‘टिकटॉक’ या चिनी अॅप किंवा उपयोजनाची अमेरिकेतील घटिका भरत आलेली असतानाच, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कृपेने त्यास संजीवनी मिळाली आहे. अध्यक्षीय विशेषाधिकार वापरून (एक्झिक्युटिव्ह ऑर्डर) आपण टिकटॉकवरील बंदीला स्थगिती देऊ, असे त्यांनी रविवारी ‘ट्रूथ सोशल’ या स्वत:च्या समाजमाध्यम मंचावर जाहीर केले. ‘अमेरिकेची ५० टक्के मालकी असलेली आणि टिकटॉक अॅपचा समावेश असलेली नवी कंपनी लवकरच स्थापली जाईल. अमेरिकेच्या मंजुरीशिवाय टिकटॉकला अस्तित्व नाही. आमच्या मंजुरीने या कंपनीचे मूल्य अब्जावधी डॉलर्सचे ठरते,’ अशी सूचक पुस्तीही त्यांनी जोडली. अमेरिकेच्या अध्यक्षपदाचा दुसरा कार्यकाळ सुरू झाल्यानंतर त्यांचा पहिला निर्णय बहुधा हाच ठरेल. तसे झाल्यास ट्रम्प यांच्या नावावरील अभूतपूर्व निर्णयांपैकी हाही एक ठरेल. टिकटॉकवरील बंदीसाठी गतवर्षी अमेरिकेच्या कायदेमंडळाने (काँग्रेस) ठराव संमत केला. त्यासाठी बनवलेल्या विशेष कायद्यावर परवाच अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. अशा प्रकारे कायदेमंडळ आणि सर्वोच्च न्यायालयाची मोहोर उमटलेल्या कायद्याला विशेषादेशाद्वारे स्थगिती देण्याचा मुळात अमेरिकेच्या अध्यक्षांना अधिकार आहे का, यावर खल सुरू आहे. टिकटॉकसंबंधी बंदी कायद्यात ही मुदत ९० दिवसांची आहे. तोपर्यंत ५० टक्के बिगर-चिनी, अमेरिकन भागीदारीसाठी शोध घेतला जाणार आहे. ही भागीदारी अमेरिकन कंपनीमार्फत असेल की प्रशासनमार्फत, याबाबत स्पष्टता नाही. ट्रम्प म्हणतात त्यानुसार टिकटॉक खरोखरच अब्जावधी डॉलर्सची कंपनी असल्यास, भागीदारीचा भार उचलण्यासाठी तशीच तगडी असामी लागणार. ती कोण असेल, याविषयी अंदाज बांधणे अवघड नाही. मोजक्याच उद्याोगपतींवर मेहेरबान होण्याची संस्कृती अमेरिकेत रुजू पाहत आहे. जगातील सर्वाधिक उद्याोगप्रधान आणि उदारमतवादी देशाला त्यामुळे या विषयावर इतरांना बोधामृत पाजण्याचा अधिकार उरत नाही.

टिकटॉक हे चीनमध्ये बनलेले अॅप आहे आणि त्याचा वापर केल्यास अमेरिकेची सुरक्षा धोक्यात येऊ शकते, असा दावा अमेरिकेतील राजकारणी विविध मंचांवर अनेकदा करत आलेत. त्यासंबंधी जो कायदा गतवर्षी बहुमताने संमत झाला त्यातील तरतुदीनुसार, महिन्याला १० लाख किंवा अधिक सक्रिय वापरकर्ते आहेत आणि ज्यांची किमान २० टक्के भागभांडवल मालकी चीन, इराण, रशिया आणि उत्तर कोरिया अशा ‘शत्रू’ देशांकडे आहे अशा उपयोजनांच्या मालक कंपन्यांना आपली कंपनी अमेरिकी कंपनीकडे हस्तांतरित करावी लागेल किंवा बंदीला सामोरे जावे लागेल. विविध पाहण्यांनुसार टिकटॉकचे अमेरिकेत जवळपास १७ कोटी वापरकर्ते आहेत. यांत अर्थातच तेथील युवा वर्गाचा हिस्सा मोठा आहे. हा वर्ग टिकटॉकबंदीने नाराज झाला आहे. आता विरोधाभास म्हणजे, मावळते अध्यक्ष जो बायडेन आणि नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या दोघांनीही वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या कारणांसाठी टिकटॉकवर बंदीची भूमिका आग्रहाने मांडली. पण प्रचारासाठी या दोन्ही ‘आजोबां’नी टिकटॉकचा भरपूर वापर केला! त्या वेळी चिनी धोका आड आला नाही. टिकटॉकची मालकी बाइटडान्स या कंपनीकडे आहे आणि आपला चिनी सरकारशी काहीही संबंध नाही, असे कंपनीच्या मालकाने काँग्रेसच्या समितीसमोर सांगितले. त्याचा काहीही उपयोग झाला नाही. परवा अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयालाही बंदीवर शिक्कामोर्तब करताना, ‘टिकटॉक हे संपर्क आणि सामूहिक अभिव्यक्तीसाठी व्यापक आणि वेगळे व्यासपीठ होते’ अशी कबुली द्यावी लागली.

हेही वाचा : पहिली बाजू : समर्पित कार्यकर्त्यांना दंडवत!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वापरकर्त्यांची माहिती उपयोजन कंपन्यांच्या हाती किती प्रमाणात दिली जावी याविषयी अमेरिकी समाज युरोपइतका बंदिस्त आणि कठोर नाही. १८ ते ३४ वर्षे वयोगटातील ४२ टक्के वापरकर्त्यांना खासगी गोपनीयतेविषयी फारशी चिंता नसते, असे गेल्या ऑक्टोबरमध्ये एका पाहणीत आढळून आले. १९९० ते २०१० या काळात जन्मलेल्या जवळपास दोनतृतीयांश वापरकर्त्यांच्या मते खासगी माहितीविषयी चिंतेपेक्षा अशा उपयोजनांतून मिळणारे फायदे अधिक महत्त्वाचे ठरतात. गंमत म्हणजे, जवळपास १२ तासांसाठी टिकटॉक दिसेनासे झाले, त्या काळात आणखी एका चिनी उपयोजनाकडे अमेरिकेतील युवा वापरकर्ते मोठ्या प्रमाणात वळले. मुक्त बाजारपेठेचा पुरस्कार करणाऱ्या संस्कृतीचेच ते प्रतिनिधी आहेत. ती संस्कृती संपवण्याचे काम अमेरिकेतील दोन्ही प्रमुख राजकीय पक्ष करत आहेत. आता ट्रम्प यांनी टिकटॉकला अल्पकाळ संजीवनी दिली असली, तरी टिकटॉकची टिकटिक यापुढे अमेरिकी कंपनीच्या मर्जीनेच चालेल किंवा बंद पडेल, हे उघड आहे.