाठी तेव्हा पूर्व विभागाचे प्रमुख या नात्याने लेफ्टनंट जनरल थोरात पाठपुरावा करत राहिले. पण आपले नेते त्या काळात ‘पंचशील’चा उद्घोष करण्यात आणि ‘हिंदी-चिनी भाई भाई’च्या घोषणा देण्यात मश्गूल होते. थोरात प्रथमपासूनच कुणाची भीडभाड न ठेवता बोलणारे. तेव्हा त्यांना दिल्लीत मित्र कमीच होते. त्यांच्या त्या कागदपत्रांना धोरणकर्त्यांपर्यंत पोहोचवले तर गेले नाहीच; पण खुद्द थोरातांच्याही न्याय्य वरिष्ठपदाची वाट अडवली गेली.

अखेर ऑक्टोबर १९६२ उजाडला. लष्करापुढील आव्हानांविषयीचे थोरातांचे विश्लेषण तंतोतंत खरे ठरले. एकेकाळी ज्या ‘आसाम रायफल्स’ने जपानी फौजांना दणका दिला होता, त्याच आसाम रायफल्ससाठी लेफ्टनंट जनरल थोरातांनी आखलेली भूमिका निभावण्याची संधीच मिळू दिली गेली नाही. पण काळाची पावले चुकली याचा दोष थोरातांच्या दूरदृष्टीला देता येणार नाही. त्यांचे निरीक्षण आणि विश्लेषण किती तंतोतंत होते याची एक आठवण मला माझ्या वडिलांकडून- कॅप्टन अशोककल्याण वर्मा यांच्याकडून- ऐकता आली. त्या वेळी माझे वडील दुसऱ्या राजपूत रेजिमेंटच्या सेवेत वालाँग येथे- म्हणजे अतिपूर्वेकडील सीमेवर होते. साधारण जानेवारी वा फेब्रुवारी १९६१ मध्ये थोरात हे पूर्व विभागाचे प्रमुख या नात्याने तेथे पाहणीसाठी आले, तेव्हा माझ्या वडिलांवर त्यांचे संपर्काधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. ‘चिनी आक्रमण पुढल्या वर्षी (१९६२ मध्ये) झाले, तर ते साधारण २० ऑक्टोबर रोजी होईल’ अशा अर्थाचे विधान थोरात यांनी त्या भेटीत केल्याची माझ्या वडिलांची आठवण आहे… आणि घडलेही तसेच. त्याच तारखेला.

मला ही आठवण माझ्या वडिलांनी १९८१ मध्ये सांगितली, तेव्हापासून मी थोरात यांच्या दूरदृष्टीचा, शत्रूच्या हालचालींचा नेमका ठाव घेण्याच्या त्यांच्या प्रतिभेचा अतुलनीय दस्तावेज असलेल्या ‘लाल किल्ला पेपर्स’बाबत विचार करू लागलो होतो. पुढल्या काही वर्षांत त्यांच्या शोधातही मी होतो. हा दस्तावेज लेफ्टनंट जनरल एसपीपी थोरात यांचे सुपुत्र यशवंत यांच्याकडे असल्याचे मला समजल्यावर मी तेथून ते मिळवून वाचले. थोरातांना संबंधित टापूची, आपल्या आणि शत्रूच्या लष्करी बळाची किती जाण होती हे त्यावरून उमगले.

थोरात यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या नव्या आवृत्तीतील हा भाग केवळ वाचनीयच नव्हे तर प्रेरकही आहे. पण थोरात यांची एकंदर जीवनकहाणी केवळ १९६२ बद्दल नाही. ती दूरदृष्टी, सचोटी आणि व्यावसायिकतेच्या शाश्वत मूल्याबद्दल आहे – जी मूल्ये आजही तितकीच महत्त्वाची आहेत.

लेखिकेच्या अटकेची अटकळ

जेन झी’ पिढीची सर्वात आवडती म्हणून आयरिश लेखिका सॅली रूनीचा दबदबा गेल्या काही वर्षांत आंग्ल साहित्य वर्तुळात तयार झाला. गेल्या महिन्यापासून मात्र वातावरण बदलले. ‘पॅलेस्टाईन अॅक्शन’ ही ब्रिटनमध्ये तयार झालेली संघटना. तिचा उद्देश पॅलेस्टिनी नागरिकांच्या सुरक्षेला पाठिंबा देणारा. गाझामध्ये सध्या सुरू असलेल्या हत्याकांडाला सक्रिय विरोध आणि निदर्शने करणाऱ्या या संघटनेला जुलै महिन्यात ‘दहशतवादी गट’ म्हणून घोषित करण्यात आले. या संघटनेला जाहीरपणे पाठिंबा देणाऱ्या सॅली रूनी हिला ब्रिटनमधील एक महत्त्वाचा पुरस्कार घोषित झाला. मात्र या पुरस्काराच्या स्वीकारासाठी या आठवड्यात ती ब्रिटनमध्ये आल्यास तिला अटक होण्याची चिन्हे अधिक. अटकेच्या अटकळीचे वृत्त आणि या लेखिकेची राजकीय, मानवतावादी मते समजवून सांगणारी गेल्या वर्षीचीच मुलाखत येथे ऐकता येईल.

● https:// tinyurl. com/ nc4 y75 e5 ● https:// tinyurl. com/49 khc7 tf

स्टॅच्यू’ देणारी कथा…

आयशेगुल शवास (Aysegül Savas) असा स्पेलिंगशी फारकत घेणारा नामोच्चार असलेल्या तुर्की लेखिकेची चाळिशी अद्याप उलटायची आहे. पण गेल्या दशकभरात पॅरिस रिव्ह्यू ते न्यू यॉर्करमध्ये तिच्या झळकलेल्या कथा आणि लेखांची संख्या पाहिली, तर त्यावर विश्वास बसणार नाही. कथानकात अचंबित करायला लावणारी बहुस्तरीय रचना हिच्या लेखनाचे वैशिष्ट्य. वाचकाशी ‘स्टॅच्यू’चा खेळ खेळण्यात हुकमत मिळविणाऱ्या समकालातील इंग्रजी लेखिकांत तिची गणना केली जाते. न्यू यॉर्करमधल्या तिच्या सर्व कथा उपलब्ध आहेतच. पण ‘लाँग डिस्टन्स’ या नुकत्याच आलेल्या कथासंग्रहामध्ये असलेली ‘घोस्ट्स’ (जी ‘न्यू यॉॅर्कर’मध्ये नाही) नावाची कथा येथे वाचता येईल.

● https:// tinyurl. com/37 a8 cdju

युद्ध आणि कविता…

प्रत्यक्ष रणभूमीपासून लांब राहून, अंगाला झळ न लावून त्यावर किती भावपापुद्री काव्य साहित्य प्रसवता येते, याची अनेक उदाहरणे आपल्याला मराठीत सापडतील. पण कतरिना काल्येटको या युक्रेनमधील कवयित्री गेल्या दशकभरापासून आंग्लवर्तुळात भेदक युद्धानुभवांच्या काव्य-कथनासाठी परिचित. युद्ध सामान्य माणसांचे आणि संवेदनशील मनांचे आयुष्य बदलून कसे टाकते, हे प्रत्यक्ष जगण्यात युद्धाचे चटके बसलेल्या कतरिना यांच्या ताज्या मुलाखतीतून कळेल. याच कवयित्रीची एक कविता अभिवाचनासह पाहता येईल. एका भारतीय तरुणीने त्या कवितेचे अभिनय सादरीकरण, ‘दाहक’ या आपण घाऊक वेळा वापरणाऱ्या शब्दाला खरोखरीच न्याय देणारे.

● https:// tinyurl. com/52 fpp7 xb

● https:// tinyurl. com/27 vzbp6 b