विसर्जनाचा कालावधी संपून दहा तास लोटले तरी लालबागच्या राजाचा अजून पत्ता नाही म्हणून समुद्राच्या तळाशी पोहचलेले शेकडो गणपती चिंतेत पडले होते. याच अस्वस्थेतून त्यांच्यात कुजबुज सुरू झाली. ‘राजा आता नुसता व्हीआयपी नाही तर व्हीव्हीआयपी झालाय. कुठेही उशिराने पोहचण्याची सवय त्याला जडलीय. एकदा मोठेपण प्राप्त झाले की असेच होते प्रत्येकाचे. असते एकेकाचे नशीब, त्याला आपण तरी काय करणार’ तेवढ्यात दमलेला राजा तळाशी पोहचताच कुजबुज थांबवून सर्वांनी टाळ्या वाजवून त्याचे स्वागत केले.

‘अरे, किती उशीर’ असे एकाने विचारताच राजाने त्याला ‘थांब, सांगतो’ म्हणत शांत केले. थोडा दम घेतल्यावर मग तो बोलू लागला. ‘अरे, फारच हाल झाले या वेळी. मीही तसा नाराज होतोच, म्हटलं दाखवूनच द्यावे विघ्नहर्त्याचा रुसवा काय असतो ते. आधी खूपच चांगले होते रे ते लालबागचे लोक, पण अलीकडे श्रीमंतीच्या वेडाने झपाटलेय साऱ्यांना. तशी माझी किंवा आपली प्राणप्रतिष्ठा हा अलौकिकाचा भाग पण या वेडात साऱ्यांना त्याचाच विसर पडलाय. सारे धावू लागले ते लौकिकाच्या मागे. मला काय वाटते, किती वेदना होतात याचे कुणालाच सोयरसुतक नाही. साऱ्यांच्या नजरा त्या देशातल्या सर्वात श्रीमंत माणसाकडे खिळलेल्या. त्याच्यासाठी गर्दी पांगवणे काय, भक्तांना मागे रेटणे काय? उघड्या डोळ्यांनी हे बघताना मला इतक्या वेदना होत होत्या की तुम्हाला काय सांगू? देव मी की तो असाच प्रश्न माझ्यासकट अनेकांना पडलेला. अरे, माझ्यामुळे यांच्या तिजोऱ्या भरत असतील तर त्या दान करून रित्या तरी कराव्यात ना! पण तेही नाही. ते बिचारे गरीब मराठे मुंबईत आले तर यांनी अन्नछत्र बंद करून टाकले. लोकांची भूक शमवणे हेच ईश्वरी कार्य, पण पैशाच्या नादात त्याचाही विसर पडला त्यांना. श्रीमंतीची नवलाई आपल्याला नव्हतीच कधी, पण मानवजातीतला स्वार्थ अलीकडे फारच वाढत चाललाय. फार वाईट वाटते रे हे बघून. आधी याच लालबागला दहा दिवस माणसांमध्ये रमण्याचा अपार आनंद व्हायचा. आता साऱ्यांनाच पैशाची हाव सुटल्याने गुदमरायला होते मला. माणसाच्या बुद्धीला ‘वाळवी’ लागली की काय असाच प्रश्न मला या वेळी रोज पडत होता. मी काय किंवा आपण काय, तसे सामान्यांचे देव. या वेळी तर व्हीआयपीच्या अवडंबराने अगदी वात आणला मला. आशीर्वाद प्रसन्न झाल्यावर द्यावा लागतो. इथे तर तो मागून घेण्याचीच स्पर्धा सुरू झालेली दिसली.

या दहा दिवसांच्या काळातच लालबागला एका श्रीमंताने ‘हायजॅक’ केल्याची चर्चा होती. विसर्जनाच्या वेळी गुजरातचा तराफा बघून त्याची खात्रीच पटली रे. दरवर्षी मला सुखरूप तळाशी पोहचवणारे कोळीबांधव अगदी हताश नजरेने बघत होते माझ्याकडे. अरे, गुजरातमधून काही आणायचेच होते तर पळवलेले उद्याोग, आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र तरी आणायचे ना! तो धड उभेही न राहता येणारा तराफा आणून काय उपयोग? स्वार्थापायी श्रद्धेचीच माती केली रे यांनी.’ एवढे बोलून झाल्यावर राजाच्या डोळ्यात पाणी तरळले तसे सारे त्याच्याभोवती गोळा झाले. यंदाचे निभावले पण पुढच्या वर्षी काहीही करून या मर्त्यमानवाला धडा शिकवायचाच असा निर्धार साऱ्यांनी केला. तेवढ्यात एक लहानशी मूर्ती तुरुतुरु चालत समोर आली व म्हणाली. ‘पुढच्या वर्षी श्रीमंतांच्या नवसाकडे दुर्लक्ष करायचे’ हे ऐकताच साऱ्यांनी सोंड उंचावून त्याला दुजोरा दिला.