अ‍ॅड. हर्षल प्रधान- प्रवक्ते आणि जनसंपर्क प्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

मराठी माणसांना एकमेकांवर आरोप करण्यास उद्युक्त करणे आणि चौकशीचा ससेमिरा लावून त्यांना आपल्या पक्षात सामील करून घेणे ही भाजपची महाराष्ट्रविरोधी नीती आहे, असा दावा करणारे आणि ‘निवडणुकीच्या आतले ‘युद्ध’ या लेखाला (लोकसत्ता- १ मे) प्रत्युत्तर देणारे टिपण..

सध्या महाराष्ट्राला काळिमा फासण्याचा, बदनाम करण्याचा एक सुनियोजित डाव खेळला जात आहे आणि मराठी माणूस मात्र त्याबाबत अनभिज्ञ आहे. राज्यात मराठी विरुद्ध अमराठी विशेषत: गुजराती, शिवसेना विरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशा लढती लावल्या जात आहेत. भाजपचे केंद्रातील अमराठी नेते ही सुप्त इच्छा बाळगून असावेत की यांनी आपापसातील लढतीत एकमेकांना संपवावे आणि मग सारे काही आपल्या ताब्यात यावे. ‘जगातील चाळीस देशांनी आमच्या बंडाची दखल घेतली,’ ‘शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना अद्दल घडवायला हवीच’ अशी वक्तव्ये केली जातात तेव्हा ती मराठी माणसाला अद्दल घडवण्याच्या उद्देशाने केलेली असतात. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ, अशी स्थिती आज महाराष्ट्रात सर्वत्र दिसते.

मराठी माणसाला मराठी माणसाविरुद्ध लढवले जात आहे. अमराठी माणसे त्यांची ही झुंज बघत टाळया पिटत आहेत. आपापसात लढून एकमेकांना घायाळ करून थकले की यांचा प्रांत तोडता येईल किंवा गिळंकृत करता येईल, हाच त्यांचा डाव आहे. आपल्या मराठी राजकारण्यांना हे कळत कसे नाही? वापर करून झाल्यावर बाजूला सारण्याची भाजपाची मानसिकता आहे. भाजपने किरीट सोमैया यांचाही वापर करून घेतला आणि त्यांना बाजूला सारले. मराठी नेत्यांना बदनाम करण्यासाठी अमराठी किरीट सोमैया यांचा वापर भाजपने केला. किरीट सोमैया यांनीही अतिशय मेहनतीने आपल्या वरिष्ठांना हवे ते केले, मात्र त्यांचा आनंद फार काळ टिकू शकला नाही. त्यांच्या चारित्र्याविषयी चर्चा सुरू होताच त्यांनाही शिताफीने बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. किरीट सोमैयांनी महाराष्ट्रातील मराठी नेत्यांवर केलेले आरोप आठवा..

हेही वाचा >>> ‘प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा’- एक पुनर्वाचन!

नारायण राणे – किरीट सोमैयांनी २०१६ मध्ये नारायण राणे यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. राणेंच्या ‘नीलम हॉटेल अँड ग्रुप ऑफ कंपनी’मध्ये शेकडो कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप सोमैयांनी केला होता. त्यासाठी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कारवाईची मागणी केली होती. राणेंनी काही कंपन्या काढून कमी किमतीचे शेअर्स दाखवले आणि तेच शेअर्स अधिक किमतीला विकून मोठा गैरव्यवहार केला, असा आरोप सोमैयांनी केला होता.

अजित पवार – कथित सिंचन घोटाळाप्रकरणी किरीट सोमैया यांनी अजित पवार यांच्यावर आरोप केले होते. या घोटाळयाच्या पार्श्वभूमीवर सोमैया यांनी मार्च २०१६ मध्ये म्हटले होते, ‘‘अजित पवारांशी संबंधित एका सिंचन घोटाळयातील होमवर्क अंतिम टप्प्यात आहे. याची चौकशी झाली की अजित पवार यांची दिवाळी आर्थर रोड कारागृहात जाणार’’ सिंचन प्रकल्पांच्या कंत्राट वाटपात तसेच त्यांच्या पूर्ततेत अनियमतता आढळली, असे कॅगने म्हटले तेव्हा अजित पवार हे जलसंपदामंत्री होते. त्यामुळे या नियमितता आणि गैरव्यवहाराची जबाबदारी अजित पवारांची आहे, असे तत्कालीन विरोधी पक्षांनी म्हटले होते. महाराष्ट्रात ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता.

अशोक चव्हाण – काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर आरोप झालेला आदर्श घोटाळाही किरीट सोमैया यांनी उघडकीस आणला होता. मुंबईतील आदर्श सोसायटीमध्ये अशोक चव्हाण यांच्या तीन नातेवाईकांना सदनिका देण्यात आल्याचे हे प्रकरण होते. हे प्रकरण समोर आल्यानंतर नोव्हेंबर २०१० मध्ये अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

छगन भुजबळ  – किरीट सोमैया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर वारंवार आरोप केले आहेत. भुजबळ हे सार्वजनिक बांधकाममंत्री असताना झालेल्या महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. लाखो रुपयांची लाच देण्यात आल्याचा हा आरोप होता. या प्रकरणी त्यांना दोन वर्षे  तुरुंगात राहावे लागले. आर्मस्ट्राँग कंपनीच्या नावाने भुजबळांनी काळा पैसा पांढरा केल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला. आर्मस्ट्राँग प्रमाणेच मुंबईतील इमारत- बनावट कंपन्यांच्या नावाने खरेदी करून भुजबळांनी तब्बल १२० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला, असा आरोप सोमैया यांनी नाशिकमध्ये केला होता.

प्रताप सरनाईक – किरीट सोमैया यांनी डिसेंबर २०२०मध्ये शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांच्यावर अनधिकृत इमारत बांधल्याचा आरोप केला. ‘‘प्रताप सरनाईक यांनी २५० कोटी रुपये लाटले असून विहंग हाऊसिंग स्कीममध्ये मोठा घोटाळा केला आहे. त्या कंपनीवर कारवाईदेखील झाली होती. आता ती कंपनीच अस्तित्वात नाही,’’ असा आरोप सोमैया यांनी केला होता. या संदर्भातील कागदपत्रे त्यांनी मुंबईतील अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात सादर केली होती. त्यानंतर प्रताप सरनाईक यांनी किरीट सोमैयांवर १०० कोटींचा मानहानीचा दावा केला होता.

भावना गवळी – भावना गवळी यांच्याविरोधात हायवे घोटाळयाचा आरोप करण्यात आला होता. १०० कोटींच्या घोटाळयात न्यालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

यशवंत जाधव, यामिनी जाधव – यशवंत जाधव, यामिनी जाधव यांचे हवाला किंग उदयशंकर महावार, बिमल अगरवाल यांच्याशी किती कोटींचे व्यवहार झाले? किती शेल कंपन्या स्थापन करण्यात आल्या? किती रक्कम विदेशात पाठविण्यात आली, याचा तपास प्राप्तिकर खाते आणि सक्तवसुली संचालनालय करत आहे.

खरे युद्ध हे आहे

वर नमूद सर्व नेत्यांच्या मागे ससेमिरा लावण्यात आला. त्यांना सातत्याने लक्ष्य केले गेले आणि नंतर त्यांनाच भाजपमध्ये किंवा भाजपच्या गटात ओढले गेले. इतकेच नाही तर यातील अनेकांना लोकसभा निवडणुकीत उमेदवारीही दिली. भाजपच्या उत्कर्षांसाठी अनेक संघ स्वयंसेवकांनी, भाजपच्या कट्टर कार्यकर्त्यांनी खस्ता खाल्ल्या आहेत. पक्ष कार्यालय, संघाच्या प्रात:शाळेपासून सर्वत्र सतरंज्या अंथरण्याचे आणि उचलण्याचे काम ते आजही इमानेइतबारे करत आहेत. त्यांच्यापुढे भविष्यात काय वाढून ठेवले आहे?

किरीट सोमैयांनी ज्यांना भ्रष्ट ठरविले, त्यांचेच झेंडे हाती घेण्याची वेळ भाजपच्या कार्यकर्त्यांवर आली आहे. मोदींना देशाची सत्ता पुन्हा मिळवून देण्यासाठी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा काळ खर्च करायचा आणि त्या मोबदल्यात मिळणार काय, तर भ्रष्ट नेत्यांना डोक्यावर घेऊन मिरविण्याची जबाबदारी! कोण आहेत ही अमराठी माणसे जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिस्त मोडू पाहत आहेत. व्यापाऱ्यांना व्यापार करता यावा आणि देशाची मालमत्ता लुटता यावी म्हणून देशाचा कणा मोडू पाहत आहेत. ज्या संविधानाने सामान्य माणसाला जगण्याचा अधिकार दिला ते संविधान आपल्या स्वहिताला प्राधान्य देता यावे म्हणून बदलण्याच्या विचारात आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरसंघचालक मोहन भागवत मशिदीत जाण्यास कचरत नाहीत मात्र मोदी मुस्लिमांना अधिक मुले जन्माला घालणारा समाज म्हणतात. कशासाठी? कोण आहेत हे जे भाजपवर पूर्ण वर्चस्व मिळवू पाहत आहेत? कोण आहेत हे जे बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेल्या शिवसेनेला नकली सेना म्हणून हिणवत आहेत? जे शरद पवारांसारख्या अनुभवी राजकीय व्यक्तीला भटकती आत्मा म्हणत आहेत? खरे मानसिक युद्ध हे आहे. खरे द्वंद्व हे आहे. भाजपच्या मराठी नेत्यांना का बाजूला काढले जात आहे?  प्रमोद महाजन ज्यांनी भाजप महाराष्ट्रात रुजवला वाढवला त्यांच्या मुलीला तिकीट का नाकारण्यात आले? प्रीतम मुंडे यांना डावलून पंकजा मुंडे यांना तिकीट का देण्यात आले? गोपीनाथ मुंडे ज्यांनी भाजपला बहुजनांचा चेहरा दिला त्यांच्या परिवारावर हा अन्याय का? खरे मानसिक युद्ध हे आहे. ज्या प्रज्वल यांना निवडून आणा असे देशाचे नेते सांगतात त्यांच्याच चारित्र्यावर आज प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. असे असंख्य विषय आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या आणि संघाच्या स्वयंसेवकांच्या मनात सध्या हे ‘युद्ध’ सुरू आहे.