निखिलेश चित्रे
गेल्या अनेक वर्षांपासून लास्लो क्रास्नाहोरकाईचं नाव नोबेलसाठी चर्चेत होतं. चर्चेतल्या नावाला पुरस्कार न देण्याच्या आपल्या परंपरेला छेद देत यंदा नोबेल समितीनं क्रास्नाहोरकाईच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला.

लास्लो क्रास्नाहोरकाईचा जन्म १९५४ साली हंगेरीमधल्या ग्युला या छोट्या शहरात झाला. त्याने सुरुवातीला वकिलीचा अभ्यास सुरू केला, पण नंतर त्याचा ओढा साहित्याकडे वळला. त्याने भाषाशास्त्र आणि हंगेरियन साहित्यात पदवी घेतली. वकिलीच्या अभ्यासाची ही पार्श्वभूमी त्याच्या लेखनात आढळणाऱ्या न्यायसंकल्पना आणि अत्यंत तर्कशुद्ध निरीक्षणातून दिसून येते. बालपणातच त्याने फ्रांझ काफ्काचं साहित्य वाचलं होतं, त्याचा खोलवरचा प्रभाव त्याच्यावर कायम राहिला. काफ्काविषयी तो म्हणतो : ‘‘जेव्हा मी काफ्काचं काही वाचत नसतो, तेव्हा त्याच्याविषयी विचार करत असतो, काही वेळ त्याच्याविषयी विचार केला नाही, तर मला त्याच्याविषयी विचार करण्याची आठवण यायला लागते आणि मी त्याचं पुस्तक काढून वाचायला सुरुवात करतो.’’

जगाचा अंत हा क्रास्नाहोरकाईच्या साहित्याचा केंद्रीय आशयघटक. मात्र, क्रास्नाहोरकाईसाठी जगाचा अंत भविष्यात घडणारी घटना नाही, तर ती रोजच्या जगण्याचीच नैसर्गिक अवस्था आहे. त्याची पात्रं एका ऱ्हासशील जगात कायम खोलवर कोसळत जगत असतात.

दाट काळोखातून येणारा मसीहा…

सेटनटँगो (हंगेरियन उच्चार : शातानतांगो) ही १९८५ साली प्रकाशित झालेली त्याची पहिली कादंबरी त्याच्या लेखनातला महत्त्वपूर्ण टप्पा ठरली. या कादंबरीमध्ये हंगेरीमधल्या सामूहिक शेतीच्या पार्श्वभूमीवर, एका विदीर्ण आणि निराशेने ग्रासलेल्या ग्रामीण परिसराचं चित्रण आहे. या गावातले रहिवासी दारिद्र्य, चिखल आणि दारूच्या व्यसनात अडकून पडलेले आहेत, त्यांची स्थिती पूर्णपणे आशाहीन आहे.

१९८५ मध्ये सेटनटँगो प्रकाशित झाल्यावर हंगेरियन समीक्षकांनी त्याचं लगेच कौतुक केलं आणि या कृतीला ‘युगप्रवर्तक’ मानलं. पेतर बालस्सा या समीक्षकाने कादंबरीचं वर्णन करताना ‘‘भव्य संकल्पना, अतिशय अचूक संपादन, आणि महाकाव्याचा आवाका या घटकांमुळे ही कृती एक थोर साहित्यिक-घटना बनते,’’ अशी विशेषणांची बरसात केली.

याच वेळी एक विरोधाभास निर्माण झाला. अनेक समीक्षकांनी क्रास्नाहोरकाईची भाषा आणि दृष्टिकोन हंगेरियन साहित्य परंपरेशी विसंगत आहेत अशी टीका केली. याचं कारण असं की, जरी त्याने हंगेरीतल्या एका अत्यंत विशिष्ट, गलिच्छ अशा ग्रामीण जीवनाचं अचूक चित्रण केलं असलं, तरी त्याचा वास्तववाद केवळ राजकीय किंवा सामाजिक नव्हता. त्यात मानवी नियती आणि सार्वत्रिक दु:खाचं चित्रण होतं. त्यामुळे तो स्थानिक संदर्भापासून मुक्त झाला आणि जागतिक स्तरावर काफ्का, मार्केस आणि बुल्गाकोव्ह यांच्या कादंबऱ्यांशी त्याची तुलना झाली.

सेटनटँगोच्या हंगेरियन समीक्षेचा भर ‘प्रतीक्षा’ आणि ‘चक्रीयता’ यावर आहे. कादंबरीचा मोठा भाग निष्क्रिय ‘प्रतीक्षेचं’ चित्रण करतो. क्रास्नाहोरकाईने काफ्काच्या एका अवतरणाचा वापर केला : ‘‘मी वाट पाहून ते चुकवेन.’’

सेटनटँगोमध्ये निराशा आणि दारिद्र्याने ग्रासलेले रहिवासी दोन व्यक्तींच्या (इरिमिआस आणि पेट्रिना) आगमनाची वाट पाहतात, त्यांना ते तारणहार (मसीहा) मानतात. इरिमिआसचं नाव बायबलमधल्या संदेष्टा येरेमीशी ( Jeremiah) साधर्म्य असलेलं आहे. मात्र, कादंबरीत हे दोघेही खोटे मसीहा निघतात. ते लोकांना आमिष दाखवून शहरात घेऊन जातात आणि तिथं त्यांना बेवारस सोडून देतात. मानवी दु:ख कोणत्याही बाह्य ‘नेत्यामुळे’ किंवा ‘व्यवस्थे’च्या आश्वासनांनी दूर होणारं नाही, हे लेखक यातून दाखवतो.

कादंबरीचं निवेदन अर्जेंटिनाच्या टँगो नृत्यातल्या मागेपुढे होणाऱ्या चक्रीय हालचालींची आठवण करून देतं. ही चक्रीयता पात्रांच्या गतिहीनतेचं, एकाच जागी अडकल्याचं आणि परिस्थितीतून बाहेर पडण्याच्या असमर्थतेचं प्रतीक आहे. या चक्रीय संरचनेमुळे शेवट पुन्हा प्रारंभाला येऊन मिळतो. यातून पात्रांच्या आयुष्यातला ‘डेड एंड’ सूचित होतो.

क्रास्नाहोरकाईच्या सुरुवातीच्या काळातल्या लेखनात ‘गुदमरल्यासारखं वाटणं’ आणि ‘निराशा’ या भावना अत्यंत तीव्र स्वरूपात व्यक्त होतात. याचं मूळ त्याच्या वैयक्तिक संघर्षात आढळतं. कम्युनिस्ट राजवटीत गुप्तचर पोलिसांनी त्याचा पासपोर्ट जप्त केला. त्यामुळे त्याला प्रवास करायला बंदी होती. ही वैयक्तिक मर्यादा, बाहेरच्या जगाशी संपर्क साधता न येण्याची भावना, त्याच्या साहित्यातल्या ‘एकाकीपणा’ आणि ‘बंदिस्तपणा’ या घटकांना अधिक धार देऊन गेली. यातूनच त्याचा सार्वत्रिक ‘जगाच्या अंताचा’ दृष्टिकोन अधिक गडद झाला, तो केवळ एका विशिष्ट देशापुरता किंवा राजकीय व्यवस्थेपुरता मर्यादित राहिला नाही.

सेटनटँगोनंतर द मेलँकली ऑफ रेझिस्टन्स (१९८९) आणि वॉर अँड वॉर (१९९९) यांसारख्या कादंबऱ्यांनी त्याची ओळख आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रस्थापित केली. त्याला हंगेरीतला सर्वोच्च मानाचा कोसुथ पुरस्कार (२००४) मिळाला. २०१५ मध्ये मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि इतरही अनेक मोठे आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले. प्रख्यात अमेरिकन लेखिका सुझन सॉन्टॅग यांनी त्याची तुलना गोगोल आणि मेल्व्हिल यांच्यासारख्या महान लेखकांशी केली आणि त्याला ‘‘जगाच्या अंताचा समकालीन हंगेरियन उस्ताद’’ असं संबोधलं.

अंधाराकडून सौंदर्याकडे

१९८९ नंतर हंगेरीतला लोखंडी पडदा ( Iron Curtain) हटल्यावर त्याला प्रवास करता आला. या प्रवासांमुळे, विशेषत: आशियातल्या संस्कृती आणि तत्त्वज्ञानाच्या संपर्कात आल्यावर, त्याच्या साहित्याच्या आशयामध्ये सूक्ष्म बदल घडून आलेले दिसतात. त्याच्या लेखनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात राजकीय आणि सामाजिक निराशा यांचं गडद सावट दिसतं, मात्र त्यानंतरच्या टप्प्यात त्याने ‘कलानिर्मिती’ आणि ‘नैसर्गिक वास्तव’ यासारख्या आशयघटकांवर अधिक लक्ष केंद्रित केलं. याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे साईबो देअर बिलो (२००८) हा १७ कथांचा संग्रह क्रास्नाहोरकाईच्या लेखनप्रवासातला ठळक टप्पा आहे. या कथांमध्ये लेखकाची दृष्टी अधिक अंतर्मुख झालेली दिसते. आधीच्या लेखनातला उग्रपणा निवळून त्यात बौद्ध तत्त्वज्ञानातला शांतपणा झिरपलेला दिसतो. या कथांमध्ये कलेच्या उगमाची धूसरता, अनित्यता, कलेला असलेला परतत्त्व स्पर्श अशा चिद्वादी आशयघटकांचं प्राबल्य दिसतं. शीर्षकात उल्लेख असलेली साईबो ही जपानी देवी स्वर्गातून निर्दोष कलाकृतीच्या शोधात पृथ्वीवर येते. विश्वातल्या अनिष्टाचं, विरूपाचं चित्रण करणारा क्रास्नाहोरकाई या कथांमधून मानवी दु:खाचं उत्तर विशुद्ध कलेत शोधण्याचा प्रयत्न करतो.

संथ लयीतला बडा ख्याल क्रास्नाहोरकाईंच्या साहित्याचं सर्वात मोठं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची प्रदीर्घ लांबीची विस्मयकारक वाक्यरचना. त्याची लांब, अखंड, एखाद्या भुलभुलैयासारखी वाक्यं अनेकदा डझनभर किंवा शेकडो पृष्ठांवरसुद्धा पसरतात. वाचकाला ती वाचून त्यांचा अर्थ उलगडण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा लागतो.

क्रास्नाहोरकाईनं स्वत: आपल्या शैलीचं वर्णन करताना, आपलं लेखन म्हणजे ‘‘अक्षरं; मग अक्षरांमधून शब्द; मग या शब्दांमधून काही छोटी वाक्यं; त्यानंतर अधिक लांब वाक्यं आणि मग खूप लांब वाक्यं. नरकात मौज आणि भाषेत सौंदर्य.’’ असं केलं आहे. ही प्रदीर्घ वाक्यरचना शैलीपुरती मर्यादित नाही. तर ती एक तात्त्विक भूमिका आहे.

पूर्णविराम ‘‘देवाचा असतो’’ असं क्रास्नाहोरकाई म्हणतो. मानवी अनुभव, विशेषत: खोलवरच्या भावना, संघर्ष किंवा प्रेम, लहान तुकड्यांमध्ये मांडता येत नाही. मानवी अस्तित्व एक अखंड प्रवाह आहे. या प्रवाहाचं अनुसरण करण्यासाठी, वाक्याचा प्रवाह थांबता कामा नये. यामुळे त्याच्या लेखनात आधुनिक साहित्याप्रमाणे ‘चेतनाप्रवाह’ नसून, दीर्घ वाक्यांतून व्यक्त होणारी जगाबद्दलची सर्वसमावेशक जिज्ञासा आहे. या अत्यंत लांब वाक्यरचनांमुळे वाचकांना एक विलक्षण अनुभव मिळतो. त्याला उसंत न घेता वाचत राहावं लागतं. हा अनुभव दमछाक करणारा असला, तरीही तो वाचकाला सतत पुढे वाचायला भाग पाडतो. म्हणूनच क्रास्नाहोरकाईच्या कादंबऱ्या वाचायला कष्टप्रद वाटल्या, तरी कंटाळवाण्या वाटत नाहीत.

या शैलीचं महत्त्व ‘हेर्ष्ट 07769’(२०२१) या कादंबरीवरून स्पष्ट होतं. ही ४०० हून अधिक पानांची कादंबरी एकाच अखंड वाक्यात लिहिलेली आहे. ही शैली फक्त कथानकाची मांडणी करत नाही, तर ती त्याच्या तात्त्विक भूमिकेला बळ देते. ‘जगाचा अंत ही जीवनाची नैसर्गिक अवस्था आहे.’ या त्याच्या सिद्धांतानुसार, मानवी अस्तित्वाचा संघर्ष हा निरंतर आहे. पूर्णविराम म्हणजे आशा, समाधान किंवा अंतिम उत्तर. पूर्णविराम फक्त दैवी हस्तक्षेपामुळेच येऊ शकतो, आणि तोपर्यंत माणसाचं आयुष्य एका अखंड, न थांबणाऱ्या प्रवाहासारखं सुरू असतं.

क्रास्नाहोरकाई याचं साहित्य हे ‘व्यवस्था’ आणि ‘अराजक’ या मूलभूत संघर्षाभोवती फिरतं. अराजक कायम ज्ञात जगाच्या व्यवस्थेमध्ये शिरून ती उद्ध्वस्त करत असतं. या अराजकाला ‘अनंत’ किंवा ‘वास्तवापलीकडचं’ (transcendent)असंही म्हटलं जातं. क्रास्नाहोरकाईची शैली पारंपरिक विरामचिन्हं आणि कथनाच्या ‘व्यवस्थे’ला नकार देऊन या आदिम अराजकाला भाषिक स्थान देते. तर्कशुद्ध संकल्पनांनी ज्या आदिम गोंधळाला स्पर्श करता येत नाही, त्याचं साहित्यिक अनुकरण त्याची लांब वाक्यं करतात.

क्रास्नाहोरकाईच्या शैलीकडे हा आजच्या आधुनिक, वेगवान जगातला सांस्कृतिक प्रतिकार म्हणून पाहता येतं. त्याची दीर्घ वाक्यं हा माहितीच्या जलद स्फोटाच्या आणि सोशल मीडियावरच्या खंडित कथनाविरुद्ध केलेली एक सहेतुक भाषिक कृती आहे.

त्याचं साहित्य ‘सरलीकरणा’ला स्पष्ट विरोध करतं. तो आधुनिकोत्तर साहित्यातला ‘हलकेपणा’ नाकारून तीव्र स्पष्टता स्वीकारतो.

त्याच्या साहित्यातला सार्वत्रिक अंधकार आणि मृत देवमाशासारख्या प्रतिमांकडे पाश्चात्त्य संस्कृतीच्या अंतिम घडीचं प्रतीक म्हणून पाहिलं गेलं.

राजकीय भाष्य आणि सामाजिक वेदना

क्रास्नाहोरकाई केवळ साहित्यातच नाही, तर सार्वजनिक जीवनातही स्पष्टवक्ता आहे. त्याने हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ओर्बान यांच्या राजकीय व्यवस्थेवर आणि देशात वाढलेल्या राष्ट्रवादावर वेळोवेळी टीका केली. पण या राजकीय भूमिकेतही एक खोल तात्त्विक दृष्टी आहे. ‘‘आज हंगेरीमध्ये कोणतीही आशा शिल्लक नाही, आणि त्याचं कारण केवळ ओर्बान शासन नाहीये. ही समस्या केवळ राजकीय नाही, तर सामाजिकही आहे.’’ असं त्यानं एका मुलाखतीत सांगितलं होतं.

हे विधान त्याच्या साहित्याच्या व्यापकतेकडेही लक्ष वेधतं. त्याचं लेखन केवळ तात्पुरत्या राजकीय टीका-टिप्पणीपुरतं मर्यादित नाही, तर ते मानवी अस्तित्वाच्या मूलभूत निराशेवर, व्यवस्थेच्या अपयशावर आणि सतत सुरु असलेल्या सामाजिक पतनावर भाष्य करतं.

साहित्याचा सिनेमॅटिक विस्तार

लास्लो क्रास्नाहोरकाईच्या लेखनाचं विश्लेषण त्याच्या आणि जगप्रसिद्ध हंगेरियन चित्रपट दिग्दर्शक बेला तार —(Bé la Tarr) यांच्या घनिष्ठ तात्त्विक भागीदारीच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण आहे. या दोघांनी एकत्र काम करणं १९८४ मध्ये सुरू केलं. त्यांनी डॅम्नेशन (१९८८), सेटनटँगो (१९९४) आणि वेर्कमाइस्टर हार्मनीज् (२०००) यांसारखे महत्त्वाचे चित्रपट एकत्र केले. या भागीदारीमुळे क्रास्नाहोरकाईच्या साहित्यातील अस्तित्ववादी ताण जागतिक चित्रपटाच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचला.

दीर्घ वाक्यं आणि लाँग टेक …

लेखन आणि चित्रपटाचं माध्यम भिन्न असलं तरी, या दोघांच्या सौंदर्यशास्त्रात साधर्म्यही आहे. दोन्ही माध्यमांमध्ये लयीला अतिशय महत्त्व आहे.

क्रास्नाहोरकाईने दीर्घ वाक्यांतून वैचारिक काळाचं प्रसरण घडवलं, तर बेला तारनं कॅमेऱ्याच्या लाँग टेकमधून दृश्यकाळाची लय कमी केली.

सेटनटँगो या चित्रपटामधले लांब टेक आणि चक्रीय कथन हे कादंबरीतल्या संरचनेचं हुबेहूब प्रतिबिंब आहे. चित्रपटात अनेक शॉट्स डझनभर मिनिटांपर्यंत अखंड चालतात, त्यामुळे दृश्याला एक जडता लाभते, ती क्रास्नाहोरकाईच्या भाषिक प्रवाहाचं परिणामकारक दृश्यात्मक रूप आहे.

क्रास्नाहोरकाई आणि बेला तार या दोघांमधली भागीदारी केवळ चित्रपटांपुरती मर्यादित नव्हती. तर ती एका सामायिक तत्त्वज्ञानावर आधारित होती. बेला तार यांनी एकदा नमूद केलं होतं की, आपल्या चित्रपटातलं दु:ख हे वैश्विक आहे, केवळ सामाजिक किंवा तात्त्विक नाही, असं बेला तारनं म्हटलं होतं. हे विधान क्रास्नाहोरकाईच्या साहित्यालाही लागू होतं.

निराशेच्या केंद्राकडून आशेच्या उगमाकडे

त्याच्या एका नवीन कथेत त्याने युक्रेनमधल्या युद्धाची तुलना ‘तंत्रज्ञानाच्या जागतिकीकरणाच्या’ आभासी आश्वासनांशी केली आहे. तो केवळ राजकीय विनाशाबद्दल बोलत नाही, तर डेटाचा स्फोट आणि चॅटबॉट्सच्या वाढत्या प्रभावाच्या जगात मानवी अस्तित्वाच्या क्षीण होत चाललेल्या अर्थाविषयीही भेदक भाष्य करतो. वॉर अँड वॉर (१९९९) ही कादंबरी क्रास्नाहोरकाईच्या विश्वदृष्टीचा परिपाक आहे. त्यात कोरिन नावाचा नायक एका हस्तलिखिताच्या शोधानं पछाडलेला आहे. त्या हस्तलिखितात मानवजातीचं अंतिम ज्ञान, शाश्वत सौंदर्य साठलेलं आहे असा त्याला विश्वास आहे. पण ते ज्ञान टिकवून ठेवण्यासाठी तो ते हस्तलिखित इंटरनेटवर अपलोड करून अमर करण्याचा प्रयत्न करतो. त्यातून लेखन आणि तंत्रज्ञान यांचं गुंतागुंतीचं नातं व्यक्त होतं.

कोरिनचा संघर्ष हा मानवी अर्थलालसा आणि इतिहासाचं विस्मरण यातला संघर्ष आहे. हस्तलिखित ही इथे एक आध्यात्मिक महत्त्व असलेली वस्तू आहे, पण तिचं माध्यम डिजिटल बनल्यावर ती अनंत पुनरुत्पादनाचं आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अर्थशून्यतेचं प्रतीक बनते.

क्रास्नाहोरकाईसाठी भाषा ही अजूनही पवित्र आहे. पण आधुनिक जगात तिचं पावित्र्य तिच्या स्वत:च्या भाराखाली ढासळताना दिसतं. हे पावित्र्य टिकवण्यासाठी त्याची पात्रं संघर्ष करतात आणि संघर्षातही ‘शब्दांचीच शस्त्रे’ वापरतात.

क्रास्नाहोरकाईचं सध्याचं लेखन ‘मानवकेंद्रित’ जगातून बाहेर पडून ‘निसर्गकेंद्रित’ किंवा ‘उत्तर-मानवतावादी’ विचाराकडे वळताना दिसतं. एका अर्थानं हा सर्वव्यापी निराशेतून आशेच्या उगमाकडे होणारा प्रवास आहे असं म्हणता येईल.

निखिलेश चित्रे

कथाकार

satantangobela@gmail. com