‘धुळे शहराच्या पश्चिमेस ४६ मैलांवरील पिंपळनेर या तीन हजार वस्तीच्या गावी १९०१च्या जानेवारी, २७ तारखेला माझा जन्म झाला. या गावची जमीन सुपीक. शेकडो वर्षांपूर्वी पांझरा नदीला ठिकठिकाणी पाटबंधारे काढलेले. दक्षिणेस सह्याद्रीची उंच शिखरे आणि समशीतोष्ण जोमदार हवा यांचा प्रभाव येथील ग्रामीण जीवनावर चांगला पडलेला होता.

ब्रिटिश आमदानीपूर्वी हा भाग बागलाण प्रांतात होता. चारशे वर्षांपूर्वी या बागलाण प्रांतावर बागलाण आडनावाच्या राजाचे अनेक शतके राज्य होते. हे राज्य आर्थिक दृष्टीने भरभराटीस आले होते, असे जहांगीर बादशहाने या काबीज केलेल्या बागलाण प्रांताच्या वर्णनात लिहिले आहे. या लहानशा गावात अठरापगड जातीची वस्ती आहे. लहान गावात तट पडलेले असतात, तसे या गावातही होते. गावात सुखवस्तूंचा भरणा होता व आजही आहे. गावात तट पडलेले होते, तरी जाती द्वेषमूलक भांडणे नव्हती.

घरची परिस्थिती म्हणजे धट्टीकट्टी गरिबी. वडिलांचा व्यवसाय भिक्षुकीचा. माझे वडील बाळाजी कृष्ण जोशी. ते जोशपणाचा व्यवसाय (पंचांग सांगणे, मुहूर्त काढणे, पौरोहित्य करणे, श्राद्ध, श्रावणी इत्यादी) करीत. ते नाशिकमध्ये शिकले होते. आई भागीरथी मी दोन वर्षाचा असताना निवर्तली. माझे संगोपन माहेरी परतलेल्या मोठ्या बहिणीने मातेप्रमाणे केले. माझी बहीण व माझे वडील भक्तिमार्गी होते. वडीलही अत्यंत सशक्त प्रकृतीचे होते. वयाच्या १३व्या वर्षापर्यंत मला गाईच्या दुधावरच वाढविले होते. गाईचे दूध घरात मुबलक नाही असे कधीही नसेल. घरातील वातावरण अत्यंत धार्मिक होते. माझे उपनयन (मुंज) नवव्या वर्षी झाले, तेव्हापासून मी धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे ब्रह्मचर्याश्रमाचे नियम पाळू लागलो.

आश्रमीय जीवनाची शिस्त वडिलांनी मला आठव्या वर्षापासूनच लावण्यास प्रारंभ केला. उष:काली उठणे, लगेच प्रात: स्तोत्रांचे पठन, शितोदकस्नान, स्वत:चे कपडे स्वत: धुणे, सायं, प्रात: ईश्वरोपासना अथवा संध्योपासना नियमितपणे करणे. भोजनासंबंधी निर्बंधांचे पालन करणे इत्यादी आचारधर्माचे वळण मला लहानपणापासून मिळाले आहे. योगासनाचे शिक्षण मला वयाच्या दहाव्या वर्षी वडिलांनी दिले. ते दक्षिणमार्गी शाक्त व शैव होते. सप्तशतीचे अनुष्ठान व नवरात्र वडील घरी करीत असत. संध्याकाळी सुरू झालेली त्यांची प्रदोषपूजा पाच खास रात्री अकरापर्यंत चाले. मी घरीच वेदाध्ययन केले. शुक्ल यजुर्वेद घरीच शिकलो.

वडिलांनी माझ्या वयाच्या साधारण सातव्या वर्षी मला अमरकोश शिकविला. मी माझ्या ज्या गावात जन्मलो, त्याच्यावर वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. माझ्या घरासमोर देशमुखाचे घर होते. ते अर्थात ब्राह्मण गृहस्थ होते. ते वयाच्या चाळिसाव्या वर्षी संसारातून विरक्त होऊन घरातच जटाभार धारण करून राहू लागले. त्यांचे नाव बाबासाहेब देशमुख होते. त्यांना देवासचे सिद्ध प्रभावी शीलनाथ महाराज यांचा अनुग्रह झालेला होता. हे विरक्त गृहस्थ पूजा व भजन यांमध्ये निरंतर रंगलेले असत. त्यांच्या ओट्यावर सिद्ध वेदांत चर्चा चाले. ते संतांचे अभंग व कविता मधुर आणि उच्च स्वराने गात असत. त्या माझ्या कानावर नेहमी पडत.

पिंपळनेरला त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि लोकमान्य टिळकांचे अनेक भक्त होते. या मंडळींचा अड्डा माझ्या घरी रोज पडत असे. मला १९०८ सालापासूनचे आठवते. आमच्या ओसरीवर ही मंडळी साप्ताहिक ‘केसरी’ वाचन करीत.

क्रांतिकारकांच्या कथाही त्यावेळी सांगितलेल्या आठवतात. लोकमान्य टिळकांना १९०८ साली राजद्रोहाच्या आरोपाखाली सहा वर्षांची शिक्षा झाली, तेव्हा गाव शोकाकुल झाला होता. याचा माझ्याही बालमनावर खोल परिणाम झाला होता. लिहायला व वाचायला मी शाळेत शिकलो. त्यावेळी ‘बिगर’ इयत्ता असे. चौथ्या इयत्तेपर्यंत गावच्या शाळेत शिकलो. त्यावेळचे ते शिक्षण आजच्या सातवीपर्यंतच्या शिक्षणाएवढे असे. मी शाळेत इतिहास, भूगोल, गणित हे विषय शिकलो.

(टीप: पुढील लेखांत भाषणे, लेख, मुलाखतींतील माहिती संकलित स्वरूपात दिली जाईल.)

– डॉ. सुनीलकुमार लवटे / drsklawate@gmail.com